आठवण बाबूजींच्या परीसस्पर्शाची

विजय मागीकर
मंगळवार, 30 जुलै 2019

सुधीर फडके यांची जन्मशताब्दी नुकतीच (२५ जुलै) संपली. बाबूजींचे निधन झाले २९ जुलै २००२ ला. त्यानिमित्त बाबूजींविषयीची एक  वेगळी आठवण.

कोरेगाव पार्कमधील ओशोंच्या समाधीवर कोरलेलं एक वाक्‍य माझ्या कायमचं स्मरणात राहिलंय.- ‘‘He was never born or He never died. He visited this planet earth from... to...’’ हे वाक्‍य सर्व मोठ्या लोकांबद्दल सार्थ वाटतं, विशेषतः ग. दि. मा. - बाबूजी यांच्याबद्दल नक्कीच. बाबूजींचा जन्म २५ जुलैचा. ते परलोकवासी झाले २९ जुलैला. ३० जुलैला त्यांचं पार्थिव दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मी सकाळपासूनच व्यवस्था पाहण्यासाठी तिथं उपस्थित होतो. त्यांच्या पायापाशीच मी दिवसभर उभा राहून दर्शनाची रांग सांभाळणं, आतल्या खोलीत ललिताबाई व फडके कुटुंबीयांना भेटायला कोणाला पाठवायचं, कोणाला नाही, हे बघत होतो. कला, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज, तसेच सर्वसामान्य लोक दर्शनासाठी येत होते.

या सर्वांच्यात मात्र एक वेगळी व्यक्ती माझ्या ठळकपणे लक्षात राहिली. पांढरा सफारी, बूट, सोनेरी घड्याळ, सोनेरी चष्मा, सोनेरी पेन व बरोबर दोन-तीन बॉडीगार्डस. मी त्यांना बाबूजींच्या संदर्भात कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं. त्यांनी मोठ्ठा तुळशी-गुलाबांचा हार पार्थिवावर वाहिला, प्रदक्षिणा घातली आणि नंतर बाबूजींच्या पायावर डोकं ठेवताना त्यांचा बांध फुटला. बराच वेळ ते हालायला तयार होईनात. सगळी रांग खोळंबली. मी अलगद त्यांच्या खांद्याला धरून त्यांना बाजूला केलं आणि एका कोपऱ्यात खुर्ची टाकून त्यांना बसवलं. त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला, त्यावर डोकं टेकवून स्फुंदत-स्फुंदत अश्रू ढाळू लागले. जरा वेळानं मी त्यांना शांत केलं व म्हटलं, ‘‘माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही.’’ त्यावर ते माझा हात असाच घट्ट पकडलेला ठेवून बाबूजींकडे पाहत म्हणाले, ‘‘अरे, हा माझ्यासाठी साक्षात देव होता. मी एकेकाळी पिस्तुलासकट सर्व हत्यारं बाळगणारा गुंड होतो, एक दिवस एका ठिकाणी बाबूजींचा ‘गीत रामायणा’चा कार्यक्रम होता. माझा एक मित्र अचानकपणे मला ते ऐकायला घेऊन गेला. ते ऐकताना मी भारावून गेलो. मला ‘गीत रामायणा’चं वेडच लागलं. परत परत जात राहिलो. अशातच एक-दोन वेळा बाबूजींना भेटण्याचा योग आला. ते माझ्याशी इतक्‍या आत्मीयतेनं वागले आणि माझी समजूत घातली, की मी काय चुका करीत होतो ते माझ्या लक्षात आलं आणि त्यांच्या बोलण्यानं प्रभावित होऊन मी गुन्हेगारी सोडून दिली.’’

‘‘मग आता आपण...’’ माझं वाक्‍य संपायच्या आतच ते म्हणाले, ‘‘मी आता लहान-मोठ्या कंपन्यांची सिक्‍युरिटी कॉन्ट्रॅक्‍ट्‌स घेतो.’’ हे म्हणतानाच त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात दिलं. पुन्हा बाबूजींना नमस्कार करीत, ‘‘बाबूजी माझ्यासाठी देव होता हो...’’ असं म्हणताना त्यांचा बांध पुन्हा फुटला. बाबूजींची ही ताकद विलक्षणच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique memory about Babuji

टॅग्स