जगणं शिकवणारा बापमाणूस!

प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेल्या असंख्य भूमिकांनी चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा पहिला चित्रपट ‘अर्ध सत्य’.
sadashiv amrapurkar
sadashiv amrapurkarsakal

- रिमा अमरापूरकर

प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेल्या असंख्य भूमिकांनी चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा पहिला चित्रपट ‘अर्ध सत्य’. त्यात साकारलेली रामा शेट्टीची भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. अभिनय क्षेत्रात ‘बाप’ ठरलेले अमरापूरकर खऱ्या आयुष्यातही ‘बापमाणूस’ होते. आज (ता. ११) त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांची कन्या आणि चित्रपट निर्माती रिमा अमरापूरकर यांनी सांगितलेल्या आठवणी...

मी दोन वर्षांची असताना बाबांचा ‘अर्ध सत्य’ चित्रपट रिलीज झाला होता आणि ते एका रात्रीत स्टार झाले. माझ्या कळत्या वयापासून मी पाहतेय, बाबांचं नाव ऐकलं की, सर्वांसमोर त्यांचा चेहरा येतो. बाबा फक्त आम्हा कुटुंबीयांसाठीच नव्हे; तर समस्त भारतीय प्रेक्षकांसाठी खूप खास होते. त्यामुळे एक मुलगी म्हणून मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटायचा.

माझे वडील एक अभिनेता असले, तरी घरात ते नेहमीच बाबा असायचे. घरात मिळून-मिसळून असायचे. त्या काळात मोबाईल नव्हते. दोन-दोन महिने ते शूटिंगसाठी राजस्थानमध्ये असायचे. बाहेरगावावरून आले, की तिथली प्रसिद्ध वस्तू ते सोबत घेऊन यायचेच. बाबा जाताना दोन बॅगा घेऊन गेले असतील, तर येताना चार बॅगा घेऊन यायचे. सोबत तिथली खासियत विकत घेऊन यायचे.

त्यामुळे जगभरातले उत्कृष्ट खाद्यपदार्थ, कपडे, साड्यांचे प्रकार किंवा घरातील सजावटीच्या वस्तू बघत आम्ही मोठे झालो. त्या वस्तू निरखून पाहता आल्या. सोबतच बाबांना फोटोग्राफीचा छंद होता. कॅमेरा नेहमीच त्यांच्यासोबत असायचा. ते कोणकोणत्या शूटला गेले त्याविषयी नाही बोलायचे; पण त्यांनी तिथे कोणत्या वास्तू बघितल्या त्याविषयी मात्र नेहमी भरभरून बोलायचे.

त्यामुळेच माझ्या वडिलांनी आम्हाला जगाकडे बघण्याची एक सौंदर्यदृष्टी दिली, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. त्यामध्ये कलासक्ती होती, त्याचप्रमाणे विवेकवादी विचार करण्याची वृत्तीही होती. कारण त्यांचा मित्रपरिवार हा वेगवेगळ्या क्षेत्रांतील होता. सोबतच सामाजिक कार्य करणारी माणसंही त्यांच्या परिचयाची होती. त्यांच्यात कधीही भेदभाव नसायचा.

हा माणूस गरीब आहे, हा श्रीमंत आहे किंवा हा सिनेमातला आहे, हा लेखक आहे, असा कोणताच भेदभाव नसायचा. त्यामुळे त्यांनी आम्हाला माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टी दिली आणि हे खूप दुर्मिळ असतं. आपल्या समाजामध्ये मूल जेव्हा वाढत असतं तेव्हा जात, धर्म, व्यवसाय अशा बऱ्याच गोष्टींवर आपण अप्रत्यक्षपणे भेदभाव करायला शिकवत असतो.

पण, बाबांनी आम्हाला लहानपणापासून हेच शिकवलं की, समोरचा माणूस काय कमावतो किंवा तो किती श्रीमंत आहे, यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे, हे सर्वात महत्त्वाचं. ही विचारांची शिदोरी आम्हाला आमच्या बाबांनी दिली.

माणसांवर विश्वास ठेवा!

दुसरं अत्यंत महत्त्वाचं जे बाबांनी आम्हाला शिकवलं, ते म्हणजे ‘माणसांवर विश्वास ठेवा’. या शिकवणीचं महत्त्व आजच्या जगात जगत असताना आम्हाला कळतंय. आज आम्ही समाजजीवनात वावरत असताना माणसांकडे माणूस म्हणून बघतो, त्यांना ते माणूस असल्याचा मान देऊन त्यांच्याशी वागतो. म्हणून लोकही आमच्याशी तसेच वागतात. यामुळेच आमच्याबरोबर अशा कुठल्याही वाईट घटना कधीच घडत नाहीत. हे माझ्या मते बाबांनी दिलेले संस्कार आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आहे.

बाबांनी आणि आईने आमच्या मनावर शिक्षणाचं महत्त्व बिंबवलं. ‘तुमचा बाबा एक मोठा स्टार आहे, तर तुम्हाला काय गरज नाहीये शाळेत जाऊन शिकायची. तू चल माझ्यासोबत सेटवर. मी मोठ्या लोकांसोबत तुझी ओळख करून देतो,’ असं ते कधीच म्हणाले नाहीत आणि त्यामुळे मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कामाला लागली तेव्हा अनेक जण अचंबित व्हायचे की, अरे, तू सदाशिवची मुलगी आहेस! असं व्हायचं.

त्यांनी पावला-पावलावर आम्हाला शिक्षण किती महत्त्वाचं आहे, हेच सांगितलं. फक्त शालेय शिक्षणच नव्हे; तर आपण जे काम करत आहोत, त्याचंदेखील शिक्षण असणं आवश्यक असतं, हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यामुळेच आज आम्ही तिघीही बहिणी आपापल्या क्षेत्रांत चांगलं काम करत आहोत.

जमापुंजी समाजकार्यासाठी वापरली

अनेकांना वाटतं की ही तर सदाशिव अमरापूरकरांची मुलगी आहे, हिला काय गरज आहे बाहेर जाऊन पैसे कमवायची... पण माझ्या वडिलांनी गरजेपेक्षा जास्त पैसे कधीच कमावून साठवले नाहीत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबाला जगण्यासाठी जेवढे पैसे गरजेचे आहेत, तेवढेच ठेवले आणि त्या व्यतिरिक्त कमावलेले सगळे पैसे त्यांनी समाजकार्याला दिले. हे तत्त्व त्यांनी त्यांच्या व्यवहारातून आम्हाला शिकवलं आहे.

त्यामुळे आम्हाला मेहनत करायची आहे, पुढे स्वतःचं करियर करायचं आहे हीच आमची महत्त्वाकांक्षा राहिली. बाबांचं हे तत्त्वच आमच्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहे. मी आजच्या स्टार्स किड्सना बघते, ज्यांच्याकडे सगळं आहे. त्यांना अशी प्रेरणाच मिळत नाही. म्हणून त्यांची व्यक्ती म्हणून वाढसुद्धा थांबते.

या बाबतीत मी स्वतःला खूपच नशीबवान समजते की, बाबांनी समाजाचं देणं जाणलं आणि ते दिलं. आज आम्ही तिघीही बहिणी ताठ मानेने उभ्या आहोत. एक वडील म्हणून बाबा खूप प्रेमळ होते. त्यांनी कधीच आमच्यावर हात उचलला नाही. अर्थात त्यांना ती गरजदेखील नव्हती; कारण त्यांची नजरच पुरेशी होती.

बाबांच्या संघर्षाबद्दल बोलायचं झालं, तर मी म्हणेन तो दोन टप्प्यांचा आहे. एक म्हणजे ‘अर्ध सत्य’ रिलीज झाल्यानंतर रामा शेट्टी हे त्यांचं पात्र, ज्यामुळे ते रातोरात स्टार झाले. त्या पूर्वीचा त्यांचा संघर्ष आणि त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर सदाशिव अमरापूरकर या व्यक्तीचा जो संघर्ष आहे तो. त्यांनी हे दोन स्ट्रगल आयुष्यभर केले. पहिल्या टप्प्याचं बोलायचं झालं तर अत्यंत कर्मट ब्राह्मण कुटुंबात ते मोठे झाले.

माझे आजोबा एक व्यावसायिक होते. बाबांनी नाटक करण्याला त्यांचा विरोध होता. बाबांनी हे जाणलं होतं की, त्यांनी जर नाटक नाही केलं तर ते त्यांच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही; पण माझ्या बाबांना आईची चांगली साथ मिळाली. आईने त्यांना खूप पाठिंबा दिला. ती त्यांना म्हणाली, तुला जे हवं ते तू कर. मी नोकरी करेन आणि आपलं कुटुंब सांभाळेन... त्या वेळी माझी आई नोकरी करायची.

माझे आजोबा बाबांना पैसे नाही द्यायचे, कारण त्यांना त्यांच्या नाटक करण्याला विरोध होता. त्या वेळी बाबा नाटकांचे प्रयोग करायचे; पण त्याचे काही फारसे पैसे मिळत नसायचे. त्या काळात त्यांनी विजय तेंडुलकर, सुहास जोशी इत्यादींसारखी माणसं जोडली. त्यांनीसुद्धा बाबांना पाठबळ दिलं. त्या काळी अक्षरशः त्यांनी लॉजवर राहून, वडापाव खाऊन दिवस काढले. त्यांचं असं कधीच नव्हतं की त्यांना सिनेमात काम करायचं आहे.

रामा शेट्टीचा रोलसुद्धा त्यांनी केवळ विजय तेंडुलकरांची स्क्रिप्ट आहे आणि त्यांनी सांगितलं म्हणून केला. त्यांच्यासाठी तो विषय तिथेच संपला होता. त्यांचा स्ट्रगल चालू होता तो नाटकासाठी. त्यांना नाटकच करायचं होतं. पण ते ‘अर्ध सत्य’ चित्रपटाद्वारे स्टार झाले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी खूप मिळाली. त्यांनंतर त्यांना अनेक सिनेमे मिळत गेले. उतरोत्तर त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली. पण कलाकार म्हणून त्यांची त्या वेळेस घुसमट होत होती.

कारण त्या काळात कलाकारांना स्टिरियोटाईप केलं जायचं की, हा म्हणजे हीरो, हा म्हणजे व्हिलन किंवा ही म्हणजे हिरोईन असं केलं जायचं. त्या तुलनेत आता तसं नाही होत. आता तुम्ही हीरोचं कामदेखील करू शकता, तुम्ही खलनायकही साकारू शकता, तुम्ही कॉमेडीही करू शकता. तसं पूर्वी नसायचं.

त्यामुळे एक कलाकार म्हणून बाबांची घुसमट होत होती आणि हे बदललं ते ‘सडक’ चित्रपटानंतर. त्यानंतर ते कॉमेडीकडे वळले. ‘कुली नं. १’, ‘हम ही कमाल के’, ‘इष्क’ इत्यादी चित्रपटांतून त्यांची विनोदी शैली समोर आली. मग त्यांना काम करायला मजा यायला लागली. कलाकार म्हणून जो स्ट्रगल असतो, तो आयुष्यभर चालूच असतो. पण प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो.

मला बाबांचा ‘वास्तुपुरुष’ चित्रपट खूप आवडतो. त्यामधील त्यांचं पात्रदेखील खूप आवडतं. कारण ते त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व दर्शवतं. म्हणजे त्यातील त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. म्हणून हा चित्रपट माझा अत्यंत आवडता आहे. त्यामुळे जेव्हा बाबांची आठवण येते तेव्हा हा चित्रपट लावून बघावासा वाटतो; पण तेवढी हिंमत होत नाही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com