राज आणि नीती : सौम्य-संपदेचा दीपोत्सव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज आणि नीती : सौम्य-संपदेचा दीपोत्सव!
राज आणि नीती : सौम्य-संपदेचा दीपोत्सव!

राज आणि नीती : सौम्य-संपदेचा दीपोत्सव!

sakal_logo
By
विनय सहस्रबुद्धे

भारताबद्दलच्या सदिच्छा जोपर्यंत भारताविषयीच्या योग्य, वस्तुनिष्ठ आणि निर्दोष आकलनात परिवर्तित होत नाहीत, तोपर्यंत या व्यापक सदिच्छेचे रूपांतर सौम्य संपदेत होऊ शकत नाही. ती संपदा निर्माण होण्यासाठी मात करायला हवी, ती आत्मविस्मृती आणि बौद्धिक आळस या दोषांवर.

भारतासारखे अफाट सदिच्छा-संपदा (गुडविल) संपादन केलेले देश अगदी मोजके असतील. काही शेजारी देश आणि आफ्रिकेतील एखाद्‌ दुसऱ्या देशाचा अपवाद वगळला तर भारत आणि भारतीयांबद्दल सर्वत्र प्रेमाची, सदिच्छेची भावना आढळते. पण ‘सॉफ्ट-पॉवर’ किंवा ‘सौम्य संपदा’ हा वैश्‍विक राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा बनत असताना तेवढे पुरेसे नाही. भारताबद्दलची सदिच्छा जोपर्यंत भारताविषयीच्या योग्य, वस्तुनिष्ठ, निर्दोष आकलनात परिवर्तित होत नाही, तोपर्यंत या व्यापक सदिच्छेचे रूपांतर सौम्य संपदेत होऊ शकत नाही.

भारताविषयीची विश्‍व समुदायाची जाण जेवढी विकसित व्हायला हवी, तेवढी ती न होण्यामागे अनेक कारणे आहेत. काहींच्या बाबतीत खरोखरच अनभिज्ञता आहे, तर इतर अनेकांचे अज्ञान वास्तवाकडे जाणूनबुजून डोळेझाक करणाऱ्या अप्रामाणिक आणि ‘राजकारणप्रेरित'' बुद्धिजीवी मंडळींसारखे आहे. भारतीय समाजाची आत्मविस्मृती आणि आपला ‘बौद्धिक आळस’ ही कारणे त्यामागे आहेत. या स्थितीचा भारतविरोधी लोकांनी लाभ उठविला. परदेशी विचारपीठे, विद्यापीठे, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि स्वयंसेवी संस्था या वर्तुळात मुख्यत्वे बोलबाला राहिला आहे, तो भारतात जे जे काही नकारात्मक घडते त्याचा. प्रामुख्याने वैगुण्यांचा. बोलघेवडेपणा करून याच गोष्टी मांडणाऱ्या तथाकथित अभ्यासकांचा.

भारताविषयी सकारात्मकतेने लिहिणाऱ्यांचे लेख युरोप वा अमेरिकी नियतकालिकांतून अपवादानेच आढळतील. तिथल्या विद्यापीठांमधून नियुक्त झालेल्या आणि मानव्यविद्या शिकविणाऱ्या भारतीय प्राध्यापकांमध्येही सतत भारतविरोधी भूमिका घेऊन आपल्या वस्तुनिष्ठतेबद्दल प्रस्थापितांचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांची बहुसंख्या राहिली आहे. भारतीय संस्कृती आणि समाजातील वैगुण्यांबद्दल सतत व्यक्त होणे, हा अशा मंडळींचा परदेशी प्रस्थापित होण्यासाठीचा जणू पासपोर्टच झाला आहे. या निरंतर आत्मप्रताडनेच्या मानसिकतेचे मूळ आपल्या समाजमानसावर झालेल्या वसाहतकालीन संस्कारात आहे किंवा काय, हा संशोधनाचा विषय आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती व कलांचे एक गाढे अभ्यासक आणि श्रीलंकेतील एक तत्वचिंतक आनंद कुमारस्वामी यांनी १९०८ मध्ये भारतीयांच्या ‘स्व-बदनामधन्य'' मानसिकतेचे जे वर्णन केले होते, ते आजही बऱ्याच जणांना लागू पडते. त्यावेळच्या एखाद्या भारतीय वा श्रीलंकन तरुणाला एतद्देशीय कला व संस्कृतीविषयी काही प्रश्‍न विचारलेच, तर तो पाश्‍चात्त्य संस्कृतीबद्दलचे आपले ज्ञान पाजळण्यात कशी धन्यता मानतो, त्याची अनेक उदाहरणे देऊन कुमारस्वामी म्हणतात, की असा हा तरुण ‘आपल्याच जन्मभूमीत परका’ होतो.

मातृभाषेचा अभिमान

चांगली गोष्ट अशी, की ही परिस्थिती गेल्या ६-७ वर्षांत बदलू लागली आहे. आपणच आपल्यात निर्माण केलेली न्यूनगंडाची भावना इतिहासजमा होऊ लागली आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करताना ‘आत्म’चे महत्त्व किती मोठे आहे, त्याचे भान आता अधिक प्रकर्षाने निर्माण होऊ लागले आहे. एतद्देशीय, पारंपरिक ज्ञानपरंपरांचा आता जाणीवपूर्वक सन्मान होऊ लागला आहे. खुद्द पंतप्रधानच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हिंदीतून भाषणे करू लागल्याने भारतीय भाषांच्या सन्मानात भर पडली आहे. आईइतकीच मातृभाषा महत्त्वाची. आता नव्या शिक्षण धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर विशेष भर दिला गेल्यानंतर मातृभाषेतून बोलण्याबद्दलचा आग्रह वाढताना दिसत आहे. योग आणि आयुर्वेदासारख्या एतद्देशीय ज्ञानपरंपरांना जगातील अनेक देश अधिकृतपणे मान्यता देऊ लागले आहेत.

‘दुबई एक्‍स्पो २०२०’ मधील भारतीय दालनात अयोध्येतील संकल्पित राम मंदिराची प्रतिकृती दिमाखात उभी करताना आपल्या मनात पूर्वीपासून असलेला आपल्या सांस्कृतिक अस्मितेबद्दलचा अनाठायी संकोच गळून पडला आहे, हे नव्या, उभरत्या "न्यू इंडिया''चे एक वैशिष्ट्य. या महत्त्वपूर्ण सामाजिक - मानसिक परिवर्तनाचे कर्णधार बनून त्याला गती देण्याचे श्रेय अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. पारतंत्र्याच्या काळात आपल्या देशातून गायब झालेल्या अनेक प्राचीन कला वस्तू आणि पुरातत्वशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाच्या अशा मूर्ती चिकाटीने प्रयत्नपूर्वक परत मिळविण्याच्या बाबतीत मिळविलेले उल्लेखनीय यश असो;अथवा परदेशी पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून भगवद्‌गीतेची प्रत देण्याबाबतचा ‘संकोच’ बाजूला सारणारा आत्मविश्‍वास असो; भारत आता आपल्या भूतकाळाकडेही अभिमानाने पाहू लागल्याचे सुखद दृश्‍य आहे. रामायण आणि महाभारताप्रमाणेच दिवाळी, गणेश चतुर्थी अथवा दुर्गापूजा या सांस्कृतिक उत्सवांना जगभर मान्यता मिळू लागली आहे.

जगभरातील भारतीयांना `शुभ दीपावली''चा संदेश पाठविण्याबाबत राष्ट्रप्रमुखांमध्ये जणू चढाओढ लागावी, असे दृश्‍य सर्वदूर आहे. कस्तुरीमृगाप्रमाणे भारताला आणि भारतीय समाजालाही आपल्या सामर्थ्याचे भान नव्हते. आंतरराष्ट्रीय दडपण झुगारून १९९८ मध्ये अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकारने अणूचाचणी करण्याचा निर्णय घेणे हे `जग काय म्हणेल?’ या मानसिकतेतून मुक्त होण्याच्या दिशेने टाकलेले अलिकडच्या काळातले दमदार पाऊल होते. "हम किसी को छेडेंगे नहीं!'' हे भारतीय सामरिक दृष्टीचे गेल्या ७५ वर्षांमधले समान सूत्र आहे. पण "कोई हमें छेडता है, तो उसे छोडेंगे नहीं'' हे नवे सूत्र दमदारपणे जोडण्याची हिंमत मोदींनी विविध प्रसंगात दाखविली. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत अनेक तथाकथित ‘अर्थतज्ज्ञ'' सरसकट खिरापतीसारखे पैसे वाटा, असा आग्रह धरत असताना भारत सरकारने आर्थिक सक्षमीकरणासाठी आधारभूत अशा अनेक योजनांद्वारे वंचितांना दिलासा देण्याचे उदाहरण असो अथवा स्वदेशी लसींच्या उत्पादनात व वापरात आपण मिळविलेले यश असो; एक नवा आत्मविश्‍वासी, आकांक्षावान आणि आत्मनिर्भर भारत उभा राहत आहे, हे आता जगालाही समजून चुकले आहे.

आत्मविस्मृतीच्या अंधारातून आत्मशक्तीच्या प्रत्ययाचा प्रकाश मनामनात उजळविणाऱ्या या दीपोत्सवाचे मूळ भारतीय तत्त्वज्ञानात आहे. त्या दृष्टीने भारतीय सौम्य संपदेची आधारशिला आपले तत्त्वज्ञान आणि आपली विश्‍वदृष्टी हीच आहे. भारतीय खाद्यपदार्थ जगप्रिय आहेत. आपली वस्त्रप्रावरणे - बंद गळा आणि साडी - यांची लोकप्रियताही वाढतेय. भारतीय संगीत आणि नृत्याची साधना करणाऱ्यांची संख्याही देशोदेशी वाढते आहे, हिंदी, अन्य भारतीय भाषा, संस्कृत आणि ‘भारतविद्या’ या ज्ञानशाखांमध्ये जगभरात अधिक रूची निर्माण होते आहे. भारतीय लोकशाहीचे यश आणि शासकतेच्या विषयात भारताने केलेले यशस्वी प्रयोग हेही जगाच्या पटलावर उल्लेखनीय ठरत आहेत.

या सर्वांच्या मुळाशी आपली सनातन सैद्धान्तिक भूमिका आहे, हे विसरता कामा नये. ‘एकम्‌ सत, विप्रा बहुदा वदंति'' या उदार दृष्टीमुळे अफगाणिस्तानच्या विषयात आपण ठाम भूमिका घेऊन सहिष्णुतेचा आग्रह धरू शकतो.

‘कॉप-२६’ सारख्या परिषदेत विकसित देशांनी आपली जबाबदारी अधिक गांभीर्याने घ्यावी आणि ‘वसुधैव कुटुंबकम''चे सूत्र त्यांनीही आत्मसात करावे हे आपले पंतप्रधान ठामपणे सांगू शकतात, त्यामागेही आपल्या कालजयी सैद्धान्तिक धारणा आहेत. ‘एक विश्‍व, एक सूर्य, एक ग्रीड'' हे पंतप्रधानांचे सूत्र ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ‘आणि एकमेव नरेंद्र मोदी'अशी जोड देऊन उच्चारणे हे आपल्या नेतृत्वाचा प्रभावी विश्‍वव्यापी होऊ लागल्याचे स्वागतार्ह चिन्ह. त्या दृष्टीने झालेल्या दिवाळीला ‘सौम्य संपदेचा दीपोत्सव'' म्हणता येईल! यातूनच आत्मविस्मृतीचा अंधार दूर व्हावाvinays57@gmail.com

loading image
go to top