थोडं 'बेशरम' बनू या 

थोडं 'बेशरम' बनू या 

या    लेखात आपण ‘स्टार्टअप आणि मराठी माणूस’ यावर चर्चा करणार आहोत. 
मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी अभिमान यावर आपण मोठ्या अभिमानानं बोलत असतो अर्थात त्याचा आपल्याला जन्मसिद्ध हक्कच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महालात बसून केवळ अशा अभिमानाच्या गोष्टीच केल्या असत्या तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? महाराजांनी पारंपरिक जोखड, त्याच त्याच विचारांची चौकट तोडली, आव्हानं स्वीकारली, धोका पत्करला, वेळप्रसंगी त्याची मोठी किंमत देखील चुकवली. तेव्हा कुठं स्वराज्य उभं राहिलं. आता आपण म्हणाल की, स्टार्टअपबद्दल चर्चा करताना मध्येच शिवाजी महाराजांचा काय संबंध? पण इथंच मोठी गंमत आहे. आपण मराठी लोकं आजही म्हणतो, महाराज पुन्हा जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात. स्टार्टअपचं पण असंच आहे. देशात औद्योगिक क्रांती व्हावी, नवे उद्योगधंदे सुरू व्हावेत, मोठमोठ्या कंपन्या सुरू व्हाव्यात...पण त्या दुसऱ्यांनी (विशेषत: अमराठींनी) सुरू कराव्यात. आम्ही मराठी मुलं त्यात नोकऱ्या मिळवण्यासाठी धडपड करू (नोकऱ्या नाहीच मिळाल्या तर मराठी मुलांवर अन्याय, मराठी-अमराठी, भूमिपुत्रांचा हक्क वगैरे वाद उभा करुन आंदोलनं करु ) हे वाचायला जरी कटू वाटतं असलं, मनाला टोचतं असलं तरी हे कटू सत्य नाकारून चालणार नाही. हे असं का होतं? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येतं की, अशा भित्र्या मनोवृत्तीचं बाळकडू लहानपणापासून आपल्याला पाजलं जातं, हो अगदी बरोबर वाचलं तुम्ही, ‘भित्रेपणाचं बाळकडू’....! सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांनी लहानपणी काही तरी वेगळं करायचं मनात जरी आणलं तरी पहिला प्रश्‍न असतो, उगीच कशाला?, हे आणखी नवं काय?, चार लोकं काय म्हणतील? आपण मराठी माणसं आपल्या मुलांना लहानपणापासून ‘सेफ झोन’चं शिकवतो. चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क्स पडतील, चांगले मार्क्स पडले तर चांगली नोकरी मिळेल या मानसिकतेत तो लहानाचा मोठा होतो, मात्र काही अपवाद वगळता आपल्या मराठी मुलांना बिझनेसबद्दल शिकवलं जात नाहीच! अलीकडच्या काळातील काही स्टार्टअप पाहिल्यास त्यांचे फाऊंडर व को - फाऊंडरची आडनावं मेहता, बन्सल, शर्मा अशीच काहीशी आढळून येतात. मात्र त्याचवेळी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील इंजिनिअर्सची आडनावं कुलकर्णी, देशपांडे, गोखले, देशमुख अशी दिसतात, हे मी माझ्या अनुभवावरुन सांगतोयं, मी अनेकवेळा सिलिकॉन व्हॅलीला गेलो असता आपल्याकडची मराठी मुलं मोठ्या पदांवर काम करताना दिसतात. त्यांना पाहिलं की प्रत्येक वेळी मला प्रश्‍न पडतो जर आपली मुलं इतकी हुशार आहेत तर ते स्वत:चा बिझनेस का करत नाहीत ? याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, ‘भित्रेपणाचं बाळकडू’, मी मुंबईच्या एका चाळीमध्ये लहानाचा मोठा झालो आहे, तेंव्हा मी बघितलयं, लहानपणी आपल्याला जास्त बोलू नका, फालतू प्रश्‍न विचारू नका,  जास्त हसू नका, नाहीतर नंतर रडावं लागेल, डोक्यावर कुणाचंही कर्ज नको...अशा स्वरुपाची फिलॉसॉफी शिकवली जाते. यामुळे आपली मराठी मुलं ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. ‘जास्त टक्के + चांगली नोकरी + चांगला पगार + मुंबई,पुण्याला १ किंवा २ बीएचके फ्लॅट + सुंदर मुलीशी लग्न = यशस्वी जीवन’ हा बहुतांश मुलांचा फॉर्म्यूला असतो. हा फॉर्म्यूला पूर्णपणे चुकीचा आहे असे मी म्हणत नाही, मात्र यापैकी अनेकांमध्ये काहीतरी वेगळं करण्याची धमक असते ते सुध्दा याच मळलेल्या वाटेवरून चालतात. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मराठी मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, यासाठी थोडसं बेशरम बनण्याची गरज आहे.

मी तुम्हाला आधीही सांगितलंय, आपल्यासमोर २०२० नं ठेवलेल्या कोरोनाच्या संकटातून जगानं शिकलेले धडे, त्यातून उभ्या राहिलेल्या स्टार्टअपनं अनेकांना जगण्याची नवी दिशा दाखवली आहे. अलीकडच्या काळात नवे स्टार्टअप सुरु होण्याची अनेक कारणे आहेत. या क्षेत्रात गत तीन दशकांपासून मी कार्यरत असल्याने अनेक चढ-उतार मी पाहिलेले आहेत. त्यातील काही अनुभवले देखील आहेत, मात्र कोरोना व लॉकडाऊनच्या काळात झालेल्या बदलांकडे मी भविष्याची पायाभरणी  म्हणून पाहतोय. 

देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत, असे म्हटल्यात ते चुकीचं ठरणार नाही. सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात तरुणाईच्या नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनांना सुरुवात केली होती.

 त्या रसाळ फळांची चव आता चाखायला मिळत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झालेले असताना भारतात गेल्या चार महिन्यात तब्बल पाच हजाराहून स्टार्टअपची नोंद झालीय, हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. अनेकांनी कोरोनाचं आव्हान संधीत बदलल्यानं भारतानं जागतिक स्तरावरील ‘स्टार्टअप इकोसिस्टम्स’च्या क्रमवारित तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या एका आकडेवारीनुसार, देशात डिसेंबर महिन्यापर्यंत ४१ हजार १९० स्टार्टअप सुरू झाले. 

कोरोना विषाणू संसर्गाचा भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये देशात सुरू होणार्‍या स्टार्टअपची संख्या २९ हजार ०१७ होती. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ पेक्षा ५० टक्के अधिक स्टार्टअपला मान्यता देण्यात आली आहे. माझ्यामते, हे सर्व नवउद्योग देशाच्या विकासातील दशा आणि दिशा यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर काहींनी स्वत:चा छोटासा का असेना पण व्यवसाय करण्याचं धाडसं केलयं. 

माझ्या परिचयातील दोन-तीन जणांनी तर नव्या व्यवसायात चांगला जम बसवत अवघ्या सहा महिन्यात मोठी आर्थिक उलाढाल करुन दाखवत, स्वत:ला सिध्द करुन दाखवलंय. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो, ‘उगीच कशाला’ म्हणणे सोडा व थोडसं बेशरम बना !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com