भूक

ऐश्वर्य पाटेकर oviaishpate@gmail.com
Sunday, 29 November 2020

पृथ्वीवरचं एक घर. पृथ्वीवरच्याच माय-लेकी; पण घनघोर अभावाच्या जगातल्या. म्हणजे हे जगही पृथ्वीवरचंच! मुलगी शाळकरी वयातली. तिच्या वयातली कुठलीही मुलगी घालू शकेल असे कपडे तिच्या अंगावर. तिची आई फाटक्यातुटक्या कपड्यांतली. घर घरासारखं. त्याचं काय वर्णन करणार? एक मोडकी-तोडकी खाट, जी पृथ्वीवरच्या बऱ्याच घरांत असते. जशी तुमच्या घरी आहे; तशीच माझ्याही घरी आहेच. इथपर्यंतचं वर्णन आपल्या घरातल्यासारखं असलं तरी पुढचं मात्र तसं नाही, हे मी खात्रीनं सांगतो आहे.

न राहवून मी पोस्ट टाकलीच. मोजत राहिलो लाईक्स. हजार...लाख...कोटी...अब्ज...यात तुमचाही एक लाईक आहेच! आपण सारे पृथ्वीवरचे. की तुम्ही त्या अभावातल्या जगातले नाही आहात? त्यानं काय फरक पडतो? 
उच्चभ्रू जग आणि अभावाचं जग असा भेदाभेद मी ही कथा लिहिताना केलाच नाही. कथा वाचण्यासाठी साक्षर असणं ही फक्त पूर्वअट. ती पूर्ण केली की कुणीही ती वाचू शकतं...तुमच्याजवळ आधारकार्ड नसलं तरही...!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

पृथ्वीवरचं एक घर. पृथ्वीवरच्याच माय-लेकी; पण घनघोर अभावाच्या जगातल्या. म्हणजे हे जगही पृथ्वीवरचंच! मुलगी शाळकरी वयातली. तिच्या वयातली कुठलीही मुलगी घालू शकेल असे कपडे तिच्या अंगावर. तिची आई फाटक्यातुटक्या कपड्यांतली. घर घरासारखं. त्याचं काय वर्णन करणार? एक मोडकी-तोडकी खाट, जी पृथ्वीवरच्या बऱ्याच घरांत असते. जशी तुमच्या घरी आहे; तशीच माझ्याही घरी आहेच. इथपर्यंतचं वर्णन आपल्या घरातल्यासारखं असलं तरी पुढचं मात्र तसं नाही, हे मी खात्रीनं सांगतो आहे. मुलगी गेले आठ दिवस उपाशी आहे. तिची आई तिच्या उशाशी बसलीय. मुलीच्या भुकेची चिंता तिला सतावत आहे. तिच्या आईलाही पोट होतंच की...मग तिच्याही भाकरीचं काय? पण मुलीच्या भुकेपुढं तिला तिच्या भुकेचं काहीच वाटत नसावं. लेक मात्र भुकेपुढं हरण्याच्या बेतात.

आजच का जगातल्या सगळ्याच्या सगळ्या भाकरी संपून गेल्यात? त्यांचा खरपूस वासही कुठं तरी विरून गेलाय... शिळ्या भाकरीचा एखादाही कुटका नजरेस पडू नये अशी चोख व्यवस्था केलीय जगानं. 

‘माह्या पोरीला जेवायचंया...ती न्हाई जेवली तं मरून जाईल...ती मेली तं जगाला थोडंच सुताक पडनार हाय? का तिचा  दुखवटा पाळला जानार हाय? खानारं येक त्वांड कमी व्हईन. जगासाठी चांगलीच गोस्ट हाय. तिच्या वाटची भाकर दुसरं कुनीतरी वाटून खाईन...’ असा काही विचार ती आई करत होती का? असा विचार करायलाही तिच्याकडे वेळ कुठं होता? तिला तिच्या पोरीच्या भुकेची चिंता...पण हा विचार मी लेखक म्हणून व्यक्त केला. तिच्या डोक्यात आणखी वेगळंच काही सुरू असेल भुकेसंदर्भात की ती नुसतीच विषण्णतेनं पाहत होती भाकरीशिवाय मरून जाणाऱ्या मुलीकडे?

आई मुलीकडे नुसतंच पाहत होती अन् मुलगी भुकेनं कणकण मरत होती. तापानं फणफणावं तशी अन्नाच्या एका कणासाठी कळवळत होती. अन्नाच्या एका कणानं तिच्या भोवती भुकेचं ब्रह्मांड उभं केलं होतं. ती मुलगी पाहू शकत होती भुकेनं मरणारी माणसं. मुलीनं पाहिलं की भाकरीवरून युद्ध सुरू झालं आहे भुकेच्या ब्रह्मांडात...तिची आईही उतरली होती युद्धात, हे ती मुलगी पाहू शकत होती. म्हणजे तिची आई आता कोणत्याही परिस्थितीत युद्ध जिंकेल व घेऊन येईल भाकरी. तोपर्यंत त्या मुलीला एकच करायचं आहे. जिवंत राहण्याचं युद्ध लढत राहायचं आहे...

मुलीनं मोठ्या प्रयासानं ओठांची हालचाल केली. जणू किती तरी वर्षांपासून तिनं शब्द उच्चारलेलाच नसावा.
‘आई, शाळंला यवढ्या दिस का सुट्टी देत्यात गं हे शाळावालं?’
‘रोजच शाळा घिऊन कसं भागंल पोरी? आन् लोक काय आपल्यासारखी शाळंच्या भाकरीवं आवलंबून न्हाईतं!’
‘सुट्टी नसती तं मिळाली असती नं भाकर!’
‘जास्त नगं बोलू पोरी. भूक आजूकच वाढंल.’
‘आई, मानसाला पोटच् नगं व्हतं...न्हाई का गं?’
‘आसं कसं? मंग तं ही प्रिथ्वी थांबून गेली आसती.’’
‘त्येनं काय झालं आसतं?’
‘दिस-रात झाले नसते.’
‘त्येनं काय फरक पडतो आसा?’
‘आगं, शेतकरी पिकवील कसा मंग?’
‘पिकीवलेलं कुढं आपल्यापत्तूर कुनी पव्हचू देतंय?’
‘आज ना उद्या पव्हचल पोरी! अशी आस न्हाई सोडायची. आस सोडली का जग संपून जातंय. आपल्या पुरतं तरी!’
‘आगं, मिळवीलच मी भाकर. तू फकस्त तुह्या कुडीला धरून जित्तं राहायचा खुटा सोडू नगंस!’
‘आई, जित्तं राहाया भाकर तं लागंतीच नं?’
‘तू भाकरीला इतकं बी म्हत्त्व दिऊ नगंस, न्हाई तं ती तुला आजूकच तरास दिईल.’
‘म्हंजी गं आई?’
‘भाकरीला म्हत्त्व दिऊ नगं, मंग ती आपसूकच यिईल तुह्याकडं. ती तुला येठीला धरंन असं काय बी करू नगं तू!
असा संवादही त्या माय-लेकींमध्ये झाला की नाही ते माहीत नाही. वर्तमानपत्रांतल्या बातमीतून ही घटना मला कळली. तीतून माझं काही अनुमान मी काढलं अन् तुमच्यासमोर ठेवलं. परिस्थिती आणखीही भयानक असू शकते; पण तिचा तपास कोण घेणार? तसं झालं असतं तर मला ही कथा लिहायचं काहीच कारण नव्हतं. वास्तवाला भिडायला खूप ताकद लागते अंगात. लेखक कसा भिडू शकेल? ज्याला त्याला ज्याचं त्याचं जगणं जगायचं आहे. ज्यांनी हे जगणं पाहिलंय तेच भिडू शकतील, जसं सध्या त्या माय-लेकी वास्तवाशी झुंज देत आहेत, तसं. वास्तवाच्या तडाख्यातून सुटण्याचा निकराचा प्रयत्न त्या करत आहेत. त्यात त्या कितपत यशस्वी होतील हे त्या वास्तवालाच ठाऊक!

‘त्ये रेशनवाले म्हन्त्यात का रेशन मिळणार न्हाई. आधार लिंक का काय म्हनत्यात ती न्हाई. न्हाई तं न्हाई. रेशन नगा दिऊ. चार दानं भीक मागितली तं ती बी न्हाई दिली. म्हंजी भीक मागाया बी आधार लिंक करावं लागंल का काय! म्हनं, ‘आधार’ म्हंजी वळख हाय तुमची! मेल्यावं झटक्यात संपून जातं आधार का काय म्हनत्यात ती कार्ड. त्या वळखीचं काय करायचं? आईच्या प्वाटातून घिऊन आलोया का ती कार्ड? मानसाला मानूस म्हून वळख दाखवत न्हाईत आन् मंग आमच्यासारख्यांनी काय करायचं जगन्याचं? कुनालाच कसा सुगावा लागंना माह्या पोरीच्या भुकंचा? आम्ही काय प्रिथ्वीबाह्यार ऱ्हातोय का काय? आम्हाला वाटलं का आम्ही मानसांतच ऱ्हातोय! कुढं गेली ती समदी शहानीसुरती मानसं? का कुनी डाव रचून अशा मानसान्लाच प्रिथ्वीवरून हुसकावून लावलंया?....’ असा काही विचार ती आई करत होती का? तेही मला काही सांगता यायचं नाही. भुकेनं मरणाऱ्या पोरीकडे ती पाहत होती फक्त...

म्हणजे ती आई भाकरीवाचून मरणाऱ्या पोरीजवळ नुसतीच बसून राहिली होती असं नाही! तिनं खूप प्रयत्न केले. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतची जमीन तिनं पायाखाली पालथी घातली. पृथ्वीला गरका मारून आली ती आई. तरी हताश न होता तिनं उंदराचं बीळ उकरलं; पण त्यातही एक दाणा सापडू नये! उंदारांना बिळात दाणे घेऊन जाण्यासाठी जगाकडे दोन दाणेही शिल्लक नव्हते म्हणे! त्यात काय आश्चर्य! जग अठराविश्वांचं दरिद्री! त्या दरिद्री जगात एक शाळकरी मुलगी भाकरीसाठी अडून बसली होती अन् तिच्या आईच्या पदराच्या झोळीत एकही भाकर कुणी टाकत नव्हतं. तुम्हाला असं वाटू शकतं की ही गोष्ट आपल्या जगातली नाहीच, ही तर अद्भुत कथा आहे...असा भाकरीशिवाय माणूस कधी मरू शकतो? हे काही खरं वाटत नाही! म्हणजे, दुसऱ्या जगातल्याच या माय-लेकी असल्या पाहिजेत. कारण, त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्या मेल्या. नंतर त्यांची तशीही नोंद होऊ शकली नाही!

खूप मोठी गर्दी त्यांच्या घराजवळ जमा झाली होती. ते सारेच आधारकार्डधारक होते; पण त्यांच्यातल्या कुणाचंच आधारकार्ड त्या माय-लेकींसाठी उपयोगाचं नव्हतं. ज्या इतरांच्या कामी येऊ नयेत, अशा गोष्टी का निर्माण केल्या जात असाव्यात? मग हे लोक कशासाठी जमले असतील? बरं, कुणाच्याच हातात भाकरी नाही किंवा त्या मुलीला वाचवायची त्यांची इच्छा असावी असं म्हणायला वाव नाही. लोक मरणाऱ्या मुलीचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यानं घेत होते. काय करतील लोक त्या पोरीचे फोटो घेऊन? फेसबुकवर पोस्ट टाकण्यासाठी त्या फोटोंचा उपयोग होऊ शकतो! फेसबुक आल्यामुळे आता जगातली कुठलीच गोष्ट वाया जात नाही! निर्घृण, कोरडी संवेदनशीलता आळवता येईल पोस्ट टाकून!

तरीही प्रश्न उरतोच आधार लिंक न झालेल्या रेशनकार्डाचा! शेवटी मुलगी मरतेच. ती किती वेळ तग धरू शकणार होती? लोकांनी मोबाईलमध्ये फोटो घेतलेच...मेलेल्या मुलीचा निश्र्चेष्ट चेहरा अन् आईचा करुण आकांत. काळजात कळ उमटली. मोबाईल तातडीनं घेऊन पोहोचणारी ही माणसं. कदाचित त्यांच्याही घरात भाकरी नसावी. असती तर आणली नसती का?

याआधी मी असा संवाद मांडला माय-लेकींचा...
‘आई, पुस्तकातलं धडं वाचलं म्या; पर त्येंच्यात बी भाकर न्हवती. कविता वाचल्या; पाठ बी केल्या. त्यांत बी भाकर न्हवती. गनितात बी न्हाई आन् भूगोलात बी न्हाई.’
‘त्यात कशी आसंल पोरी?’
‘मग कुढं आसंल भाकर?’
‘आधारकार्डात!’
‘तेच तं न्हाई नं आपल्याकं!’
‘मंग दुसऱ्याचं मागून आनायचं नं आई, थोड्या दिसांसाठी! माही शाळा भरली आसती तं मला भाकर मिळाली आसती आन् आपन आधारकार्ड बी परत केलं आसतं ज्येचं त्येला.’
‘दुसऱ्याचं न्हाई चालत, पोरी!’
‘मंग काय उपेग त्येचा?’
अर्थात मी मांडलेला हा संवाद पूर्णतः काल्पनिक आहे. माणसानं माणसाच्या भावना काल्पनिक करून टाकल्या अन् तो ‘कल्पना...कल्पना’ असं खेळत बसला. भुकेल्या पोटानं कुठं असा वास्तव संवाद करता येईल का? की वास्तवाचीच कल्पना करुन टाकलीय माणसानं?

फेसबुक पोस्टला लाईक न करता मी लिहू पाहिली त्या बातमीमागची ही कथा. तसा मीही गुन्हेगार आहेच. जग ऑनलाईन होऊनही, मीही त्या मुलीसाठी साधी एक भाकरी सेंड करू शकलो नाही...! आणि मी ही कथा तुम्हाला सांगितली. ती अशीच घडली की काय? मला नाही माहीत! एवढं मात्र खरं आहे की, ते पृथ्वीवरचं एक घर होतं अन्  पृथ्वीवरच्याच त्या माय-लेकी होत्या. जी मुलगी भाकरीशिवाय मरून गेली ती पृथ्वीवरचीच होती. ते जग घनघोर अभावाचं होतं; पण पृथ्वीवरचंच!

न राहवून मी पोस्ट टाकलीच. मोजत राहिलो लाईक्स. हजार...लाख...कोटी...अब्ज...यात तुमचाही एक लाईक आहेच! आपण सारे पृथ्वीवरचे. की तुम्ही त्या अभावातल्या जगातले नाही आहात? त्यानं काय फरक पडतो? 
उच्चभ्रू जग आणि अभावाचं जग असा भेदाभेद मी ही कथा लिहिताना केलाच नाही. कथा वाचण्यासाठी साक्षर असणं ही फक्त पूर्वअट. ती पूर्ण केली की कुणीही ती वाचू शकतं...तुमच्याजवळ आधारकार्ड नसलं तरही...!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aishwary Patekar Write Article on Appetite