विजू कुठे आहे?

विजू कुठे आहे?

‘सरदार’ फारच लवकर म्हणजे १९९२ मध्ये काळाच्या पडद्याआड गेला. ‘गब्बरसिंग’ची भूमिका अजरामर करणाऱ्या अमजद खानचा ‘शोले’मधील एक साथीदार ‘सांबा’ म्हणजे मॅकमोहन २०१० मध्ये ‘सरदारा’ला भेटायला गेला आणि सोमवारी त्यांचा साथीदार ‘कालिया’ म्हणजेच विजू खोटेही गेला.

१९७५ मध्ये ‘शोले’ हा मल्टिस्टार चित्रपट पडद्यावर झळकला, तेव्हापासून विजू खोटेला कोणीही विजू खोटे म्हणून ओळखलेच नाही. ‘कालिया’ हीच त्याची ओळख झाली होती. संपूर्ण चित्रपटात ‘मैंने आप का नमक खाया है, सरदार...’ एवढा एकमात्र संवाद वाट्याला आलेल्या खोटेने ती भूमिका अजरामर केली, एवढी एकच बाब त्याच्या अभिनयगुणांची प्रशंसा करायला पुरेशी आहे. मुंबईच्या गावदेवी या गजबजलेल्या वस्तीत आयुष्य काढलेल्या विजूने ‘पॅकअप’ केले, तेव्हा त्याचे वय ७८ होते. त्यामुळे ‘अहो-जाहो’तच त्यांना श्रद्धांजली वाहायला हवी. मात्र, दुय्यम भूमिका करूनही आपली छाप पाडणाऱ्या अनेक कलावंतांचे जे होते, तेच विजूचेही झाले होते आणि त्यामुळे सारे त्याला ‘ए कालिया’ वा ‘विजू’ म्हणूनच संबोधित. खरे तर ‘शोले’ चित्रपटाला चार दशके उलटून गेली, तरी आपल्या मनाच्या पडद्यावर ‘कालिया’ची भूमिका अजरामर करणाऱ्या विजूला ‘अरे-तुरे’तच संबोधावे लागते. विजूने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात १९६४ मध्ये केली आणि तेव्हापासून त्याने हिंदी, मराठी अशा चारशेहून अधिक चित्रपटांत काम केले होते.  ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील त्याची ‘रॉबर्ट’ ही भूमिका आणि ‘गलती से मिस्टेक किया!’ हा डायलॉगही आज अनेकांना आठवला असेल. नंदू खोटे या मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा विजू हा मुलगा आणि त्याच्याबरोबर त्याची मोठी बहीण शुभा खोटेही असंख्य चित्रपटांत झळकली होती.      

प्रसिद्ध अभिनेत्या दुर्गा खोटे विवाहानंतर या कुटुंबात दाखल झाल्या आणि त्यांच्याकडूनच या सर्वांनी अभिनयाचे धडे घेतले असणार. ‘जीने की राह, अनोखी रात, तपस्या, शरीफ बदमाष’ अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले. त्याच्या निधनानंतर अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्‌वीट केले ते ‘विजू कुठे आहे?’ असेच. विजूने केलेला शेवटचा चित्रपट ‘जाने क्‍यूँ दे यारो’. पण आता तो नव्या भूमिकेत दिसणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com