Premium|Jayant Naralikar : भारतीयांना कोणत्या काळात वावरायचे आहे? डॉ. नारळीकरांचा खडा सवाल!

डॉ. जयंत नारळीकर यांनी सकाळमध्ये अतिथी संपादक म्हणून पद भूषवले असताना लिहीलेला हा महत्त्वाचा लेख (पूर्वप्रसिद्धी १७ मार्च २०१८)
संपादकीयातून डॉ नारळीकरांनी टोचले कान.
संपादकीयातून डॉ नारळीकरांनी टोचले कान.ई सकाळ
Updated on

विज्ञानकथांचा एक लोकप्रिय मसाला असतो परकीय जीवांची पृथ्वीला भेट. अशीच एक विज्ञानकथा आपण वाचतोय अशी कल्पना करूया. करटक आणि दमनक हे दोघे ‘ईटी’. (म्हणजे, थोडक्‍यात एक्‍स्ट्रा टेरेस्ट्रियल) पृथ्वीच्या दिशेने पाठवलेले जीव. त्यांचे संभाषण, विचारक्षमता आणि मुख्यत्वेकरून त्यांचा नियोजित कार्यभाग इत्यादी आपण कथालेखकावर सोडू. पण ते कशासाठी पाठवण्यात आले, ते मात्र वाचकांसाठी स्पष्ट केले पाहिजे.

करटक-दमनक यांना घेऊन येणारे अंतराळ यान पृथ्वीपासून चंद्राइतके जवळ आल्यावर हे दोघे प्रवासी जागे झाले. झोपी गेलेला जागा होण्याजोगे स्थित्यंतर झाल्यावर करटकाने आपल्या मस्तकात रुजवलेल्या संगणकाचा आश्रय घेत म्हटले ः ‘‘दमनका, ठरल्याप्रमाणे आपण पृथ्वीवरील भारत देश पाहणार आणि पाहिले ते आपल्या नोंदीत रूपांतरित करणार आहोत.’’
‘‘बरोबर; आणि तू या भारतवासीयांचे धनात्मक गुणधर्म सांगणार, तर मी ऋणात्मक गोष्टींवर जोर देणार’’ - दमनक.

‘‘चला तर मग! आपण यांच्या चोवीस तासांत मिळेल ती माहिती गोळा करून व्यवस्थित अहवालाच्या रूपात घालून इथे भेटायचे,’’ असे म्हणून करटक आपल्या स्पेसबबलवजा लहानग्या यानात शिरला. दमनकाने त्याचे अनुकरण केले. दोघांचा त्यांच्या भ्रमणध्वनीवर वार्तालाप चालू होता. निघण्यापूर्वी करटक म्हणाला, ‘‘हे भारतीय म्हणाले असते तसे मी म्हणतो ः शुभास्ते संतु पंथानः म्हणजे आपले हे कार्य सफळ होवो.’’

दमनक म्हणाला, ‘‘हे भारतवासी कळत-नकळत दैववादी आहेत. एखादे काम हाती घेतले तर ते तडीस नेण्यास पुरेशी तयारी न करता ते असफल झाले याचे खापर दैवाच्या माथी फोडतात. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे वाक्‍य भारतीय काव्ये वाचताना मला खटकले होते...’’
‘‘खरं आहे दमनका!’’ करटक उत्तरला. तू रामावतारातली पदोक्ती सांगितलीस, तर मी कृष्णावतारातली भगवद्‌गीतेतली उक्ती सांगतो- ‘‘दैवं चैवात्र पंचमम्‌!’’
करटकाच्या मार्गात भारतभूमीत आयोजित केलेल्या अंतराळ प्रक्षेपणाचा प्रयोग होता. विज्ञानाधिष्ठित गणिताचा वापर करून यान आकाशाकडे झेपावले आणि अपेक्षेनुसार ट्रॅजेक्‍टरीवर स्थिरावले तेव्हा ते पाहणाऱ्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी टाळ्या वाजवीत, शेकहॅण्ड करत आनंद व्यक्त केला; पण अभिनंदन करायला अंतराळ संस्थेचे प्रमुख होते कुठे? करटकाच्या प्रश्‍नाला अखेर उत्तर मिळाले, ‘‘ते गेलेत मुंबईला सिद्धिविनायकाचा नवस फेडायला.’’ नवस फेडणे म्हणजे काय हे जाणून घ्यायला त्याने आपल्या डोक्‍यातील संगणकात पाहिले. तेव्हा त्याला आश्‍चर्यच वाटले. एकविसाव्या शतकातला भारतीय अंतराळ प्रक्षेपणासारखे गुंतागुंतीचे प्रयोग करतो; पण नवस फेडतो? त्याचा आपणच वापरत असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानावर विश्‍वास नाही का?

या प्रयोगात स्वावलंबन आहे हे सर्वश्रुत आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांनी एकलव्याची भूमिका वठवत हे नवे ज्ञान स्वतः आत्मसात केले. वेळप्रसंगी त्या क्षेत्रातल्या पाश्‍चात्त्य द्रोणाचार्यांचा राग पत्करून. पाश्‍चात्त्यांनी अशा प्रयोगांसाठी आवश्‍यक सामग्रीवर बंदी घातली तेव्हा भारतीयांनी ती स्वतः तयार केली. त्यासाठी त्यांचे पुरेसे कौतुक करायला नको काय? दमनक हसला आणि म्हणाला, ‘‘काही भारतीय भविष्याऐवजी भूतकालाकडे नजर लावून आहेत. आज विज्ञानाची घोडदौड चालू आहे. तिच्यात भाग घेण्याऐवजी हे लोक पश्‍चातबुद्धी वापरून हे सर्व आपल्या पूर्वजांना माहीत होते, हे अभिमानाने सांगतात आणि त्यांचे संदर्भ शोधू पाहतात.’’ त्यावर करटक हसला. त्याला पूर्वी वाचल्याचे आठवले. आत्मज्ञानाचा धडा देताना कबीरदास म्हणाले होते.
तेरा साँई तुज्झमें ज्यों पहुपनमें बास।
कस्तुरी का मिरग ज्यों फिर फिर ढूढे घास।।

(इथे ‘साँई’ हा शब्द आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या अर्थी घ्यावा.) आज प्रचलित असलेले विज्ञान पृथ्वीवासी भारतीयांना पूर्वी माहीत असते, तर महाभारत काळी विजेचे दिवे, पंखे, नळातून कमी- जास्त येणारे पाणी आदी आज सामान्य समजल्या जाणाऱ्या सुविधा त्या काळच्या राजेलोकांनाही का उपलब्ध नव्हत्या? आजचे राहणीमान पूर्वजांच्या तथाकथित प्रगतीमुळे साध्य झाले नसून, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साह्याने मिळाले आहे, हे विसरून चालेल काय?
त्या दोघांनी- ‘ईटी’नी आपल्या अहवालावर शेरा मारला ः ‘‘भारतीयांनी आत्ममंथन करायला पाहिजे. त्यांना प्रगत मानवाप्रमाणे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मार्गाने जायचे आहे की अंधश्रद्धांचा मार्ग घ्यायचाय? त्यांना नेमके कुठल्या शतकात राहायचेय?’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com