‘सुराज्य’कर्ते द्रष्टे प्रशासक

‘स्वराज्यकर्ते’ छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या सर्वमान्य पैलूबद्दल आजपर्यंत खूप लिहिले व बोलले गेले आहे ते योग्यच आहे; पण आपल्या भविष्यासाठी त्यांचे ‘सुराज्यकर्ते’ हे रूपही अतिशय महत्त्वाचे आहे.
chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajsakal
Updated on
Summary

‘स्वराज्यकर्ते’ छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या सर्वमान्य पैलूबद्दल आजपर्यंत खूप लिहिले व बोलले गेले आहे ते योग्यच आहे; पण आपल्या भविष्यासाठी त्यांचे ‘सुराज्यकर्ते’ हे रूपही अतिशय महत्त्वाचे आहे.

- अजित आपटे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘स्वराज्यकर्ते’ या पैलूबरोबरच आणखी एक रूप अतिशय महत्त्वाचे आहे ते ‘सुराज्यकर्ते’ म्हणून. शिवाजी महाराजांसारखे लोकोत्तर नेते आपल्या कर्तव्याचा, जबाबदारीचा आणि राज्याशी संबंधित प्रत्येक प्रश्‍नाचा, घटनेचा किती बारकाईने व सम्यक विचार करतात ते पाहून थक्क व्हायला होते. प्रशासनासंबंधी विलक्षण द्रष्टेपण या शिवरायांच्या पैलूबाबत ऊहापोह...

‘स्वराज्यकर्ते’ छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या सर्वमान्य पैलूबद्दल आजपर्यंत खूप लिहिले व बोलले गेले आहे ते योग्यच आहे; पण आपल्या भविष्यासाठी त्यांचे ‘सुराज्यकर्ते’ हे रूपही अतिशय महत्त्वाचे आहे. ख्यातनाम बंगाली इतिहासकार (कै.) सुरेंद्रनाथ सेन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी असे म्हटले होते, ‘Shivaji''s greatness as a military leader has never been contested, but his greatness as a civil administrator is perhaps still more undoubted.’ याच सुरेंद्रनाथ सेन यांनी, ‘Military systems of Marathas,’ ‘Administrative systems of the Marathas’ आणि ‘The Judicial systems of Marathas’ अशी तीन पुस्तके लिहावीत हा त्यामुळेच योगायोग नाही. शिवाजी महाराजांसारखे लोकोत्तर नेते आपल्या कर्तव्याचा, जबाबदारीचा आणि राज्याशी संबंधित प्रत्येक प्रश्‍नाचा, घटनेचा किती बारकाईने व सम्यक विचार करतात ते पाहून थक्क होणेच आपल्या हातात राहते. असो.

‘सुराज्य’ अवलंबून असते चांगल्या मुलकी प्रशासनावर; लष्करी बळावर नाही! या संदर्भात महाराजांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती काय व कशी होती ते पाहू. महाराजांनंतर सर्वांत प्रभावी कार्यकारी मंडळ होते ते अष्टप्रधान मंडळ. या अष्टप्रधानांमध्ये आठपैकी सात होते मुलकी प्रशासनाशी संबंधित आणि फक्त एक लष्करी बाण्याचे प्रधान होते ते म्हणजे सरनौबत किंवा सरसेनापती! तसेच सर्वांत महत्त्वाचे (First among equals) होते ते मुलकी प्रशासनाचे प्रमुख पेशवा ‘पंतप्रधान.’ त्यांनाच सर्वांत जास्त वार्षिक वेतन होते (१५,००० होन) आणि सेनापतींचे वार्षिक वेतन होते (१२,००० होन). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळप्रसंगी पेशव्यांना युद्धप्रसंग करण्यास परवानगी होती; पण सेनापतींना मुलकी सेवेचे काम छत्रपतींची विशेष आज्ञा असल्याशिवाय करण्यास सक्त मनाई होती.

अंतिम ध्यास ‘सुराज्या’चाच

महाराजांनी लष्करी शक्तीनेच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘स्वराज्य’ निर्माण केले होते. लष्करी ताकद, लष्करी डावपेच, शौर्य, धैर्य, चातुर्य हे त्यांचे आयुष्यभर जिव्हाळ्याचे व जबाबदारीचे विषय होते. त्यांची भरपूर उदाहरणे आपल्याला दिसतात; पण त्यांचे अंतिम ध्येय होते ‘सुराज्य!’ या सुराज्याची पहिली आवश्‍यक गरज म्हणूनच त्यांनी ‘स्वराज्य’निर्मिती केली; पण त्याचबरोबर त्यांची सततची गरज आणि ध्यास होता ‘सुराज्याचा!’ सुराज्यामुळेच लोकसुख निर्माण होईल व तेच आपले अंतिम लक्ष्य असले पाहिजे हे ते जाणून होते. त्यामुळेच ते आपल्या आज्ञेत म्हणतात, ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. नाही तर लोक बोलतील, की हे कसले स्वराज्य? यापेक्षा मोगल बरे.’ त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची सुमारे सात वर्षे लढायांची पूर्वतयारी, प्रत्यक्ष लढाया, त्यानंतरचे त्यांचे परिणाम निस्तरणे यात गेली; पण त्याच्यापेक्षा जवळजवळ चौपटीने (२८ वर्षे) त्यांनी दिली व्यवस्था निर्माण व त्यांची बळकटी करण्यासाठी!

आजही एकविसाव्या शतकात System Management वरच सर्व बड्या देशी-विदेशी कंपन्या व प्रागतिक सरकारे भर देताना दिसतात. हेच उद्दिष्ट ३५० वर्षांपूर्वीच्या मध्ययुगीन, सरंजामशाही काळात महाराज एका विवक्षित आग्रहीपणामुळे करीत होते हेच त्यांचे अलौकिक द्रष्टेपण! त्यामुळेच त्यांचा जास्तीत जास्त भर कार्यक्षम, लोकाभिमुख मुलकी प्रशासनावर होता.

त्याचा प्रत्यय आपल्या दैनंदिन जगण्यात आजही येतो. पुण्यासारख्या तुलनेने जास्त आधुनिक, जागरुक नागरिकांनासुद्धा नगरसेवक, महापौर, आयुक्त अशा मुलकी व्यवस्थेतल्या व्यक्तींची, अधिकाऱ्यांची बहुधा माहिती असते; पण त्याच पुण्यात असलेल्या भारतीय लष्कराच्या सेवेतील सर्वांत मोठ्या कमांडचा म्हणजेच सदर्न कमांडचा मुख्याधिकारी कोण हे क्वचितच माहीत असते. कारण रोजच्या सुखाशी, आनंदाशी मुलकी प्रशासनाचाच संबंध असतो; पण लष्कराचा नसतो. युद्धप्रसंग सोडले तर लष्कराने बराकीतच राहिले पाहिजे आणि त्यांच्यावर मुलकी व्यवस्थेचेच नियंत्रण असले पाहिजे या अत्याधुनिक दृष्टिकोनाचा स्वीकार त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केला होता हे आश्‍चर्यकारक; पण पूर्ण सत्य होते.

राज्याविषयीच्या मनोवस्थेत बदल

आपल्याला केवळ एखादी राजवट बदलायची नसून, त्यातील सर्वसामान्य लोकांची राज्याविषयीची मनोवस्थाच बदलायची आहे हे त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या गावीही नसे. मात्र, स्वतःबरोबरच सर्व समाजात ही जाणीव निर्माण करणे आणि वाढवणे हे अवजड शिवधनुष्य पेलण्याचा; मध्ययुगात मराठी जनमानसात रुजवण्याचा बिनीचा मान महाराजांनाच जातो.

प्रतिभावान (केवळ लढाऊ/ आक्रमक नव्हे) राज्यकर्ता कसा असतो आणि त्याचे प्रजाजन कसे प्रागतिक असतात याची असंख्य उदाहरणे मराठ्यांच्या इतिहासात विखुरली आहेत. त्यामुळेच सतरावे व अठरावे ही दोन शतके भारताच्या इतिहासात ‘मराठ्यांची शतके’ म्हणून ओळखली जातात आणि त्यामुळेच शिवकाल हा ‘सामान्य माणसांनी निर्माण केलेला असामान्य इतिहास’ म्हणून ओळखला जातो. क्षात्रतेज, असामान्य प्रशासकीय कौशल्य आणि सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त सहयोग यामुळेच अजरामर झाला आहे हा ‘शिवकाल!’ केवळ ‘शककर्ते’ नव्हे, तर ‘शतककर्ते’ असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यामुळेच मानाचा मुजरा!

कालातीत प्रशासक

  • ‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची (डोंगराच्या मध्यभागावरची) झाडी, ते झाडी प्रत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडो न द्यावी. बलकुबळीस (धोक्याच्या, आणीबाणीच्या प्रसंगी) या झाडीमध्ये हशम, बंदुके घालावे,’ असे महाराजांनी सांगितले होते.

  • ‘केर तटाखाली न टाकिता जागा जागा जालोन ते राखही परसदार टाकोन घरोघर होतील ते भाजीपाले करावे, (राख म्हणजे पोटॅश- जे खतासारखे उपयोगी पडते), असे सांगणारे शिवाजी महाराज यांनी पर्यावरणाबाबतचाही द्रष्टेपणा दाखवला होता.

  • सर्व जाती, जमाती, धर्माच्या लोकांचा राज्यकारभारात समावेश असे. त्यांना नोकरीवर ठेवताना एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल, अशी व्यवस्था केलेली असे. एका किल्ल्यावर एका घरातले भाऊबंद किंवा टापूच्या प्रदेशातले लोक नेमत नसत. त्यामुळे एका जातीचे अथवा घराचे वर्चस्व निर्माण होत नसे.

(लेखक छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक असून, ‘श्रीशिवराय आयएएस?’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com