
एका खासगी कॅबचालकाने अभिनेत्री मनवा नाईक यांच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार नुकताच समोर आला.
- मनवा नाईक
एका खासगी कॅबचालकाने अभिनेत्री मनवा नाईक यांच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्या म्हणून चित्रपटसृष्टीत ओळख असलेल्या मनवा यांनी या कठीण प्रसंगात स्वत:ला सावरले. मोठ्या धाडसाने लढा दिला. त्यांच्या वाट्याला आलेला हा प्रसंग इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, इतका तो भीतीदायक होता. या चित्तथरारक प्रवासाची घटना थरकाप उडवणारी आणि विकृत मानसिकतेबाबत प्रचंड चिड आणणारी आहे. मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या महानगरात असे घडतेच कसे, हा प्रश्न समाजमन अस्वस्थ करणारा आहे.
मुंबई हे माझं शहर आहे. इथंच मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे स्वतःला अस्सल मुंबईकर समजते. या शहरामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट; पण अर्थात चांगल्या गोष्टींचा मनामध्ये अभिमान बाळगणाऱ्यांपैकी मी आहे. मुंबईमध्ये स्त्री सुरक्षित असते, मुंबई सगळ्यांना प्रेमानं वागवते. मुंबईमध्ये मुंबईकरांचं एक स्पीरिट असतं. जिथे माणसं एकमेकांना मदत करतात, अशी ही लाडाची आमची मुंबई; पण...
शनिवार, १५ ऑक्टोबरला कधी नव्हे, ते मी उबर ॲप डाऊनलोड करून कॅब बुक केली. वांद्र्यातून चेंबूरला जायला. एक २१ वर्षांचा तरुण मुलगा चालक होता. खासगी कॅब म्हणजे सेफ असं कुठंतरी मनात होतं. तो चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता, हेडफोन वगैरे नाही, तर पद्धतशीर कानाला फोन लावून. तेव्हा माझ्यातला जागरूक नागरिक जागा झाला आणि मी त्याला म्हणाले, ‘‘अरे, फोनवर बोलू नकोस, हे सेफ नाहीये.’’ एकदा नाही, दोनदा सांगितल्यावर त्याने फोन ठेवला.
नंतर आम्ही पुढे गेलो ‘आयएल ॲण्ड एफएस’च्या सिग्नलला आलो. बीकेसीमध्ये चार पदरी रस्ते आहेत. नंतर ‘आयएल ॲण्ड एफएस’च्या सिग्नलला उजवीकडे वळताना त्याने चौथ्या मार्गिकेमधून उजवीकडे कॅब वळवली. तेव्हाही मी त्याला सांगितलं की ‘चौथ्या मार्गिकेतून उजवीकडे गाडी वळवायची नसते.’ तेव्हाही तो वैतागला आणि म्हणाला की, ‘‘निकालना पडेगा ना गाडी.’’ सिग्नल बंद झाला होता, तरीही त्याने गाडी घुसवली. सिग्नल तोडला. पुढे वाहतूक पोलिसांनी त्याला पकडलं. अर्थात पोलिसांनी त्यांच्या नेहमीच्या कारवाईनुसार वाहनाचा फोटो काढला. तो फोटो ॲपवर टाकून त्याला कदाचित दंड बसला असेल. चालकाने कॅबची काच खाली करत पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. तो पोलिसांना सांगू लागला की, ‘‘जब गाडी निकाली तब सिग्नल चालू था.’’ माझ्या लक्षात आलं की, तो धादांत खोटं बोलतोय. त्याला खोटं बोलण्याची, चुका करण्याची, नियम धाब्यावर बसवण्याची जणू सवयच होती. तो पोलिसांबरोबर हुज्जत घालत राहिला. पोलिस म्हणत होते की ‘‘तुने सिग्नल जंप किया है, सिग्नल बंद हुआ था.’’ एका पॉईंटला मी म्हणाले की, ‘‘हवालदार साहेब, तुम्ही फोटो काढलाच आहे, म्हणजे दंड बसणारच आहे, तर जाऊ द्या आम्हाला.’’ ते हवालदार म्हणाले, ‘‘मी हेच सांगतोय की तुम्ही जा, मी तसाही दंड लावलाय.’’
त्यावर त्या उबरचालकाचा प्रचंड संताप झाला. मला म्हणाला, ‘‘तू भरेगी क्या ५०० रुपया?’’ मला हे अपेक्षित नव्हतं. एकतर एकेरी बोलणं आणि त्यातून मी का भरेन ५०० रुपये, तेही याने केलेल्या चुकीचे. मला काही ते आवडलं नाही. तिकडून आमची सुरू झाली बाचाबाची. बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत; मात्र शनिवार असल्यामुळे सायंकाळी सहा-सातनंतर हा परिसर ओस पडतो. गाड्या कमी होतात. लाईट्सचा भगभगीतपणा नसतो. तिकडे बरेचसे वन-वे आहेत. त्यामुळे वाहतूक कमी असते. काळोख असलेल्या ठिकाणी गाडी अत्यंत स्लो करत तो म्हणाला की ‘‘अभी तुमको मैं देखता हूँ.’’ आता मात्र मी घाबरले आणि चिडलेदेखील. मी आरडाओरडा करायला लागले. त्याला मी सांगितलं, ‘‘सीधा पुलिस स्टेशन चलो, नेक्स्ट बिट ऑफिस पे गाडी रोकना, सीधा पुलिस स्टेशन जायेंगे.’’ त्याने गाडीचा वेग वाढवला. वेग वाढवून त्याने बीकेसी-चुनाभट्टी-कुर्ला कनेक्टरच्या पुलावर गाडी घेतली.
तोही पूल तसा सुनसान, कारण त्या पुलावर टू-व्हिलर, ऑटोरिक्षा, ट्रक्स यांना प्रवेशबंदी आहे. त्या पुलावर त्याने परत गाडी स्लो केली आणि ‘‘मैं देखता हूँ’’ म्हणाला. उबर ॲपवर उबेर सेफ्टी ऑप्शन असतो, हे माझ्या लक्षात होतं. मी त्या नंबरवर फोन लावला. एक माणूस फोनवर आला आणि तो म्हणाला की, ‘‘स्वतःच्या सेफ्टीसाठी लवकरात लवकर गाडीतून बाहेर पडायचा प्रयत्न करा.’’ म्हणून मी त्या ड्रायव्हरला ‘‘गाडी थांबव, गाडी थांबव’’ सांगायला लागले. तोपर्यंत आम्ही प्रियदर्शनीच्या सर्कलपर्यंत आलो होतो. प्रियदर्शनीच्या इकडे सुमननगर बिट ऑफिसला खूप पोलिस असतात. तिकडे त्याला गाडी थांबव, असं सांगत होते. त्याने अजिबात ऐकलं नाही आणि तो कोणाला तरी फोन करायला लागला. हे पाहून मी अजून घाबरले, कारण पुढे जाऊन त्याने आणखी चार-दहा मुलं बोलवली असती तर... माझ्या मनात भीती निर्माण झाली. म्हणून मी पुन्हा आरडाओरडा करायला लागले, त्याच्या हातून फोन खेचण्याचा प्रयत्न करू लागले. आमची हाता-पायी झाली. राडा झाला. सगळा राडा आजूबाजूच्या रिक्षावाल्यांना, दुचाकीस्वारांना दिसायला लागला. त्यातल्या एका दुचाकीस्वाराच्या लक्षात आलं, की काहीतरी गडबड आहे. तो आमच्या गाडीच्या बाजूला येऊन चालकाच्या काचेवर हात मारायला लागला. त्यामुळे आता हा चालक आणखी बिथरला. त्याने गाडी हळू केली. तेव्हा आणखी एक दुचाकीस्वार आडवा आला. एक रिक्षावालाही आला. असं करत तिघांनी मिळून ती उबर थांबवली. पहिल्या दुचाकीस्वाराने काच खाली करून त्याच्या सणकन कानफटात मारली आणि ओरडला. तेव्हा कुठं सरबरलेला उबर कॅबचालक भानावर आला. आता गाडी उभी होती. थांबली होती; पण त्या गाडीतून उतरावं हे मला सुचलंच नाही. तिकडे तशीच काही क्षण बसून राहिले मी. स्तब्ध बसून होते. त्या दुचाकीस्वाराने मला सांगितलं की, आप उतर जाओ; मग भानावर येऊन मी उतरले. गाडीचा फोटो काढला आणि त्या दुचाकीस्वाराला पुढील रिक्षा स्टॅण्डवर सोडण्याची विनंती केली. त्याने मला एका रिक्षा स्टॅन्डवर सोडलं.
घाबरले तर मी होतेच; पण कुठूनतरी आतून काही तरी संचारलं आणि मला वाटलं की, आवाज उठवला पाहिजे. मला असं लक्षात आलं की, आपल्या आतमध्ये किती ताकद असते, याची कल्पना नसते. बहुदा ही ताकद शरीरात नसते, तर ती ताकद मनात, डोक्यात आणि विचारात असते. मी ती वापरली. त्या क्षणी मला ती सुचली. कदाचित दैनंदिन आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यामध्ये बऱ्याच चढाओढी बघण्याची सवय असल्यामुळे किंवा एक अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती म्हणून विविध पात्र आणि त्यांचे विविध संघर्ष बघण्याची, त्यांचा अभ्यास करण्याची कुठेतरी सवय असण्यामुळे, या अख्ख्या प्रसंगाला मी सामोरे जाऊ शकले; पण मनात एक विचार घर करून राहिला की, माझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती, एखादी लहान मुलगी असती, एखादी घाबरट मुलगी असती किंवा मुलगा असता तर काय झालं असतं?
उबरचालकाकडे एखादं हत्यार असतं, एखादा रॉड असता तर काय झालं असतं? माझ्याकडे एखादं हत्यार असतं, रॉड असता, पेपर स्प्रे असता तरी काय झालं असतं? मी तो त्याच्या डोळ्यात मारला असता आणि त्याने ती गाडी कुठेतरी ठोकली असती. हे सगळंच विचित्र, चुकीचं आणि भीतीदायक आहे.
अर्थात यानंतर पोलिसांनी मला मदत केली, मी एफआयआर नोंदवला. त्या उबर कॅबचालकाला अटक झाली. त्याचा चालक परवाना जप्त झाला. उबर कंपनीने मला फोन केला. सांगितलं, ‘आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.’; पण आता माझ्या लक्षात आलंय की, उबरने माझं अकाउंट बंद केलं. त्यांनी सरळसरळ मला ब्लॉक केलं! परंतु आपल्याला माहिती आहे, उपचारापेक्षा काळजी घेतलेली कधीही बरी; पण आपणही नेहमी उपचारावरच भर देतो. मी काय ॲक्शन घेतली, त्यांनी काय ॲक्शन घेतली, नंतर पोलिसांची काय ॲक्शन होती; परंतु आता आपल्याला काळजी घेण्याबाबत किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. हे असं व्हायलाच नको होतं. या घटनेनंतर मला एक प्रकारचा धक्काच बसल्याचे जाणवतंय... खूप धडधडतंय...
मुळात अशा प्रकारे कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चालकांना नोकरीवर ठेवताना त्यांची किमान चौकशी करायला हवी. केवळ चालक परवाना आहे अथवा गाडी चालवता येते, याच्या आधारावर त्यांना नोकरी देता कामा नये, तर त्यांची मानसिक स्थिती, त्याची वागणूक, त्याची ग्राहकांप्रतीची भावना, वागण्या-बोलण्याची पद्धत, आदींबाबत चाचणी आणि शिक्षण देणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडील रिक्षावाला किमान बिल्ला लावतो आणि युनिफॉर्म घालतो. उबरचे चालक तर यापैकी काहीच करत नाही. कॅब ही सार्वजनिक वाहतुकीचा सर्वात धोकादायक प्रकार आहे; पण आपण त्यालाच सुरक्षित पर्याय मानतो. या सगळ्याचा विचार करत असताना, कुठंतरी त्या मुलाचादेखील माझ्या मनात विचार येतो. हा २१ वर्षांचा मुलगा असा का घडला? सातत्याने खोटं बोलायची त्याला इच्छा का झाली? गाडी चालवताना फोनवर बोलायची, सिग्नल मोडायची त्याला इच्छा का झाली? एका स्त्रीला अपमानास्पद वागवण्याची त्याला का इच्छा झाली? त्याला कायदा, पोलिस यांची भीती वाटली नाही का? कुठे त्याच्या जडणघडणीत चूक झाली असेल का? का त्याला हे सगळं बरोबर वाटत होतं?
प्लीज नोट - हे सगळं चुकीचं आहे आणि आपण तरी हे असं करतोय, असं त्याला वाटत नव्हतं. तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतो त्यानुसार, एखाद्याने तो जे करतोय ते चुकीचं आहे, हे माहीत असूनसुद्धा करणं, एक वेळ ठीक आहे. कारण त्या व्यक्तीला सुधारायला वाव आहे. या मुलाच्या बाबतीत हे असं नव्हतं. तो हे सगळं करत होता, ते सगळं बरोबर आहे, असंच त्याला वाटत होतं. आणि ही आपली, आपल्या समाजाची हार आहे, असं मला वाटतं.
मुंबई एक उत्साही शहर आहे, मुंबईकरांनी मला मदत केली. मुंबई पोलिस प्रचंड कार्यतत्पर आहेत. त्यांनी मला सुरक्षा दिली, सुरक्षिततेची हमी दिली. मुंबईचा गुन्हेगारी दर कमी असतो, हे नक्कीच मुंबई पोलिसांमुळे; पण हा जो उबर कॅबचालक- जो बाहेरून मुंबईत आला होता अर्थार्जनासाठी तो- कोणत्या परिसरातून आला होता, कोणत्या मानसिकतेतून आला होता, संस्कारातून आला होता? त्याला माहितीच नव्हतं की तो जे करत होता, जे वागत होता ते चूक आहे.
इथून पुढे आपण आपल्या सुरक्षिततेचा विचार नक्कीच करायला हवा. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित राहण्यासाठी आवाहन करूया, आपण काळजी घेऊया की जेणे करून आपण सुरक्षित असू. आपण विश्वास ठेवू की आपण सुरक्षित राहू. आपल्याला गर्व राहील, की मुंबई पोलिस आपल्याला सुरक्षित ठेवतात; पण मुळात अशा घटना का घडतात, याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि यांच्या विचारसरणीत बदल होणं खूप गरजेचं आहे; अन्यथा ही विकृती अधिक फोफावल्यास त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.