सावित्रीच्या लेकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी

सावित्रीच्या लेकी

‘मी’च्या शोधात

पुण्यात आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. स्पर्धेत सहभागी होवून जिल्‍ह्याबाहेर जाण्याचा हा आमचा पहिलाच योग होता.

दि ४ जानेवारी २०२२ रोजी अहमदनगरहून आम्ही विद्यार्थिंनी व डॉ. संजय मेस्त्री आणि डॉ. वसिम फातेमा आंबेकर या महाविद्यायन अध्यापकांसह पुणे येथे गेलो. स्पर्धा संपल्यावर सावित्रीबाईंची कर्मभूमी असलेल्या भिडेवाड्याला भेट देण्याची आम्हा सर्वांची इच्छा झाली. तेथे गेलो तेव्हा ऐतिहासिक स्मृतींना ऊजाळा मिळाला.

हेही वाचा: प्रेमाचा विजय अन् दोनदा लागलं लग्न

बहुजन समाजाच्या विकासासाठी ज्ञानमार्ग खुला करण्याचे कार्य क्रांतीबा महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. महात्मा फुलेंनी दि. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. याच शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंनी कार्य केले.

त्यांच्या चळवळीचे आणि प्रबोधनाचे फलित म्हणजेच आजचा बदलता महाराष्ट्र, भारत आहे. स्त्री शिक्षणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भिडे वाड्याला भेट दिल्यावर मनस्वी समाधान वाटले; पण त्याचबरोबर भिडे वाड्याची आजची दूरवस्था पाहून पुरोगामी विचारवंत आणि राज्यकर्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंतही वाटली.

स्त्री शिक्षणाच्या प्रवासाच्या संदर्भातील आणखी एक आठवणीतील जखम नोंदवावीशी वाटते. महात्मा फुले यांचे एक सहकारी डॉ. विश्राम घोले सत्यशोधक चळवळीतील कृतीशील विचारवंत होते. त्यांना काशीबाई नावाची एक कुशाग्र बुद्धीची चुणचुणीत मुलगी होती. आपली मुलगी शिकावी, यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. परंतु त्या वेळच्या सनातन वृत्तीच्या समाजाला मुलींचे शिक्षण घेणे हे पचणारे नव्हते. काशीबाई (बाहुलीच्या ) शिक्षणाला त्यांनी कडाडून विरोध केला, तरीही डॉ. घोले यांनी आपल्या मुलीला शिक्षण देणे सुरूच ठेवले. तेव्हा नतद्रष्ट नातेवाईकांनी काचा कुटून घातलेला लाडू काशीबाईला खायला दिला आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होवून वयाच्या नवव्या वर्षी (सन १८७७) त्या मृत्युमुखी पडल्या.

शिक्षण घेण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांची हत्या झाली. स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी होय. डॉ. घोले यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ बाहुलीचा हौद बांधला. त्यावेळचा आपला समाज स्त्री शिक्षणाबाबतीत किती प्रतिगामी होता, याची जाणीव यावरून आपणास होते.

काशीबाईच्या बलिदानाच्या कथेने उत्तर पाकिस्तानातील मलालाचा संघर्ष आठवला. तालिबानी अतिरेक्यांबरोबर शिक्षणासाठी लढणाऱ्या या मुलीवर गोळीबार झाला. नंतर तिला आंतरराष्ट्रीय बालशांती नोबल मिळाले. (कै.) खासदार शंकरराव काळे यांनी आपल्या आईच्या नावाने १९८९ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे हे महिला महाविद्यालय अहमदनगर येथे सुरू केले. फक्त मुलीं साठी असलेले हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. येथे पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनात्मक शिक्षणाची सुविधा आम्हाला सहज उपलब्ध झाली आहे.स्त्री शिक्षणासाठी कृतीशील योगदान देणाऱ्या ज्योतिबा-सावित्रीच्या महान परंपरेला आणि कर्मवीर शंकरराव काळे साहेबांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानाचा मुजरा.

- सानिका थोरवे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top