World Cup 2019 : समतोल आणि विजिगीषू (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये.

विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये.

भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर आठवडाभरात सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेसाठीचा भारताचा संघ जाहीर झाला आहे! या संघातील बहुतेक जागा मात्र आधीच निश्‍चित झाल्या होत्या आणि चुरस होती ती फक्‍त दोनच जागांसाठी. विराट कोहली हा या संघाचा कर्णधार, भले सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’ या रंगारंग स्पर्धेत त्याचा संघ पिछाडीवर असला तरीही, असणारच होता आणि त्याची संघनिवडही बहुतेक पार पडलेलीच होती. प्रश्‍न होते ते या संघातून चौथ्या क्रमांकावर मैदानात कोण उतरणार आणि महेंद्रसिंह धोनी याला पर्याय म्हणून दुसरा यष्टिरक्षक कोण असणार, एवढेच. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाची जागा निश्‍चित करण्यासाठी भारतीय निवड समितीने गेल्या दीड वर्षात ११ खेळाडूंना मैदानात उतरवून बघितले होते! तर धोनीचा पर्याय मात्र रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोहोंतून निवडायचा होता! अखेर निवड समितीने जवळपास तीन तासांच्या प्रदीर्घ बैठकीनंतर या दोन जागांवरील खेळाडूंची निवड केली असून, चौथ्या क्रमांकावर आता विजय शंकर मैदानात उतरणार आहे. मात्र, धोनीचा पर्याय निवडताना समितीने रिषभ पंत या फटकेबाज खेळाडूऐवजी अनुभवाला प्राधान्य देत दिनेश कार्तिकची निवड केली आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याचेही या १५ सदस्यांच्या संघात पुनरागमन झाले आहे. नवोदित खेळाडूंऐवजी अनुभवाला निवड समितीने प्राधान्य दिले, याचे मुख्य कारण म्हणजे ३० मेपासून या स्पर्धा रंगणार असलेल्या इंग्लंडचे लहरी हवामान लक्षात घेतले गेले, हेच आहे. पंत आणि अंबाती रायडू यांच्या पदरी निवड समितीच्या या निर्णयामुळे निराशा आली. रायडू हा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून शंकरसमवेत चुरशीच्या स्पर्धेत होता.
इंग्लंडमधील या विश्‍वचषकाच्या निमित्ताने भारताने १९८३ मध्ये इंग्लंडमध्येच जिंकलेल्या विश्‍वचषक स्पर्धेच्या आठवणी जागविल्या जाणे अपरिहार्य आहे. तेव्हा कर्णधार कपिलदेव याच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ हा खरे तर ‘कच्चा लिंबू’च समजला जात होता. त्या संघात सुनील गावसकरसारखा महान फलंदाज होताही; मात्र तोपावेतो तो मर्यादित षटकांच्या सामन्यांना सरावलेला नव्हता आणि मुख्य म्हणजे स्वत: कपिल वगळता त्या संघात कोणीही नावाजलेला गोलंदाज नव्हता. तरीही, ‘संघशक्‍ती’च्या जोरावर आणि मुख्य म्हणजे ईर्षा आणि उमेद यांच्या बळावर तेव्हा भारताने इंग्लंडमधूनच विश्‍वचषक खेचून आणला होता. त्या तुलनेत आताचा संघ हा सर्व बाजूंनी समतोल असाच म्हणावा लागेल. स्वत: विराट हा विश्‍वविक्रमी फलंदाज आहेच आणि त्याच्या जोडीला रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव तसेच शंकर अशा नावाजलेल्या फलंदाजांचा ताफा आहे. शिवाय, धोनी याने आपला ‘मॅचविनर’ हा किताब ‘आयपीएल’मध्ये सार्थ करून दाखवला आहे. या १५ जणांच्या ‘टीम’मधील नऊ जण हे गोलंदाजी करू शकतात. त्यामुळे जसप्रीत बुमरा असो की भुवनेश्‍वर कुमार की कुलदीप यादव की यजुवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यास संघात आणखी किमान तीन-चार तरी गोलंदाज असणार आहेत. तसेच, रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडूही दिमतीस आहेच. याचा अर्थ हा संघ सर्वार्थाने समतोल आहे.

‘आयपीएल’मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरचा संघ भलताच ढेपाळला, तेव्हा त्याच्यावर टीकेची झोड उठली. मात्र, त्या वेळी सारेच एक बाब विसरून गेले होते; ती म्हणजे कोहलीला रणनीती ठरविण्यासाठी मुख्य सल्लागार म्हणून धोनी यष्टींमागे नव्हता! इंग्लंडमध्ये मात्र स्लिपमधील कोहली आणि यष्टींमागील धोनी हे मिळून रणनीती आखणार आहेत आणि या दोहोंची जोडी जेव्हा रणनीती ठरवते, तेव्हा विजय हा भारताचाच असतो, हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. राहता राहिला प्रश्‍न तो रिषभ पंत या संघात का नाही, हा! रिषभ हा मोठे फटके मारण्यात पटाईत असला, तरी तो यष्टींमागील कामात कार्तिकच्या तुलनेत डावा आहे, हे अलीकडे दिसून आले आहे. शिवाय, कार्तिक हा चोरट्या धावा घेऊन धावफलक हलता ठेवण्यात कुशल आहे, ही बाबही निवड समितीने लक्षात घेतली असणार. जडेजालाही मर्यादित षटकांच्या सामन्यातील आपले पुनरागमन आपल्या कामगिरीनेच यशस्वी करून दाखवावे लागणार आहे. मात्र, ‘आयपीएल’ संपल्यावर या खेळाडूंना विश्रांतीसाठी जेमतेम महिनाच मिळणार आहे. तो ते जाहिरातबाजीच्या चित्रीकरणात दवडणार नाहीत आणि नव्या जोमाने इंग्लंडमधील ढगाळ आणि लहरी हवामानातून विश्‍वचषक घेऊनच भारतात परततील, अशी आशा आता भारतीय क्रिकेटरसिक करत असणार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 and indian cricket team in editorial