अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये : अरुणा सबाने

swati huddar
Wednesday, 18 September 2019

कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश...
स्वाती हुद्दार
*अरुणाताई सातव्या वैदर्भीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपली निवड झाली आहे. या टप्प्यावर पोहोचेपर्यंतचा आपला साहित्य प्रवास कसा झाला. बालपणीच साहित्याचे संस्कार आपल्यावर झाले का? घरात साहित्यिक वारसा होता का?

कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश...
स्वाती हुद्दार
*अरुणाताई सातव्या वैदर्भीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपली निवड झाली आहे. या टप्प्यावर पोहोचेपर्यंतचा आपला साहित्य प्रवास कसा झाला. बालपणीच साहित्याचे संस्कार आपल्यावर झाले का? घरात साहित्यिक वारसा होता का?
-माझा जन्म श्रीमंत शेतकरी कुटुंबात झाला. वर्धा जिल्ह्यातील निमगाव इथे आमची शेती, घर होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी जायचो. घरात खूप संपन्न असे ग्रंथालय होते, शिवाय गावातही माझ्या आजोबांनी सुरू केलेले ग्रंथालय होते. उन्हाळ्यात रात्री झोपण्याआधी सगळ्यांनी सामूहिकपणे एखादे चांगले पुस्तक वाचायचेच, असा दंडक माझ्या आईने घालून दिला होता. त्यामुळे वाचनाचे संस्कार घरातूनच झाले. मला तर वाचनाचे प्रचंड वेड होते. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदींचे साहित्य मी लहानपणीच वाचले होते. त्यातूनच लिहिण्याचाही संस्कार आपोआपच रुजत गेला. मी काहीतरी खरडायचे, ती कविता आहे, हे मात्र मला बरेच दिवस कळलेच नाही. एकदा आकाशवाणीवरच्या बालविहार कार्यक्रमात मी माझी कविता पाठवली, ती निवडली गेली, ती आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि त्याचा चेकही मिळाला. ते माझे पहिले प्रसिद्ध झालेले साहित्य. त्यानंतर लिहिण्याचा ओघ सुरूच होता. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी नागपूरला आले आणि इथल्या साहित्यिक, सांस्कृतिक वर्तुळात रमले. नागेश चौधरी, म. य. दळवी, नेताजी राजगडकर, सीमा साखरे, रूपा कुळकर्णी या सगळ्या मंडळींनी साहित्याबरोबरच माझ्या सामाजिक जाणिवाही संस्कारित केल्या. ताराबाई शिंदे आणि सावित्रीबाई फुलेंचे संस्कार होतेच. त्यातून माझे लिखाण स्त्रीवादी जाणिवांकडे झुकू लागले. इथल्या अनेक वृत्तपत्रांतून, बायजा, मानुषी अशा मासिकांतून माझ्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यावर गिरिजा कीर, आनंद यादव, बा. ह. कल्याणकर अशा नामवंतांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि आपण लिहू शकतो, ही जाणीव मूळ धरू लागली. "जखम मनावरची' हे माझे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, त्याचे खूप कौतुकही झाले.
*सामाजिक जाणिवेची साहित्यिक अशी ओळख प्रस्थापित झाल्यावर प्रकाशन व्यवसायाकडे का वळावेसे वाटले?
-सामाजिक आणि साहित्यिक प्रवास सुरू असताना वैयक्‍तिक आयुष्यात काही घडामोडी घडल्या आणि मला माझे आणि माझ्या तीन मुलांचे पोट भरण्यासाठी काहीतरी उद्योग करण्याची गरज निर्माण झाली. अनेकांनी अनेक लहानमोठे उद्योग सुचविले, पण मला माझे स्वत्व विसरून काही करायचे नव्हते. मी मुलींसाठी एक होस्टेल सुरू केले. त्यातून आमची आर्थिक निकड भागत होती. दरम्यान, सामाजिक जाणिवा गप्प बसू देत नव्हत्या. माझ्याचसारख्या महिलांना आसरा मिळावा, म्हणून मी माहेर ही संस्था सुरू केली. अनेक अन्यायग्रस्त महिलांना या संस्थेत आश्रय मिळाला. आजपर्यंत साडेचार हजार महिलांना माहेरने आधार दिला आहे. अनेकींना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. संसाराची घडी थोडी नीट बसल्यावर लिखाणाचे संस्कार गप्प बसू देईनात, त्यातूनच 1999 साली आकांक्षा हे त्रैमासिक सुरू केले. आकांक्षाचा पहिला अंक सावित्रीबाई फुले विशेषांक होता. त्याच्या उद्‌घाटनाला मृणाल गोरे आणि भा. ल. भोळे आले होते. त्या अंकाचे तारा भवाळकर, डॉ. श्रीराम लागू, आनंद पाटील, निळू फुले अशा दिग्गजांनी खूप कौतुक केले. पुढे 2000 साली आकांक्षा मासिक सुरू केले. आकांक्षाचा यशस्वी प्रवास बघून प्रा. बा. ह. कल्याणकरांनी मला प्रकाशन संस्था सुरू करण्याचा सल्ला दिला आणि स्वत:चे पुस्तक विश्‍वासाने मला प्रकाशनासाठी दिले. आकांक्षा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले "युगंधर नेते यशवंतराव चव्हाण' हे पहिले पुस्तक. त्यानंतर आकांक्षाने मागे वळून पाहिले नाही. डॉ. तारा भवाळकर, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. यशवंत मनोहर अशा अनेक मोठ्या लेखकांची पुस्तके आकांक्षाने प्रसिद्ध केली आणि एक यशस्वी महिला प्रकाशिका अशी माझी ओळख निर्माण झाली.
*आजच्या वैदर्भीय लेखिकांच्या लेखनाने आपण समाधानी आहात का?
-विदर्भाला अत्यंत प्रगल्भ अशी स्त्री साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. कुसुमावतीबाई देशपांडे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आशा बगे, प्रभा गणोरकर, आशा सावदेकर अशा आणि अनेक. अलीकडे मात्र लिखाणातला सच्चेपणा, खोली हरवली आहे. प्रसिद्धीचा हव्यास, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी इन्स्टंट प्रसिद्धी, वाचनाचा अभाव, चिंतनाचा अभाव, अनुभवाला भिडण्याची ताकद नाही, यामुळे कुठेतरी ही परंपरा खंडित झाल्यासारखी वाटते. विदर्भातल्या लेखिकांच्या समृद्ध परंपरेशी नाळ जोडायची असेल तर नव्या लेखिकांनी प्रसिद्धीची घाई करू नये. लिखाणावर खूप मेहनत घ्यावी, आत्मचिंतन करावे, खूप वाचावे आणि खूप अनुभवावे, तेव्हाच लिखाण सकस आणि दर्जेदार होईल.
*स्त्री साहित्यिकांच्या लिखाणातून वेगळे विषय येत नाहीत, याविषयी आपल्याला काय वाटते?
-हो, हे अगदी खरे आहे. याला कारण नवोदित लेखिका लेखनाला साइड ट्रॅक समजतात, करमणूक म्हणून लिहितात, पान, फूल, निसर्ग यापुढे त्यांचे लिखाण पोहोचतच नाही. किती जणी श्रमजिवी स्त्रीबद्दल लिहितात, किती जणींच्या लिखाणात वेश्‍यांचे दु:ख उमटते, किती जणींनी "मी टू'सारख्या विषयावर लिहिले आहे? असे विषय त्यांच्या लिखाणातून उमटत नाहीत, कारण त्या मध्यमवर्गीय सुरक्षित जीवन जगतात. दु:खभरल्या समाजाचे दु:ख जाणवायला, ते समजून घ्यायला त्यांना वेळ नाही, त्यामुळे अलीकडच्या लेखिकांचे लिखाण खूप उथळ आणि वरवरचे आहे. प्रसिद्धीसाठी आणि पुरस्कारासाठी केलेले ते लिखाण आहे. हे कधीतरी बदलले पाहिजे.
*वैदर्भीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे कळल्यावर काय वाटले?
-पहिल्यांदा खूप आश्‍चर्य वाटले आणि त्यानंतर खूप आनंदही झाला. आश्‍चर्य यासाठी की मी साहित्यिक असण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ती अधिक आहे. माझे नाते चळवळीशी आहे आणि चळवळीनेच मला जिवंत ठेवले आहे. जगण्यातील विरोधाभास, मूल्यांची गळचेपी, गरीब-शोषितांच्या आयुष्यातील दु:ख, वैयक्‍तिक आयुष्यातील अनुभव, या सगळ्यांमुळे मी लिहिती झाली. मी आतापर्यंत 14 पुस्तके लिहिली असली तरी साहित्यिक विश्‍व, इथल्या प्रथा, राजकारण या सगळ्यांपासून मी दूरच आहे. माझे लिखाण साहित्यासाठी साहित्य असे नसून समाजासाठी साहित्य असे आहे, असे असतानाही अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यामुळे मला खूप आश्‍चर्य वाटले आणि खूप आनंदही झाला. कारण या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून समाजाभिमुख विचार मांडण्याची संधी मला मिळणार आहे. वैदर्भीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी मनोहर म्हैसाळकर आणि डॉ. गिरीश गांधी यांची ऋणी आहे.
*साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपण काय आव्हान करणार आहात?
-अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, ही अपेक्षा मी व्यक्‍त करणार आहे कारण अलीकडे अशी अनेक उदाहरणे आपण अवतीभवती बघतो आहोत. मनाजोगे लिहिता येत नाही, अशी तक्रार अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी केली आहे. गौरी लंकेश आणि कलबुर्गींसारख्यांच्या हत्या होताहेत. पुरस्कार वापसीसारख्या घटना घडत आहेत; मात्र आगामी काळात हे चित्र बदलेल. साहित्यिक आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लिहतील, शेतकरी, शोषित, श्रमिक, वर्गाचे प्रश्‍न साहित्यातून पुढे यावेत, असे आवाहनही मी या व्यासपीठावरून करणार आहे.
*वैदर्भीय लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून वर्षभर आपला काय अजेंडा असणार आहे?
-लहानपणापासून लिखाणाचे उत्कृष्ट संस्कार व्हावेत, म्हणून शाळांमधून लेखनसंबंधी कार्यशाळा घेण्याचा मानस आहे. वाचनसंस्कृती रुजावी, यासाठीही विशेष प्रयत्न करणार आहे. साहित्य हे केवळ करमणूकप्रधान असू नये, तर त्यातून समाज जीवन प्रतिबिंबित व्हावे, ही माझी साहित्यविषयक भावना आहे. समाजातील अयोग्य गोष्टींवर साहित्यातून प्रहार व्हावा, गरीब-शोषितांचे प्रश्‍न त्यातून मांडले जावेत आणि त्यावर मंथनही व्हावे, यासाठी साहित्य समाजाभिमुख करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
सातव्या वैदर्भीय लेखिका साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, संपादक आणि प्रकाशक अरुणा सबाने यांनी त्यांचा साहित्यपट आणि जीवनपट या मुलाखतीमधून सहज उलगडला. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhivyakti swatantrachi galchepi hou naye - aruna sabane