- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अमाप प्रसिद्धी मिळत असली तरी हॉकीमधील आपल्या देशाचे यश वाखाणण्याजोगे आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने १९७५मधील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या विश्वकरंडकात सुवर्णपदक पटकावले.
त्यानंतर १९८०मधील मॉस्को येथील ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यातही त्यांना यश मिळाले. त्यानंतर मात्र आशियाई स्तरावर अधूनमधून ठसा उमटवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला जागतिक व ऑलिंपिक स्तरावर देदीप्यमान कामगिरी करता आलेली नाही. टोकियो व पॅरिस या मागील दोन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत भारतीय हॉकी संघाने पुनरागमनाचे संकेत दिले.
याच पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याशी संवाद साधण्यात आला. आगामी आशियाई करंडक, आशियाई क्रीडा स्पर्धा व विश्वकरंडक या तीन स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून तयारी केली जात असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.