ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.comप्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी नवा अनुभव देतो आणि कळत नकळत समृद्ध करतो. प्रवासाने माणूस शहाणा होत जातो, म्हणून ‘बारा गावचं पाणी प्यायलेला’ म्हणजे फार अनुभवी, जग पाहिलेला, दुनियादारी जाणणारा असं म्हटलं जातं. .गो व्याहून पुण्याला येताना दूधसागर स्थानकावर गाडी थांबल्यावर आपोआपच गाणं ओठावर आलं...हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंद व्हा रे...हिरवी शाल पांघरलेले डोंगर आणि कोसळणारे शुभ्र धबधबे. ‘धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे’ या समर्थ रामदासांच्या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव! स्वर्ग याहून का वेगळा असतो. श्रावणातील प्रवास म्हणजे डोळ्यांचं असं पारणं फिटतं. रेल्वेचा प्रवास आणि त्यात विंडो सीट. ते दूधसागर स्थानक जणू माझ्यासाठी दुधात साखर झालं होतं. अर्थात ते दृश्य मनातच साठवून ठेवलं नंतर, कारण पुढचा प्रवास सुरू झाला आणि स्थानक मागे राहिलं.एकंदरीत वाटेत येणारी काही स्थानकं ही विविध कारणांसाठी महत्त्वाची असतात. जसं लोणावळ्याची चिक्की, कर्जतचा वडा, शेगावची कचोरी घेणं हे अनेकांसाठी शास्त्र असतं! तसंच स्थानकावर प्रवाशांचं चढणं- उतरणं हेदेखील चालू असतं. अलीकडचीच एक आठवण. एका स्थानकावर गाडी बराच वेळ थांबली होती आणि पुण्यात शिक्षणासाठी निघालेला मुलगा चढणार होता. त्याची आई तर अगदी रडतच होती. कसंबसं सावरलं. गाडी सुटताना कवी संदीप खरे यांची कविता आठवलीच-.गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओलेगाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले...खरंच अशा निरोपाच्या क्षणी गळा दाटून येतो. आणि पुढे जाता जाता खिडकीबाहेर काळोखही दाटून येतो.बाहेर अंधार पडला, की आपले कान आणि डोळे डब्याच्या आत येतात. आणि विविध नमुने अनुभवता येतात. मुलांचे हट्ट, कुणाची गहन चर्चा, एखाद्या ग्रुपचं अंताक्षरी खेळणं अशी दृश्य दिसू लागतात.हळूहळू सगळं शांत होतं आणि जेवणाचे गंध दरवळू लागतात. कुणी तिथेच जेवणाची ऑर्डर देतं, कुणी सुटसुटीत डबा आणलेला असतो, तर कुणी ‘खाईन तर तुपाशी’ म्हणत साग्रसंगीत जेवण अगदी ताट, वाटी, चमच्यासकट आणलेलं असतं. मग झोपायच्या वेळी त्यांची अमुकच उशी आणि तमुकच पांघरूण बाहेर येणार हा आपला अंदाजही खरा ठरतो. कधी सहप्रवासी आपल्याशी स्वतःहून बोलू लागतात. एकदा कार्यक्रमासाठी ट्रेनमधून जात असताना एकमेकींशी मराठीत बोलणाऱ्या दोन बायका माझ्याशी मात्र हिंदीत बोलू लागल्या. तेवढ्यात मला फोन आला आणि मी मराठीत बोलतेय म्हटल्यावर त्यांनाही गंमतच वाटली. मुक्कामाइतकाच कधीकधी प्रवासही अशा छोट्या-छोट्या प्रसंगांमुळे लक्षात राहतो; मात्र जसं आपलं स्थानक जवळ येतं, तसे आपल्याला उतरण्याचे वेध लागतात. अर्थात काही अनपेक्षित अनुभव हे कायमचे लक्षात राहतात..एकदा गोव्याहून पुण्याला जायचे ठरलेले असतानाच रत्नागिरीहून कार्यक्रमासाठी विचारणा झाली. अगदी आवडीचा विषय म्हणून पुण्याचं फ्लाइट रद्द करून गोव्याहून रत्नागिरीची ट्रेन पकडली. आणि आता थोड्याच वेळात उतरायचं अशा तयारीत असताना अलीकडच्या एका स्थानकावर गाडी बराच वेळ थांबली. शेवटी आयोजक त्या स्थानकावर गाडी घेऊन आले आणि मी अलीकडेच उतरले. थोडक्यासाठी लटकल्यामुळे जरा शीण जाणवला; पण एरवीही गाड्यांच्या आणि फ्लाइटच्या वेळांमुळे काही तास विमानतळ वा स्थानकावर काढणं आता सवयीचं झालं आहे. झोपेचं खोबरं म्हणजे काय हे अशावेळेस समजतं; पण तोही एक अनुभवच गाठीशी येतो आणि तिथलं वातावरण पाहता वाटणारही नाही, की बाहेरचं जग साखरझोपेत आहे. अशावेळेस वह्या-पुस्तकं आणि हेडफोन्स चांगलीच साथ करतात.एकूणच प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी नवा अनुभव देतो आणि कळत नकळत समृद्ध करतो. प्रवासाने माणूस शहाणा होत जातो, म्हणून ‘बारा गावचं पाणी प्यायलेला’ म्हणजे फार अनुभवी, जग पाहिलेला, दुनियादारी जाणणारा असं म्हटलं जातं.समर्थ रामदास स्वामींचा हा मंत्र इथेही तंतोतंत लागू होतो.नित्य नूतन हिंडावे। उदंड देशाटन करावे॥.जितके प्रदेश तितक्या भाषा, खाद्यसंस्कृती, विचारधारा या सगळ्याची ओळख होऊन विचारकक्षा रुंदावत जातात. कधी स्वतःला प्रवास नाही करता आला, तर प्रवासवर्णनंही खूप समृद्ध करतात. आणि हो, मेघदूत वाचत असताना यक्ष मेघाला दूत समजून रामगिरी पर्वतापासून अलकानगरीपर्यंतचा जो मार्ग सांगतो, आपणही बसल्याजागी तो प्रवास करत जातो, अर्थात महाकवी कालिदासांच्या अलौकिक शैलीमुळे. ही तर खरोखर प्रतिभेची आणि शब्दांची किमया! त्यातही मेघाच्या उंचीवरून ते वर्णन अनुभवणं विलक्षणच.रामायणामध्येही रामचंद्रांचा वनवास हादेखील एक मोठा विलक्षण प्रवासच होता. मुळात आयुष्याच्या प्रवासात अनपेक्षितपणे आलेलं ते वळण होतं; पण ते स्वीकारून रामचंद्र पुढे पुढे चालत राहिले. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जात राहिले; मात्र भरतासाठीच ही गोष्ट असह्य होती; पण त्यावेळेस रामचंद्रच वास्तवाची जाणीव करून देतात. गीतरामायणात एक सुंदर ओळ आहे.रामचंद्र भरताला म्हणतात,तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवासआणि एकाच पित्याची दोन मुलं; पण प्रवास किती वेगळा असावा!रामचंद्र पुढे म्हणतात-अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचापराधीन आहे जगती पुत्र मानवाचागदिमांनी याच गीतामध्ये सांगितलेलं एक वास्तव तर प्रत्येकाच्याच आयुष्याला लागू होतं.दोन ओंडक्यांची होते सागरात भेटएक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठक्षणिक तेवि आहे बाळा, मेळ माणसांचापराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.सगळी नाती आणि सर्व परिचित हे आपले आयुष्याच्या प्रवासातील सहप्रवासी. कोण किती काळ आणि कशी सोबत करेल, याबाबत आपण अगदी पराधीन असतो. आणि हे माहीत असूनही वियोगाचा त्रास होतोच; पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो हेच खरं.परगावी जाताना आपल्याला माहीत असतं, की आपल्याला कुठल्या गाडीत कधी चढायचं आणि कुठल्या स्थानकावर उतरायचं; पण आयुष्याची पुढची स्थानकं आपल्याला माहीत नसतात. भाऊसाहेब पाटणकर यांनी आपल्या शायरीतून यावर फार छान भाष्य केलं आहे. ते म्हणतात-जीवनाची रेलगाडी, ना कळे नेते कुठेतिकिटावरी तर स्टेशनाचे नावही नाही कुठेही रचना बरीच मोठी आहे; पण यात रेलगाडी, टीसी, स्थानक सगळी रुपकं छान मांडली आहेत आणि आधी म्हटलं तसं आपले सहप्रवासी कुठल्या स्थानकावर चढतील आणि कधी उतरतील हेदेखील सांगता येत नाही. आपण प्रवास तेवढा करत राहायचा. ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ असं म्हणत गात राहायचं आणि कधी इच्छितस्थळी पोहोचता आलं नाही, तरी मनाच्या कल्पनेने हवं तिथे विहरून यायचं. कारण बसल्याजागीही मन सतत प्रवास करतच असतं. आपल्या आयुष्याच्या प्रवासात असा मनाचा प्रवास, एकेका नात्याचा प्रवास आणि ठरवलेल्या ध्येयाचाही प्रवास करत ‘आनंदयात्री’ होऊन जायचं आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या या शब्दांना पुन:पुन्हा गिरवायचं-अखंड नूतन मला ही धरित्रीआनंदयात्री मी आनंदयात्री (लेखिका निवेदिका-व्याख्यात्या आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.