राजपक्षेंचा दौरा लाभदायक

Sri-Lankan-Prime-Minister
Sri-Lankan-Prime-Minister

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद राजपक्षे यांचा पाच दिवसांचा भारत दौरा शनिवारपासून सुरू झाला आहे. त्यांचे बंधू लेफ्टनंट कर्नल गोटबाया राजपक्षे हे नोव्हेंबर २०१९ मधील अध्यक्षीय निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आले. श्रीलंकेचे राजकारण गेली अनेक वर्षे राजपक्षे कुटुंबाभोवती फिरत आहे. दुसरे दोन बंधू बेसिल व छामल राजपक्षे हेही सरकारमध्ये आहेत. माजी अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांच्या कारकिर्दीत भारत व श्रीलंका दरम्यानचे संबंध जेमतेम होते; परंतु गोटबाया राजपक्षे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यात लक्षणीय बदल झाला. त्यांनी सूत्रे हाती घेताच पहिली भेट भारताला दिली आणि संबंध सुरळीत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीत उच्चस्तरीय वाटाघाटींबरोबर महिंद राजपक्षे वाराणसी, सारनाथ, बोधगया व तिरूपतीला भेट देणार आहेत, त्यामुळे ‘बुद्धसर्किट’ पर्यटनालाही चालना मिळेल. त्याचप्रमाणे, अरबी समुद्र व हिंदी महासागरातील नाविक व सामरिक सहकार्याला वेग येईल, असे तज्ज्ञांना वाटते. 

तमीळ मच्छीमारांचा मुद्दा महत्त्वाचा
गेल्या काही वर्षांत चीनने श्रीलंकेत चांगला जम बसविला. हंबनटोटा बंदराची उभारणी व त्याची देखभाल याचे प्रदीर्घ कंत्राट चीनला देण्यात आले. चीनच्या युद्धनौका श्रीलंकेच्या परिसरात ये-जा करू लागल्या, त्यामुळे भारताची चिंता वाढली. तथापि, गोटबाया राजपक्षे अध्यक्ष झाल्यापासून, चीनच्या जवळीकीची भारताला चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाही त्यांच्याकडून भारताला दिली जात आहे. भारत व श्रीलंका यांच्यातील मतभेदांच्या मुद्द्यांमध्ये भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौदलाकडून होणारा गोळीबार, त्यांना वारंवार होणारी अटक व त्यांच्या नौकांची होणारी जप्ती हे विषय असून, त्याबाबत सातत्याने संपर्क साधूनही, प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यातून कायमस्वरूपी मार्ग निघेल काय, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. तसेच, श्रीलंकेच्या घटनेतील तेराव्या दुरुस्तीचे कलम अद्याप पूर्वेकडील जाफना, बट्टिकलोवा, त्रिंकोमाली आदी प्रांतांबाबत शिथिल करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्या प्रांतात निवडणुका होऊन तमीळवासीयांना हवी असलेली सरकारे येऊनही त्यांच्या हाती पोलिस यंत्रणेचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कोलंबोतील सरकारने पूर्वेकडील प्रांताची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वतःकडे ठेवल्याने तेथील केंद्र व पूर्वेकडील प्रांतांचे संबंध फारसे सुधारलेले नाहीत. भारत या घटनादुरुस्तीच्या संदर्भात आग्रही आहे.

श्रीलंकेत मूळचे सिंहली, बौद्ध, मुस्लिम, तमीळ, ख्रिस्ती हे प्रमुख धर्मीय राहातात. २०१९ च्या आकडेवारीनुसार श्रीलंकेत नोंदणीकृत ७० राजकीय पक्ष आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राजपक्षे यांचा ‘एसएलएफपी’- श्रीलंका पीपल्स फ्रंट पक्ष व माजी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचा ‘यूएनपी’- युनायटेड नॅशनल फ्रन्ट हे दोन पक्ष असून, अन्य तमीळ पक्ष आहेत. या व्यतिरिक्त दक्षिण श्रीलंकेत ‘जनता विमुक्त पेरामुना’ ही आंदोलन निमराजकीय संघटना आहे. 

पर्यटनाच्या बाबतीत सुधारणा
१९८७ मधील राजीव गांधी-जयवर्धने यांच्यातील करारानंतर तमीळ बंडखोरांशी लढण्यासाठी भारतीय शांतिसेना तेथे पाठविण्यात आली होती. ‘एलटीटीई’चा म्होरक्‍या व्ही. प्रभाकरन याला यमसदनी पाठविण्याचे श्रेय प्रामुख्याने गोटबाया राजपक्षे यांना दिले जाते. काही महिन्यांपूर्वी कोलंबोत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २९० लोकांचा मृत्यू झाला, त्यात ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करण्यात आले. तेव्हापासून श्रीलंकेत पसरलेले भीतीचे वातावरण आता काही प्रमाणात कमी झाले आहे. नेमक्‍या त्याचवेळी अध्यक्षपदाच्या निवडणुका आल्याने जनतेने गोटबाया राजपक्षे यांना निवडून दिले. त्यानंतर पर्यटनाला बसलेली खीळ आस्तेआस्ते ओसरत असल्याचे ताज्या श्रीलंका भेटीत दिसून आले. आता जर्मनी, इटली, अन्य युरोपीय देश व भारतातून पुन्हा पर्यटकांचा श्रीलंकेत ओघ सुरू झाला आहे. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीचे तंतोतंत पालन करणारा श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय पुन्हा परदेशी पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे, त्यासाठी आवश्‍यक असलेले रस्त्यांचे उत्तम जाळे, स्वच्छता, नीटनेटकेपणा, चविष्ट खाद्यपदार्थ, समुद्राकाठची सुंदर रिसॉर्ट, हॉटेल व व्हिला, सागरी खेळ पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहेत. बव्हंशी पर्यटन हे श्रीलंकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावर कोलंबो, आंबेलनगोडा, बेंटेटा, कनकेसनथुराय, गॉल, कॅंडी या भागात आहे. पूर्वेकडे जाण्यास पर्यटक तयार नसतात. कारण तेथे पाहण्यासारखे विशेष नाही. तसेच, पायाभूत सोयींचीही वानवा आहे.      

गेल्या महिन्यात केलेल्या श्रीलंकेच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात भारताविषयी तेथील सर्वसामान्यांच्या भावना मैत्रीपूर्ण असल्याचे जाणवले. परंतु, भारतात ‘बुद्धसर्किट’ असूनही, श्रीलंकेचे पर्यटक भारतात येणे पसंत करीत नाहीत. या संदर्भात अंबेलनगोडा येथील रिसॉर्टचे मालक गुणसेकर म्हणाले, की माझ्या पत्नीसह सुमारे पन्नास पर्यटक गया, सारनाथ, सांची आदी स्थळांना भेट देण्यास गेले होते. पण, त्यापैकी अनेकांना फसविण्यात आले. पर्यटकांना तुम्ही मान देत नाही, त्यामुळे भारतात जाण्यास श्रीलंकेतील लोक धजावत नाहीत. महिंद राजपक्षे यांच्या दिल्लीभेटीत भारत- श्रीलंका- मालदीव असा मैत्री व सहकार्याचा व्यूहात्मक त्रिकोण साधता येईल काय, यावरही विचारविनिमय होईल. माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांच्या कारकिर्दीत भारत व मालदीव यांचे संबंध कमालीचे बिघडले होते, ते इब्राहीम महंमद सोल्ही यांची मालदीवच्या अध्यक्षपदी २०१८ मध्ये निवड झाल्यापासून सुधारले असून, भारताला हिंदी महासागरातील सामरिक जुळवाजुळव राजपक्षे यांच्या भेटीमुळे साध्य करता येईल असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com