देवांचं शिखर

नावापासून वेगळेपण असलेला हा पर्वत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टीस्थान येथे असलेल्या हिमालयाच्या अतिउत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे.
14 highest peak of himalaya naga parvat geographical place trekkers climbers
14 highest peak of himalaya naga parvat geographical place trekkers climbersSakal

- उमेश झिरपे

हिमालय सर्वदूर पसरलेला आहे. भारताच्या वायव्येला काराकोरम पर्वतरांगेपासून ते थेट ईशान्येतील अरुणाचल प्रदेशपर्यंत. हिमालयातील एक-एक शिखरं किंवा शिखरसमूह ही पीएचडीचा विषय आहेत, एवढं वैविध्य इथे आहे. अष्ट हजारी शिखरं, म्हणजेच ज्यांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा अधिक आहे, अशी शिखरं जगात फक्त हिमालयात आहेत.

एकदोन नव्हे तर तब्बल चौदा ! या चौदांपैकी पाच शिखरं ही भारताच्या अतिउत्तरेला असलेल्या काश्मीरमध्ये, जो सध्या अनधिकृतपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे इथे आहेत. ज्याला आपण पाकिस्तानव्याप्त काश्मीर असं म्हणतो. येथे के-२, नंगा पर्बत, ब्रॉड पीक, गशेरब्रुम-१ व गशेरब्रुम २ अशी पाच अष्ट हजारी शिखरं आहेत. यातील प्रत्येक शिखरांचं वैशिष्ट्य अन् वैविध्य वेगळं आहे. यातील एक शिखर म्हणजे नंगा पर्बत!

या शिखराचं नंगा पर्बत असं नामकरण झालं ते इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे. इतक्या उंचीवर असलेल्या शिखरांवर सहसा हिमाचा थर असतो, मग तो ऋतू कोणताही असो. इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. नंगा पर्बत एका अगदी काटकोनात उभा राहावा असा पर्वत आहे.

ज्या टेक्टॉनिक प्लेट्स, ज्या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली, त्याचे ठळक पुरावे इथे दिसतात. शिखराचा वरचा भाग हा ग्रॅनाइटने बनलेला आहे. इथं सहसा हिम साचत नाही, म्हणून दगडी कातळ पर्वत उघड्या डोळ्यांनी दिसतो.

इतर पर्वतांच्या तुलनेत हे शिखर उघडं भासतं, म्हणून यांचं बोली भाषेतील नाव पडलं, नंगा पर्बत, ते तसंच पुढे इंग्रजीत देखील रूढ झालं. स्थानिकांसाठी हा पर्वत शिखर देवासमान आहे. याला ते देओमीर असं म्हणतात, ज्याचा अर्थ होतो देवांचं शिखर!

नावापासून वेगळेपण असलेला हा पर्वत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टीस्थान येथे असलेल्या हिमालयाच्या अतिउत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे. ८१२६ मीटर उंच असलेले हे शिखर उंचीनुसार जगातील नववे शिखर आहे.

कोणत्याही मोसमामध्ये चढाईसाठी अत्यंत कठीण शिखर म्हणून नंगा पर्बतचा लौकिक आहे. १८९५ पासून, म्हणजे जेव्हापासून हा शिखरपर्वत चढण्याचे प्रयत्न करण्यास सुरवात झाली, तेव्हापासून या शिखरावर अनेक गिर्यारोहकांचे मृत्यू झाले, म्हणून गिर्यारोहक जगतामध्ये माउंट नंगा पर्बत हा मृत्यू पर्बत म्हणून देखील ओळखला जातो.

या पर्वत शिखरावर चढाई करताना अत्यंत कठीण रिज अर्थात कड्यांवरून किंवा ८० ते ९० अंश कोनातील बर्फ व दगडांनी व्यापलेल्या कठीण भिंतींवरून चढाई करावी लागते. गिर्यारोहकांसाठी नंगा पर्बत हे नेहमीच मोठं आव्हान ठरला आहे.

रेन्हॉल्ड मेसनर (जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखर मोहिमा यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक) व त्याचा भाऊ गुंतूर मेसनर यांनी नंगा पर्बत चढताना रुपाल फेस या मार्गाचा वापर केला, मात्र उतरताना हवामान कमालीचं खराब झाल्यानं ममरी रिजहून उतरण्यास सुरवात केली.

मात्र, ममरी रिजच्या तीव्रतेमुळे व सततच्या हिमप्रपातामुळे गुंतूर मेसनर यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१३ मध्ये नार्दीने फ्रेंच गिर्यारोहक एलिझाबेथ रेव्होलच्या साथीनं याच मार्गानं चढाईचा प्रयत्न केला होता, जो असफल ठरला. नंगा पर्बत शिखराची चढाई आहेच अशी आव्हानात्मक !

नंगा पर्बत शिखराचा रुपाल फेस हा प्रसिद्ध आहे. जवळपास ४ हजार ६०० मीटर उंच असलेला फेस हा जगातील सर्वांत मोठा ‘रॉकफॉल फेस’ आहे. सरळसोट उभ्या ग्रॅनाइटच्या भिंतीमुळे तुलनेने कमी हिम असतो, असलाच तर तो टणक प्रकारातील असतो. या सरळ दगडी भिंतीच्या खाली विस्तीर्ण पसरलेलं ग्लेशियर आहे.

त्यामुळं गिर्यारोहक जेव्हा इथे चढाई करतात, तेव्हा त्यांचा कस लागतोच, मात्र आजूबाजूला दिसणारं दृश्य हे डोळे दिपवणारे असतं, असं गिर्यारोहक सांगतात. भौगोलिकदृष्ट्या नंगा पर्बतचं वैविध्य हे अलौकिक आहे, हे तेवढंच खरं.

नंगा पर्बत शिखराशी गिर्यारोहण क्षेत्राची एक कटू आठवण जोडली गेली आहे. हे पर्वत शिखर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या इतर चार शिखरांपेक्षा थोडंसं पश्चिम दिशेला आहे. तुलनेने मानवी वस्ती येथील बेस कॅम्पहून जवळ आहे.

हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने थोडासा अस्थिर आहे. २०१३ साली जून महिन्यात जेव्हा या शिखरावर चढाई मोहीम चालू होती, तेव्हा बेस कॅम्पवर चीन, स्लोव्हेकिया, नेपाळ, युक्रेन, लुथेनिया इत्यादी देशांतील १० हून अधिक गिर्यारोहक होते व सोबतीला स्थानिक गाइड देखील होते.

मोहीम चालू असताना पोलिसांच्या वेशात काही लोक येथे आले व त्यांनी सर्व गिर्यारोहकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गिर्यारोहक काहीही म्हणो, त्या लोकांनी सर्व गिर्यारोहकांना बांधलं व नंतर एक-एक करून सगळ्यांना मारून टाकले.

असं कृत्य करणारी लोकं ही पाकिस्तान-तालिबान संघटनेचे दहशतवादी होते. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना मारून जगाचं लक्ष त्यांना वेधून घ्यायचं होतं. या घटनेत १० गिर्यारोहकांचा व एका स्थानिक गाइडचा मृत्यू झाला.

संपूर्ण गिर्यारोहण जगतासाठी हा खूप मोठा धक्का होता. गिर्यारोहकांची सुरक्षा व पाकव्यात काश्मीरची अस्थिर परिस्थिती यामुळं पुन्हा चर्चिली गेली. या घटनेचा परिणाम इतका आहे, की आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या ही नेपाळ अथवा भारतीय हिमालयाला भेट देणाऱ्या गिर्यारोहकांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्यानं इथं जाण्यास भारतीय गिर्यारोहकांना अर्थातच बंदी आहे. येत्या काळात जर काही राजकीय बदल घडले तर कदाचित भारतीय गिर्यारोहक देखील आपल्या हक्काच्या शिखरांवर चढाई करू शकतील.

नंगा पर्बतचं नाव, त्याचं रूप, त्याची चढाई, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल अन् त्याचं भविष्य हे सर्वच काही वेगळं आहे. या पर्वताच्या दर्शनासाठी जेव्हा संधी मिळेल, तेव्हा माझ्यासारखा गिर्यारोहक नक्कीच चुकवणार नाही.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com