महाभारतातल्या मूल्यांचा वेध (आशिष तागडे)

book review
book review

महाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून घेतलं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर महाभारतात ठोस उत्तर आहे. अशा महाकाव्याकडे डॉ. अपर्णा जोशी यांनी मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मुळात हा त्यांच्या पीएचडीच्या संशोधनाचा हाच विषय होता. मूल्यशिक्षण आजच्या काळात किती आवश्‍यक आहे, त्याची व्याप्ती कशी असावी, याचं सखोल मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. मध्यंतरीच्या काळात प्रत्येक शाळेतून पहिला तास मूल्यशिक्षणाचा होत असे. शालेय जीवनात झालेले संस्कार पुढील आयुष्याची बीजं असतात, असं मानलं जातं. त्यातून योग्य पद्धतीनं मूल्य रुजवली गेल्यास त्याचे परिणामही चांगले होतात. यासाठी डॉ. जोशी यांनी महाभारतासारख्या महाकाव्याची अचूक निवड केली आहे. व्यक्ती-निर्माणात मूल्यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्याची सुरवात शालेय जीवनापासून होणं क्रमप्राप्त आहे. महाभारतातल्या अनेक कथांतून आपल्याला या मूल्यांची ओळख होते. त्याची प्रभावीपणे मांडणी केल्यास विद्यार्थ्यांमध्ये सहजतेनं मूल्यशिक्षण जोपासलं जाईल, अशी धारणा या पुस्तकातून दिसते. महाभारतातले अनेक प्रसंग, कथा, यातून विविध व्यक्तिरेखांचे गुणदोष दाखवले आहेत. महाभारतात "धर्म' हा शब्द कर्तव्य या अर्थानं येतो, हे अधोरेखित केलं आहे. यासाठी त्या काळातल्या शिक्षणपद्धतीचा आढावाही पुस्तकात घेतला आहे. युधिष्ठिर, भीष्म पितामह, भगवान कृष्ण, कुरूकुलातील अन्य राजांच्या जीवनातल्या घटनांद्वारे सत्यप्रियता, कर्त्यव्यनिष्ठा यांचा संस्कार करण्याबाबत या पुस्तकातून सुचवलं आहे. त्याचबरोबर दुर्योधन, जरासंध, दु:शासन, शकुनी, कर्ण या व्यक्तिरेखांची माहिती देत कोणते दुर्गुण टाळता येतील याचंही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. महाभारतातले यक्षप्रश्‍न, विदुरनीती याद्वारे सदाचाराचे अनेक विचार विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवता येतील, असं लेखिकेनं पुस्तकातून सूचित केलं आहे. व्यक्तिगत, सामाजिक; तसंच राष्ट्रीय मूल्यं यांचा परस्पर घनिष्ठ संबंध असल्याचं पुस्तकातून अधोरेखित होतं. ही मूल्यं परस्परावलंबी आहेत, हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी राष्ट्र ही संकल्पना उकलून सांगितली आहे. शिक्षण क्षेत्रातल्या विविध आयोगांनी शालेय जीवनातल्या मूल्यशिक्षणावर विशेष भर दिला आहे. त्या दृष्टीनं या पुस्तकाचं महत्त्व लक्षात येतं. राष्ट्रीय मूल्यशिक्षणात महाभारताचं महत्त्व या पुस्तकाच्या माध्यमातून निश्‍चितच लक्षात येतं.

पुस्तकाचं नाव : राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान
लेखक : डॉ. अपर्णा जोशी
प्रकाशक : अविरत प्रकाशन, जळगाव (8625868953)
पानं : 216, किंमत : 200 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com