आव्हानयुक्त काटेरी मुकूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vikas jhade writes about congress president election Mallikarjun Kharge shashi tharoor Assembly elections

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शिरावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाचा गुजरात, कर्नाटकसह अकरा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून कस लागणार

आव्हानयुक्त काटेरी मुकूट

- विकास झाडे

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शिरावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाचा गुजरात, कर्नाटकसह अकरा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून कस लागणार आहे. काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करणे, युवक वर्गासह कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करत, ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेत सक्षम नेतृत्व द्यावे लागणार आहे.

नवचैतन्य देणारा दीपोत्सव. कष्टकऱ्यांच्या श्रमांचे मोल सांगणाऱ्या कृषी संस्कृतीचा हा उत्सव. पसायदानातही ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ म्हटले आहे. माणसांसकट, किडे-मुंग्या आणि वृक्षवल्लीतही दुर्दम्य आशावाद आणि जगण्यावरचे नितांत सुंदर प्रेम अनुभवण्याचा हा काळ. समाजात सकारात्मकता पेरणारा हा सण. राजकारणही यापासून दूर कसे असेल. १३७ वर्षांचा इतिहास असलेल्या कॉँग्रेसने अंतर्बाह्य बदलण्याचा केलेला संकल्प आणि सकारात्मकता दाखवून केलेली अध्यक्ष बदलाची कृती या पक्षासाठी आणि कदाचित संपूर्ण देशासाठी भविष्यात आशेचा किरण ठरू शकेल.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गेले तीन दशके, म्हणजे १९९१ पासून ‘१० जनपथ’ हे शासकीय निवासस्थान कॉँग्रेसचे शक्तीस्थळ म्हणून उदयास आले. पुढे ‘१० जनपथ’ आणि सोनिया गांधी असे समीकरण झाले. १५ हजार चौरस मीटर विस्तीर्ण परिसराच्या या निवासस्थानाने अनेक चढउतार बघितले आहेत. कधी सुगीचे दिवस फुलले, तर कधी निराशेचे मळभही दाटले. कॉंग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या. कार्यकाळात त्यांनी विविध राज्यात काँग्रेसची सरकारे आणली.

केंद्रात सलग दोनदा घटक पक्षांच्या सहकार्याने काँग्रेसची सत्ताही होती. सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर कॉँग्रेसच्या प्रत्येक दिग्गज नेत्यांच्या भाग्याचा फैसला येथेच झाला. महाराष्ट्रापुरते नमूद करायचे तर कॉँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे २००४मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) घटक झाले. त्यासाठीची रणनीती येथेच आखली गेली. ‘यूपीए’मधील प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांस ‘१०, जनपथ’चे उंबरठे झिजवावे लागत. विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून सुशीलकुमार शिंदेंना तेथे आणण्याचा आणि २१ महिन्यानंतर पुन्हा देशमुखांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय इथलाच. आदर्श घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाण यांच्याबाबत निर्णय घेणारी बैठक येथेच झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा ताज चढविण्याचा संकल्प सोनिया गांधींनी येथेच केला. ‘यूपीए’तील सर्वात प्रभावशाली पक्ष म्हणून काँग्रेसच कायम राहिली.

इतिहासाचे साक्षीदार

केंद्रात २०१४ मध्ये सत्तांतर झाले. नंतरच्या काळात कॉँग्रेसची प्रचंड घसरण झाल्याचा ठपका नेतृत्वावर ठेवण्यात आला. कॉँग्रेससारखी आपली दुरवस्था होऊ नये म्हणून ‘यूपीए’तील घटक पक्ष त्यांच्या राज्यात स्वत:ला स्थिरावण्यासाठी मशागत करायले लागले. ‘१०, जनपथ’मधील गर्दी ओसरली. याला लागूनच ‘२४, अकबर रोड’ हे कॉँग्रेसचे मुख्यालय आहे. त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची गौरवशाली वर्षे, राजीव गांधींचे नवे प्रयोग आणि त्यानंतर सोनिया पर्व अनुभवले आहे. कॉँग्रेस आता आपल्यासाठी लाभदायक नाही म्हणून या वास्तुकडे पाठ फिरवणारे नेतेही असंख्य आहेत. कार्यकर्त्यांविना हे मुख्यालय ओस पडले. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निमित्ताने पक्षाला नवनिर्वाचित अध्यक्ष मिळाले आहेत. परंतु प्रश्न असा निर्माण होतो, ‘१० जनपथ’मध्ये पूर्वीचे दिवस येतील का? ‘२४ अकबर मार्ग’ला पुन्हा सोनेरी काळ अनुभवता येईल? की या दोन्ही वास्तू इतिहासजमा होतील.

दिल्लीच्या ल्युटन्स झोनमध्ये काही वास्तूंना विशेष महत्त्व आहे. मल्लिकार्जुन खर्गे ज्या ‘१०, राजाजी मार्ग’ या वास्तूत राहतात तिथे आधी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी राहायचे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना मुखर्जी यांचा सल्ला घेण्यासाठी याच वास्तूत गेले होते. ज्ञानगंगेच्या स्वरुपात या वास्तुकडे पाहिले जाते. अब्दुल कलाम राष्ट्रपती भवन सोडून इथे वास्तव्यास आले तेव्हा त्यांनी एका माळ्यावर वाचनालय तयार केले होते. खर्गे यांचेही वाचन प्रचंड असते. ते घरी-दारी कुठेही असो, त्यांच्या हाती पुस्तक असतेच. खर्गे यांना आठ भाषा येतात. त्यांचे मराठीवरही प्रभुत्व आहे. ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले असले तरी अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. ‘१०, जनपथ’ला होते तसे वैभव ‘१०, राजाजी’ला येऊ शकेल काय? निवडणुकीपूर्वीच खर्गे हे गांधी परिवाराचे उमेदवार आहेत, असा संदेश सर्वत्र गेला. त्यामुळे ही निवडणूक नाममात्र आहे, एकतर्फी होणार असे संकेत होते. झालेही तसेच. त्यांनी शशी थरुर यांचा पराभव केला. प्रचंड मताधिक्याने खर्गे विजयी झाले. निकालानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांची पक्षावर मजबूत पकड आणि दबदबा असल्यावरही शिक्कामोर्तब झाले.

आव्हानांची मालिका

खर्गे यांची पक्षाध्यक्षपदाची खुर्ची काटेरी आहे. ६० वर्षांचा त्यांचा राजकीय अनुभव पाहता ते पुढ्यात असलेल्या आव्हानांवर मात करतीलही. २०२४च्या लोकसभा निवडणुकीची रणनीति आखताना कॉँग्रेसकडे मतदार पुन्हा परत कसे येतील यासाठी खर्गेंना दमदारपणे संघटनात्मक रचना करावी लागणार आहे. गांधी परिवाराचे निकटवर्ती म्हणून वषार्नुवर्षे पद अडवून बसलेल्या नेत्यांना मुख्यालयातून बाहेर घालवण्याचे आणि त्यांना लोकांमध्ये पाठवण्याचे धाडस त्यांना करावे लागेल. खर्गे अध्यक्ष झाल्यापासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत ११ राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभांच्या निवडणुका तोंडावर आहेत. परंतु पक्षाचे अद्याप नियोजन नाही.

या राज्यांमध्ये त्यांना ताकद वाढवावी लागणार आहे. नाराज गटातील नेते निवडणुकीत खर्गे यांच्यासोबत होते, ही जमेची बाजू आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणत पक्षाच्या हितासाठी त्यांना धडाडीने कार्य करावे लागेल. खर्गे यांनी आधीच सांगितले की, ते गांधी परिवारास आदर्श मानतात. त्यामुळे ते त्यांचा सल्ला घेतीलच. हे करीत असताना ‘डॉ. मनमोहन सिंग हे केवळ नामधारी पंतप्रधान होते आणि सोनिया गांधीच सरकार चालवित होत्या’, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तसा शिक्का खर्गे यांच्यावर लागला तर पारदर्शकतेने निवडणूक घेतल्याचे आणि पक्षात लोकशाही असल्याचे सांगत फिरण्यास कोणताही अर्थ उरणार नाही. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दोघांनाही पक्षात कायम राखत व्यवहार्य तोडगा काढावा लागेल.

पुढच्या वर्षी खर्गेंचे गृहराज्य कर्नाटकात विधानसभा निवडणूक आहे. १७७२ मध्ये खर्गे पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्यात कौशल्य असल्याने लगेच मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेव्हापासून या राज्यात जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा तेव्हा ते मंत्री होते. खर्गे यांच्याकडे अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा काळ असणार आहे. तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत ‘चौकीदार चोर आणि गब्बर सिंग टॅक्स’ अशा प्रकारे थेट आरोप करीत संसद दणाणून सोडली होती. सरकारला रोखठोक जाब विचारणारा काँग्रेसमध्ये तसा दुसरा कुठलाही नेता दिसला नाही. सरकारला घेरण्याचे बळ खर्गेंना स्वत:मध्ये आणि प्रत्येक नेत्यांमध्ये आणावे लागले. तशाही राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने कॉंग्रेस किती राज्य काबीज करण्यात यश मिळवते त्यावर खर्गेंच्या नेतृत्वाचे आणि कार्यपद्धतीचे मूल्यमापन होणार आहे.