
ऋणानुबंध पंढरपूरच्या वारीचे
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची कित्येक भक्तिगीतं गाजली. त्यातील ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनीया गाठ’ हे गाणं प्रचंड गाजलं. नव्वदच्या दशकात हे गाणं आलं. या गाण्याला संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. प्रत्येक भक्तिगीतात विठ्ठलाची, देवाची महती येते; मात्र सामान्य वारकऱ्याच्या, भक्ताच्या विठ्ठलाबद्दल काय भावना आहेत, हे पहिल्यांदा या गाण्याच्या रूपात व्यक्त झालं आहे. त्यामुळे प्रल्हाद शिंदे यांचं हे गाणं वेगळं ठरलं. त्यांच्या भक्तिगीतांचा वारसा पुढच्या पिढीने जोपासला आहे.
पंढरपूरच्या वारीला काही दिवसानंतर सुरुवात होईल. शिंदे कुटुंबाचे आणि पंढरपूरच्या वारीचे ऋणानुबंध जुने आहेत. पंढरपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले मंगळवेढा हे आमचं गाव. या पवित्र भूमीत संत चोखामेळा, संत जनाबाईंपासून अनेक संतांचा जन्म झाला. आम्ही शिंदे कुटुंब संत चोखामेळाचे वंशज. त्यामुळे वारी, भक्तीची पंरपरा आमच्या रक्तातच आहे. ती परंपरा वडील प्रल्हाद शिंदे यांनी सुरू ठेवली. त्यानंतर मी आणि तिसऱ्या पिढीतले आदर्श, उत्कर्ष आजही न चुकता दरवेळी वारीत सहभागी होतो. आजही वारकरी आजोबांची भक्तिगीतं गात दिंडीत मार्गक्रमण करतात, याचे समाधान वाटते.
वडील प्रल्हाद शिंदे यांची कित्येक भक्तिगीतं गाजली. त्यातील ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनीया गाठ’ हे गाणं प्रचंड गाजलं. नव्वदच्या दशकात हे गाणं आलं. या गाण्याच्या यशानंतर त्याच चालीवर पाऊले चालती अक्कलकोटची वाट, तुळजापूरची वाट अशी अनेक गाणी आली. मात्र त्याला मूळ गाण्याची सर आली नाही. पाऊल चालती या गाण्याला संगीत दिले होते विठ्ठल शिंदे यांनी. हे गाणं मुळात वेगळ्या धाटणीचं होत. प्रत्येक भक्तिगीतांत विठ्ठलाची, देवाची महती येते. मात्र सामान्य वारकऱ्याच्या, भक्ताच्या विठ्ठलाबद्दल काय भावना आहेत, हे पहिल्यांदा या गाण्याच्या रूपात व्यक्त झालं आहे. त्यामुळे प्रल्हाद शिंदे यांचं हे गाणं वेगळं ठरलं. त्यापूर्वी आलेल्या भक्तिगीतांत विठ्ठल, देवाची महती असायची; मात्र प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यातील फोकस सामान्य माणसावर आहे. त्यांच्या सर्व गाण्यात देव सापडतो, मात्र त्यातील संदर्भ, आशय हा मात्र सामान्य भक्ताचा, वारकऱ्याचा आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट, हे गाणं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास असल्यासारखं वाटतं. आजही या गाण्याचा गोडवा कायम आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर हे गीत आहे. या गाण्यामुळे प्रल्हाद शिंदे घराघरापर्यंत पोहोचले. एकदा पंढरपूरला वारीच्या सांगता कार्यक्रमात प्रल्हाद शिंदे यांनी हे गाणं गायलं. मी लहान होतो. आजीसोबत वारकऱ्यांच्या गर्दीत बसलो होतो. स्टेजवरून प्रल्हाद शिंदे यांचं नाव पुकारलं गेलं. वडील स्टेजवर गेले. त्या वेळी काही म्युझिकल अरेंजमेंट नव्हती. वडिलांनी काही वारकऱ्यांना टाळ, मृदंगासह स्टेजवर बोलावलं. साधा माईक होता. त्यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे गाणं गायला सुरुवात केली आणि लाखो वारकरी भक्तीत तल्लीन झाले. वडिलांच्या गायनाची ताकद मला त्या दिवशी कळली.
प्रल्हाद शिंदे यांचे अजून एक गीत ‘आतातरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का’ खूप गाजले. हे प्रत्येक वारकऱ्याचं गाणं आहे. वारकरी घरात असताना तो वारीची किती आतुरतेने वाट पाहतो, त्याचा जोश, त्याचबरोबर त्याचा संसार कसा सुरू असतो, या सर्व भावना या गाण्यातून प्रकट होतात. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, चंद्रभागेच्या तीरी उभा... अशी असंख्य गाणी वारकऱ्यांच्या ओठावर कायम आहेत.
‘कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अंभगाची, बघून घे सावळी मूर्ती...’ हे गाणं १९८५ ला आलं. हे प्रल्हाद शिंदे यांचं पहिलं भक्तिगीत आहे. या गाण्याचा आशय मला आवडतो. आपलं काम करून भक्तिमार्गावर राहा, कामातून तुम्हाला देव मिळेल. तुझ्या घामात तुझा देव आहे, असा आशय या गाण्यातून दिला गेला आहे. कित्येक वर्षांनंतर नातू उत्कर्ष शिंदे याने आजोबाला आदरांजली म्हणून हे गाणं नव्या रूपात गायलं.
वडील प्रल्हाद शिंदे यांनी सर्व भक्तिगीत सुपरडुपर हिट झाली. या सर्व गाण्यांमधील पुरुष कोरसचा आवाज माझा (आनंद शिंदे) आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. वडिलांच्या बहुतांश गाण्याला मधुकर पाठक आणि विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलं आहे. वडिलांची सर्वच गाणी मला आवडतात, मात्र ‘जैसे ज्याचे कर्म तैसे’ हे गाणं माझे सर्वात फेव्हरेट आहे. कारण या गाण्यात जीवनाचं सार सांगितलं आहे. जगण्याचं सोपं साधं तत्त्वज्ञान या गाण्याच्या माध्यमातून सांगितलं आहे, तू चांगलं काम करं, तुला त्याचे फळ मिळेल!
वडिलानंतर त्यांच्या भक्तिगीतांची पंरपरा मी कायम ठेवली. आतापर्यंत मी जवळपास दीड हजार भक्त्गीतं गायली आहेत. ‘पंढरीच्या नाथा’ हा माझा अल्बम टी सीरिजने काढला. या अल्बमला मी संगीत दिलं. महत्त्वाचं म्हणजे या अल्बममध्ये शिंदे घराण्यातील तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व आहे. या कॅसेटमध्ये आदर्श, उत्कर्ष यांनीही गाणी गायली; मात्र जेव्हा आदर्शची गाण्याची वेळ आली तेव्हा प्रल्हाद शिंदे यांनी मला थांबवलं. ते मला म्हणाले, आदर्शकडून मी गाणं गावून घेतो. त्या वेळी त्यांनी भक्तिगीतात शब्दांना कीती महत्त्व आहे, याचा परिपाठ आदर्शला घालून दिला. आजोबांकडून भक्तिगीताचे बाळकडू घेऊन आदर्शने ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं पुढे गायलं. ते लोकप्रिय आहे.
‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या वडिलांच्या गाण्याची जादू आजही अनुभवयाला मिळते. एकदा पंढरपूरला माझा मुलगा उत्कर्ष, आदर्श एका संगीताच्या कार्यक्रमानिमित्ताने गेले असताना, तिथे १० हजार वारकरी जेवत होते. या दोघांना बघून सर्व वारकरी जेवण थांबवून उभे झाले, काहींनी टाळ मृदंग हाती धरला आणि आदर्श, उत्कर्षला पाऊले चालती पंढरीची वाट हे गाणं गाण्याची विनंती केली. माईकशिवाय हे गाणं गायलं, तेव्हा सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ते नाचत होते. एवढं अतूट नातं आमचं वारकऱ्यांसोबत आहे.
प्रल्हाद शिंदे यांनी सुरू केलेली पंरपरा तिसऱ्या पिढीने कायम ठेवली आहे. पंढरपूरला दरवर्षी एक कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाचा शेवट प्रल्हाद शिंदे यांच्या भक्तिगीताने होतो. प्रल्हाद शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून आजही दिंडी गावापर्यंत पोहोचल्यावर आम्ही वारकऱ्यांसाठी जेवण, पाणी, फळ, राहण्याची सोय अगदी मनोभावे करतो. प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीते किती लोकप्रिय आहेत, याचा प्रत्यय वारंवार आम्हाला येतो. सहा वर्षापूर्वी माझा मुलगा उत्कर्ष, आदर्श वारीत सहभागी झाले होते. आदर्शने ‘देवा तुझ्या गाभ्याराला’ हे गाणं वारकऱ्यांमध्ये जाऊन प्रमोट केलं होतं.
‘मंगळवेढे भूमी ही संताची’ हे गाणं प्रल्हाद शिंदे यांनी तयार केलं. या गाण्यातून मंगळवेढे गावाचा इतिहास, तिथे जन्म घेतलेल्या संतांची परंपरा, इतिहास अजरामर केला. त्यामुळे मंगळवेढ्याचे नाव सर्वदूर पसरलं. त्याची उतराई म्हणून मंगळवेढे या गावातील बाजारपेठेला प्रल्हाद शिंदे यांचं नाव दिलं. आजही त्यांच्या नावाची कमान तिथे पाहायला मिळते.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
Web Title: Aanand Shinde Writes Pandharpur Wari Bhaktigeete Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..