esakal | भाष्य : नेम चुको नेदी...
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

भाष्य : नेम चुको नेदी...

sakal_logo
By
वरदा संभूस

नव्या माध्यमांच्या सोयीने वारी, कीर्तन यासारख्या परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सद्यःस्थितीत वारीची परंपरा देश-भाषेच्या सीमा ओलांडत आहे, त्याला तंत्रज्ञान सहाय्यभूत ठरत आहे, हे खरेच; पण महत्त्वाचे म्हणजे त्यातील तत्त्वज्ञानामुळे हे सहजपणे घडत आहे.

अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।।

जून -जुलै महिना आला की वारकऱ्यांना वेध लागतात ते वारीचे आणि पंढरीचे. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा...अशी वारकऱ्यांची अवस्था असते. परंतु, मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात होतो आहे. मानाच्या काही पालख्यांचे प्रतीकात्मक प्रस्थान होऊन पालख्या ज्या त्या मंदिरात स्थिरावल्या आहेत. आपापल्या ठिकाणहून बसने निघून एकादशीसाठी निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालख्या पंढरपूरला पोहोचाव्या अशी योजना राज्य सरकारने घालून दिलेली आहे. ज्या प्रकारचा पालखी सोहळा कोरोनापूर्व काळात योजला जात असे, तसा सोहळा यंदाही होणार नाही. साहजिकच त्यामुळे वारकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. वारीला जाता येणार नाही ही तळमळ समजून घेण्यासाठी मुळात वारीचा अनुभव काय सांगतो याकडे लक्ष द्यावे लागेल. वारी या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले जातात. त्यातील तीन अर्थांचा विचार येथे करू. वारी शब्दात वारंवारिता अध्याहृत आहे. परत परत, प्रतिवर्षी करायची ती वारी. तसंच, वारीचा एक अर्थ येरझार असाही केला जातो. तदनुषंगाने वारी म्हणजे पंढरपूरला पायी करायची येरझार. ‘वार’ या शब्दाचा अमरकोशातील अर्थ समूह किंवा गट. त्यामुळे समूहाने किंवा गटाने करावयाची ती वारी. मर्यादित स्वरूपात होऊ घातलेल्या वारीने जी अस्वस्थता आहे, तिचा प्रत्यक्ष संबंध या तीनही अर्थाने वारी घडणार नाही याच्याशी आहे.

वारीचं भारलेपण हे जितकं पांडुरंगाच्या दर्शनात आहे, तितकंच, किंबहुना काकणभर जास्त समूह भक्तीत आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाडयातून संबंध वारकरी समाज वारीच्या निमित्ताने एकत्र येतो. वारीत चालताना हितगुज करत वर्षभराचा संसाराचा शीण हलका होत असतो. वारीत होणारं रिंगण आणि त्यानिमित्ताने होणारे खेळ नवी ऊर्जा देत असतात. दिंड्यादिंड्यातून होणारी कीर्तनं, प्रवचनं, भारुडं या माध्यमातून आध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञानाची सांगड घातली जात असते. आणि संबंध वारीच आनंद सोहळा होऊन जाते. कोरोनाच्या कारणास्तव हा समूह भक्तीचा आनंद सोहळा अनुभवता येत नाही, हेच शल्य आहे. नवीन नियमांमुळे वारकऱ्यांचा जरी हिरमोड झाला असला, तरी आहे त्या प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणारा तो वारकरी संप्रदाय. बहुसंख्य वारकरी समाजाला पायी पंढरपूरला जाता येत नसले तरी, मनाने वारकरी पंढरपूरच्याच वाटेवर आहेत; ‘मानस वारी’च्या माध्यमातून. सगुण, निर्गुण जयाची ही अंगे, तोचि आम्हा संगे, क्रीडा करी, असे तुकोबा म्हणतात. ठायीच बसून करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा... असाही त्यांचा उपदेश आहे. सद्यःस्थितीतही तो किती प्रस्तुत ठरतो! वारकरी संप्रदायाची भक्ती ही प्रेमभक्ती आहे. प्रेम ये हाता जरी, जेथे नांदू ती पंढरी, या संत नामदेवांच्या ओळीही त्याकडेच निर्देश करतात.

व्हर्च्युअल माध्यमे, मानस वारी

मानस वारी म्हणजे मनाने करावयाची वारी. आणि या मानस वारीला आधार मिळतो आहे व्हर्च्युअल माध्यमांचा. नव्याने उपलब्ध असलेली माध्यमे, सहज उपलब्ध असणारे इंटरनेट आणि स्मार्ट फोन्स यांच्या माध्यमातून व्हर्चुअल वारी आणि मानस वारी यांचा मिलाफ बघायला मिळतो आहे. अनेक दिंड्या - प्रामुख्याने शहरी भागातील - फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या सदस्यांसाठी मानस वारी घडवीत आहेत. आपापल्या ठिकाणी राहून वारीच्या स्मृतींना उजाळा देत, आणि जितका शक्य होईल तितका वारीतला दिनक्रम पाळणे हे मानस वारीमध्ये अभिप्रेत आहे. यामध्ये दिवसातील ठराविक वेळ पारायण, संध्याकाळी हरिपाठ, जमेल त्यानुसार व्हर्चुअल कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन इत्यादी उपक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर सदस्यांनी आपल्या वेळेनुसार दिवसभरात नामजप करणे, आणि जागा उपलब्ध असल्यास १-२ तास भजनीमालेतील अभंगाचं स्मरण करत चालणे अपेक्षित आहे. सामान्यतः वारीत जर काही मनाविरुद्ध प्रसंग घडले तर ‘राम कृष्ण हरि’ म्हणत सोडून देत वारकरी पुढे निघतात. त्याचप्रमाणे घरी राहून मानस वारी करताना घरच्यांबरोबर वादाचा प्रसंग निर्माण झाला, तर वारीची सात्त्विक आचार विचार ही शिकवण आठवणे अपेक्षित आहे.

मानस वारीतील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे पूर्वी केलेल्या वारीच्या आठवणी. अनेक वारकरी व्हाट्स ऍप समूहांवर पूर्वी काढलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून वारीच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत. आणि यावर्षी वारीला पायी जाता आलं नाही तरी कोरोनाचं संकट टळून निदान कार्तिकीला किंवा पुढच्या वर्षी पांडुरंगाची भेट व्हावी, ही आशा प्रकट केली जात आहे.काही दिंड्यानी घेतलेल्या पुढाकाराबरोबरच विविध संतांच्या मंदिर संस्थानांनी देखील वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले आहेत. फेसबुक, यू ट्यूब च्या माध्यमातून काकडा, पूजा, नैवेद्य यांसारखे दिवसातील महत्त्वाचे कार्यक्रम भक्तांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. तसेच प्रतीकात्मक प्रस्थान सोहळ्याचे देखील थेट प्रक्षेपण करण्यात संस्थानांनी पुढाकार घेतला. अनेक व्यावसायिक, तरुण, तसेच परदेशात स्थित असलेले, ज्यांना वारीला जाण्याची इच्छा असूनदेखील प्रत्यक्ष पालखी सोहळ्यात भाग घेता येत नाही, त्यांच्या दृष्टीने व्हर्चुअल वारी ही एक संधी आहे. त्याचप्रमाणे नव्या माध्यमांच्या योगाने प्रत्यक्ष वारी नाही तरीदेखील वारीचे कवडसे देश- परदेशातील उत्सुक आणि अभ्यासकांपर्यंत पोहोचत आहेत. या नव्या माध्यमांच्या सोयीने वारी, कीर्तन यासारख्या परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि वारीशी जोडला गेलेला लोकसमूह अधिकाधिक विस्तारत आहे. वारीची परंपरा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देश-भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विक होत आहे.

मुळातच वारकरी समाजाचा स्वभाव हा द्वंदात्मक नसून समन्वयात्मक आहे. त्यामुळे राज्य यंत्रणेविरोधात दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा आलेल्या कोरोनाच्या परिस्थितीला व तदनुषंगिक निर्बंधांना वारकरी समाज आपल्या समन्वयवादी वृत्तीनेच समोर जात आहे. प्रत्यक्ष वारीत चालण्याची, टाळ मृदूंगाच्या गजरात, पताका खांदयावर घेऊन,‘ होय होय वारकरी’ या आत्मविश्वासाने एक एक गाव जवळ करत आणि मागे सोडत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या पालखी सोहळ्याचे सामाजिक आणि आत्मिक वैभव जरी व्हर्चुअल वारीत नसले, तरी सद्यःस्थितीत वारीची आणि वारकरी मूल्यांची आठवण ठेवत वारीचा ‘नेम चुको नेदी’ हेच उद्दिष्ट आहे. ज्ञानदेवांचा दाखला देऊन सांगायचे तर

‘काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार। बापरखुमादेवीवरू विठ्ठलाचा वारीकर।।

(लेखिका दिल्लीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’ येथे ‘रिसर्च फेलो’ आहेत.)

loading image