

Actor Struggle
esakal
डॉ. मिलिंद शिंदे- saptrang@esakal.com
असहायता... दमन... वर्गसंघर्ष, पिळवणूक, विषमता, स्त्रीची किंमत - तिचं स्थान, तिची उपयोगिता, समाजाचं तत्सम असणं या सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा चित्रपट होता तो. काय अनुभव आले, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि सारा भवताल, एकूण वेगळाच प्रवास होता तो, आत्मशोधाचा आणि व्यवस्थेच्या अंतरंगातच प्रवेश करण्याचाही...
हीरोचं काय चाललंय?
असा प्रश्न माझ्या वडिलांना त्यांचे परिचित नेहमी विचारत. मुळातच माझ्या वडिलांना या सगळ्या सिनेमा-नाटकाचा तिटकारा. त्यात ही मंडळी पुन्हा पुन्हा चिरंजीवाचं काय चाललंय? हीरो काय करतो सध्या? आता स्वतः हीरोलाच (?) माहीत नाही त्याचं स्वतःचं काय चाललंय? तिथं त्याच्या वडिलांना काय माहीत असणार? हां... आता... हूं... काय... आता... असा ज्याचा काहीही अर्थ निघत नाही, असा शब्दमेळ वडील सादर करत.
कारण त्यांच्याकडं काही उत्तर नव्हतं... त्यात प्रश्न अतिशय नावडता... अडचणीत आणणारा... राग उत्पन्न करणारा...
ज्या भागातून माझं येणं झालं, त्या भागात सिनेमात काम करणारा प्रत्येक माणूस हीरो असतो. तो दुसरं काही नसतो. तो सिनेमात काम करायला मुंबईला गेला म्हणजे तो हीरोच व्हायला गेला. मी एनएसडी, एफटीआयआय मधून शिकून बाहेर पडलो. त्यामुळं हे हीरो बीरो काही नसतं इतपत भान आलं होतं... पण हे मात्र किती लोकांसोबत वाटून घेणार? आणि आपण काही हीरो होऊ शकतो हे आपल्या स्वप्नातही नाही. जर अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या प्रारंभीच्या काळात, त्यांना त्यांच्या चेहरेपट्टीवरून, उंचीवरून टीका सहन करावी लागली असेल तर आपण कोण आहोत? मनोज वाजपेयी एका मुलाखतीत म्हणतात ‘‘काल परवापर्यंत एक सामान्य व्यक्ती होतो... ‘सत्या’ आणि ''शूल’ आल्यावर मी एकदम हँडसम दिसतो अशी टिपणी एका सिनेपाक्षिकानं केल्याची बातमी मला समजली. ही यांची अवस्था असेल तर आपण काय आहोत या माया बाजारात?