गझनीच्या महमूदची प्रलयंकारी आक्रमणं

गझनीच्या महमूदनं भारतावर वारंवार आक्रमणं करून कशी दहशत पसरवली आणि किती प्रचंड लूट जमा केली.
ghazni mahmud attack on india
ghazni mahmud attack on indiasakal

गझनीच्या महमूदनं भारतावर वारंवार आक्रमणं करून कशी दहशत पसरवली आणि किती प्रचंड लूट जमा केली याविषयी आपण याआधीच्या लेखात वाचलं. या सगळ्याच्या पलीकडे जाणारा त्याच्या स्वाऱ्यांचा परिणाम म्हणजे भारतीयांच्या आत्मविश्वासाला व आत्मसन्मानाला लागलेला धक्का. पराभूत लोकांना पूर्णपणे अपमानित करण्याची त्याची पद्धत होती.

ही अपमानास्पद वागणूक टाळण्यासाठी मथुरेचा राजा कुलचंद व इतर अनेक राजांनी सपत्नीक आत्महत्या केल्या. अशा प्रकारची हिंसा, अत्याचार, बलात्कार, विध्वंस, लुटालूट, गुलामी भारतानं याआधी पाहिली नव्हती. क्रौर्य व धर्मवेड यांच्या अचानक झालेल्या या थैमानानं भारताच्या मानसिकतेला फार मोठा धक्का बसला हे नक्की.

मुस्लिम इतिहासकारांची व डाव्या इतिहासकारांची आणखी एक मखलाशी म्हणजे, ‘गझनीचा महमूद हा त्याला हवं तेव्हा भारतात यायचा. त्याला अडवण्याची कुणाचीही हिंमत नव्हती; पण त्यालाच भारतात आपलं साम्राज्य उभं करण्यात काही रस नव्हता. तो त्याला हवी तेवढी लूट करायचा व परत निघून जायचा.’

मात्र, खरं हे होतं की त्यानं खुरासाण, इराण, इराक व मध्य आशियाचा बहुतेक सर्व भाग आपल्या हुकमतीखाली आणून आपलं साम्राज्य उभं केलं होतं. भारतही आपल्या साम्राज्याला जोडला जावा अशीच त्याची इच्छा होती. गझनीचा महमूद हा एक अत्यंत युद्धकुशल आणि रणधुरंधर सेनापती होता यात काही शंकाच नाही. त्यामुळेच त्यानं भारतात अनेक मोठे विजयही मिळवले; इथंच त्याला आपलं राज्य प्रस्थापित करता आलं.

उर्वरित भारतात तो जरी लुटालूट करू शकला तरी तिथला प्रतिकार पूर्णपणे मोडून काढून तिथं आपलं राज्य प्रस्थापित करून स्थिर करणं त्याला कधीच जमलं नाही. सत्य हे आहे की, महमूदशी अनेक हिंदू राज्यांनी कडवा संघर्ष केला आणि त्याला इथं स्थिरावू दिलं नाही.

हिंदुशाही राज्यांनी महमूदाशी केलेल्या संघर्षाबद्दल आपण याआधी वाचलं. त्यांच्याशी लढताना अनेक वेळा तो केवळ नशिबानं वाचला होता. त्यानंतर कालिंजर व खजुराहो इथल्या चंदेला राजवटीचा राजा विद्याधर यानं त्याला असाच कडवा प्रतिकार केला.

कनौजचा गुर्जर प्रतिहार राजा राज्यपाल यानं महमूदसमोर न लढताच शरणागती पत्करल्यामुळे संतापून विद्याधरनं त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार केलं होतं. हे ऐकून सन १०१८ मध्ये, महमूदनं विद्याधरच्या राज्यावर आक्रमण केलं. त्यानं विद्याधरला निरोप पाठवला- ‘मुस्लिम धर्माचा स्वीकार करून शरण आलास तर तुझं राज्य वाचेल’. विद्याधरनं त्याला निरोप पाठवला - ‘मला यावर जे काही सांगायचं आहे ते मी युद्धभूमीवरच सांगेन.’

युद्धाच्या वेळी विद्याधरच्या सैन्याचा अंदाज घेण्यासाठी महमूद एका उंच ठिकाणी गेला. निजामुद्दीन अहमद हा इतिहासकार म्हणतो, ‘विद्याधरचं विशाल सैन्य पाहून महमूदच्या उरात धडकी भरली. या मोहिमेची आखणी केल्याबद्दल त्यानं अंतर्मुख होऊन स्वतःला दोष दिला व कपाळ जमिनीवर टेकवून अल्लाची प्रार्थना केली.

त्याच्या नशिबानं हिंदूंनी त्याच्यावर ताबडतोब हल्ला केला नाही व ते त्याच्याकडून पहिली खेळी होण्याची वाट बघत बसले. याचा फायदा घेऊन महमूदनं युद्ध न करता गझनीकडे काढता पाय घेतला. मनातून हार मानलेल्या महमूदचा पाठलाग करून हिंदू सैन्य त्याचा विध्वंस करू शकलं असतं; पण माघार घेणाऱ्यांवर वार करायचा नाही ही राजपूतांची धर्मयुद्धाची संकल्पना आडवी आली आणि महमूद एका अत्यंत बिकट परिस्थितीतून पुन्हा एकदा आश्चर्यकारकरीत्या बचावला.

युद्धात जिंकण्यासाठी युद्धकुशल नेतृत्व, व्यूहरचना, पराक्रम, आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रास्त्रं यांबरोबरच नशीबही लागतं हेच खरं. हिंदुशाही राजांबरोबर लढताना महमूदला नशिबानं बऱ्याच वेळा साथ दिली होती. चंदेलांशी गाठ पडली तेव्हाही नशीबच त्याच्या मदतीला धावून आलं.

सन १०२२ मध्ये त्यानं पुन्हा एकदा चंदेला राजवटीवर हल्ला करून ग्वाल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला; पण चाळीस दिवस थांबूनही काही प्रगती होत नाही म्हटल्यावर त्यानं कालिंजरकडे मोर्चा वळवला. तुंबळ युद्धानंतरही कुणीच हार मानत नाही हे पाहून दोन्ही बाजूंनी तह मान्य केला. यानंतर तो कधी चंदेलांच्या वाटेला गेला नाही. याचाच अर्थ त्यांना हरवण्याचा त्याला विश्वास वाटत नव्हता.

संघर्ष सोमनाथचा

गझनीच्या महमूदची सोमनाथवरील स्वारी व हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराचा विध्वंस याबद्दल आपण बरंच ऐकलेलं असतं आणि यावरून आपला असा समज झालेला असतो की, कुठलाही विरोध न होता महमूद सोमनाथला आला, त्यानं मंदिर व मूर्ती फोडली, प्रचंड संपत्तीची लूट केली व तो तिथून निघून गेला... यादरम्यान हिंदू कुठलाही प्रतिकार न करता मुकाट्यानं बघत बसले... पण ही समजूत पूर्णपणे खोटी आणि विपर्यस्त आहे.

सोमनाथचा विध्वंस ही भारतीयांच्या हृदयाला झालेली भळभळती जखम ठरल्यामुळे, तसंच या मोहिमेत तुर्कांना आजवर कधीही मिळाली नव्हती इतकी संपत्ती मिळाल्यामुळे मुस्लिम इतिहासकारांनी या मोहिमेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महमूदनं या मोहिमेची खूप तयारी केली होती. मुलतान ते सौराष्ट्र हा मार्ग वाळवंटातून जात असल्यामुळे या मोहिमेसाठी लागणारं अन्न-धान्य व पाणी लादलेले तीस हजार उंट सैन्याबरोबर वाटचाल करत होते.

वाळवंटातून वाटचाल करत सौराष्ट्राची राजधानी असलेल्या अन्हिलवाड (सध्याचं पाटण) इथं पोहोचेपर्यंत त्यांच्या सैन्याला कुठल्याही विरोधाला सामोरं जावं लागलं नाही. पाटणचा चालुक्य राजा भीम (पहिला) याला बहुधा ही मोहीम अनपेक्षित असावी. त्यामुळे महमूदच्या प्रचंड फौजेला अटकाव करण्याच्या पुरेशा तयारीत तो नव्हता. तरीही मोढेरा इथं त्यानं गझनीच्या सैन्याची वाट अडवली.

तुंबळ लढाईनंतर दुर्दैवानं चालुक्य सैन्याचा पराभव झाला. त्यानंतर सोमनाथला असलेल्या तुटपुंज्या सैन्यानं मंदिराच्या संरक्षणासाठी अत्यंत कडवी लढत दिली. इतिहासकार फिरिश्ता लिहितो, ‘हिंदूंनी असा जाज्ज्वल्य प्रतिकार केला की, मुसलमानांचा टिकाव लागेना. शेवटी, थकून त्यांनी तात्पुरती माघार घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लढाई सुरू झाली.

गझनीचं सैन्य जितक्या आवेशानं मंदिराच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होतं, तितक्याच निर्धारानं वेढ्यात अडकलेले हिंदू त्यांना खाली ढकलून देत होते. मंदिराचं शेवटपर्यंत संरक्षण करण्याच्या निश्चयानं ते भारलेले होते. दुसरा दिवस पहिल्यापेक्षाही अधिक अयशस्वी ठरला. तिसऱ्या दिवशी मूर्तिपूजकांची नवीन कुमक पोहोचली आणि तिनं लढाईत उडी घेतली.

शेवटी, स्वतः महमूदनं सूत्रं हाती घेतली. आता संघर्षाची तीव्रता अधिकच वाढली. विजय अजूनही दृष्टिपथात येत नव्हता. महमूद शेवटी घोड्यावरून उतरला व जमिनीवर डोकं टेकून त्यानं अल्लाची मदत मागितली.’

खोंड मीर हा इतिहासकार त्याच्या वर्णनात म्हणतो, ‘जशी हिंदूंची फळी फुटू लागली तसे या अज्ञानी भक्तांचे जथे सोमनाथाला मिठी मारून रडू लागले व हातात जे शस्त्र मिळेल ते घेऊन पुन्हा लढू लागले. असे पन्नास हजार मूर्तिपूजक मंदिराभोवती मरून पडले.’ आपल्या श्रद्धास्थानाच्या रक्षणासाठी पन्नास हजार भक्तांनी मृत्यूला कवटाळल्याची अशी घटना जगाच्या इतिहासात सापडणं कठीणच.

यानंतर अर्थातच महमूदनं सोमनाथमंदिराचा विध्वंस केला, पुजाऱ्यांच्या कत्तली केल्या व प्रचंड संपत्तीची लूट केली. याचं वर्णन करताना ब्रिटिश इतिहासकार जाॅन की त्याच्या ‘इंडिया, अ हिस्टरी’ या ग्रंथात लिहितो, ‘त्यानंतर झालेला नरसंहार इतका भीषण होता की, त्याबद्दल लिहिताना मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनातही थोडी अस्वस्थता जाणवते.

त्यांच्यापैकी एक जण म्हणतो की ‘मंदिराबाहेर झालेली कत्तल अधिकच भयानक होती; पण लुटालूट आणि मृत्यूचं थैमान यापेक्षाही जास्त खुपणारी गोष्ट होती, सोनेरी शिवलिंग फोडताना महमूदला झालेला आनंद. शिवलिंगाचा सोनेरी पत्रा काढून टाकल्यावर त्यानं स्वतः त्याच्या तलवारीचा घणाघात शिवलिंगावर केला. त्याचे तुकडे गजनीला पाठवून तिथं बांधल्या जात असलेल्या जामी मशिदीच्या पायऱ्यांमध्ये बसवण्यात आले.’

ही विखारी धर्मांधता आणि विकृत द्वेष भारतानं तोपर्यंत कधी अनुभवला नव्हता. महमूदला आता परतीचे वेध लागले होते. त्यामुळे सोमनाथला फार दिवस मुक्काम न करता तो परत निघाला; पण सोळंकी राजवटीचं सैन्य आता पुरेशा तयारीनिशी त्याची वाट अडवून उभं होतं.

इतिहासकार गर्दिझी लिहितो, ‘हिंदूंचा बादशहा परमदेव त्याच्या वाटेत आपल्या सैन्यासह उभा होता. आपल्या विजयाचं पराभवात रूपांतर होऊ नये म्हणून महमूदनं आपला मार्ग बदलायचं ठरवलं. जाताना पाणी न मिळाल्यामुळे, तसंच सिंधमधील जाटांच्या हल्ल्यामुळे त्याच्या सैन्याचं खूप नुकसान झालं. इस्लामच्या कित्येक सैनिकांना आपले प्राण गमावावे लागले. शेवटी, कसंबसं मुलतानला पोहोचून सैन्य गझनीकडे रवाना झालं.’

डॉ. पी. एल. भाटिया यांच्या मते, गर्दिझीनं उल्लेख केलेला परमदेव म्हणजे चालुक्य राजा भीम नसून परमार राजा भोज असावा.

कच्छच्या अवघड वाटेनं मुलतानला निघालेल्या महमूदनं दोन स्थानिक तरुणांना वाटाडे म्हणून नेमलं. त्यांनी महमूदच्या सैन्याची दिशाभूल करून तीन दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना वाळवंटात अशा ठिकाणी नेऊन सोडलं, जिथं पाण्याचा एकही थेंब किंवा गवताचं एकही पातं दृष्टिपथात नव्हतं.

महमूदनं त्यांना जाब विचारला असता त्यांनी उत्तर दिलं, ‘आमच्या राजाच्या आज्ञेवरून आम्ही हे जोखमीचं काम हाती घेतलं. आमच्या सोमनाथाच्या चरणी आम्ही आमचं आयुष्य वाहिलं आहे. खुशाल आम्हाला मारून टाका; पण आता तुमच्यासमोर समुद्र आहे आणि मागं हिंदुस्थानचं सैन्य आहे. तुमचा एकही माणूस जिवंत जाणार नाही.’

महमूदच्या सैन्याचे हे हाल चालुक्य राजा भीम (पहिला) याच्या योजनेमुळे झाले होते. तो स्वतः जैसलमेरजवळ आपलं सैन्य घेऊन तयारीत थांबला होता; पण महमूद वेगळ्या मार्गानं मुलतानला पोहोचल्यामुळे त्याला चालुक्य सैन्याचा सामना करावा लागला नाही. या वर्णनावरून असं दिसतं की, महमूदकडे हेरांचं कार्यक्षम जाळं असावं.

म्हणूनच त्याला वाळवंटात वाटा बदलून व लढाई टाळून मुलतानला पोहोचता आलं. याउलट, चालुक्य राजा भीम याला महमूद संपूर्ण वाळवंट पार करून अन्हिलवाडला पोहोचेपर्यंत खबरही न लागल्यामुळे तो सोमनाथाच्या रक्षणाची पुरेशी तयारी करू शकला नाही.

अशा प्रकारे सोमनाथचा विध्वंस कुठल्याही प्रतिकाराविना झाला हा आजवर आपल्याला शिकवला गेलेला इतिहास संपूर्ण चुकीचा आहे. सोमनाथच्या विध्वंसाचं दुःख भारत कधीही विसरला नाही. सोमनाथ ज्या संस्थानात होतं त्या जुनागढचा नबाब स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात समाविष्ट व्हायची स्वप्न बघू लागला; पण सरदार पटेल यांनी हे संस्थान झटपट भारतात विलीन करून घेतलं.

नंतर सरदार पटेल आणि केंद्र सरकारमधील आणखी एक मंत्री कन्हैयालाल मुन्शी यांनी भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक म्हणून सोमनाथमंदिराची पुनर्उभारणी करायचं ठरवलं. महात्मा गांधींनी या कल्पनेला पाठिंबा दिला. फक्त पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा या प्रकल्पाला टोकाचा विरोध होता. तरीही सरदार पटेल यांनी तिथली मशीद दुसरीकडे हलवून प्रकल्प मार्गी लावला.

दुर्दैवानं मंदिर पूर्ण होण्याआधीच सरदार पटेल यांचं देहावसान झालं. मंदिराच्या उद्घाटनसमारंभाला येण्याचं नेहरूंनी तर नाकारलंच; पण ‘राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनीही या समारंभाला जाऊ नये,’ अशी त्यांना आग्रहवजा सूचना केली. डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी ही सूचना साफ धुडकावून लावली आणि सोमनाथमंदिराचं उद्घाटन स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झालं.

राजेंद्रप्रसाद यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की, ‘निर्मिती ही विध्वंसापेक्षा केव्हाही श्रेष्ठच असते.’ दुर्दैवाची गोष्ट अशी की, नेहरूंच्या विरोधामुळे राष्ट्रपतींचं भाषण ‘ऑल इंडिया रेडिओ’नं प्रसारितच केलं नाही! यामुळे या ऐतिहासिक समारंभाचं प्रत्यक्ष वर्णन ऐकण्याच्या आनंदापासून भारताचे नागरिक वंचित राहिले.

खुद्द राष्ट्रपतींचा आवाज बंद करणाऱ्यांची प्रतिमा लोकशाहीचे व आविष्कारस्वातंत्र्याचे महाप्रवर्तक म्हणून रंगवली गेली हीदेखील इतिहासातील एक दिशाभूलच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com