भारताचा इतिहास फक्त पराभवांचा?

वायव्येकडून परकीय आक्रमक येत गेले, भारतीय त्यांच्यासमोर वारंवार पराभूत होत गेले आणि गुलाम बनत राहिले.
War
Warsakal
Updated on
Summary

वायव्येकडून परकीय आक्रमक येत गेले, भारतीय त्यांच्यासमोर वारंवार पराभूत होत गेले आणि गुलाम बनत राहिले.

संस्कृत भाषा आणि वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचं मूळच परदेशी आहे हे आपल्या माथी मारणारा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत कोणी आणि कशासाठी मांडला आणि त्यातलं तथ्य काय याचा वापर उहापोह आपण गेल्या चार लेखांमध्ये केला. यापुढील कालखंडाबाबत आपल्याला हे सांगण्यात आलं आहे की वायव्येकडून परकीय आक्रमक येत गेले, भारतीय त्यांच्यासमोर वारंवार पराभूत होत गेले आणि गुलाम बनत राहिले. परकीयांसमोर वारंवार गुडघे टेकणाऱ्या भारताचा इतिहास हा केवळ पराभवांचा इतिहास आहे, हे सतत सांगत राहिल्यामुळे भारताच्या कित्येक पिढ्या पराभूत मनोवृत्तीच्या आणि न्यूनगंडाच्या बळी ठरल्या.

पण खरा इतिहास काय सांगतो ? पराभवांची न संपणारी मालिका हेच भारताच्या इतिहासाचं वास्तव आहे का ? पुढील काही लेखांमधून या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. असीरियन राणी सेमिरॅमिस हिचं इसवी सन पूर्व ८१० मधील आक्रमण हे इतिहासाला ज्ञात असलेलं भारतावरील पहिलं आक्रमण ठरतं. तिच्या राजवटीत असीरियन साम्राज्याची भरभराट झाली आणि तिने इजिप्त, पॅलेस्टाईन अनातोलिया ( सध्याचा टर्की ) अर्मेनिया, पर्शिया हे प्रदेश पादाक्रांत केले. या सर्व विजयी मोहिमांनंतर तिने भारताकडे मोर्चा वळवला. तिने काही हेऱांना माहिती काढण्यासाठी व्यापाऱ्यांच्या वेशात भारतात पाठवलं. त्यांनी तिला माहिती दिली की पंजाबचा राजा सत्यव्रत याचे सैन्य अतिशय बलवान असून त्याचे हत्तीदल तर फारच शक्तिशाली आहे. त्यामुळे तिने तिचा आक्रमणाचा मुहूर्त दोन वर्षांनी पुढे ढकलला.

तिने भारतीय हत्तींचा मुकाबला करण्यासाठी ( तिच्या मते ) एक युक्ती लढवली. म्हशींची एकमेकांना शिवलेली कातडी तिने उंटांवर चढवली. अनपेक्षितरित्या इतके हत्ती शत्रू सैन्यात बघून भारतीय सैन्यात गोंधळ माजेल असा तिचा कयास होता. अशाप्रकारे ३० हजार पायदळ, पाच हजार घोडदळ, एक हजार रथ व हत्तीच्या वेशातले एक हजार उंट असे प्रचंड सैन्य घेऊन तिने भारतावर चढाई केली.

सिंधू नदीच्या किनाऱ्यावर राजा सत्यव्रताच्या सैन्याशी तिची गाठ पडली. म्हशीच्या कातड्यामुळे उंटांना भारतातील उकाडा सहन झाला नाही व ते सैरावैरा पळू लागले. भारतीय हत्तींनी मात्र शत्रुसैन्यावर तुफान हल्ला चढवला. सेमिरॅमिसच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. तिचं दोन तृतीयांश सैन्य नष्ट झालं. राजा सत्यव्रताशी लढताना ती स्वतः जखमी झाली. राजा सत्यव्रताने पळून जाणाऱ्या सैन्याचा पाठलाग न करता त्यांना नदी ओलांडून पळून जाऊ दिलं. शरण आलेल्या / पराभूत झालेल्या सैन्याला अभय देणारे असे दिलदार राजे भारताच्या इतिहासात नेहमीच आढळतात.

कित्येकदा या फाजील औदार्यामुळे त्यांना शेवटी पराभव स्वीकारायला लागल्याची उदाहरणंही जागोजागी सापडतात. तसेच या युद्धात हुकमी अस्त्र ठरलेलं हत्तीदल युद्धाचं तंत्र बदलल्यानंतर अनेकदा भारतीय राजांच्या प्रभावाचं कारण ठरलेलंही आपल्याला आढळतं. अशा रितीने भारतावर झालेल्या या पहिल्या आक्रमणात भारतीयांनी ताकदवान शत्रूला पुरतं नामोहरम करून पिटाळून लावलं.

त्यानंतर इसवी सन पूर्व ५३५ ते ५१८ दरम्यान पर्शियन सम्राट सायरस द ग्रेट व दारिअस द ग्रेट यांनी भारतावर आक्रमण केले पण त्यांना सिंधू नदीच्या पलीकडे फारशी प्रगती करता आली नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांचे या भागातील अस्तित्वही लयाला गेले व झेलम व चिनाबच्या दरम्यान, तसेच झेलम व सिंधूच्या दरम्यान अनेक गणसंघ ( रिपब्लिक्स ) उदयाला आले.

अलेक्झांडरचा तथाकथित दिग्विजय

ग्रीक सम्राट अलेक्झांडर ग्रीस पासून इराण पर्यंत सगळ्या राज्यांवर विजय मिळवत भारताच्या वायव्य सेनेपर्यंत येऊन थडकला. यापुढील त्याच्या मोहिमेचे वर्णन ब्रिटिश इतिहासकार मोठ्या अहमाहीकेने Conquest of India किंवा भारत दिग्विजय या शब्दात करतात. या वर्णनावरून कोणाला वाटावं की त्याने संपूर्ण भारत पादाक्रांत केला होता. वास्तव असे आहे की भारताच्या सीमेवर राजा पोरसशी झालेल्या युद्धानंतर अलेक्झांडर परत गेला. भारताच्या भूमीवर पुढे एक पाऊलही टाकायची त्याची हिंमत झाली नाही. हा दिग्विजय कसा ठरतो हे ब्रिटिश इतिहासकारच जाणोत.

इतिहास असं सांगतो की वायव्य सरहद्दीवर पोहोचतानाच त्याला त्या भागातील टोळ्यांनी इतका तिखट प्रतिकार केला की त्याच्या सैन्याच्या पार नाकी नऊ आले. झेलम नदीच्या किनाऱ्यावर ग्रीक सैन्य व पोरसच्या सैन्याची गाठ पडली. या युद्धाचा निकाल काय लागला याविषयी अनेक मतमतांतरं आहेत. एका गोष्टीवर मात्र सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. ती म्हणजे अलेक्झांडरच्या आयुष्यातील हे सगळ्यात कठीण युद्ध होते.

ग्रीक इतिहासकार ॲरियन म्हणतो, हे युद्ध संपल्यानंतर अलेक्झांडरच्या सैनिकांनी जो आनंद साजरा केला तसा जल्लोष त्यांनी पर्शियन साम्राज्याच्या दोन लाखाहून अधिक सैन्याचा पाडाव केल्यानंतरही साजरा केला नव्हता. या कठीण युद्धातून आपण सर्वनाश न होता वाचलो याचा तो आनंद होता. अलेक्झांडर व पोरस यांच्यात तह कशामुळे झाला याबद्दल इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. काही इतिहासकारांच्या मते पोरसशी लढताना अलेक्झांडर घोड्यावरून पडला. पोरसचा भाला त्याच्या मानेवर टेकलेला होता. अशावेळी पोरसने त्याला जीवदान देऊन दोघांमध्ये तह घडवून आणला. तर काहीजणांच्या मते पोरसच्या मुलाला अलेक्झांडरचा विषारी बाण लागून तो जखमी झाल्यावर पोरसने तह मान्य केला.

अलेक्झांडरचा तोपर्यंत शिरस्ता असा होता की पराभूत राजाला तो एक तर ठार करत असे किंवा त्याला मांडलिकत्व स्वीकाराला भाग पडत असे. पोरसला मात्र त्याने अत्यंत आदराने वागवले व त्याला अंभी राजाच्या प्रदेशातील काही भाग देऊ केला. या बदल्यात पोरसने त्याला भारतातून सुरक्षित परत जाण्यासाठी मदत करण्याचं मान्य केलं. या अत्यंत अवघड परीक्षेनंतर पुढे जाऊन मगधाच्या महाप्रचंड सैन्याचा सामना करण्या इतकी ऊर्जा, इच्छाशक्ती व मनोबल अलेक्झांडरच्या सैन्यात उरलं नाही. त्यामुळे पंजाबच्या पश्चिमेकडील जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी आपला सेनापती सेल्युलुकसवर देऊन अलेक्झांडर आपल्या सैन्यासह परत गेला. या सेल्युलुकसचा नंतर चंद्रगुप्त मौर्याने पराभव करून ग्रीक सैन्याच्या धोक्यापासून भारताला मुक्त केलं.

सीमेवरून परत जा...

अलेक्झांडरनंतर वायव्येकडून भारतावर अनेक स्वाऱ्या झाल्या. पण कोणालाही भारताच्या मुख्य भूप्रदेशावर आपलं राज्य प्रस्थापित करणं जमलं नाही. वायव्येकडील काही भाग ते जिंकू शकले, अधून मधून त्यापुढेही धडक मारू शकले, पण भारतात स्थिरावून आपलं साम्राज्य स्थापन करणं कोणालाही जमलं नाही. इसवी सन पूर्व १८० मध्ये उत्तर अफगाणिस्तानातील डिमॅट्रियस राजाने भारतावर आक्रमण केले. त्याने स्वतः बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्याला वायव्येकडील बौद्ध समुदायाने समर्थनही दिले, पण मौर्य साम्राज्याच्या लयानंतर आपले शुंग साम्राज्य स्थापन केलेल्या पुष्यमित्र शुंगाने त्याला माघार घ्यायला भाग पाडले.

त्यानंतर सायथिअन्स (शक), इंडो - पार्थिअन्स या जमातींनी भारतावर आक्रमणं केली पण वायव्य प्रांत व सिंधूच्या खोऱ्यापलीकडे ते फारशी मजल मारू शकले नाहीत. भारतामध्ये खऱ्या अर्थाने आपलं राज्य स्थापन करू शकले ते झिनझियांग प्रांतातून आलेले कुशाण. पण त्यांना देखील भारताच्या मुख्य भूमीवर यश मिळाले ते सर्वार्थाने भारतीय बनल्यानंतरच. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध / हिंदू नावं धारण केली, हिंदू चालीरीती व जीवनपद्धती आपलीशी केली व खऱ्या अर्थाने ते भारतीय बनले. कुशाण राजा कनिष्क हा अत्यंत कर्तबगार आणि यशस्वी राजा होता. हूणांच्या आक्रमणासमोर कुशाण राज्य कोसळून नष्ट झाले. इसवी सनाच्या पाचव्या शतकात हूण टोळ्यांनी जगभरातील अनेक मोठी साम्राज्य नष्ट केली. ''अटीला द हूण '' याच्या नेतृत्वाखाली त्यांनी रोमन साम्राज्याची वाताहात करून टाकली. भारतावरही मिहीरकुल याच्या नेतृत्वाखाली हूणांनी आक्रमण केलं. पण सम्राट स्कंदगुप्त व नंतर यशोधर्मन आणि नरसिंहगुप्त यांनी त्यांचा पराभव करून त्यांना भारतातून हाकलून दिलं. या सर्व आक्रमकांपैकी कोणीच भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गाभ्याला धक्का लावू शकले नाही.

अशा रितीने इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास होता असे चुकूनही म्हणता येत नाही. याउलट तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत गुप्त साम्राज्याच्या काळात अर्थव्यवस्था, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, संस्कृती, साहित्य या सर्व बाबतीत भारत समृद्धीच्या चरमसीमेपर्यंत पोचला होता. म्हणूनच या कालखंडाला भारताचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. सातव्या शतकातील सम्राट हर्षवर्धनाच्या काळातही भारताच्या समृद्धीचा ओघ असाच सुरू राहिला. त्यामुळे पराभूत मनोवृत्ती तर सोडाच पण भारत ही तेव्हा जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था होती व विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती या सर्वच क्षेत्रात भारत ही जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता होती.

सातव्या शतकात अरबस्तानच्या वाळवंटात एका शक्तीचा उदय होत होता. तिच्या पाशवी आक्रमणांपुढे जगातील मोठमोठी साम्राज्य पाल्यापाचोळ्यासारखी उडून जाणार होती आणि लवकरच या आक्रमणाच्या लाटा भारताच्या किनाऱ्यावर धडका देऊ लागणार होत्या. ही शक्ती म्हणजे इस्लाम धर्म. या आक्रमणाला भारताने कसं तोंड दिलं हे बघूया पुढील लेखात.

(लेखक ब्रॅंडिग -तज्ज्ञ असून ‘असत्यमेव जयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन केलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com