दुनियादारी : एक ‘नाही’ सोबत असावा!

राम परत दुसऱ्या कोपऱ्यात त्याचा जागी गेला आणि कॉम्प्युटर स्क्रीनवरच्या त्यानं आणि साक्षीनं बनवलेल्या डिझाईनकडं बघत त्यात अजून काय छान करता येईल ह्याचा विचार करायला लागलो.
दुनियादारी : एक ‘नाही’ सोबत असावा!
Summary

राम परत दुसऱ्या कोपऱ्यात त्याचा जागी गेला आणि कॉम्प्युटर स्क्रीनवरच्या त्यानं आणि साक्षीनं बनवलेल्या डिझाईनकडं बघत त्यात अजून काय छान करता येईल ह्याचा विचार करायला लागलो.

‘परत एक छोटासा बदल आहे.’

‘परत?’

‘हो ना अगं. शहाणपण पाझळायचं एक उत्तम क्षेत्र आहे आपलं. कोणीही येऊन आपल्या कामाची इज्जत काढतं. असो... आहे का वेळ?’

‘अम्म... काढते.’

‘सांग मोकळी झालीस की. आपण बसू एकत्रच करायला.’

‘हो हो सांगते.’

राम परत दुसऱ्या कोपऱ्यात त्याचा जागी गेला आणि कॉम्प्युटर स्क्रीनवरच्या त्यानं आणि साक्षीनं बनवलेल्या डिझाईनकडं बघत त्यात अजून काय छान करता येईल ह्याचा विचार करायला लागलो. ह्या नवीन क्लायंटच्या किचकट कामामुळं राम आणि साक्षीला सारखं इकडून तिकडं पळावं लागत होतं. पाच मिनिटांत ती त्याचा डेस्कपाशी आली.

‘मी इथेच काही नवीन गोष्टी ॲड केल्या आहेत, तुला बघ त्या डिझाईनमध्ये कशा खुलवता येतील. खुर्ची घे... बस.’ तो स्क्रीन थोडी वळवत म्हणालो.

तिनं एक खुर्ची ओढली आणि तिचा आजचा जरा थकलेला चेहरा बरा करायचा प्रयत्न केला. खुर्चीत बसण्याआधी तिनं तिच्या सवयीप्रमाणं त्याच्या स्क्रीनजवळ येऊन, त्यातच बघता बघता केस सोडले आणि परत घट्ट बांधले. तिच्या स्क्रीनच्या जवळ येण्यानं तिनं मारलेला परफ्युम रामच्या अगदी नाकातल्या प्रत्येक केसाला स्पर्शून पार आत फुफ्फुसांपर्यंत गेला आणि खूप वेळ तिथेच घर करून राहिला. मागच्या बाजूला बसलेले सगळे ऑफिस कलिग मान वळवून बघत होते आणि मनात गाणं गात होते, ‘दो दिल मिल रहे हैं.. मगर चुपके चुपके.’

राम त्यांचं डिस्कशन सुरू असताना आजूबाजू बघून, ‘काय बघतो रे हराम्या!’ असे लुक्स सुद्धा सगळ्यांना देत होता.

क्लायंट्सचा अंदाज आणि बॉसची कटकट, ह्यातून राम आणि साक्षीनं डोकं वापरून काम उरकलं आणि अखेरीस काम क्लायंटकडून अप्रूव्ह झालं.

त्यांचे डिस्कशन आटोपलं. काम संपल्याचा दोघांनी निःश्वास सोडला. बघता बघता संध्याकाळ झाली, ऑफिस सुटलं आणि दोन दिवसाचा कामाचा थकवा घेऊन दोघंही बाहेर पडले.

‘‘काही खाणारेस?’’ रामनं ऑफिसबाहेर येताच विचारलं.

‘अम्म...’ साक्षीच्या चेहऱ्यावर खूप द्विधा होती.

‘काय गं? इतका विचार? भूक नाही लागली सकाळपासून?’

‘काही नाही, असंच.’ ती तशीच थकलेल्या चेहऱ्यानं म्हणाली.

‘सब ठीक?’

‘हां? नाही रे... असं काही नाही. सब ठीक! दोन दिवस काम करून आज जरा डोकं सकाळपासून दुखतंय म्हणून जरा तंद्रीत आहे. आणि पोट सुद्धा... थोडं थोडं. बाकी काही नाही... ’’ साक्षी शब्दांच्या शोधात काहीबाही जुळवून म्हणाली.

‘अस्सं... चल मग जाऊ खायला.’ राम थोडा विचार करून म्हणाला.

‘हो चल ना!' ती म्हणाली आणि निघण्यासाठी वळाली.

‘बावळट! नाही म्हणता येत नाही ना तुला तोंडावर कोणाला,’ राम तिथेच थांबून तिला म्हणाला.

‘हां??" साक्षीनं मान वळवली आणि तशीच त्याच्याकडं बघायला लागली.

‘प्रश्न नको विचारूस, तुझी गाडी घे आणि घरी जा लगेच.’

‘अरे?? असं काय करतोयस?’

‘तुझं डोकं, पोट का दुखतंय, एरवीपेक्षा आज इतकी का दमली आहेस... एरवी भरमसाट सेल्फी काढनारीनं आज एकही फोटो का काढला नाहीये, अचानक आलेला तुझ्या चेहऱ्यावरचा मोठा पिंपल... हे सगळं अगदी लगेच क्लिक नाही झालं ना... तरी कळतं आम्हा मुलांना पण... ’ असं म्हणून रामनं तिच्या कपाळावर एक हलकी टपली मारली. साक्षी तशीच ‘काय बोलू?’ ह्या भावनेनं बघत उभी राहिली.

‘बॉसनं किंवा ऑफिसमधल्यांनं सांगितलेलं काम तर चल तुला नाही म्हणता येत नाही, हे मी एकवेळ समजू शकतो. मात्र, पण इतर वेळी तर हक्कानं तू नाही म्हणू शकतेस ना? नीघ आता... नंतर खाऊ कधीतरी.’ रामच पुढं शांतता तोडत म्हणाला.

दमलेल्या चेहऱ्यानं साक्षी दमलेलं हसली. सवयीप्रमाणं तिनं पटकन तिचे केस सोडले आणि परत बांधले. तिच्या पर्फ्युमचा सुगंध दरवळला. तिच्या गाडीची किल्ली तिनं तिच्या बागेतून हातात घेतली आणि तोच हात दाखवत ती म्हणाली, ‘थँक्स.’

‘फॉर व्हॉट?’

‘फॉर मेकिंग माय फर्स्ट डे जस्ट अ बिट बेटर.’

mahajanadi333@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com