esakal | हायड्रोजन भविष्यातील इंधन
sakal

बोलून बातमी शोधा

Hydrogen-Fuel

विज्ञानरंग
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली, मात्र बहुतांश माध्यमांत ती दुर्लक्षितच राहिली. ही घोषणा होती ‘राष्ट्रीय हायड्रोजन मिशन’ची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इनव्हेस्टमेंट मीटिंगमध्ये केलेल्या सूचनेनुसार ही घोषणा करण्यात आली.

हायड्रोजन भविष्यातील इंधन

sakal_logo
By
अभय जेरे saptrang@esakal.com

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली, मात्र बहुतांश माध्यमांत ती दुर्लक्षितच राहिली. ही घोषणा होती ‘राष्ट्रीय हायड्रोजन मिशन’ची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इनव्हेस्टमेंट मीटिंगमध्ये केलेल्या सूचनेनुसार ही घोषणा करण्यात आली. भारतानं २०५० पर्यंत हरित ऊर्जा तंत्रज्ञान वापरून कार्बनमुक्त देश होण्याचं ध्येय निश्चित केलं असल्यानं ही घोषणा अत्यंत महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर, भविष्यात ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनंही ‘नॅशनल हायड्रोजन मिशन’ हे महत्त्वाचं पाऊल आहे. 

शून्य टक्के कार्बन
जगभरात वैश्विक तापमानवाढीसंदर्भात आणि त्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वांचं लक्ष्य ‘झिरो कार्बन फुटप्रिंट’चे असल्यानं हायड्रोजनवर आधारित ऊर्जास्रोतांना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. हायड्रोजन ऊर्जेमध्ये हायड्रोजन किंवा हायड्रोजनचा समावेश असलेल्या संयुगांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. हायड्रोजन ऊर्जेमध्ये कार्बनाधारित इंधनाचं प्रमाण शून्य टक्के असल्यानं त्याच्याकडं भविष्यातील इंधन म्हणून पाहिलं जातंय. त्याचबरोबर ते ऊर्जेच्या बाबतीत अत्यंत कार्यक्षम मानले जाते (पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत तिप्पट) व त्यामुळं या इंधनापासून पर्यावरणविषयक व सामाजिक फायदे मोठ्या प्रमाणावर मिळतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताला हायड्रोजन तंत्रज्ञानात वैश्‍विक नेतृत्व स्वीकारायचं असल्यास आपण त्यावरील संशोधन आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठीच्या गुंतवणुकीत आघाडी घ्यावी लागेल. त्याचबरोबर आपली उत्पादन क्षमता आणि पुरवठा साखळ्या वाढवून त्यापासून अधिकाधिक फायदा मिळेल, हे सुनिश्चित करावं लागेल. या सर्व परिस्थितीचा विचार करता नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा खूपच महत्त्वाची ठरते. 

नव व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई) या मोहिमेचा मसुदा सार्वजनिक सल्लामसलतीसाठी पुढील काही महिन्यांत सादर करणार असून, या वर्षीच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मला खात्री आहे, की या मोहिमेमुळे आपल्या देशाच्या अपारंपरिक ऊर्जेच्या मोहिमेला मोठी गती मिळेल. त्याचबरोबर, हायड्रोजन ऊर्जेचे विविध क्षेत्रांमध्ये अनेक दूरगामी उपयोग असल्याने खूप आधी गुंतवणूक केल्यामुळे व हे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे भविष्यात देशाला खूप मोठा फायदा होईल. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

हायड्रोजन हा वासहिन व अदृश्य वायू असला, तरी त्याचे भविष्य ‘उज्ज्वल’ आहे. हायड्रोजनच्या निर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासूनची विद्युत ऊर्जा वापरली जाते व ‘इलेक्ट्रोलायजर’च्या मदतीने हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. यातील हायड्रोजन गोळा करून तो गॅस ग्रीडच्या माध्यमातून पुढे पाठविला जातो. त्याचा उपयोग घरे, उद्योगधंदे, वाहने आणि मोठ्या आस्थापनांमध्ये केला जातो. थोडक्यात, हायड्रोजनच्या वितरण साखळीमध्ये उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व शेवटी त्याचा द्रवीभूत केलेल्या किंवा गॅसच्या रूपातील इंधनाद्वारे उपयोग केला जातो. 

हायड्रोजनचे तीन प्रकार आहेत. करडा, निळा आणि हिरवा. जीवाश्म इंधनापासून उत्पादित इंधनाला करडा (ग्रे) हायड्रोजन, जीवाश्म इंधनातून कार्बन वेगळा काढून व  साठवण्याची सुविधा असलेल्याला निळा हायड्रोजन व सौर व पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून बनवलेल्या इंधनाला ग्रीन हायड्रोजन म्हणून ओळखतात. 

हायड्रोजन इंधनाचे फायदे 

  • हायड्रोजनची ऊर्जा घनता पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत तिप्पट असली, तरी त्याचे कार्बन फुटप्रिंट जवळपास शून्य आहे. 
  • हायड्रोजन हा ऊर्जेचा असा एकमेव स्रोत आहे, जो पाण्याची वाफ बाहेर सोडतो व हवेत त्याचा कोणताही अंश शिल्लक राहात नाही. 
  • हायड्रोजन हा पृथ्वीवरील सर्वाधिक मुबलक प्रमाणात उपलब्ध घटक पदार्थ आहे. 
  • तो टाक्यांमध्ये सीएनजी गॅसप्रमाणे साठवता येतो आणि त्याच पद्धतीने उपयोगात आणता येतो. 
  • तो लिथियम आयन बॅटरींच्या तुलनेत खूप हलका आहे आणि त्यामुळे ट्रकसारखी मोठी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त ठरतो. 
  • त्याचे केवळ ५ ते १० मिनिटांत पुनर्भरण करता येते. बॅटरीच्या चार्जिंगला लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत हे खूपच वेगवान आहे. 

हायड्रोजन इंधनाचे तोटे 

  • हायड्रोजनचा स्फोट होण्याचा मोठा धोका असतो आणि तो अति ज्वलनशील पदार्थ आहे. 
  • त्याच्या निर्मितीचे तंत्रज्ञान अद्याप पूर्ण विकसित झाले नसल्याने तो खूप महाग आहे. 
  • हायड्रोजनच्या बाबतीत पायाभूत सुविधा अत्यल्प असल्याने जगभरात ५०० पेक्षा कमी हायड्रोजन स्टेशन आहेत.

(लेखक भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

Edited By - Prashant Patil