दुनियादारी : निर्णायक काहीतरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुनियादारी : निर्णायक काहीतरी...
दुनियादारी : निर्णायक काहीतरी...

दुनियादारी : निर्णायक काहीतरी...

‘हे बघ, हा डिजिटल मार्केटिंगच कोर्स बेटर वाटतोय मला. घराजवळही पण आहे आणि रेटिंगही चांगली आहे.’

‘पण का करायचाय तुला हा कोर्स?’

‘का काय? ट्रेंडिंग आहे हा कोर्स... सगळेच करत आहेत. स्कोप पण चांगलाय.’

‘अगं हो! ते ठीकेस पण तुला आहे का त्यात तितका इंटरेस्ट? खरं सांग, जग करतंय आणि त्यातून कमावतंय म्हणून तू करत आहेस ना हा कोर्स?’

दोघांच्यात एकदम शांतता पसरली. साहिल भुवया वर करून तिच्याकडं शांत, पण तरी व्यंगात्मक नजरेनं बघत होता. सिद्धी थोडी एका गालात अर्धवट हारलेलं हास्य घेऊन बसली होती. तिनं साहिलशी नजर मिळवणं टाळलं आणि समोरचा संपलेला कोल्ड कॉफीच्या ग्लासातला स्ट्रॉ तोंडाला लावला.

‘संपलंय त्यातलं सगळं... सोड आता तो स्ट्रॉ आणि मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे.’

‘नाही रे... मला करायचाय हा कोर्स कारण...’

‘कारण शाल्मली तो करतीये आणि ती म्हणाली ह्यात खूप स्कोप आहे, नाही का?’’ साहिलनं पुन्हा भुवया उडवून सिद्धीच्या उत्तराची वाट बघितली.

‘नाही रेऽऽऽऽ असं नाहीये रे!’

‘हो रेऽऽऽऽ... असंच आहे रे!’ साहिल तिच्याच स्वरात स्वर मिसळून म्हणाला.

सिद्धानं टिशू पेपर साहिलवर फेकला.

‘माझी नक्कल करत जाऊ नकोस काय तू!’ तिनं खोटं रुसल्यासारखं केलं.

‘अगं, पण आयुष्यात तू कधी थांबवणारेस नक्कल करणं... इतरांची?’ साहिलनं तोच चुरगळलेला टिशू पेपर परत सिद्धीवर फेकून मारला. सिद्धी काहीच न बोलता आणि तशीच खोटं खोटं चिडून बसून राहते. तेवढ्यात वेटर येतो आणि अजून काही हवंय का विचारतो.

‘नाही नाही. बिल करा. पण बिल दोन वेगळी करा... कोल्ड कॉफी आणि क्रिमरोलचं मॅडम वेगळं देतील,’ साहिल वेटरला म्हणाला.

‘ए हॅलो! वेगळं काय वेगळं? तू भरणारेस आज बिल ठरलंय आपलं,’ सिद्धी ताडकन वळून म्हणाली. ‘ओ दादा, तुम्ही एकच बिल करा ओ!’

‘अच्छा म्हणजे तुला ऐकू येतं तर... मग माझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर दे आधी.’

‘अरे तू काय रे... सोडतच नाहीस विषय.’

‘कित्ती वर्ष ओळखतो सांग बरं मी तुला?’

सिद्धिनं पुन्हा नाक मुरडलं, ‘अरे, असं किती दिवस मी तुलाच हट्ट करून सगळीकडं पैसे द्यायला लावणार... कळतंय का तुला? कुठंतरी काहीतरी सुरुवात केली पाहिजे ना मी!’

ती बेंबीच्या देठापासून म्हणाली खरं, पण ते तसं अगदी तिच्या तोंडून ऐकताना वाटलं नाही ती गोष्ट वेगळी. साहिलला मात्र तिचा हा पेच माहीत होता.

‘दादा! एक चीजकेक पाठव ना... आणि बिलात ॲड कर,’ साहिल ओरडून वेटरला म्हणाला.

सिद्धी गोंधळून साहिलकडं बघायला लागली आणि म्हणाली, ‘ओय हॅलो! तू काय वेडाय का बहिरा? आत्ताच म्हणाले ना खर्च कमी करायचे आहेत मला... चीजकेक कशाला अजून वाढवतो आहेस बिलात?’’

‘अगं, हा चीजकेक माझ्याकडून आहे...’

‘किस बात कि खुशी में?’ ‘माझ्या मैत्रिणीला मी पुन्हा एकदा येडपट काहीतरी निर्णय घेण्यापासून आणि तिला इंटरेस्ट नसलेल्या कोर्सचे तिचे पैसे वाचवल्याच्या खुशी में...’

साहिल हे म्हणताना हसला आणि त्याला बघून सिद्धी सुद्धा खुद्कन हसली.

चीजकेक आला आणि दोघांनी कोणी किती खायचा ह्यावर भांडण सुरू केलं. आयुष्यातील निर्णयांच्या भांडणातलं हे अजून एक भांडण.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
loading image
go to top