सिनेमातला अवकाश

सिनेमातला अवकाश

कोणत्याही सिनेमाला दोन मिती असतात. एक स्थळाची आणि एक काळाची. ‘स्थलपुराण’ या माझ्या सिनेमाची मांडणी करताना, आपल्याला कोणत्याही एका जागेची गोष्ट सांगता येते का? प्रत्येक जागेची स्वतःची अशी एक गोष्ट असते का? त्या त्या जागेवरून आपण ते स्थळ, तो अवकाश कॅमेराबद्ध करू शकतो का? या मुद्द्यांची चाचपणी करता असताना, प्रत्येक लोकेशन शोधत असताना सातत्यानं एक विचार मनात येत होता व तो म्हणजे, आपल्याला समोर दिसत असलेली जागा आपण कशा पद्धतीनं कॅमेराबद्ध करू शकतो? वास्तव म्हणजे तर जे आपल्याला दिसतं आहे, जे 

आपल्यासमोर आहे, आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलं, ऐकलं जातं आहे ते; पण त्याही पलीकडे अवकाशातल्या अपरिमित दृश्य-अदृश्य अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला एवढ्याशा कॅमेऱ्याच्या चिमुकल्या अवकाशात बद्ध करून काहीतरी निर्माण करायचं आहे. आणि या सगळ्याची जाणीव माझ्यातला दिग्दर्शकाला अधिकाधिक असमाधानी करत नेत असते.  

हेही वाचा : कालातीत सिनेमा

आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे वास्तव दिसत असतं, त्या वास्तवाच्या आपल्या नजरेच्या पलीकडे अनेक मिती, अनेक पदर असतात. ज्या एकतर जाणवतात किंवा जाणवल्यासारख्या वाटत राहतात. त्या सर्व मिती कॅमेराबद्ध करण्याची हातोटी आत्मसात करता यायला हवी. आणि ती आपापल्या मगदुराप्रमाणे आपल्या सिनेमात करून पाहता यायला हवी. हा अट्टहास, ही प्रेरणा, ही ऊर्मी, ही उमेद, सिनेमा करू पाहणाऱ्या प्रत्येकाला बाळगता आली पाहिजे ही जाणीव मनोमन  वाढत जाते. सिनेमा नेमकं काय करत असतो? तर सिनेमा जागा दाखवत असतो आणि माणसं बघत असतो. माणसं आणि जागा यांच्यामधला जो अनंत पसरलेला अवकाश आहे तो अवकाश कॅमेऱ्याच्या चौकटीत साठवून ठेवण्यासाठी जगभरचे दिग्दर्शक आपली हयात खर्च करत आले आहेत. त्याच साखळीतली एक छोटीशी कडी, छोटासा दुवा या नात्यानं दिग्दर्शक म्हणून मी सिनेमाच्या अवकाशाच्या अनेक मिती इवल्याशा चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो. 

सिनेमा करणारा कुठलाही दिग्दर्शक सिनेमा का करत असतो? तर त्यानं अनुभवलेला अनुभव, मग तो अनुभव एखाद्या घटनेचा असेल, एखाद्या जागेवर गेल्यावर तिथल्या अनोख्या वातावरणामुळे त्या जागेचा तयार झालेला वेगळा समग्र अनुभव असेल, आयुष्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग असेल किंवा आपल्या बालपणी घडून गेलेली एखादी घटना असेल, या सर्व घटनांच्या माध्यमातून एखाद्या फिल्ममेकरला सिनेमा करावासा वाटतो. मग त्या सिनेमासाठी पटकथा लिहिणं, शूटिंगसाठी अनुकूल जागा शोधणं,  शूटिंग ते पूर्ण पोस्ट-प्रॉडक्शनची किचकट प्रक्रिया पार पाडणं...अशा अनेक गुंतागुंतीच्या मानवी व्यवहारांनी भरलेल्या टप्प्यांमधून जात, एका विचारातून सुरू झालेला सिनेमा, अनेक लोकांच्या साह्यानं तयार करून शेवटी तो अनेक लोकांपर्यंत न्यायचा असतो, शेअर करायचा असतो. म्हणजे सिनेमा हा एकापासून अनेकांपर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे. सिनेमा समजायला जितका सोपा तितकाच तो व्यक्त करायला अवघड. कारण, सिनेमा हा सिनेमाच्याच माध्यमातून अनुभवला जाऊ शकतो. सिनेमातून केवळ एखादी गोष्ट सांगण्याऐवजी त्यातल्या दृक्-श्राव्याच्या सोबतीनं खूप काही  मांडलं जाऊ शकतं. 

गोष्ट सांगण्याच्या पलीकडे सिनेमा स्वतःची अशी विलक्षण ताकद बाळगून असतो. गोष्ट सांगणं हे काम सिनेमा करतच असतो; पण त्याबरोबरच सिनेमा एक असं विश्व निर्माण करतो, एक असा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, जो शब्दांत व्यक्त केला जाऊ शकत नाही. तो शब्दातीत अनुभव ‘शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु’ असा साकार होत आपल्यापर्यंत पोहोचतो. याचं एखादं उदाहरण द्यायचं झालं, तर सत्यजित राय यांच्या ‘अपूर संसार’चं देता येईल. 

या चित्रपटात एके ठिकाणी त्यातल्या नायक द्विधा मनोवस्थेत असतो. लग्न या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या निर्णयाला अचानक सामोरं जाण्याची  वेळ त्याच्यावर येते. त्या वेळी, तो प्रसंग कोणत्या पार्श्वभूमीवर चित्रित करायचा याचा पेच राय यांनी अगदी सहजपणे सोडवल्याचं दिसतं. त्यांनी चित्रपटातल्या नायकाशी लग्नाविषयी बोलायला येणाऱ्या लोकांच्या मध्ये आणि नायकाच्या मध्ये एक उभं झाड दाखवलं आहे. विभागणाऱ्या दोन बाजू, दोन मतांची समोरासमोर भेट...

यातून नकळतणे, पडद्यावर सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकाला, आपण नायकाची द्विधा मनोवस्था पाहतो आहोत याचं भानही येतं; पण ती भावना नेमकी कोणत्या कोणत्या घटकांनी गडद होतेय हे स्पष्टपणे सांगताही येत नाही. म्हणजेच सिनेमा मुळात काहीतरी ऐकवण्यासाठी आणि काहीतरी दाखवण्यासाठी केला जातो. शब्दातीत अनुभव उभा करणारं असं हे बलाढ्य माध्यम आहे. 

सिनेमाचा अवकाश चिमटीत पकडू इच्छिणारे अनेक कलावंत जगभरात आजतागायत होऊन गेलेले आहेत. सिनेमाच्या सुरुवातीच्याच टप्प्यावर असा एक महान कलावंत होऊन गेला, ज्यानं सिनेमाची भाषा, त्याचा अवकाश अशा काही विलक्षण रीतीनं बद्ध-बंदिस्त केला की आजही आपण त्यानं उभ्या केलेल्या चित्रकृती पाहताना स्तिमित होऊन जातो. सिनेमा ही जर वैश्विक भाषा असेल आणि त्या भाषेला कोणत्याही संस्कृतीची, भौगोलिकतेची बंधनं नसतील तर त्या भाषेतला सर्वात अजरामर ग्रंथ लिहिणारा कलावंत म्हणजे चार्ली चॅप्लिन! 
(उर्वरित भाग पुढच्या आठवड्यात)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com