भाष्य : पुरवठा साखळ्यांचे अर्थकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Globalization

कोरोनाची महासाथ, रशिया-युक्रेन युद्ध तसेच चीनची बाजारपेठेतील दादागिरी यांच्यामुळे जागतिकीकरणाने आकाराला आलेल्या पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाला आहे.

भाष्य : पुरवठा साखळ्यांचे अर्थकारण

कोरोनाची महासाथ, रशिया-युक्रेन युद्ध तसेच चीनची बाजारपेठेतील दादागिरी यांच्यामुळे जागतिकीकरणाने आकाराला आलेल्या पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाला आहे. बदललेली परिस्थिती लक्षात घेवून पुरवठा साखळी उद्योगात परिवर्तन होत आहे. भारतालाही त्यात संधी असू शकते.

अर्ध्याहून अधिक जागतिक व्यापार हा पुरवठा साखळ्यांमार्फत होतो. ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील एकेका व्यवहारांपेक्षा कच्च्या मालाचे, सुट्या भागांचे उत्‍पादक व पुरवठादार, वितरक, अडते, वाहतूकदार आणि ग्राहक या सर्वांना एकत्र जोडणाऱ्या पुरवठा साखळ्या खूप कार्यक्षमतेने फार मोठ्या प्रमाणावर विनिमय करत असतात. ॲपल, सॅमसंग, ह्युंदाई या सारख्या व्यवसायांनी आणि बांगला देश, व्‍हिएतनाम या देशांनी विशिष्ट पुरवठा साखळ्यांमार्फत मोठी प्रगती साधली आहे.

सन २००० पर्यंत जागतिक पुरवठा साखळ्यांचा झपाट्याने विस्‍तार झाला होता. जगाचा कारखानदार म्‍हणून चीनची कीर्ती झाली होती आणि चीनच बहुतेक सर्व साखळ्यांच्या केंद्रस्‍थानी होता. जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना जिथे कुठे प्रक्रिया खर्च कमी होता, तिथे जायला उद्योजक तयार होते. मोठ्या कंटेनर्समधून स्‍वस्‍तात होणारी जलवाहतूक, सर्व देशांनी कमी केलेले आयातकर यांच्यामुळे जागतिक व्यापाराला देखील मोठी चालना मिळाली होती. त्‍यामुळे पुरवठा साखळ्यांचा विकास झाला; उत्‍पादन प्रक्रिया विभागून जगभर विखुरल्‍या गेल्‍या आणि वाढलेला वाहतूक खर्च जमेला धरूनही त्‍यांनी उत्‍पादन खर्च खूप कमी केला.

मात्र या जागतिक अर्थकारण आणि निर्मितीच्या बदलां‍मुळे अमेरिकेतील कामगारांचा रोजगार गेला. त्यांच्यात असलेली नाराजी, खदखद अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्‍प यांनी घेतलेल्या ‘अमेरिका फर्स्ट’ भूमिकेतून व्यक्‍त झाली होती. याच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या निर्यातीवर कर लावून व्यापार युद्ध सुरू केले होते. ते पदावरून जाईपर्यंत हा संघर्ष सुरूच होता. त्‍यानंतर आलेल्‍या कोरोनाच्या महासाथीमुळे २०२० आणि २०२१ अशी सलग दोन वर्षे उत्‍पादन आणि वितरण यांच्या प्रक्रियेला मोठी खीळ बसली. २०२२मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्‍या आक्रमणामुळे गव्हाच्या पिकाची मोठी हानी झाली; गव्हाने भरलेली जहाजे आणि इंधनाचा पुरवठा रशियाने रोखून धरला. या कोंडीमुळे युरोपमध्ये मोठे अस्‍थैर्य निर्माण झाले. आफ्रिकेतील अनेक देशांमधील अन्नसुरक्षाच धोक्यात आली. इंधनदराचा मोठा भडका उडाला. जगाला ऊर्जा संकट भेडसावू लागले. रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

जागतिकीकरण उलट दिशेने

अर्थशास्‍त्रज्ञांमध्ये मुक्‍त व्यापाराच्या फायद्यांबाबत दुमत नाही; पण आज जागतिकीकरणापासून उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. सुरक्षितता, सार्वभौमत्‍व, स्‍वावलंबन यांना महत्त्‍व देऊन अनेक देशांनी औद्योगिक धोरणे आखली आहेत. त्‍यात विशिष्ट उद्योगांचा विकास करायचे, हे धोरण ठरवले आहे. आता आयात-निर्यात यांच्यावरील बंदी नेहमीची झाली आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी महत्त्‍वाचा कच्चा माल, तंत्रज्ञान आणि उत्‍पादिते यांच्या आधारावर कोणत्‍याही देशाने आमच्यावर हुकुमत गाजवणे आम्‍हाला अमान्य आहे, असे स्‍पष्टपणे नमूद केले. त्यापाठोपाठ लगोलग जैवतंत्रज्ञान, प्रगत सेमीकंडक्‍टर्स यांच्यासाठीचे सॉफ्‍टवेअर यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

या परिस्‍थितीचा पुरवठा साखळ्यांवर अर्थातच मोठा विपरित परिणाम झाला आहे. सुदैवाने त्‍या शाबूत आहेत, मोडून पडलेल्‍या नाहीत, हे मात्र खरे. तथापि, त्‍यांचे स्‍वरूप आता अमुलाग्र बदलले आहे. पहिला बदल म्‍हणजे कार्यक्षमता आणि लवचिकपणा याऐवजी त्‍या आता सुरक्षित राहणे, भक्‍कम बनणे यालाच प्राधान्य देत असताना दिसत आहेत. दुसरे म्‍हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जिथे खर्च कमी होईल, तिथे जाण्यापेक्षा त्‍या आपल्‍या जवळच्या आणि जिथे शांतता आहे तसेच रोजचे व्यवहार निर्धोकपणे सुरू आहेत, अशा प्रदेशांना पसंती दाखवत असल्याचे दिसते.

तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्‍हणजे एकाच पुरवठादारावर अवलंबून राहण्यापेक्षा पुरवठादारांची संख्या वाढवणे, महत्त्‍वाच्या भागांसाठी किमान दोन पुरवठादार राखणे, मधल्‍या टप्प्यांमध्ये अर्धप्रक्रिया केलेला माल, कच्चा माल यांचा साठा बाळगणे, प्रतिकूल परिस्‍थिती उद्भवली तर हाताशी असावा म्‍हणून राखीव साठा ठेवणे या बाबींकडे उत्‍पादक लक्ष पुरवत आहेत. बाहेरून सर्व कामे करवून घेण्याऐवजी स्‍वतः जास्‍त काम करायला व्यवसाय उद्युक्‍त झाले आहेत. अमेरिकेतील चारचाकी वाहने तसेच संगणक बनवणारे उद्योग आतापर्यंत जगभरातून सुटे भाग मागवायचे. आता त्‍यांनी बॅटऱ्या आणि काही भागांचे उत्‍पादन स्‍वतः करायला सुरवात केली आहे.

आधीच्या पुरवठा साखळ्यांमध्ये प्रक्रियेमधल्‍या साठ्यांचे प्रमाण अत्‍यल्‍प असायचे. ‘जस्‍ट इन टाइम’ तंत्रानुसार पुरवठा साखळ्या सतत पुढे पाठवणी करत रहायच्या, कुठेही काही साचू द्यायचे नाही, या सुत्रानुसार चालायच्या. त्यामुळे त्‍यांचा एकूण खर्च खूप कमी असायचा. त्‍याऐवजी आता सुरक्षिततेला महत्त्‍व दिल्‍यावर खर्च आणि म्‍हणून किंमती वाढत आहेत.

सर्वांत महत्त्‍वाचा बदल म्‍हणजे अमेरिकी व्यवसायांनी चीनचे स्‍थान कमी करण्याचे ठरवले आहे. गेल्‍या शतकापर्यंत चीनमध्ये आर्थिक प्रगतीबरोबर लोकशाहीला, उदारमतवादाला चालना मिळेल, असा पाश्‍चिमात्‍य देशांचा होरा होता. मात्र तसे काही होण्याचा संभव दिसत नाही. त्या उलट चीनमध्ये कम्‍युनिस्‍ट पक्षाची पकड सैल होण्याऐवजी अधिक घट्ट होत आहे, हे आता त्‍यांना कळून चुकले आहे. चीनने आपले तंत्रज्ञान चोरून त्‍याच्या बळावर जास्‍त सरस कामगिरी करून दाखवत आपल्‍या स्‍थानाला आणि धक्‍का दिला आहे. या मुद्यावर अमेरिकी व्यावसायिकांचे एकमत झाले आहे. शिवाय, चीनच्या विस्तारवादी, कुरापतखोर धोरणामुळेही चीनबद्दल सावधगिरी बाळगली जात आहे.

व्हिएतनाम, कंबोडियाकडे कल

अर्थशास्‍त्रीय विश्‍लेषण असे दाखवते की, पुरवठा साखळ्यांमध्ये अंतर्गत गतिमानता असते. त्‍यांच्यात शिरकाव करण्यासाठी आणि आत आल्‍यावर वरचे स्‍थान पटकावून जास्‍त मूल्‍यनिर्मिती करण्यासाठी प्रत्येक येणाऱ्याची सतत धडपड सुरू असते. त्‍यातून जी प्रगती होते तिच्यामुळे कामगारांचे वेतन वाढते आणि सुरवातीचा कमी खर्चाचा फायदा नाहीसा होतो. म्‍हणून चीनऐवजी व्‍हिएतनाम, कंबोडिया यांच्याकडे कल झुकतो आहे. म्‍हणून भारतालाही इथे संधी आहे, असे म्‍हटले जाते.

जगात सध्या एकूणच चलन फुगवट्याची स्‍थिती निर्माण झाली असून ती बराच काळापर्यंत टिकून राहील, असा अंदाज आहे. कोरोना महासाथीच्या काळातील उत्‍पादन, वितरण यातील व्यत्‍यय, रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच तापमानवाढीमुळे झालेली शेतमालाची हानी आणि परिणामस्वरूप शेतमालाच्या वाढलेल्‍या किंमती, इंधन आणि खाद्यतेल यांच्या किंमतीत झालेली वाढ, कोरोना काळात सर्व देशात लोकांना शासनाकडून मिळालेले अर्थसहाय्य अशा अनेक घटकांमुळे चलनफुगवटा तयार झाला आहे. त्‍याला पुरवठा साखळ्यांमधील वर उल्‍लेखलेल्‍या बाबींमुळे झालेला खर्च व किंमत यातील वाढीचाही हातभार लागतो आहे.

(लेखिका अर्थशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Vasudha Joshi Writes Russia Ukraine War China Market Globalization

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top