कार्यक्रमांपलीकडचा टीव्ही...

विश्राम ढोले (माध्यम- संस्कृती- तंत्रज्ञानाचे अभ्यासक)
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

‘दूरचित्रवाणी’ या माध्यमाचे खरे सामर्थ्य त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांत आहे. व्यापक समाजाचा आपण भाग आहोत, असे वाटण्याची मानसिक गरज हे माध्यम पूर्ण करते. त्या अर्थाने टीव्ही हाच टीव्हीचा खरा कार्यक्रम... आजच्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त.

‘दूरचित्रवाणी’ या माध्यमाचे खरे सामर्थ्य त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांत आहे. व्यापक समाजाचा आपण भाग आहोत, असे वाटण्याची मानसिक गरज हे माध्यम पूर्ण करते. त्या अर्थाने टीव्ही हाच टीव्हीचा खरा कार्यक्रम... आजच्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त.

टीव्हीसंबंधीची आपल्याकडील चर्चा बहुतेक वेळा मालिकांमधील सवंगपणा, बातम्यांतील उथळपणा नि जाहिरातींतील फसवेपणा यांच्याभोवतीच घुटमळत राहते. अगदी अलीकडेपर्यंत त्याच्या जोडीला मुलांमधील टीव्हीचे वेड हाही मुद्दा असायचा; पण आता त्याची जागा इंटरनेट आणि मोबाइलच्या वेडाचा मुद्दा घेत आहे. आपल्या चर्चांमधील टीव्ही बहुतेक वेळा टीकेचाच धनी असतो. टीव्ही म्हणजे आपली पंचिंग बॅगच जणू. समाजात कुठे काही वाईटसाईट झाले, की आपल्या चर्चांमध्ये टीव्हीवरील कार्यक्रमांवर आरोपाचा एखादा तरी ठोसा हाणला जातोच. हे सारे चुकीचे आहे असे नाही. टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये आणि बातम्यांमध्ये बऱ्याचदा सवंगपणा-उथळपणा असतो, हे खरेच आहे. समाजातील काही भल्या-बुऱ्या गोष्टींचा संबंध निदान तार्किक पातळीवर तरी टीव्हीच्या कार्यक्रमांशी लावता येऊ शकतो, हेही मान्य; पण टीव्ही म्हणजे फक्त टीव्हीवरील कार्यक्रम नाहीत. टीव्हीचे खरे सामर्थ्य त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांत आहे. कार्यक्रम तर त्याचे फक्त आविष्कार आहेत.

टीव्ही मालिका पाहणारे बहुतेक जण एपिसोडगणिक त्या मालिकांवर टीका करतात; पण म्हणून मालिका पाहण्याचे थांबवित नाहीत. बहुतेक जण बातम्यांवर नाखूश असतात; पण म्हणून बातम्या पाहण्याचे थांबवित नाहीत. टीव्हीवरील जाहिरातींना आपण नाके मुरडतो; पण खरेदीच्या वेळी त्याच जाहिरातींनी ओळख करून दिलेल्या ब्रॅंडना आपण नाकारत नाही. हा विरोधाभास समजून घ्यायचा असेल, तर  या माध्यमाची काही अंगभूत वैशिष्ट्ये लक्षात घेतली पाहिजेत. वृत्तपत्राप्रमाणेच पण त्यापेक्षा किती तरी जास्त प्रमाणात टीव्ही हा आपल्या दैनंदिन जीवनातील उपचार किंवा रुटीनचा भाग झाला आहे. म्हणजे असं, की टीव्ही पाहिल्याने आपल्याला दररोज काही नवे वेगळे वाटेलच असे नाही; पण नसल्याने खूप चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. अगदी घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखं. त्याच त्या कार्यक्रमांद्वारे, त्याच त्या व्यक्ती आणि व्यक्तिरेखांच्याद्वारे अशा दैनंदिन उपचाराचा भाग होणे आणि त्यातून जगण्याला एक नियमितता आणि स्थैर्य प्राप्त करून देणे, ही माध्यम म्हणून टीव्हीची फार मोठी ताकद आहे. असे रुटीन ही माणसाची फार मोठी सुप्त मानसिक गरज असते. पूर्वी ही गरज दररोजचे धार्मिक, सामाजिक उपचार पूर्ण करत असत. आधुनिक काळात ही गरज प्रसारमाध्यमे करतात. टीव्ही तर खूप प्रमाणात. म्हणूनच पूर्वी जशी संध्याकाळी घरोघर दिवेलागण होत असे, तशी आता ‘टीव्हीलागण’ होते. म्हणूनच सौंदर्यशास्त्रीय फुटपट्टयांवर मालिका वा कार्यक्रम टुकार असले, तरी या दैनंदिन स्थैर्याच्या ओढीने आपण ते पाहत जातो. कारण, मुदलात स्थैर्यासाठीची सवयीची कृती या पलीकडे या कार्यक्रमांकडून बहुतेकांच्या सुप्त पातळीवर फार अपेक्षाही नसतात. माध्यम म्हणून टीव्हीचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाहणाऱ्याला एका व्यापक सामाजिक व्यवहारात सहभागी करून घेतात. 

एका मोठ्या समुदायाचा भाग असल्याची जाणीव करून देतात किंवा भाग बनण्याची संधी व्यापक करून देतात. विशेषतः टीव्हीवरील बातम्यांच्या लोकप्रियतेमागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. एरवी हे वैशिष्ट्य वृत्तपत्रांनाही लागू आहे; पण दृकश्राव्यतेमुळे टीव्हीवर ते अधिक प्रकर्षाने जाणवते आणि बातम्या किंवा खेळाच्या लाइव्ह प्रक्षेपणातून ते अधिक जिवंतपणे अनुभवायला येते. त्याबाबतीत इतर कोणतेच माध्यम टीव्हीची बरोबरी करत नाही. 

नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करणारे मोदींचे भाषण, निवडणुकांचे निकाल, मुंबईवरील २६/११ चा हल्ला, क्रिकेट विश्‍वचषकाची मॅच किंवा कुठल्याशा गावातील प्रिन्स नावाच्या चिमुरड्याची सुटका, अशा अनेक प्रसंगांमध्ये सारे भाषिक, सांस्कृतिक भेद विसरून एका मोठ्या समाजाचा भाग असल्याची जाणीव आपण फक्त टीव्हीमुळे इतक्‍या जिवंतपणे एकसाथ अनुभवू शकलो. टीव्हीवरील इतर कार्यक्रमही हळूहळू लाखो लोकांच्या सामायिक जाणीवेचा भाग बनतात. एका वेगळ्या पातळीवर त्यांना जोडत जातात. त्यात कार्यक्रमात काय दाखविले हा फक्त वरवरचा भाग असतो. त्यानिमित्ताने टीव्ही या माध्यमाने लाखो लोकांच्या मनात एक सामायिकतेचा हलकासा थर तयार केलेला असतो. एका अर्थाने जनांची संस्कृती घडविण्याची (किंवा बिघडविण्याची) टीव्हीइतकी क्षमता निदान आजतरी इतर कुठल्या माध्यमात नाही. इंटरनेटची लोकप्रियता आणि जगण्यातील अपरिहार्यता वेगाने वाढत आहे, हे अगदी खरे; पण इंटरनेटवर निवडीचे इतके पर्याय आहेत आणि व्यक्तीनुसार एकरूप होण्याची इंटरनेटची क्षमता इतकी आहे, की त्यातून टीव्हीसारखी सामायिकता निर्माण होणे कठीण. इंटरनेट हे व्यक्तीनुसार शतखंडित होणारे माध्यम आहे. टीव्ही हे शतखंडित व्यक्तींना एकत्र आणणारे माध्यम आहे. म्हणूनच आपण भारतीय टीव्ही, मराठी टीव्ही असे म्हणू शकतो; पण भारतीय इंटरनेट, मराठी इंटरनेट अशा म्हणण्याला अर्थ नसतो. इंटरनेट हे इंटरनेट असते. तिथे आपण मुख्यत्वे व्यक्ती असतो, सामाजिक घटक कमी. सामाजिकतेच्या या वैशिष्ट्यालाच जोडून येते ती टीव्हीची प्रत्यक्षता. टीव्हीला नाम-रूप आहे. टीव्ही कंपन्यांचे कूळ आणि मूळ ओळखता येते. त्यांना नियमनाची काहीएक राष्ट्रीय चौकट आहे. त्यांचे स्वतःचे काहीएक संघटन आहे. टीव्ही दृश्‍य आहे; पण इंटरनेटसारखे आभासी नाही. म्हणूनच टीव्हीवरील कार्यक्रमांना विशेषतः माहितीला सत्याचा काहीएक आधार असल्याचे अधिक लवचिकपणे मानता येते. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये छापून आले म्हणजे खरेच, असे मानले जाई. त्यासारखेच हे इंटरनेट किंवा मोबाइलच्या बाबतीत. माहिती अफाट; पण त्याच्या सत्यासत्यतेबाबत मनात शंकासूर कायमच जागा. टीव्हीच्या बाबतीत हे तुलनेने कमी.

आज टीव्हीपुढे इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांनी अनेक आव्हाने उभी केली आहेत. विशी-पंचविशीतील पिढी तर टीव्हीचा पडदा सोडून टॅब आणि मोबाइलच्या पडद्याकडे वेगाने वळत आहे; पण जरा बारकाईने पाहिले, तर तिथे ती टीव्हीची नाममुद्रा बाळगणारे कार्यक्रमही बघत असते, हे लक्षात येईल. टीव्हीदेखील इंटरनेट आणि मोबाइलच्या शक्‍यता आपल्या कार्यक्रमांमध्ये सामावून घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. जाहिरातींच्या जगावर आजही टीव्ही या माध्यमाचेच राज्य आहे. भविष्यात त्यात बदल होतीलही; पण रुटीनमधून मिळणारे स्थैर्य, सामाजिक ओढ आणि नियमनातून मिळणारी विश्‍वासार्हता यासारख्या आपल्या सामाजिक गरजा जोवर राहतील, तोवर टीव्ही हे माध्यम म्हणून स्वतःचे औचित्य टिकवून धरेल. माध्यम विचारवंत मार्शल मॅक्‍लुहन यांच मीडियम इज दी मेसेज या प्रसिद्ध विधानाचा आधार घ्यायचा तर म्हणता येते, की टीव्ही हाच टीव्हीचा खरा कार्यक्रम आणि तो अजूनतरी खूप टीआरपी खेचतोय. टीव्ही दिनाच्या निमित्ताने त्याचेच हे एक (लेखी) रिपीट टेलिकास्ट.

Web Title: world of television day