समाजसेवेचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Family Social Work
समाजसेवेचा वसा

समाजसेवेचा वसा

शिंदे कुटुंबीयांवर मायबाप रसिकांचं ऋण आहे. त्यातून आम्हा कुणालाच, कधीच मुक्त होता येत नाही. त्यांच्या ऋणात राहून, सामाजिक कार्य करण्याचा मानस होता. ते काम सुरू आहे. संकटं ही काही सांगून येत नसतात; पण ती आली की उद्‌ध्वस्त करतात. अशा संकटसमयी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काम करत आहोत. हा समाजसेवेचा वारसा माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनीच दिला आहे, तो आता मी आणि माझी मुलं पुढं नेत आहोत...

शिंदे घराण्यावर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं, थोरा-मोठ्यांनी आशीर्वाद दिले. त्यामुळेच प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर दुसऱ्या पिढीचे मी आणि मिलिंद शिंदेने प्रतिनिधित्व केले. तिसरी पिढी माझी मुलं आदर्श शिंदे आणि डॉ. उत्कर्ष शिंदे आणि आज चौथी पिढी माझा नातू आल्हाद हर्षद शिंदे महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी, आपल्या मराठी गाण्यांसाठी सज्ज आहे.

शिंदे घराण्याला शाहीपणा आमच्या गाण्यातल्या मेहनतीतून आला असला, तरीही त्या मेहनतीला वाव देणारे प्रेक्षक मायबापच आहेत, ज्यांनी शिंदे घराण्याला शिंदेशाही बनवलं आणि भरभरून प्रेम दिलं. हे प्रेम, हे ऋण कधीच फेडता येणार नाही. ही जाणीव मनात ठेवूनच कैक मैल पायी चालत कार्यक्रम केले आणि आज महागड्या ऑडीमध्ये आम्ही फिरतो, हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झालं. त्या प्रेमाची परतफेड करणे केवळ अशक्य असलं, तरी सामाजिक जाणिवेतून काही समाजसेवेचं कार्य करण्याची धडपड सुरू होती. त्यातूनच स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल उभं करून महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेची सेवा करता यावी म्हणून माझ्या उत्कर्षला डॉक्टर करायचं ठरवलं. जेमतेम नववी शिकलेला मी आणि जेमतेम सातवीपर्यंत शिकलेली माझी पत्नी विजया आनंद शिंदे.

मुलांना शिकवून त्यांना ज्ञानसंपन्न करण्याचं आम्ही ठरवलं. त्यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचा निश्‍चय केला. घरात कोणी शिकलेला नसल्याने बऱ्याचदा प्रश्नांची उत्तर शोधताना तारांबळ उडायची; पण माझी पत्नी विजयाने मुलांना खऱ्या अर्थाने घडवलं. मी जास्तीत जास्त कार्यक्रम करायचो. हर्षद, उत्कर्ष, आदर्श यांच्या भविष्याच्या तयारीस लागणार पैसा जमा करत होतो. विजया एकटी या माझ्या मुलांना शिक्षण, कराटे क्लासेस, टायपिंग क्लासेस, ट्युशन सर्व करण्यासाठी कुठेही अडचण येऊ नये म्हणून लढत होती.

मुलं शिकली पाहिजेत, शिक्षणाशिवाय स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, हे एव्हाना कळलं होतं. बघता बघता मुलं इंग्लिश मीडियममधून उच्चशिक्षित झालीत आणि उत्कर्ष तर परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन आमचं चॅरिटेबल हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण करण्यास सज्जही झाला.

आता शिंदे परिवाराचे दोन दवाखाने पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांसाठी सज्ज आहेत. जिथे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. माझे वडील महागायक प्रल्हाद शिंदे नेहमी तळेगावमधील अंध आश्रमाला भेट द्यायचे आणि त्यांची मदत करायचे. तीच भावना मनात ठेवून त्यांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेलं समाजकार्य आम्ही पुढे सुरू ठेवतोय आणि विस्तारितही करतोय. त्यासाठीच त्यांच्या नावाचं ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरू केलं आहे.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आम्ही नेहमी जशी जमेल, तशी मदत करतोय. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या नदीला आलेला पूर असो की कोरोनाच्या महामारीत गरजूंची मदत करणे असो, हे काम सामाजिक जबाबदारी म्हणून केलं. रक्तदान शिबिरांचे आयोजन केलं. अन्न, औषधं पुरवली. अनाथ-दिव्यांग यांच्या हक्काच्या लढाईसाठी चॅरिटेबल ट्रस्टने पाठबळ दिलं. कलाकारांना त्यांच्या हक्कासाठी, पेंशनसाठी सरकारदरबारी निवेदन देण्यापासून ते आजारी कलाकारांच्या मदतीसाठी कार्यक्रम करणे ही सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा महाराष्ट्राच्या मातीतूनच आम्हाला मिळाली आहे. खरंतर आम्हा शिंदे परिवाराला ही ताकत महाराष्ट्रानेच दिली आहे. त्यांच्या प्रेमामुळेच आज सर्व काही शक्य होत आहे.

पुढेही मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल उभे करण्याचा मानस आहे. माझ्यासोबतच, हर्षद, उत्कर्ष, आदर्श ही माझी मुलं अहोरात्र मेहनत करत आहेत. हे कार्य वाढत जाईल आणि महाराष्ट्रातल्या मायबाप रसिकांशी जोडलेलं आमचं प्रेमाचं नातं या निमित्तानं आणखी वृद्धिंगत होईल.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social Workaanand shinde
loading image
go to top