जागवला विकासाचा आत्मविश्‍वास

व्यंकय्या नायडू
शुक्रवार, 26 मे 2017

आमचे इरादे स्पष्ट होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी पुरेसा आहे; परंतु घोषित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा काळ अपुरा आहे. याचे कारण अनेक आघाड्यांवर मोठे अडसर उभे आहेत. त्यातील बहुतांश जागतिक परिस्थितीचे आहेत. ते दूर करून "सबका साथ, सबका विकास' या तत्त्वाला अनुसरून आम्ही पुढच्या दोन वर्षांत सर्व अडथळ्यांवर मात करीत आर्थिक विकासाचा रथ पुढे नेऊ.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गेल्या तीन वर्षांचा प्रवास हा प्रामाणिकपणे आणि जिद्दीने केलेल्या प्रयत्नांचा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेतून आशावादाकडे, गमावलेल्या आत्मविश्‍वासातून सक्षमीकरणाकडे, अनागोंदीकडून सुव्यवस्थेकडे अशी ही वाटचाल सुरू आहे. राष्ट्र म्हणून एका समान ध्येयाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारे नेतृत्व मिळाल्याने देशाचे चित्र बदलते आहे. सक्षमता, ऊर्जा, प्रखर ध्येयवाद ही या नेतृत्वाची वैशिष्ट्ये. अगदी थोडक्‍यात सांगायचे तर "भारतीय' असल्याबद्दल अभिमानाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यात मोदी सरकारला यश आले आहे आणि ही फार मोठी जमेची बाजू म्हणता येईल.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. त्या आधीच्या तीस वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नव्हते. हा अपूर्व जनादेश आणि लोकांनी टाकलेला विश्‍वास याला आपण पात्र ठरले पाहिजे, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. सर्वसामान्य लोकांच्या आशा-आकांक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीनेच गेल्या तीन वर्षांत पावले टाकण्यात आली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशाचे वातावरण बहुतांशी स्थिरावले असून नागरिकांचा नेतृत्वावरील विश्‍वास दृढ झालाय. त्यामुळेच जगात भारताची मान उंचावत आहे. आजवर भारताने ज्या संधी गमावल्या, वेळेचा जो अपव्यय केला, ती सगळी तूट भरून काढण्याच्या जिद्दीने हे सरकार झपाटून काम करीत आहे. मोदींमध्ये देशवासीयांना आशेचा किरण दिसतो आहे.

आता या पायावर पुढची वाटचालही गतीने होईल. देशातील पासष्ट टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्ती 35 वयाच्या आतील असल्याने या अनुकूलतेचा फायदा आम्ही उठवू. समाजाच्या सर्व स्तरांना फायदा होईल, अशा रीतीने विकास साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असून हा विकास शाश्‍वत स्वरूपाचा असेल. आमचे इरादे स्पष्ट होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी पुरेसा आहे; परंतु घोषित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा काळ अपुरा आहे. याचे कारण अनेक आघाड्यांवर मोठे अडसर उभे आहेत. त्यातील बहुतांश जागतिक परिस्थितीचे आहेत. ते दूर करून "सबका साथ, सबका विकास' या तत्त्वाला अनुसरून आम्ही पुढच्या दोन वर्षांत सर्व अडथळ्यांवर मात करीत आर्थिक विकासाचा रथ पुढे नेऊ.

नोटाबंदी आणि वस्तू-सेवा कराकडे वाटचाल ही आर्थिक आघाडीवरची महत्त्वाची कामगिरी आहेच. पण रोजगारनिर्मिती हे जे या सरकारचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्यात काही अडचणी आल्या हे खरे; पण आधीच्या राजवटीने वस्तुनिर्माण क्षेत्र आणि खास करून त्यातील रोजगारनिर्मितीच्या पैलूकडे केलेली डोळेझाक हे त्याचे कारण आहे. यात दुरुस्ती करीत पुढे जाण्याचा सरकारचा निर्धार आहे. प्रतिकूल जागतिक परिस्थितीची झळ भारताला बसू नये, यादृष्टीने सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलणार आहे. "मेक इन इंडिया', "डिजिटल इंडिया', "स्टार्ट अप इंडिया' आदींद्वारे कौशल्य विकासाला सरकारने प्राधान्य दिले आहे. परकी गुंतवणूक आकृष्ट करण्यासारखी स्थिती निर्माण करण्यात यश आल्याने रोजगारनिर्मितीच्या आघाडीवर आम्ही नक्कीच उद्दिष्टे साध्य करू. देशाच्या काही भागात निर्माण झालेले तणाव आणि हिंसाचार याबद्दल सरकारवर टीका होत आहे; पण खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल, की कॉंग्रेसने ज्या प्रकारचे भेदाभेदाचे राजकारण केले, त्यामुळे विविध जातीसमूहांमध्ये कटुता निर्माण झाली. त्याचे दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत. सलोखा आणि बंधुभाव यांची विकासासाठी गरज आहे. त्यातूनच शांतता व समृद्धी येऊ शकते. "श्रेष्ठ भारत-एक भारत' ही आमची दृष्टी आहे. लोकांत परस्परांविषयी संशय व द्वेष निर्माण करणारे कोणतेही वक्तव्य वा कृतीला सरकारचा विरोध आहे. कोणी याविषयी शंका घेऊ नये. सरकारची यशस्वी वाटचाल पाहून अस्वस्थ झालेले विरोधक याबाबतीत सरकारवर टीका करीत आहेत; पण त्यांची कारस्थाने ओळखून जनता त्यांना खड्यासारखे दूर ठेवेल. आम्हाला पाच वर्षांचा जनादेश मिळाला आहे, त्यामुळे लवकर निवडणुका घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. उर्वरित दोन वर्षांत लोकांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी आम्ही अथक परिश्रम करू.

काश्‍मीरची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे, हे खरे. सरकार ती सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही करेल; परंतु ज्यांच्या देशाबाहेर निष्ठा आहेत आणि ज्यांचे हेतूच देशविरोधी आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार नाही. मात्र ज्यांचा देशाच्या सार्वभौमत्वावर विश्‍वास आहे, त्यांच्याशी नक्कीच संवाद साधू. भारताची विकासाची यशस्वी वाटचाल ज्यांना पाहावत नाही, ते या वाटचालीत अडथळे आणू पाहात आहेत. त्यांना न जुमानता आम्ही पुढे जाऊ. शेजारी देशांशी मैत्रीचे मोदी सरकारचे प्रयत्नही सफल झाले आहेत. चीनने "वन रोड वन बेल्ट' परिषद आयोजित केली आणि त्यावर भारताने बहिष्कार घातला, मात्र इतर छोट्या शेजाऱ्यांनी भारताला एकटे पाडले, अशी टीका होत आहे. पण ती निराधार आहे. एकतर भारत सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. दुसरे म्हणजे इतरही अनेक जण चीनच्या प्रस्तावाविषयी साशंक आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून शेजाऱ्यांशी भारताने उत्तम संबंध निर्माण केले आहेत. अपवाद पाकिस्तानचा. परंतु, त्याला तेथील अंतर्गत परिस्थिती कारणीभूत आहे. एकूण विचार करता, जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्याची मोदी सरकारची कामगिरी लक्षणीय ठरली आहे, हे नक्की.

(लेखक केंद्रीय नगरविकास मंत्री आहेत.)

Web Title: venkaiah naidu writes in sakal three years of modi govt