
आचार्य विष्णुशर्मा यांनी लिहिलेला ‘पंचतंत्र’ हा ग्रंथ विविध भारतीय भाषांत प्रसिद्ध झालेला आहे. हे पंचतंत्र चौदाशे वर्षांपूर्वी फारसी भाषेतही भाषांतरित करण्यात आलं.
‘पंचतंत्रा’चा भारताबाहेर प्रसार
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
आचार्य विष्णुशर्मा यांनी लिहिलेला ‘पंचतंत्र’ हा ग्रंथ विविध भारतीय भाषांत प्रसिद्ध झालेला आहे. हे पंचतंत्र चौदाशे वर्षांपूर्वी फारसी भाषेतही भाषांतरित करण्यात आलं. प्राण्यांच्या गोष्टींतून सोप्या भाषेत नीतिशास्त्र आणि मूल्यं शिकवण्याच्या पद्धतीमुळे पंचतंत्राचं हे फारसी भाषांतर जगभर प्रसिद्ध झालं. कुठल्याही भारतीय साहित्यकृतीला लाभलं नसेल असं, जगातील विविध भाषांत भाषांतर होण्याचं भाग्य, पंचतंत्राला लाभलं. आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडात झालेला हा पंचतंत्राचा प्रवास आजच्या लेखातून जाणून घेऊ या.
पंचतंत्र
पंचतंत्र हा ग्रंथ कधी लिहिला गेला याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. विविध अभ्यासकांनुसार, इसवीसनपूर्व ३०० वर्षं ते इसवीसन ३०० या काळात हा ग्रंथ लिहिला गेला असावा; पण अनेक अभ्यासक, पंचतंत्र हा ग्रंथ इसवीसनाच्या अंदाजे तिसऱ्या शतकात (म्हणजे, आजपासून १७०० वर्षांपूर्वी) रचला गेला असल्याचं मानतात. पंचतंत्रात कौटिल्यलिखित ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातून मांडलेलं नीतिशास्त्र आणि राजधर्म, भारतीय परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या सोप्या कथांतून, सांगितला आहे.
इसवीसनाच्या सहाव्या शतकात (म्हणजे, १४०० वर्षांपूर्वी) या पंचतंत्राचं आपल्याला माहीत असलेलं पहिलं भाषांतर झालं होतं, त्यामुळे या काळापूर्वी हा ग्रंथ प्रसिद्ध असणार हे नक्की.
मूळ पंचतंत्र ग्रंथाच्या ‘कथामुख’ या सुरुवातीच्या प्रकरणात सांगितल्यानुसार, आचार्य विष्णुशर्मा यांनी अमरशक्ती नावाच्या राजाच्या तीन राजकुमारांना सहा महिन्यांत व्यवहार आणि नीतिशास्त्रात पारंगत करण्यासाठी विविध कथा सांगून त्यांना शिक्षण दिलं.
पंचतंत्रातील या कथांतील पात्रं ही प्राणी आणि माणसं आहेत. या कथा पाच ‘तंत्रां’त, म्हणजे ‘भागां’त, विभागलेल्या असल्यामुळे या ग्रंथाला ‘पंचतंत्र’ असं नाव मिळालं. यांत ‘मित्रभेद’, ‘मित्रलाभ’, ‘काकोलूकियम्’, ‘लब्धप्रणाश’, ‘अपरीक्षितकारक’ अशा पाच मुख्य कथा येतात. या पाच मुख्य कथांमध्ये उदाहरण देताना, वानर आणि पाचर मारलेलं लाकूड, चार मूर्ख पंडितांची कथा, निळ्या कोल्ह्याची कथा, दुष्ट सिंहाला विहिरीतील त्याचंच प्रतिबिंब दाखवून मारणाऱ्या सशाची कथा, वानराचं काळीज मागणाऱ्या मगरीची कथा अशा अनेक इतर छोट्या कथा सांगितल्या आहेत.
फारसी भाषेत पंचतंत्राचं भाषांतर
अशा या राजधर्म, नीतिशास्त्र सांगणाऱ्या पंचतंत्राचं इस्लामच्या उदयापूर्वी इराणमधील फारसी भाषेत भाषांतर झालं होतं. अरबी भाषेतील पंचतंत्राच्या काही आवृत्त्यांमध्ये या फारसी भाषांतराबद्दल पुढील माहिती दिलेली आहे :
इसवीसनाच्या सहाव्या शतकात (आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी) इराणमध्ये खुस्रो नावाचा राजा राज्य करत होता. राजाला उपयोगी पडणारं नीतिशास्त्र आणि राजधर्म सांगणारा पंचतंत्रासारखा ग्रंथ भारतात असल्याची माहिती खुस्रो राजाला समजते, त्यामुळे तो बुर्झो नावाच्या इराणी वैद्याला भारतात पाठवतो.
भारतात येण्याचं कारण उघड न करता बुर्झो एका भारतीय राजाच्या दरबारात प्रवेश मिळवतो. तिथल्या एका भारतीय दरबाऱ्याशी मैत्री करून पंचतंत्र या ग्रंथाविषयी त्याच्याकडे चौकशी करतो. तेव्हा, पंचतंत्र हा ग्रंथ राजाच्या खजिन्यात ठेवला असल्याचं तो दरबारी सांगतो. वारंवार विनवणी केल्यानंतर तो दरबारी बुर्झोला पंचतंत्र हा ग्रंथ आणून देतो. त्यातील एकेका कथेचं बुर्झो फारसीमध्ये भाषांतर करतो आणि नंतर भाषांतरित केलेला पंचतंत्र ग्रंथ इराणमध्ये जाऊन खुस्रो राजाला देतो, अशी माहिती थोडक्यात येते.
अर्थात्, अरबी भाषांतराच्या काही आवृत्त्यांमध्ये ही माहिती थोडीशी वेगळी दिली आहे. त्यातील एका माहितीनुसार, मृताला जिवंत करणारी संजीवनी वनस्पती मिळवण्यासाठी बुर्झो हा इराणमधून भारतात आलेला असताना त्याला पंचतंत्र या ग्रंथाबद्दल समजतं आणि पंचतंत्र हा ग्रंथ मिळवून तो भारतीय राजाच्या नकळत गुप्तपणे त्याचं भाषांतर करतो.
वरील माहितीचा अस्सलपणा पटला नाही तरी इसवीसनाच्या अंदाजे सहाव्या शतकात पंचतंत्राचं फारसीत भाषांतर झालं, हे या माहितीवरून स्पष्ट होतं.
अरबी भाषेत पंचतंत्राचं भाषांतर
फारसी भाषेतील पंचतंत्राच्या या भाषांतरावरून इसवीसनाच्या सहाव्या शतकातच तुर्कस्तानातील सीरियाक भाषेत आणि इसवीसनाच्या आठव्या शतकात (आजपासून १२०० वर्षांपूर्वी) अरबी भाषेत पंचतंत्राचं भाषांतर झालं.
पंचतंत्रातील ‘मित्रभेद’ या पहिल्या तंत्रातील मुख्य कथेमध्ये करटक आणि दमनक या नावाच्या कोल्ह्यांची दोन मुख्य पात्रं आहेत. फारसी आणि अरबी या भाषांत ‘पंचतंत्र’ या नावापेक्षा या दोन कोल्ह्यांच्या नावानं पंचतंत्राचं भाषांतर जास्त ओळखलं गेलं. ‘करटक आणि दमनक’ या नावांचा सीरियाक भाषेतील अपभ्रंश ‘कलीलाग वा दमनग’ असा झाला, तसंच त्या नावांचा अरबी भाषेत ‘कलीला वा दिम्ना’ असा अपभ्रंश होऊन आजही ‘कलीला वा दिम्ना’ याच नावानं मुस्लिम देशांत पंचतंत्राचं हे भाषांतर प्रसिद्ध आहे.
सीरियाक आणि अरबी भाषेतील ‘कलीला वा दिम्ना’ या भाषांतरात/रूपांतरात एकूण दहा कथा येतात. यांत पंचतंत्रातील पाच तंत्रांच्या पाच कथा (ज्यांत अर्थातच अनेक छोट्या उपकथा येतात), महाभारतातील शांतिपर्वात भीष्मानं युधिष्ठिराला सांगितलेल्या तीन कथा, चंडप्रद्योत राजाच्या कथेवर बेतलेली एक कथा आणि कदाचित दुसऱ्या एका भारतीय कथेवर आधारित ‘उंदीरराजा आणि त्याचे मंत्री’ या नावाची एक कथा यांचा समावेश होतो. म्हणजे बुर्झो यानं भारतात येऊन केवळ पंचतंत्र भाषांतरित न करता राजधर्म आणि नीतिशास्त्राशी निगडित इतरही कथा भाषांतरित केल्या असाव्यात.
पंचतंत्र अर्थातच जवळजवळ सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. या ग्रंथाच्या अंदाजे ५० भाषांमध्ये एकोणिसाव्या शतकापर्यंत केलेल्या भाषांतरांच्या आणि रूपांतरांच्या २०० आवृत्त्या आढळतात. भारताबाहेरील १५ ते २० भाषांतदेखील पंचतंत्राचं भाषांतर झालेलं आहे.
अर्थात्, भाषांतर, रूपांतर करताना प्रत्येक प्रदेशाला साजेसे बदल पंचतंत्राच्या कथांमध्ये करण्यात आले, त्यामुळे पंचतंत्राचं जगातील वेगवेगळ्या प्रदेशांत केवळ जसंच्या तसं भाषांतर नाही, तर अनेकदा काव्यातही रूपांतरही केलेलं दिसून येतं. खुद्द भारतातही अंदाजे हजार वर्षांपूर्वी पंचतंत्रावर आधारित ‘हितोपदेश’ या ग्रंथाची रचना झाली होती.
युरोपीय भाषांत भाषांतरं आणि रूपांतर
अंदाजे ९०० वर्षांपूर्वी पंचतंत्राच्या ‘कलीला वा दाम्ना’ या अरबी भाषांतरावरून त्याची स्पॅनिश, हिब्रू, लॅटिन या भाषांत भाषांतरं केली गेली. लॅटिन भाषांतरावरून नंतर जर्मन, इटालियन भाषांत आणि पुन्हा स्पॅनिशमध्ये भाषांतरं झाली. याप्रमाणे अंदाजे इसवीसन अकरावं शतक ते इसवीसन सतरावं शतक या सहाशे वर्षांच्या काळात युरोपमध्ये ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, इटालियन, जर्मन, इंग्लिश, चेक, फ्रेंच इत्यादी अनेक युरोपीय भाषांमध्ये पंचतंत्र भाषांतरित केलं गेलं.
काही अभ्यासकांच्या मते, कदाचित मध्ययुगात (म्हणजे ९०० वर्षांपूर्वीपासून) बायबलच्या खालोखाल जगभरातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेला ग्रंथ म्हणजे पंचतंत्र हा असावा. अर्थात्, ही कदाचित अतिशयोक्ती असली तरी पंचतंत्राचं भाषांतर अनेक देशांत प्रसिद्ध होतं याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पंचतंत्राच्या या भाषांतरांचा प्रभाव अरबजगतातील आणि युरोपमधील साहित्यकृतींवर पडला. ग्रिम बंधूंच्या कथा किंवा अरेबियन नाईट्स या साहित्यकृतींवर पंचतंत्राच्या या भाषांतराचा प्रभाव असल्याचं अनेक युरोपीय अभ्यासकांचं मत आहे, तर पंचतंत्रातील ‘ब्राह्मण आणि मुंगूस’ ही कथा युरोपमध्ये ‘धर्मगुरू आणि त्याचा कुत्रा’ या पात्रांद्वारे मांडून स्थानिक लोककथेमध्ये तिचा समावेश झालेला दिसतो.
आजही इस्लामिक देशांत पंचतंत्राचं ‘कलीला वा दाम्ना’ हे अरबी भाषांतर अरब निधर्मी (सेक्युलर) साहित्यातील एक उत्कृष्ट साहित्यकृती मानलं जातं. अनेक अरब देशांतून मुलांना शिकवताना हे पुस्तक वापरलं जातं. अरब भाषा शिकतानादेखील परदेशी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पंचतंत्र जिथं लिहिलं गेलं त्या भारत देशात नीती आणि मूल्य शिकवण्यासाठी आपण पंचतंत्रातील कथांचा वापर सजगपणे करतो का याचा विचार करण्याची गरज आहे.
(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)
Web Title: Aanand Kanitkar Writes Panchtantra Book Publicitiy In Out Of Country
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..