संक्रमणकाळातली सुंदर लेणी

भाजे आणि कार्ले लेणीसमूहापासून अगदी काही अंतरावर असणारा बेडसे अतिशय महत्त्वाचा आणि स्थापत्यकीयदृष्ट्या आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असलेला लेणीसमूह आहे.
caves
caves sakal

-केतन पुरी

भाजे आणि कार्ले लेणीसमूहापासून अगदी काही अंतरावर असणारा बेडसे अतिशय महत्त्वाचा आणि स्थापत्यकीयदृष्ट्या आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असलेला लेणीसमूह आहे. खरेतर, पुण्यापासून अगदीच जवळ असल्यामुळं बरेच भटके आणि पर्यटक कार्ले, भाजे आणि बेडसे लेण्या एकाच दिवसात किंवा कोणत्याही दोन लेण्या एकाच वेळेस पाहण्यावर भर देतात. अर्थात, त्यात वावगं असं काही नाही.

परंतू यामुळं लेण्यांच्या एकूण रचनेची आणि तत्कालिन स्थापत्य प्रयोगांची जाणीव आपल्याला चटकन होत नाही. पश्चिम दख्खन भागात तयार करण्यात आलेल्या सर्वात पहिल्या लेण्यांपैकी एक म्हणून भाजे लेण्यांची माहिती आपण मागील लेखात घेतली होती. हीनयान संप्रदायाच्या काळात या प्रदेशामध्ये अनेक लेण्या निर्माण करण्यात आल्या. त्यात पितळखोरा आहे, जुन्नर जवळ असणारी तुळजा लेणी आहे, ठाणाळे आहे, कोंढणे आहे, कोंडीवटे आहे, कान्हेरीमधील काही लेण्या आहेत. हे सर्व घडत असताना बौद्ध धर्मात फार मोठी धार्मिक उलथापालथ सुरु होती. हीनयान संप्रदायाची जागा ‘महायान’ नामक संप्रदायानं घेण्यास सुरुवात झाली होती. काहीसे कर्मठ आणि मूर्तिपूजनात विशेष रस असणारे हे तत्त्वज्ञान जनसामान्यांच्या समोर सक्षम पर्याय म्हणून उभे राहिले. त्यातून गौतम बुद्धांच्या प्रतिमांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. गौतम बुद्धांचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या स्तूपांच्या समोरील बाजूस बुद्धमूर्ति कोरल्या जाऊ लागल्या. लेणी स्थापत्यात अनेक बदल झाले. हीनयान ते महायान असा प्रवास होत असतानाचा जो संक्रमणाचा काळ होता, त्या काळात एका अतिशय सुंदर लेणीसमूहाची निर्मिती झाली. ती ही बेडसे येथील लेणी.

साधारण तीनचारशे पायऱ्या चढून गेल्यावर लेणीच्या मुख्य परिसरात आपण प्रवेश करतो. ही अरण्यक प्रकारातील लेणी आहे. इथं राहणाऱ्या बौद्ध भिक्खुंना शांततेत ईश्वराची आराधना करण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या व्रताची पूर्तता करण्यासाठी या लेण्यांची निर्मिती प्रामुख्यानं झाली असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. पायऱ्या चढून गेल्यावर आपण थेट सात क्रमांकाच्या लेणीसमोर उभा राहतो. संपूर्ण भारतात ही एकमेव चैत्य लेणी आहे, ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अरुंद अशा कातळात खोदलेला रस्ता आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन पूर्ण आणि दोन अर्धस्तंभांची रचना केलेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, एवढे भव्य आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कातळ खोदून खांब तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा, असे अभ्यासक सांगतात.

या स्तंभांच्या शीर्षावर अशोकच्या स्तंभशीर्षाप्रमाणे उलट्या कमळाची रचना करण्यात आली आहे. त्यावर हत्ती, नीलगाय, घोडे, बैल यांसारखे प्राणी आणि त्यांच्यावर आरूढ युगुल आपल्याला आढळतात. मुख्य प्रवेशद्वार आणि खांबाच्या मध्ये काहीशी मोकळी जागा सोडलेली आहे, जिथे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर एकावर एक चैत्यगवाक्षांची रचना केलेली आहे आणि काही छोट्या खोल्यासुद्धा खोदल्या आहेत. या सर्व गोष्टी पहिल्यांदाच लेणीस्थापत्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस चैत्य गवाक्ष आहे. आतील चैत्य इतर चैत्यगृहाप्रमाणेच गजपृष्ठकार आहे. स्तूपाची रचनासुद्धा अगदीच सारखी आहे. स्तूपाच्या बाजूस काही खांबांवर कमळ, त्रिरत्न, धम्मचक्र सारख्या अनेक गोष्टींचे अंकन केले आहे. ही शुभचिन्हे मानली जातात.

या चैत्याच्या उजव्या बाजूला असणारी लेणी क्रमांक ११ अशीच दुर्मिळ स्थापत्य असलेली लेणी आहे. हे एक विहार आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या लेण्यांमध्ये प्रामुख्यानं विहारांची रचना ही चौकोनी किंवा आयताकृती केल्याचं पाहायला मिळतं. परंतू बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या विहाराची रचना अगदीच चैत्यगृहासारखी आहे, गजपृष्ठकार. खरेतर, इथेही चैत्य बनवण्याचा विचार असावा. परंतू काही अशुभ वाटणाऱ्या घटना घडल्यामुळे किंवा ऐनवेळी निर्माण झालेल्या काही अपरिहार्य परिस्थितीमुळे चैत्य बनवण्याचा विचार अर्धवट सोडून देण्यात आला असल्याचे आपल्याला जाणवते. नंतर या चैत्यगृह बनवण्यासाठी खोदण्यात आलेल्या लेणीस विहारामध्ये रूपांतरित करण्यात आले.

एकूण नऊ खोल्यांची रचना असणारा हा विहार वैशिष्ट्यपूर्ण आहे. छोट्या खोल्यांच्या प्रवेशद्वारावर चैत्य कमान तर आतील बाजूस बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी केलेली व्यवस्था दिसून येते. लेणीच्या मधोमध एका स्त्री देवतेच्या प्रतिमेचं अंकन करण्यात आलं आहे. हे फार पुरातन नसून उत्तर मध्ययुगीन काळ किंवा त्यानंतर कधीतरी हे करण्यात आलं असावं. इ. स. १८६१ या वर्षातल्या नोंदीवरून या लेणीची सातत्यानं देखभाल घेतल्याचे संदर्भ आपल्याला वाचावयास मिळतात. कदाचित त्याचकाळात ही देवी याठिकाणी अंकित करण्यात आली असावी. अर्थात, हा केवळ अंदाज. आज स्थानिक परिसरातील गावकरी या देवीला ‘सटवाई’ नावानं ओळखतात व तिची पूजाअर्चा करतात.

ही एका भल्यमोठ्या धार्मिक स्थित्यंतराच्या-संक्रमणाच्या काळात निर्माण झालेली लेणी आहे. पुढे कार्ले, कण्हेरी किंवा अजंठा, छ. संभाजीनगर येथील लेण्याची रचना किंवा स्थापत्यकीय घटकांचे केलेले विशेष प्रयोजन पाहता बेडसे अतिशय महत्त्वाची आणि नव्या गोष्टींच्या निर्मितीस कारणीभूत ठरणारी लेणी आहे. सातवाहन काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात ही लेणी निर्माण करण्यात आली. सातवाहन कालीन कलेचा महत्त्वाचा घटक म्हणून या लेण्यांकडे पाहायला हवे.

पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारी बेडसे लेणी दोन हजार वर्षांपूर्वी अशा बौद्ध भिक्खूंकडून वापरण्यात यायची, ज्यांचा इतर जगाशी अन्न गोळा करण्यापलीकडं फारसा संबंध नसायचा. ही अलिप्ततेची परंपरा आजही कायम आहे. आपल्या उदरात अनेक रहस्ये, अनेक विस्मयकारक गोष्टी आणि एका सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक आणि स्थापत्यकीय उलाढालीच्या खाणाखुणा जपत बेडसे आजही आपले एकांतवासाचं अस्तित्व टिकवून आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com