मनाचा क्ष-किरण (परिमळ)

parimal
parimal

सिग्मंड फ्राइड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पांत गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोड्या वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणाऱ्या आपल्या पत्नीला फ्राइड म्हणाला, ""अगं मला एवढंच सांग, आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमूक एक जागी जाऊ नकोस, असं काही सांगितलं होतं का?'' ती म्हणाली, हो, ""बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको, असं बजावलं होतं.'' त्याने लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कूच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणाऱ्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.

बायकोने मुलाला हाक मारली व फ्राइडचा हात धरत विचारलं, "तुम्हाला सिद्धी प्राप्त झालीय का? हा कारंज्याजवळच आहे, हे कसे तुम्हाला कळालं?'' फ्राइड म्हणाला, ""सिद्धी-बिद्धी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.''
खरोखर मित्रांनो, कवयित्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशत जाते. प्रयोग करून पाहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला की, दोन-तीन माकडं डोळ्यांसमोर येतील. एखाद्या दारावर आत डोकावू नये, अशी पाटी लावली की, आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ""मित्रा, मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.'' राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय, त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घोडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला, "अरे यार, ही किल्ली दुसऱ्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही.' पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.


अंतर्मनाला एखादी गोष्ट करू नकोस, अशी ताकीद देऊन दरडावून सांगितले की, ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्या वेळी बहिर्मनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्त्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले की, अंतर्मन-बहिर्मन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंतर्मन-बहिर्मन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो; पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये, यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा, असे भक्ताला वाटते. आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते. कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणास दाद द्यावी, असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळ्यांना दिसावा; पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळ्यांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण, आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.


मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार "क्ष-किरण' काढण्यासाठी सजग राहून दीर्घश्‍वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सूर्यनमस्कार घालणे महत्त्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरीक्षण करावे, त्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळी मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्‍वासाला डोळे मिटून जाणत राहा. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागले व मनाचा एक्‍स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनाचेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल. शेवटी म्हणतात ना, ""मन करा रे प्रसन्न - सर्व सिद्धीचे कारण.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com