वाढता वाढता वाढे...

Business World
Business World

सरलं, एकदाचं २०२०,  संपलं !. २०२१ म्हणजे नव्या वर्षांकडं नवीन आशेनं बघणाऱ्या जगाची हिच एक भावना आहे. वर्षभर घरात कोंडून घेतलेल्या अनेकांनी अवघ्या काही आठवड्यात जग कसं आमूलाग्र बदलू शकतं याचा ‘लाईव्ह’ अनुभव घेतलाय या वर्षात. हे बदल अर्थातच लोकांच्या जीवनमानात, राहण्याच्या पद्धतीत घडले तसतसे त्याचे पडसाद उद्योगांवर पडायला लागले. त्यातूनच एकविसाव्या शतकाला निर्णायक वळण लावणाऱ्या ‘डिजिटल इकोसिस्टिम’ची व्याप्ती देखील वाढायला लागली.

आपल्यासमोर २०२० नं ठेवलेल्या कोरोनाच्या संकटातून जगाने शिकलेले धडे, त्यातून उभ्या राहिलेल्या नव्या आयामांकडे एक उद्योजक, नव-उद्योगांत गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार आणि एकूणच स्टार्टअप जगाचा चाहता म्हणून मी थोडं उत्कंठेतनं, थोडं अचंब्यानं आणि थोडं आश्वासकतेनं बघत आलोय. माझ्या तीन दशकांच्या उद्योजकीय अनुभवांचा लेखाजोखा त्यानिमित्ताने समोर उभा राहिलाय. केबलच्या चॅनल्सचा बिझनेस असो वा भारतात ई कॉमर्सचा झंझावात येण्याआधीच त्या क्षेत्रात चंचुप्रवेश करणं असो, मुंबईतल्या ‘मराठी छोकऱ्याच्या’ नजरेनंच सगळं बघितलं आहे. मुंबईनं, महाराष्ट्रानं आपली नाळ मजबूत ठेवल्यानं इथल्या मातीचं वास्तव नेहेमी मला धरून होतं. कोरोना काळात नव्यानं घडणाऱ्या गोष्टींत हे वास्तव पुन्हा झळाळून निघालं आहे.

रिक्षा चालवणाऱ्या माझ्या ओळखीच्या एका काकांनी भाज्या विकणं सुरू केलं. त्यांचा भाचा आता एक अॅप तयार करतोय त्यांच्यासाठी. शिकवणी घेणाऱ्या एका परिचितानं ऑनलाईन कोचिंग सुरू केलं. कलावंत मंडळींनी सोशल मीडियावर मैफिली जमवल्या...चित्रपटांचं थेट ओटीटीवर रिलीज होणं झपाट्याने सर्वमान्य झालं... हे असे बदल घडून येण्यास कित्येक वर्षांचा...कधीकधी दशकांचा कालावधी लागतो. लॉकडाऊनमुळे एका वर्षात झालेली ही घुसळण विविध प्रकारे कित्येक दशकांचा कार्यभाग आटोपती झाली. ‘यूट्युब’कडं फक्त तरुणाईचं माध्यम म्हणून बघणाऱ्या कित्येक वरिष्ठांनी याच ९ महिन्यांत स्वतःचे किमान ५० व्हिडिओ टाकल्याचं मी स्वतः बघितलं, अनुभवलं आहे...आणि हे घडून येणं एन्जॉय सुद्धा केलं आहे. डिजिटल क्रांती, डिजिटल क्रांती असं खूपदा म्हटलं जातं. अतिवापरामुळे कधीकधी काही शब्दप्रयोग त्यांची व्याप्ती, खोली, गहनता हरवून बसतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘डिजिटल क्रांती’चं तसंच झालंय काहीसं. अगदी काही वर्षांपूर्वी श्रीमंतांची चैन असणारं इंटरनेट आज लक्षावधींचं उत्पन्नाचं साधन होऊन बसलं आहे, कोट्यवधींना आर्थिक संपन्नतेचा रस्ता दाखवत आहे. या प्रक्रियेत इंटरनेट, कनेक्टिव्हीटी, ई-कॉमर्स, सोशल मीडिया असे कित्येक समान धागे दिसत असले, तरी मला, नेहेमीप्रमाणे सामान्य भारतीयाच्या एकाच वेळी परिस्थितीशी समतोल राखण्याचं आणि त्यातल्या त्यात प्रयत्न करत जास्तीत जास्त पदरी पाडून घेण्याचं कसब जाणवतं. मुंबईच्या लोकलमध्ये लोक गर्दीला स्वीकारतात सुद्धा आणि चुळबुळ करत, इकडून तिकडे सरकत आपल्यासाठी वेगळी जागा मिळवतात सुद्धा.

भारतीय स्टार्टअप स्पेस अशीच आहे. अनंत अडचणी नेहेमीच्याच. कधी भांडवलाच्या पुरवठ्यातील अडचणी, कधी नियमांच्या क्लिष्टतेमुळे. कधी पिअर प्रेशरमुळे तर कधी होम लोनच्या हप्त्यांमुळं. पण तरीही नवनवे तल्लख, हुरहुन्नरी फाऊंडर्स समोर येत आहेतच. आपली प्रतिभा पणाला लावून, तळाच्या समस्यांपासून टॉप ऑफ द पिरॅमिड इश्युज पर्यंत सगळं काही सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कधी कल्पना केली असेल का की बाळंतपणानंतर वजन वाढलेल्या स्त्रियांसाठी म्हणून खास वजन कमी करण्याचे प्रोग्रॅम्स असू शकतात? आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ हिट होतात - हे कळल्यावर कुणी आजीबाई चक्क स्वतःचे मसाले विकायला सुरुवात करेल - कधी कल्पना केली होती का?! तुम्हाला कधी वाटलं होतं का की नोकरी शोधणाऱ्यांसाठी फक्त ‘रिझ्युम कसा लिहायचा’ याचं पैसे मोजून ट्रेनिंग घेतलं जाऊ शकतं?

हे सगळं गेल्या काही महिन्यांत घडलंय!
‘हटके’ विचार करण्याची हद्द पार करतात आपली भारतीय पोरं ! वेगवेगळ्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना आपल्या जाहिरातींसाठी ग्राफिक्स लागतात...पण स्पेशालिस्ट्सकडून घेणं परवडत नाही. या अडचणीवर चपखल उत्तर शोधत एका डिजिटल फ्लॅटफॉर्मवरच्या नव उद्योजकानं ‘१००० रेडिमेड एडिटेबल’ ग्राफिक्सच विकायला काढले ! एका सुटसुटीत अॅपचं फ्री व्हर्जन वापरून हे ग्राफिक्स जुजबी एडिट करायचे...त्यात आपला लोगो, नाव टाकायचा, रंगसंगती बदलायची...आणि तुमची इमेज तयार ! मला ही कल्पना कळल्यानंतर त्या झकास तरुणाला घट्ट मिठी मारावीशी वाटली. कोण म्हणतो उद्योजकांच्या समस्या सोडवायचा लाखो करोडोंचं फंडिंग लावलं? या हिरोने काही हजारांमध्ये खूप मोठा प्रॉब्लम सोडवलाच - पण झकास बिझनेसच उभा केला!

घरोघरी डबा पोहोचवणारे, डिजिटल कॅलेंडर्स करून देणारे, घरबसल्या योगासनं शिकवणारे, वाढदिवसाला घरी केक आणून देणारे...किती जटील समस्या सोडवणारे उभे राहिलेत गेल्या वर्षभरात, नाही का? ही आहे कोरोनाच्या काळ्याकुट्ट ढगाची लखलखती चंदेरी किनार. माणूस याचमुळे पृथ्वीवरील सर्वात बलवान प्राणी आहे. नाजूक शरीर, कोवळी त्वचा ! नखं...शिंगं...काटे...सुळे...काहीच नाही ! आहे ती फक्त जिद्द, कल्पकता आणि एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ हा आपल्या जंगली मुळांवर मात करत, स्वतः घडलेला सामाजिक नियम ! याच बळावर पहिलं चाक निर्मिलं गेलं. याच बळावर त्या चाकांचा रथ झाला. त्यातूनच फोर्डची कार तयार झाली. त्यातूनच ओला - उबेर सारख्या मोटारींची सेवा देणाऱ्या कंपन्या उभ्या राहिल्या. हवेत उडायला विमानालाही हेच चाक लावतो आम्ही आणि मंगळावर रोव्हर फिरवायला ही ! जंगली श्वापदांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गुहेच्या तोंडावर रात्रभर शेकोटी पेटवणारा मानव आता परग्रहावर वस्तीची स्वप्नं सहज पाहू लागलाय. हीच उर्मी तुम्हा आम्हाला २०२० मध्ये जगवून गेली, तगवून गेली.

उद्यमशीलता : हीच आपली खरी ओळख!
स्टार्टअप : हाच आमचा आत्मा. तीच आमची ऊर्जा.
संकटं येतील, जातील...पण आपण प्रगतीच्या, समृद्धीच्या आसमंतात नेहेमीच वर्धिष्णू राहू.
वाढता वाढता वाढे...अशीच ही आपल्या उद्यमी कर्तृत्वाची झळाळी आहे. कोरोनाच्या काळोखात तिनं जग दिपवलं आहे. तिच्याच प्रकाशात २०२१ चं आगमन होत आहे.
( सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक व विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com