सर्वांगीण विकासाचा "योग'मार्ग

Yoga is the way of All round development Pune Edition Editorial
Yoga is the way of All round development Pune Edition Editorial

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय. जगभरातील 170 पेक्षा अधिक देशांमधील नागरिक "जागतिक योग दिन' उत्साहात साजरा करत आहेत, हे भारतीयांसाठी अभिमानास्पदच. हे प्राचीन योगशास्त्र म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. शारीरिक समतोल साधतानाच व्यक्तीचे परिसर व निसर्गाबरोबरचे नातेही योगच दृढ करतो.

योग आणि ध्यान यांच्या एकात्मिक स्वरूपातून व्यक्तीच्या अंतर्गत जाणिवेचा बाह्य पर्यावरणाशी समन्वय साधला जातो. त्यामुळे व्यक्ती मनाची एक प्रकारची समाधीवस्था अनुभवते. अनेकांनी योगशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत. मात्र, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची व्याख्या मनाला भावते. अय्यंगार म्हणतात - "योग आपल्याला, जे आपण सहन करण्याची अजिबात गरज नाही, ती दूर किंवा बरी करण्यास शिकवितो. त्याचप्रमाणे, बरी न होणारी गोष्ट सहन करण्याची क्षमता प्रदान करतो.' 

सुमारे पाच हजार वर्षांची परंपरा असणारे योगशास्त्र शरीर व मनाला अतिशय लाभकारक आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या गुणामुळेच ते सलग इतकी वर्षे भारतीय भूमीत अस्तित्व टिकवून आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या आपल्या पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगशास्त्राचा गौरव केला होता.

ते म्हणाले होते, ""योग म्हणजे प्राचीन भारतीय परंपरेची अनोखी देणगी. शरीर आणि मन, विचार व कृती, संयम आणि समाधान यांचे एकत्रित प्रतीक म्हणजेच योग होय. हा तर एकूणच आरोग्याकडे पाहण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. योग हा काही व्यायामप्रकार नाही. जीवनशैलीतील बदल आणि स्वजाणीव जागृत करत स्वत:चे निसर्गाबरोबरच संपूर्ण जगाशी ऐक्‍य घडविण्याचा तो निकोप मार्ग आहे. सध्या जगाला भेडसावणाऱ्या हवामानबदलाशी सामना करण्यासाठीही योगशास्त्र आपली मदत करू शकते. 

भारताने 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 21 जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित करण्याची मागणी मसुदा ठरावाद्वारे केली होती. त्यानंतर, पुढील वर्षी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून 2015 हा पहिला "जागतिक योग दिन' म्हणून घोषित केला. जगातील 175 देशांनी योगदिनाच्या ठरावाला पाठिंबा दिला, हे विशेष. या ठरावात योगशास्त्राचे महत्त्व मांडतानाच वैयक्तिक आणि समूहस्तरावरही आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्याचे आणि निकोप आरोग्याची जोपासना करणाऱ्या जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले होते.

मनुष्यबळ कसे आहे, त्यावरच देशाच्या विकासाचे स्वरूप अवलंबून असते. निकोप आणि उत्तम आरोग्याचे मनुष्यबळ ही देशाची मोठी साधनसंपत्ती असते. देशात अलीकडच्या काही वर्षांत असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढतेय. "जागतिक आरोग्य संघटने'चा नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात दरवर्षी भारतातील एकूण मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, श्‍वसनाच्या व इतर गंभीर असंसर्गजन्य आजारांमुळे होत असल्याचे म्हटले आहे. 

जीवनशैलीशी संबंधित हे आजार थांबविण्यासाठी योग हा अतिशय उपयुक्त मार्ग आहे. योगशास्त्राच्या अनेक पैलूंचे मला सखोल ज्ञान नाही. तरीही, सर्व धर्मामध्ये, समाजाच्या सर्व थरांमध्ये या प्राचीन शास्त्राची लोकप्रियता आणखी वाढविण्याची गरज आहे. योग म्हणजे निरामय आरोग्यासाठीचा समग्र दृष्टिकोन . केवळ शारीरिक दृष्टिकोनातूनच विचार केला, तर योग हा क्रमबद्ध हालचालींचा शक्तिशाली संच असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुले, तरुण तसेच प्रौढ आणि ज्येष्ठही योगासने करू शकतात. नियमित योगाभ्यासातून अनेक मनोशारीरिक आजारांवर मात करता येते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. योग मन, वाणी आणि शरीराची शुद्धी घडवतो. त्याचप्रमाणे समाधान, इतरांचा स्वीकार, चिकाटी, स्वयंभ्यास, स्वओळख, वैश्‍विक शक्तीचे चिंतन या सर्व गोष्टी योगशास्त्रातूनच साध्य होतात. 

पतंजली ऋषींनी योगशास्त्राचे तत्त्वज्ञान सर्वप्रथम मांडले. त्यांनी योगशास्त्राची स्वैर, अनियंत्रित विचारांना नियंत्रण करून स्थिरता, शांततेतून अंतर्गत सौहार्द प्रस्थापित करणारे, अशी व्याख्या केली आहे. काही जण व्यवस्थित समजून न घेताच अज्ञानातून योगशास्त्राला धार्मिक रंग देतात, हे दुर्दैवी. खरे तर, योगशास्त्र कुठल्याही धर्माशी संबंधित नसल्याने त्याकडे संकुचित, धर्मांध दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. नियमित योगाभ्यास व्यक्तीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेतो.

नुकत्याच लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पेरू देशाच्या लिमा या राजधानीतील योगवर्गांनी मला आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. वस्तुतः व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणाऱ्या योगशास्त्राकडे केवळ सर्वसामान्य नागरिकच आकर्षित होत नसून, अनेक जागतिक नेते आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजही त्याचे आरोग्यदायी गुणगान गात आहेत. योगशास्त्राच्या वैश्‍विक साद घालण्याच्या क्षमतेत याचे गुपित दडलेय. 

सध्याच्या आधुनिक जगामध्ये विशेषत: तरुणांसमोर जीवनशैलीशी निगडित आजारांनी मोठेच आव्हान उभे केलेय. योग या आव्हानांचा यशस्वी सामना करू शकते. शारीरिक व मानसिक बदलातून आरोग्य व तंदुरुस्तीचे ध्येय गाठण्यासाठी योग हे महत्त्वाचे साधन ठरू शकते. आजपर्यंत अनेक संशोधनांतून योगशास्त्राच्या आरोग्यदायी परिणामांवर शिक्कामोर्तब झालेय. योग शारीरिक व मानसिक चापल्य वाढवतोच; पण मानवी जीवनातील सर्व प्रकारच्या चढ-उतारांकडे पाहण्याची संतुलित दृष्टीही देतो. 

देशाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणाऱ्या तरुणांमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढतेय. तरुणाईमध्ये योग आणि ध्यानातून मनःशांती आणि समतोल वृत्ती विकसित करता येऊ शकते. त्यातून, या दुर्दैवी घटनांना आळा बसेल. प्राचीन भारतीय धर्मग्रंथ आणि पुस्तकांमध्येही योगशास्त्राची महती वर्णन केली आहे. एकेकाळी गुरुकुल आश्रमामध्ये योगाभ्यास हा दैनंदिन उपक्रमाचा अविभाज्य भाग होता. मात्र, परकी आक्रमणे आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीमुळे भारताने आपला स्वाभिमान गमावला.

त्यात, योगशास्त्रासारख्या अस्सल भारतीय परंपरेकडेही दुर्लक्ष झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक समुदायाला योगशास्त्र लोकप्रिय करण्याचे आवाहन केले. या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर आता अवघ्या जगानेच त्याचे महत्त्व ओळखल्याचा मला आनंद वाटतो. हृषीकेश येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेला उपस्थित असलेले अनेक देशांचे प्रतिनिधी म्हणजे योगशास्त्राच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्षच. 

आता, शालेय अभ्यासक्रमातच विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, येत्या काही वर्षांमध्ये भारत आरोग्यसंपन्न आणि आनंदी नागरिकांचा देश बनेल. योगशास्त्राच्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलू पाडणाऱ्या, जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान मांडणाऱ्या मार्गावरून चालण्याची गरज आहे. मनुष्याच्या सर्वांगीण विकासरथाचे ते इंजिन बनू शकते.

"योग' हा शब्दातूनच एकता आणि मानवी जीवनाची एकात्मिक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. आजचे जग संघर्ष, हिंसाचार, अनारोग्य आदींनी ग्रासले आहे. त्यामुळेच, शरीर, मन व इतरांबद्दलच्या दृष्टिकोनात आमूलाग्र सकारात्मक बदल घडविणारा योग व्यक्तीबरोबरच संपूर्ण समाजासाठीही उपचारात्मक ठरेल. आपण सर्व जण नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे शोधूयात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळविल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. 

(अनुवाद : मयूर जितकर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com