पाचव्या मजल्यावरची युवती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students
पाचव्या मजल्यावरची युवती!

पाचव्या मजल्यावरची युवती!

- अभिषेक शेलार abhishekshelar2@gmail.com

मराठी साहित्यातलं रहस्‍यकथांचं दालन नेहमीच लोकप्रिय राहिलंय, या कथाप्रकाराची मोहिनी सर्व वयोगटांतल्या वाचकांना पडते. अन्य भाषांमधील साहित्य प्रकारातदेखील हा विभाग नेहमीच लोकप्रिय ठरलाय. ‘सप्तरंग’मधून विविध लेखकांच्या चित्तवेधक रहस्यकथा वर्षभर वाचकांसमोर येतील...

शिवम लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. अभ्यासासोबतच त्याला अन्य गोष्टींचीसुद्धा आवड होती. कॉलेजच्या प्रत्येक इव्हेंट किंवा स्पर्धेमध्ये तो आवडीनं सहभागी होत असे. यंदा तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. डिसेंबरचा महिना होता. त्याच्या कॉलेजमध्ये ‘विंटर फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात आलं होतं व त्यासाठी थोडे दिवसच शिल्लक राहिले होते. त्या फेस्टिव्हलसाठीची जी काही तयारी होती, ती दरवर्षीप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थीच करणार होते आणि त्याकरिताच आजची मीटिंग होती. त्या बैठकीत कमिटीमेंबर व शिक्षकदेखील हजर होते. कमिटीमध्ये एकूण १७० विद्यार्थी होते.

ठरल्याप्रमाणे त्यांची मीटिंग पार पडली आणि त्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे चार ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायचं होतं. एका ग्रुपमध्ये अंदाजे ४० - ४५ विद्यार्थी होते. शिवमनं यापूर्वी कॉलेजच्या अशा अनेक प्रोजेक्ट्सवर उत्तम कामगिरी केली असल्यानं, शिक्षकांनी त्यालाच त्याच्या ग्रुपच्या मॉनिटरपदाची जबाबदारी दिली. त्याच्या ग्रुपमध्ये ३० ते ३२ मुलं, तर सात ते आठ मुली होत्या. शिवमच्या ग्रुपला कॉलेजच्या बिल्डिंगला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात फेस्टिव्हलच्या फ्लेक्स व बॅनर लावण्याची जबाबदारी दिली होती. त्याचं कॉलेज एकूण पाच मजल्यांचं होतं आणि कॉलेजच्या आसपासचा परिसरही खूप मोठा होता, त्यामुळं खूप कमी दिवसांत त्यांना जास्त काम करायचं होतं.

त्याचदिवशी त्यानं त्याच्या ग्रुपसोबत एक मीटिंग ठेवून सगळं काही नियोजन करायचं ठरवलं. या मीटिंगमध्ये त्यानं प्रत्येकाला आपापली कामं नेमून दिली. दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली, कारण अवघे पाच दिवसच शिल्लक होते. प्रत्येक ग्रुपसाठी कॉलेजचे वेगवेगळे मजले देण्यात आले होते. जसं की, डान्स-नाटक बसवणाऱ्या ग्रुपसाठी तळमजला आणि वरचे दोन हॉल देण्यात आले होते. गायनाच्या ग्रुपसाठी पहिला मजला, तर शिवमच्या ग्रुपला दुसरा मजला दिला होता. प्रत्येकजण आपापल्यापरीनं खूप मेहनत घेत होता. शिवम व त्याचे मित्रही त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करत होते. दिवसा काम असल्यानं सकाळी थोडं लवकर येऊन ते काम करत असत; परंतु वेळेच्या बंधनामुळं त्यांना म्हणावा तितका वेळ त्यासाठी देता येत नव्हता. असंच करत करत आता त्यांच्याकडं फक्त दोनच दिवस राहिले होते; परंतु त्यातही जमेची बाजू म्हणजे, त्यातील एक दिवस हा रविवारचा होता, त्यामुळं त्यांनी ते दोन्ही दिवस थोडं उशिरापर्यंत थांबून काम करण्याचा निर्णय घेतला.

ठरल्याप्रमाणे सर्वजण शनिवारी ऑफिस सुटल्यावर कॉलेजमध्ये भेटले. शिवम व त्याच्या काही मित्रांनी येताना सर्वांसाठी नाश्ता आणला होता. थोडावेळ गप्पागोष्टी करत करत नाश्ता संपवून पुन्हा ते आपापल्या कामाला लागले. बाकीचे ग्रुप्स दिवसाचं थोडावेळ येऊन प्रॅक्टिस करत असल्यानं, आता संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त शिवमचाच ग्रुप होता. बाकीचे कोणतेही ग्रुप्स नसल्यानं त्यांनी तळमजल्यावरील हॉलमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. आज काहीही करून त्यांना कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये लावण्याचा एक मोठा फ्लेक्स करायचाच होता. रात्रीचे ९ वाजून गेले असतील, सर्वांनाच खूप भूक लागली होती. त्यांच्या कॉलेजबाहेर एक प्रसिद्ध हॉटेल होतं, तिथंच जेवण करून पुन्हा कॉलेजमध्ये येऊ असं त्यांचं ठरलं. त्यांचं कॉलेज मुख्य रस्त्यापासून थडं आत असल्यानं अंतर थोडं जास्तच होतं; परंतु ग्रुपमधील बऱ्याच जणांकडं बाइक्स असल्यानं त्यांना हॉटेलपर्यंत जाण्यास काही अडचण आली नाही. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडावेळ तिथंच गप्पागोष्टी करून पुन्हा ते सर्वजण कॉलेजमध्ये आले व फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागले. एव्हाना रात्रीचे दहा ते सव्वादहा वाजून गेले असतील, त्यांच्या ग्रुपमधील मुलींना घरून कॉल्स येऊ लागले. तसंच, काहीजण कॉलेजपासून लांब राहत असल्यानं शिवम व इतर मुलांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे काही मुलं व मुली घरी निघून गेले.

आता त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त २० ते २५ जणच राहिले होते. मजा-मस्ती करत काम करताना कधी साडेअकरा वाजून गेले ते त्यांच्याही लक्षात आलं नाही. एव्हाना त्यांनी कॉलेजबाहेर लावण्याचा फ्लेक्स बनवून पूर्ण केला. तो फ्लेक्स त्यांना कॉलेजच्या गच्चीवरून खाली सोडायचा होता. तो फ्लेक्स लावून उर्वरित काम उद्या करू असं त्यांचं ठरलं.

शिवम व ग्रुपमधील काहीजण तो फ्लेक्स घेऊन गच्चीवर आले. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती, रस्तेदेखील निर्मनुष्य झाले होते. फ्लेक्स लावून ते सर्व खाली आले आणि आपला पसारा आवरून घरी जाण्यास निघाले. इतक्यात शिवमच्या लक्षात आलं की, सर्व मजल्यांवरील दिवे चालू राहिले आहेत. तिथं आसपास सुरक्षारक्षकदेखील दिसत नव्हते. त्यामुळं शिवमनं ग्रुपमधील राहुल व अमितला सर्व दिवे बंद करून येण्यास सांगितलं. सुरुवातीला त्यांनी कंटाळाच केला; परंतु शिवम व इतरांनी त्यांना जाण्यास भाग पाडलं.

काम करता करता रात्रीचे जवळजवळ १२ वाजून गेले असतील, दिवसा गजबजलेलं कॉलेज आता मात्र भयाण वाटत होतं. त्या दोघांनीही पहिल्या मजल्यापासून दिवे बंद करण्यास सुरुवात केली. प्रत्येक मजल्यावर एकूण दहा वर्ग होते. जिना चढल्यानंतर डाव्या बाजूस पाच, तर उजव्या बाजूस पाच वर्ग होते व त्यातील पाचवा वर्ग थोडा आतल्या बाजूस होता. त्या वर्गाच्या बाजूलाच दिव्यांची बटणं होती.

त्यांनी पहिल्या चार मजल्यांवरचे दिवे पटापट बंद केले व ते आता पाचव्या मजल्यावरील दिवे बंद करण्यासाठी निघाले. जिने चढता चढताच राहुल अमितला म्हणाला ‘‘अमित, तुला माहितीय? माझा एक मित्र मला सांगत होता, की आपल्या कॉलेजच्या पाचव्या मजल्यावर भूत आहे.’’ त्यावर अमित हसतच त्याला म्हणाला, ‘‘कशावरून? तू कधी पाहिलं किंवा अनुभवलं आहेस का?’’ त्यावर राहुलनं नकारार्थी मान हलवली व म्हणाला, ‘‘पण मग आपल्या कॉलेजचे वॉचमनदेखील संध्याकाळी साडेसहानंतर त्या मजल्यावरचे वर्ग कोणालाच वापरू का देत नसतील?’’ त्यावर अमित त्याला म्हणाला, ‘‘अरे वेड्या तिथं बीएमएसची लेक्चर्स असतात आणि त्या सर्व वर्गांत एसी आहेत. ते वर्ग फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहेत, म्हणूनच ते कोणालाही वापरू देत नाहीत.’’ अमितच्या उत्तरानं राहुल काही समाधानी दिसत नव्हता, त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यामुळं अमित त्याला बोलला, ‘‘अरे भाई एवढा विचार करू नकोस, We are living in a modern world now, भूत वगैरे असं काहीही नसतं.” अशाप्रकारे बोलत बोलत ते पाचव्या मजल्यावर पोहोचणार इतक्यात, त्यांच्या समोरून काहीतरी खूप वेगानं गेल्याचं त्यांना जाणवलं. ते पाहून राहुल घाबरतच अमितला म्हणाला, ‘‘बघ मी तुला म्हटलं होतं ना? चल, यार खाली जाऊ आणि सिक्युरिटी गार्डला सांगू दिवे बंद करायला.’’ त्यावर अमित हसूनच बोलला, ‘‘अरे राहुल, तू किती डरपोक आहेस यार... मांजर असेल रे...चल पटकन दिवे बंद करून खाली जाऊ.’’ राहुल मनातून घाबरलाच होता; परंतु नाइलाजानं त्याला अमितसोबत जावंच लागलं.

(क्रमशः)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :studentCollegesaptarang
loading image
go to top