अनमोल साहित्याचा वैचारिक ठेवा...

‘अक्षरधन’ हा बृहद्ग्रंथ पुण्यातल्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेतर्फे नुकताच प्रकाशित झाला. ग्रंथाचं संपादन व्यासंगी समीक्षक, कवयित्री डॉ.‘नीलिमा गुंडी’ यांनी केलंय.
akshardhan book
akshardhan booksakal

- दीपाली दातार, deepali.poem@gmail.com

‘अक्षरधन’ हा बृहद्ग्रंथ पुण्यातल्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेतर्फे नुकताच प्रकाशित झाला. ग्रंथाचं संपादन व्यासंगी समीक्षक, कवयित्री डॉ.‘नीलिमा गुंडी’ यांनी केलंय. मराठी भाषा आणि वाङ्‍मयाच्या संदर्भात लेखक-वाचकाची अभिरुची वाढवणाऱ्या परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्‍मय नियतकालिकाच्या विसाव्या शतकातील अंकांमधल्या निवडक लेखांचा अनमोल वैचारिक ठेवा यायोगे वाचकांकरता खुला झाला आहे.

या ग्रंथात सात विभागांत ८१ लेख समाविष्ट आहेत. पत्रिकेच्या संपादकांचं धोरण, वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक, पत्रिकेतील लेखनाचं स्वरूप, सदरं, वाचकांचा प्रतिसाद, कालोचित झालेले बदल यांचा वेध घेणारी विस्तृत प्रस्तावना आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अभ्यासपूर्ण प्रस्तावना डॉ. नीलिमा गुंडी यांनी लिहिली असल्यानं आकलनाच्या दृष्टीने वाचकाची मोठीच सोय झाली आहे.

संस्थेची उद्दिष्टं, पत्रिकेचं स्वरूप, उदार आणि सर्वसमावेशक धोरण सांभाळत पत्रिकेच्या प्रतिष्ठेत मोलाची भर घालणाऱ्या ना. गो. चापेकर, द. वा. पोतदार, स. गं. मालशे, यांसारख्या अनेक मान्यवर संपादकांचं कार्य यावर प्रकाश टाकणारा पहिला विभाग. यातून पत्रिकेचं वाङ्‍मयीन योगदान समजण्यास मदत होते.

रा. भि. जोशींचा ‘देशभाषांचा उच्च अभ्यासक्रमात समावेश’, साहित्यसंमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणांचा दु. का. संत यांनी सूत्ररूपाने घेतलेला आढावा आणि यासारखे अनेक उद्बोधक लेख, भाषासंवर्धनाचं कार्य करणार्‍या, तद्विषयक धोरण ठरवणाऱ्या मंडळींना दिशा दाखवणारे आहेत.

सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटकांमधून निर्मिती आणि विकास होत असतो. त्यातूनच आकार घेणार्‍या वाङ्‍मयीन पर्यावरणातील बदलाला गती देताना लवचीक धोरण ठेवत काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि चळवळींचे स्थान अधोरेखित करणारे लेख तसेच कलाकृती व तिचा भवताल यातील संबंधांचं भान देणारे लेख दुसर्‍या विभागात आहेत.

वि. म. महाजनी यांच्या मराठी वाङ्‍मयावरील लेखातून आलेलं स्वराष्ट्र, स्वभाषा यांविषयीचं लक्षणीय विचार आजही लागू पडणारे आहेत. वि. वा. शिरवाडकरांचा ‘साहित्यातील आग्रह आणि दुराग्रह’, निरफराके यांचा ‘प्रतिभाशक्ती’, नेमाड्यांचा ‘साहित्यातील देशीयता’ हे लेख तसेच के. ना. काळेंचा ‘नाट्य-साहित्य’ हा दोन कलांचा तात्त्विक अंगाने विचार करणारा लेख, ‘ज्ञानपीठ पुरस्कार आणि मराठी साहित्य’ एकाहून एक दमदार विषय घेऊन हा विभाग सजला आहे.

व्याकरण, कोश, व्युत्पत्ती, छंदशास्त्र या तिसर्‍या विभागातील गो. कृ. मोडक यांचे व्याकरणातील वादविषयांवरचे लेख भाषेच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत. स्वभाषा मराठी नसताना ‘रूपसिंह सुंदरसिंह’ या गृहस्थाने उर्दू-मराठी कोश तयार करताना एकेका शब्दासाठी खर्ची घातलेले प्रहर, प्रमाण भाषा आणि बोल भाषा यासंदर्भातला रा. श्री. जोगांचा लेख, वि. का. राजवाडे यांचे भाषाशास्त्रविषयक कार्य, ‘स्त्रियांची भाषा’सारखा वेगळा लेख, संपूर्ण विभाग वाचनीय आहे.

‘व्यक्तिवेध’ या विभागात लेखक, पत्रकार, संपादक, समाज सुधारक यांच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन घडवणारे, मूल्यमापन करणारे लेख आहेत. यातील गं. बा. सरदार यांचा म. जोतिबा फुले यांच्यावरील लेख तत्कालीन सामाजिक, राजकीय वास्तवाची मीमांसा करणारा असल्याने महत्त्वाचा आहे. पुस्तक परीक्षणं हे पत्रिकेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य.

केशवसुत, मर्ढेकर यांच्या कविता, इरावती कर्वे यांचे ‘युगान्त’, ‘अजान’सारखा मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारा कवितासंग्रह यांवरील परीक्षणं, अनुवादित कलाकृतींच्या गुणमर्यादा दाखवणारं धर्मानंद कोसंबी यांचं परीक्षण, असे वैविध्यपूर्ण लेख ‘परीक्षण’ विभागात निवडले आहेत.

परीक्षणं लिहिताना परखड, चिकित्सक दृष्टिकोन तथा विधायक भूमिका ठेवत, कलाकृतीचे मर्म जाणून घेत रसग्रहण करावं याचा आदर्श वस्तुपाठ देणारे हे लेख.

‘साहित्यविश्वाचे कवडसे’ हा विभाग वाचकाच्या मनावर अधिक प्रभाव टाकणारा आहे. लेखकांची मनोगतं, आस्वादप्रक्रिया, निर्मितीप्रक्रिया, वाङ्मयीन विचारवादळं, जुन्या-नव्या कलाकृतींच्या संदर्भातली चर्चा यामध्ये आलेली आहे. ना. सी. फडके यांचे नाटकाविषयीचे व्याखान वाचताना वाचकाला जाणीव होते, की दोन कलाकृतींमधील तौलनिक अभ्यास श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी नाही तर त्यांच्यातील सामर्थ्य आणि मर्यादा सूक्ष्मपणे जाणून घेण्यासाठी करायचा असतो. ‘लघुनिबंध’ या साहित्यप्रकाराच्या मुक्ततेची रम्य कहाणी मांडणारा लेख, ‘कथा’ या साहित्यप्रकाराची वाङ्मयीन व सामाजिक अंगाने कमल देसाई यांनी केलेली चिकित्सा, दलित साहित्य प्रवाहाच्या वळणावाटांची वेध घेणारी दया पवारांची मुलाखत वाचताना वाचक प्रगल्भ होत जातो.

‘परभाषा व साहित्यविश्व : व्यापक भान’ या शेवटच्या विभागातून इतर भाषांच्या तुलनेत मराठी साहित्यविश्वाची बलस्थानं, मर्यादा समजण्यास मदत होते. परभाषेतील अनेक अपरिचित विषयांचेही आकलन होते; जसे, की शेक्सपीयरचे ‘विंटर्स टेल’ हे नाटक, कन्नड दलित साहित्य, रवींद्रनाथ टागोर आणि शरच्चंद्र बाबू या प्रतिभावान लेखकांमधले नातेसंबंध वगैरे. या ग्रंथात, सुरुवातीच्या काळात पत्रिकेत संपादकांचे नाव छापलेले नसायचे, भगवद्गीतेवर जितकी छंदोमय भाष्ये मराठीत आहेत तितकी बहुदा दुसर्‍या कोणत्याही भारतीय भाषेत नसावीत, असं काही अनपेक्षित, रंजक, सुखावह संदर्भही वाचायला मिळतात.

पत्रिकेत प्रसिद्ध झालेले लेखनशैलीचे विविध घाट, विषयांची व्याप्ती आणि खोली पाहता संपादनाचे काम किती कठीण आहे हे लक्षात येते. सर्व साहित्यप्रकारांचे, वैचारिकतेचे समग्र दर्शन वाचकांना व्हावे यासाठी आधुनिक साहित्याला वाव देण्याची मर्यादा घालून, योग्य लेखांची निवड करीत विसाव्या शतकाचा उत्तम आलेख प्रस्तुत करण्याचं आव्हान डॉ. गुंडी यांनी समर्थपणे पेलेले आहे.

विसाव्या शतकातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक स्थित्यंतराचे सखोल दर्शन घडवणारा, मराठी साहित्य परंपरेचे अर्क साठवून ठेवणारा हा ग्रंथ चोखंदळ वाचकांना, अभ्यासकांना आणि साहित्यिकांना मर्मदृष्टी देणारा, संशोधनाच्या नव्या वाटा दाखवणारा आहे. लेखांचा कालनिर्देश, तळ-टिपा, संपादकीय-टिपा या गोष्टींनी ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. भाषा आणि वाङ्मयाविषयीची वेगळी दृष्टी देणारा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमींच्या, अभ्यासकांच्या संग्रही असायलाच हवा.

पुस्तकाचं नाव : अक्षरधन - निवडक ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ विसावे शतक

संपादक : डॉ. नीलिमा गुंडी

प्रकाशक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. (०२० - २४४७५९६३, ९८२३०६८२९२)

पृष्ठं : १०५६

मूल्य : १५०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com