
गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
राजस्थानातील कोटा या शहरातलं कैथून नावाचं गाव. या छोट्याश्या गावात ‘ती’ राहत होती तिच्या अम्मी, अब्बू आणि बहीण सदफसोबत! ‘ती’ म्हणजे आपली नायिका. तिनेच तर सांगितलीय ही गोष्ट! तर, तो दिवसही नेहमीसारखाच होता. त्या दिवसाची नेहमीसारखीच एक दुपार. म्हशींनी गावातल्या तलावात डुंबून मस्त अंघोळ केली होती आणि त्या छानपैकी पहुडल्या होत्या. सदफही डुलकी घेत होती. अब्बा रोजप्रमाणे दोरे रंगवत होते आणि अम्मी ते काम करत होती, जे ती सगळ्यांत उत्तम करते आणि सगळ्यांपेक्षा उत्तम करते, ते म्हणजे - मागावर विणकाम करण्याचं काम! अहाहा! आता तिच्या आणि सदफच्या अम्माच्या कामाविषयी किती किती आणि काय काय सांगायचं! अम्मी गुलाबी, पिवळ्या, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या सुरेख साड्या विणते. त्यावर ती आंबा, मोर, पक्षी, झाडांची पानं, फुलं यांची रेखीव नक्षी काढते.