एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेवराव ढसाळ...

टीम ई सकाळ
बुधवार, 15 जानेवारी 2020

मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले. 'दलित पॅंथर'चे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले. 'दलित पॅंथर'चे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपीठा या "रेड लाइट' भागात त्यांचं बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्‍सी चालवली. ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य आणि वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून त्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे बिनीचे शिलेदार होते. "दलित पॅंथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी 1972 मध्ये "दलित पॅंथर'ची स्थापना केली. अमेरिकेतील "ब्लॅक पॅंथर' चळवळीपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. दलितांसाठीचे अनेक प्रश्‍न त्यांनी हिरिरीने मांडले. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, "दलित पॅंथर'शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होते.

आंबेडकर चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी या सगळ्या अनुभवांची चिकित्सा केली आणि त्यातून त्यांची कविता अधिक क्रांतिकारी होत गेली. तिथून पुढे त्यांचे जीवन एक संग्राम बनले. साठीच्या दशकाच्या शेवटी महाराष्ट्रात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होते; पण त्यांची कुणीही दखल घेत नव्हते. त्या वेळी रिपब्लिकन पक्ष एकतर विकलांग झालेला होता किंवा तो सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेला होता. अशा स्थितीत नामदेवरावांसह अनेक तरुण लेखक एकत्र आले आणि त्यांनी "ब्लॅक पॅंथर'च्या धर्तीवर "दलित पॅंथर' संघटना स्थापन केली. ज्या गावात अत्याचार व्हायचे, तेथे "दलित पॅंथर' उग्र आंदोलन करायची. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात "दलित पॅंथर'चा दरारा वाढला आणि अन्याय, अत्याचारही कमी होत गेले. नामदेवरावांचे वाचन विविधांगी होते. ते जसे वैचारिक लेखन वाचत, तसे मार्क्‍सवाद, इंग्रजीसह इतर साहित्याचीही आवडीने दखल घेत. या वाचनातून आणि अनेक मित्रांच्या चर्चेतून त्यांचे विचार घडत गेले. त्यांच्या लेखनाचे वेगवेगळ्या देशांतूनही स्वागत व्हायचे. वक्तृत्वाने अनेक माणसे खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यामुळे तो दलित "मासेस'चा पुढारी झाला. तरुणवर्ग त्याच्याकडे अधिक आकर्षित होत गेले.

नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह "गोलपीठा' 1973 मध्ये प्रकाशित झाला. यानंतर "मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले', "तुही यत्ता कंची?', "खेळ' आणि "प्रियदर्शिनी' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. साहित्य जीवनगौरव पुरस्कार (2004), पद्मश्री (1999) व "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार' (2010) आदींनी त्यांना गौरविण्यात आले होते.

नामदेव ढसाळ यांचे साहित्य
कवितासंग्रह
* गोलपीठा (1973)
* मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (1975)

* खेळ (1983)
* तुही यत्ता कंची (1981)
* या सत्तेत जीव रमत नाही (1995)
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (1976)
* आंधळे शतक - मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे
* मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
* तुझे बोट धरून चाललो आहे

नाटक
* अंधार यात्रा
कादंबरी
* हाडकी हाडवळा
* निगेटिव स्पेस

कवीता...
आज थांबेल माझे अधःपतन
आमचे आयुष्य अलंकृत करून सोडणाऱ्या
माझ्या दैवता- चौपन्न-पंचावन्न वर्षे होऊन गेली तुझा महापरिनिर्वाणाला
"मृत्यू' नावाच्या नराधमाने तुला ठेवले आहे
स्वतःच्या कैदेत
नाही विसरू शकत या वास्तवाला
पण तू तर
जन्मजात विद्रोही -
मला नाही वाटत
मृत्यू तुला डांबून ठेवील!
ते काळेकभिन्न आडदांड ध्यान
शरण आले असेल केव्हाच तुला
आणि तो शाळिग्रामाच्या त्वचेने
मढवलेला- उन्मत रानरेडा
वाहन त्या यमाचे
तो मृत्युदेवही
लागला असेल भजनी तुझ्या
जन्म ही पीडा
मरण ही पीडा
हे सर्व अनुभवून
तू तर निघून गेलास निर्वाणाच्या मार्गाने उंच उत्तुंगस्थळी
ज्याला कधीच कुणी
हलवू शकणार नाही असा तू ध्रुवतारा झालास
अंतरंगातला सुप्त ज्वालामुखी
उसळून वर येऊ लागला की
मी माझा उरत नाही
धावत येतो तुझ्या चैत्याजवळ
होतो नतमस्तक
समोर तू दृढ, द्रष्टा उभा
उच्छृंखल स्वातंत्र्यासारखा अमोघ!
जणू ज्योतिर्मय जाणिवेचे चैतन्य
जणू सृजनाचे अक्षर
महाकाव्याच्या ओळीत ऊर्जा चेतविणारे
जणू प्रस्तर भौतिकाचा झळाळता
जणू ब्रह्मांड अलौकिक संगीताने भारलेले
जणू उजेड काळ्याभोर जमिनीतून
उगवून आलेली
जणू उजेडाच्या अंकुराचा
सूर्य लकाकता
या उजेडाच्या वर्षावात
सर्वांग पवित्र होऊन गेलेले
मनातला फुत्कारणारा काळाजहर साप
मरून गेलेला-
उजेड मनमनावर बरसत राहणारा
आईच्या उबदार कुशीचा प्रत्यय देणारा
व्याप होऊन माथ्यावर छत्रछाया धरणारा
किती सामर्थ्य दडले आहे या उजेडात?
समुद्राच्या पाण्याचा रंगही बदलून गेला
आकाशाची निळीभोर अथांगता हलवून गेला
बदलली हवेच्या पोताची चव
बदलले झाडाफुलांचे रूपरंग-गंध
वसंत सर्वत्र पसरलेला सर्वत्र बरसात उजेडाच्या फुलांची
फुलपाखरांचे रंग लेऊन उधळते आहे मन्मन चौखूर
सर्जनशील झंझावात
सृष्टीला अलंकृत करणारा
अवकाशाच्या अथांग पोकळीत
भिरभिरणारी पृथ्वी
त्या पृथ्वीवर नांदणारी मनुष्यजात वेंधळी -
उजेडात न्हाऊन निघालेली-
लहान मुलीच्या हातून निसटलेली
गॅसचा फुगा जणू पृथ्वी तरंगते आकाशात
उजेडाच्या उत्सवात
सर्व वस्तुजात न्हाऊन निघालेले
आज तुझ्या महापरिनिर्वाणाचा दिवस
तुझ्या चैत्यासमोर नतमस्तक होऊन
उभे राहिले की
उजेडात न्हाऊन निघतो आम्ही
मी भुकेला तुझ्या एका शब्दाचा
तुझ्या हृदयातल्या अपार करुणेने
मलाही टाकले चिंब भिजवून
नाही तर जगणे होते मुश्‍कील
सार्वभौम स्वतंत्र देशात
अजूनही नाही झाला जातवर्गाचा अंत
जातीयता आता नुसती जनतेला
उरली नाही
विधिमंडळ संसदीय झाली आहेत
जातिप्रथेचे अड्डे
हे सर्व बदलच ना?
तुझे मिशन पुरे करायचेय ना
तू दिलेली स्वप्ने प्रत्यक्षात
उतरावयाची आहेत ना? बळ दे
रिक्ततेने मांडला आहे छळ माझा
अनात्मा नखशिखांत गेला आहे त्रासून
बेभान जगतो तरीसुद्धा
सुटत नाही अस्पृश्‍यपणाच्या मुक्तीचे कोडे
चुकलेमाकले असेल तर शिक्षा कर
मी तुझ्या चैत्यासमोर पश्‍चात्तापदग्ध होऊन उभा
तुझ्या शब्दाबरहुकूम वागता आले नाही मला
हे मृत्युंजया बोलता माझ्याशी एखादा शब्द?
बघ मी स्वतःत डोकावून निरखून घेतले
स्वतःला - अंत केला षड्व्विकारांचा
तू सांगितल्याप्रमाणे माणूस होण्याचा
प्रयास केला मी-
आता फक्त पाठीवर तुझी थाप हवी
नाही तर शांत झोपू शकणार नाही मी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15th january in dalit history death anniversary of namdeo dhasal