

Wabi Sabi Japanese philosophy
esakal
एक कथा लिहून पूर्ण केली, पण काही केल्या तिचा शेवट हवा तसा होत नव्हता. वेगवेगळ्या पद्धतीने तो लिहून पाहिला. वेगळा विचार करून पाहिला. पण तरी हवा तसा शेवट काही जमेना. मला जे ध्वनित करायचं होतं, ते नीट मांडता येईना.
मग मला माझा जाम राग आला. त्या कथेचं बीज मला दीडेक वर्षांपूर्वी सुचलं होतं. त्यानंतर समांतर पातळीवर त्या बीजाचा निगुतीने विचार करत राहिलो - त्यातल्या पात्रांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, घडणाऱ्या घटितांबद्दल आणि कथेच्या आशयाबद्दल... जे सूचित करायचे आहे त्याबद्दल... तसा आराखडा तयार केला, टिपणं काढली. काही तपशील तपासून पाहायचे होते म्हणून आनुषांगिक पुस्तकं वाचली, लेख वाचले. पॉडकास्ट ऐकले. शेवटी, ते बीज आता पक्व झालं आहे असं आत्मविश्वासाने वाटल्यावर कथा लिहून काढली. त्याचे तीन खर्डे केले आणि नेमकी शेवटाला - शेपटाला ती अशी अडून बसली होती! पण ते शेपूट तितकंच महत्त्वाचं होतं, त्यामुळे कसंतरी संपवून चालणार नव्हतं.
इतका वेळ देऊन, संयम राखून निगुतीने एकेक टप्पा पार करून काम केलं आणि आता तुला कथेचा शेवट नीट लिहिता येत नाहीये! कसला तू मग लेखक? अरे आता काहीएक कथा लिहिल्यानंतर एवढं तर जमलं पाहिजे की नाही तुला! मी स्वतःलाच कोसत होतो, स्वतःवरच चिडलो होतो. मी परत ती कथा घेऊन बसलो. तीनचार प्रकारे शेवट लिहून काढले, पण तरी मनासारखं काम होईना. शेवटी ते शेवट सेव्ह करून ठेवून दिले. स्वतःला म्हटलो, पठारावस्थेला लागलास की काय? संपली की काय तुझी लेखनाची धग, तुझी पॅशन? शेवटी वैतागून मी ती कथा बाजूला ठेवून द्यायचा निर्णय घेतला. थोडे दिवसांनी परत पाहू या, कदाचित सुचेल काहीतरी नवं, नाहीतर राहू दे तशीच पडून असा तिरपागडा विचार करून मी लक्ष दुसरीकडे वळवायचं ठरवलं.