‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)

संदीप कुलकर्णी
रविवार, 20 जानेवारी 2019

सध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर मर्यादा ठेवा’ हा माझा फिटनेससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटलं तरी चालेल.

सध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर मर्यादा ठेवा’ हा माझा फिटनेससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटलं तरी चालेल.

निरोगी आरोग्यासाठी, तसंच शरीर फिट राहावं यासाठी मी जिम हा पर्याय कधीच निवडला नाही. जिम करून फिट राहता येतं, हेच मला मान्य नाही. ज्यांना ‘मस्क्‍युलर लूक’ करायचा आहे त्यांच्यासाठी जिम हा पर्याय योग्य आहे; पण मी प्रथम प्राधान्य देतो ते योग करण्याला. माझी दिवसाची सुरवातच योग करण्यापासून होते. मी नेहमी ‘पॉवर योगा’ करतो. शरीराच्या फिटनेसासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी योग हा उत्तम मार्ग. योगासनं हा अत्यंत फलदायक असतात. प्रत्येकानं दिवसातून एकदा तरी ती केलीच पाहिजेत, असं मला मनापासून वाटतं. वेळ मिळेल तेव्हा मी धावायलाही जातो. मोकळ्या वातावरणात मग दिवसाची सुरवातही छान होते. शिवाय नवी ऊर्जाही मिळते. आठवड्यातून एकदा किंवा कामातून थोडा वेळ मिळाला की मी झुम्बा क्‍लासलाही जातो. व्यायामात तेवढाच बदल. व्यायामात बदल आणि वेगळेपणा हवाच, म्हणून झुम्बा हा अगदी चांगला पर्याय. आधी मी आठवड्यातून किमान तीन वेळा तरी झुम्बा क्‍लासला जायचो. मात्र, आता एकदाच जातो. सध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. रोज किमान एक ते दीड तास मी योग करतो. 

आमचं क्षेत्रंच असं आहे की चित्रपटाची गरज म्हणून एखाद्या भूमिकेसाठी कधी वजन वाढवावंही लागतं किंवा कमीही करावं लागतं. अशा वेळी मात्र व्यायामावर अधिक भर द्यावा लागतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कृतान्त’ या माझ्या चित्रपटासाठी मात्र मला वजन कमी करावं किंवा वाढवावं लागलं नाही; पण मला ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटासाठी जवळपास सात-आठ किलो वजन वाढवावं लागलं होतं. त्यामुळे माझ्या डाएट प्लॅनमध्येही बदल झाला. त्या कालावधीत माझ्या जेवणात भाताचं प्रमाण जास्त असायचं. एरवी मी भात फार कमी खातो. वजन वाढवण्याच्या दृष्टीनं अन्य पदार्थांचाही आहारात समावेश होताच. कोणत्याही कलाकाराला भूमिकेनुसार वजन वाढवण्यासाठी वा कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांची किंवा ट्रेनरची मदत घ्यावीच लागते. त्यानुसारच शरीरात आणि दिसण्यात बदल जाणवतात; पण याचा कलाकाराच्या शरीरावर काही परिणाम होत नाही. फक्त वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी थोडेफार कष्ट घ्यावे लागतात. भूमिकेपुरता मी वजन वाढवलं आणि आता पुन्हा पूर्ववत झालो आहे. मात्र, त्यासाठी सकाळी धावणं  किंवा योग यावरच मी जास्त भर दिला.

माझ्या जेवणाच्या वेळा मी अगदी कटाक्षानं सांभाळतो. कामात अगदीच व्यग्र असेन तर अर्धा तास इकडं-तिकडं होतो; पण वेळेत खाल्लेलं कधीही बरं. दोन्ही वेळा घरचं जेवण मी जेवतो.  पोळी-भाजी, वरण-भात हा माझा ठरलेला आहार आहे. मात्र, दुपारच्या जेवणात मी भात खातच नाही. शिवाय, रात्रीही फार कमी जेवतो. असं असलं तरी मी बाहेरचे चटपटीत पदार्थही खातो; पण प्रमाणातच! चाट पदार्थ मला आवडतात. मर्यादित स्वरूपात मी ते खातो. खाण्यावर कितीही नियंत्रण ठेवलं तरी त्याच्या जोडीला व्यायाम हा करावाच लागतो. व्यायाम आणि योग यांच्याशिवाय पर्याय नाही. माझ्या जेवणात कधी कधी मांसाहारी पदार्थही असतात. मासे तर मला खूप प्रिय. ‘नियमित व्यायाम करा, खाण्यावर मर्यादा ठेवा’ हा माझा फिटनेससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटलं तरी चालेल.

केवळ शरीरानं फिट राहून ताजंतवानं वाटत नसतं, मनही तितकंच ‘फिट’ असणं गरजेचं असतं. त्यासाठी मेडिटेशन अर्थात ध्यान करायला हवं. मेडिटेशन हे अगदी शाळेच्या वयापासूनच सुरू करायला हवं, असा मला आग्रहपूर्वक सांगावंसं वाटतं. मन, शरीर आरोग्यपूर्ण असेल तर कामावरही त्याचा चांगला परिणाम होतो. मी कधी तणावग्रस्त असलो किंवा माझ्यावर कामाचा जास्त भार असला की योग किंवा मेडिटेशन करतो; त्यामुळे मन:शांती मिळते. योग करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते. पोहणं हाही फिटनेससाठी उत्तम मार्ग आहे. पोहण्यानं स्टॅमिनाही वाढतो. मी पूर्वी स्विमिंग करायचो; पण आता वेळेअभावी खास स्विमिंगसाठी बाहेर जाणं जमत नाही.

फिटनेससाठी सोपे उपाय शोधणं कधीही चांगलं. कारण, ते लगेच अमलात आणता येतात. आळस दूर सारला की सगळ्या गोष्टी शक्‍य होतात. सूर्यनमस्कार, जोर-बैठका हाही व्यायामाचाच एक भाग. हेल्दी खा, फिट राहा आणि योग करा...तुम्ही आयुष्यभर फिट आणि आनंदी राहाल हे नक्की!

(शब्दांकन : काजल डांगे)

Web Title: actor sandeep kulkarni shares his secret of fitness