ज्याचा त्याचा अर्थ

अक्षय इंडीकर akshayindikar1@gmail.com
Sunday, 31 January 2021

मोन्ताज
सिनेमानिर्मितीत एखाद्या दिग्दर्शकाच्या, लेखकाच्या, निर्मात्याच्या मनात एखादी कल्पना येते, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो टीम जमवतो. त्या कल्पनेचा सिनेमा तयार करण्यासाठी, त्याला त्याची कलाकृती हवी तशी निर्माण करण्यासाठी, त्याला त्या प्रक्रियेतला प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह क्रायसिस पार पाडावा लागतो.

सिनेमानिर्मितीत एखाद्या दिग्दर्शकाच्या, लेखकाच्या, निर्मात्याच्या मनात एखादी कल्पना येते, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो टीम जमवतो. त्या कल्पनेचा सिनेमा तयार करण्यासाठी, त्याला त्याची कलाकृती हवी तशी निर्माण करण्यासाठी, त्याला त्या प्रक्रियेतला प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह क्रायसिस पार पाडावा लागतो. सिनेमा/फिल्म लिहीत असताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो; त्यात मग काळाची गफलत, सुरुवात-मध्य-शेवट, कसं लिहावं हे न सुचणं, मांडणी लक्षात न येणं, भावनेच्या ओघात मूळ मुद्द्यापासून कुठंतरी कथानक भरकटत जाणं अशा प्रकारच्या अनेक अडचणी येत असतात. सिनेमाची मांडणी करत असताना हे सगळं ध्यानात ठेवून सबंध कलाकृतीची रचना, विटेवर वीट रचत जावी त्याप्रमाणे करत जावी लागते, मग त्यातून एक स्ट्रक्चर उभं राहत जातं. स्ट्रक्चर उभं करत नेण्याची प्रक्रिया, त्या प्रक्रियेत सिनेमाची भाषा अत्यंत मोलाची भूमिका बजावत राहते. आपल्याला गोष्ट सांगायची आहे किंवा सिनेमातून अनुभव व्यक्त करायचा आहे, तो नेमका कसा सांगायचा आहे त्या सांगण्याला ‘सिनेमाची भाषा’ असं म्हणतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिनेमा काय करतो? सिनेमा माणसं आणि जागा पाहतो. मग तो जगातला कोणताही सिनेमा असो. जर तुम्हाला सर्वार्थानं माणसं पाहता येत असतील आणि भवतालची जागा तुमच्या दृष्टीनं पाहता येत असेल तर तुम्ही सिनेमा करू शकता. ‘टाइम ट्रॅव्हल’ ही सिनेमाशी निगडित आणि सिनेमाच्या महत्त्वाच्या बलस्थानांपैकी एक अशी संकल्पना आहे. तीत एका शॉटमध्ये तुम्ही पंधरा मिनिटं किंवा पंधरा वर्षं...कितीही ट्रॅव्हल करू शकता. काळात आणि स्थळात वावर करण्याची सिनेमाची अफाट ताकद जगभरातल्या दिग्दर्शकांना सिनेमाच्या भाषेत वेगवेगळे प्रयोग करत असताना लक्षात येत गेली. अगदी छोटं आणि सर्वांना परिचित असलेलं उदाहरण द्यायचं तर ‘दो आँखे, बारह हाथ’ मधलं व्ही. शांताराम यांनी वापरलेलं दृश्यभाषेचं तंत्र. तुरुंगातल्या बदलत जाणाऱ्या सावल्या कथानकाच्या काळाची मांडणी समोर तर उभी करतातच; पण त्याबरोबरच हातात न येणारा एक अदृश्य काळही आपल्या समोर उलगडत नेतात. कलाकृतींमधला अर्थ तुम्हाला किती समजला यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्या कलाकृतींमधल्या अर्थांचे वयानुसार वेगवेगळे टप्पे होतात आणि त्यानुसार अर्थही बदलत जातात. हे अर्थ ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. म्हणूनच असंही म्हटलं जातं, की सिनेमा ही अत्यंत ‘पर्सनल’ गोष्ट असते. सिनेमा समजणं खूप सोपं आहे; पण तो सांगणं हे खूप अवघड असतं. कारण, ते त्याच्याच माध्यमातून व्यक्त होऊ शकतं. सिनेमा समजणं हेसुद्धा अनुभवावर अवलंबून आहे. सिनेमाचे वेगवेगळे पदर तुमच्या मन:स्थितीनुसार, राजकीय-सामाजिक आकलनानुसार उलगडत जातात.

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्या पद्धतीनं आपण वाचन शिकतो त्यासारखीच ही गोष्ट आहे. त्यासाठी सिनेमा - वेगवेगळा सिनेमा - पाहणं महत्त्वाचं आहे. संगीतात ज्या पद्धतीनं ‘रागातल्या’ जागा लक्षात येतात, कवितेमधली शब्दांची मांडणी लक्षात येते त्याच पद्धतीनं सिनेमाही पाहून पाहून वाचता यायला लागतो. सिनेमा हा दृश्यमाध्यमाची ताकद, आवाजाची ताकद, तो काळ, प्रदेश, देश या बाबी व्यक्तिगत आकलनानुसार रिप्रेझेंट करत असतो. ज्याप्रमाणे दोन ओळींच्या मधली जागा वाचता यावी लागते, त्याचप्रमाणे सिनेमाच्या दोन शॉटच्या मधला सायलेन्स, त्या दोन शॉटच्या एकत्रित मांडणीमधून ध्वनित होणारा तिसरा अर्थ, त्याच्यातला रंग, संरचनेचं कथानकाच्या मांडणीतलं स्थान अशा अनेक गोष्टी सिनेमाची एकेक फ्रेम बघत असताना विचारात घ्याव्या लागतात. 

सिनेमा सर्वार्थानं पाहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सिनेमाच्या वेगवेगळ्या शक्यता पाहिल्या तर तुम्ही त्या शक्यता तुमच्या मगदुरानुसार तपासून पाहू शकता. सिनेमात काहीतरी घडायलाच हवं हे गरजेचं नाही. सिनेमा निर्माण करताना जसं किती तरी गोष्टींचं भान असावं लागतं, तसंच भान सिनेमा बघतानासुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. ते भान असेल तर आपण डोळसपणे कोणत्याही गोष्टींकडे पाहू शकतो.  नोबेलविजेते लेखक ज्यूझे सारामगो म्हणतात त्यानुसार, ‘पाहणं आणि निरीक्षण करणं हे दृष्टीचे दोन टप्पे आहेत.’

सिनेमाचं खूप बारकाईनं निरीक्षण करता यायला हवं. भारतीय सौंदर्यसिद्धान्तात रसिक अशी एक संकल्पना आहे. म्हणजे, कलावंत ज्याप्रमाणे कला निर्माण करत असतो, त्याचप्रमाणे प्रेक्षकही त्याच्या समोर उलगडल्या जाणाऱ्या कलाकृतीला जेव्हा सामोरा जात असतो तेव्हा त्याच्या आकलनशक्तीनं, त्याच्या कल्पनाशक्तीनं, त्यानं त्याच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांतून त्याची स्वतःची अशी एक प्रतिमा आणि कलाकृती मनात रचत जात असतो. वास्तव व वास्तवाच्या वरचा थर यांमध्ये सिनेमा सहज प्रवास करू शकतो. एकाच वेळी अनेक धाग्यांबद्दल बोलण्याची ताकद सिनेमात आहे. अनेक धागे जोडत जाऊन स्पेस अँड टाइममध्ये एक रेशमी वस्त्र सिनेमा उभं करतो, जे क्षणात हातात आल्याचा भास तयार होतो, तर त्याच वेळी त्या वस्त्राच्या अनेक धाग्यांचा थांगपत्ताही लागत नाही. 

जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी यांच्या सिनेमातून निर्माण होणारा अर्थ याविषयीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ‘कोरस’ या त्यांच्या अवघ्या काही मिनिटांच्या फिल्मचं द्यावं लागेल.
लहान मुलगी शाळेतून घरी येतेय...तिचे आजोबा घरी आहेत...आजोबांना ऐकू कमी येत असल्यानं श्रवणयंत्र  लावून त्यांना ऐकावं लागतंय...मुलगी शाळेतून घरी परतली आहे...आजोबा दार उघडत नाहीत...मुलगी खालून हाका मारत राहते...शाळेतल्या इतर मैत्रिणीही येतात व त्याही तिच्याबरोबरच हाका मारू लागतात...तिथं क्षणात अनेक मुलींचा घोळका येऊन हाका मारत राहतो...म्हणत राहतो... ‘आजोबा, दार उघडा.’
वरवर पाहता ही गोष्ट नातीची आणि आजोबांची; पण खोलवर बघता ती फिल्म नव्या-जुन्या पिढीतल्या राजकीय विचारसरणीची आणि त्यांच्यातल्या संघर्षाची आहे याची जाणीव होत जाते. आणि कियारोस्तामी बघता बघता बदलती इराणी स्त्री अवघ्या काही मिनिटांत मांडून जातात. 

सिनेमासाक्षरता वाढावी म्हणून मी महाराष्ट्रात ‘सिनेमा लॅब’ नावाचा एक उपक्रम राबवतो. त्यात लहान मुलांपासून ते तरुण मित्रांपर्यंत अनेकांना मी ही फिल्म दाखवली आहे. सगळ्यांना ती फिल्म तितकीच आवडते. लहान मुलं ती फिल्म एक छान गोष्ट म्हणून बघतात, तर प्रौढ लोक त्यांचं सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक आकलन त्या कलाकृतीशी जोडून त्या फिल्ममधून नवा अर्थ निर्माण करतात.

कलाकृती चिरंतन होण्याची पहिली पायरी म्हणजे तीमधला साधेपणा. त्यानंतर ती कला कुणाच्या तरी अंतरीचा ठाव घेण्याची ताकद बाळगते. ‘सिनेमात गोष्टी चुकीच्या नसतात, तर त्यांची जागा चुकलेली असते,’ असं म्हटलं जातं. कुठल्याही कलेत चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं, तर जागा चूक किंवा बरोबर असते.

आपल्या फिल्मनं थिएटरमधल्या सर्वांवर एकसारखा परिणाम करावा, असा मतप्रवाह असणारे काही दिग्दर्शक आहेत, तर याउलट काही दिग्दर्शक असेही आहेत की ज्यांना वाटतं, आपल्या फिल्मनं वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम साधले जावेत. कारण, सिनेमा ही अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. 

‘अव्यक्त भावना अविस्मरणीय असतात,’ असं म्हटलं जातं. अशा अव्यक्त भावना मांडण्याची ताकद सिनेमा बाळगून असतो.

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Indikar Writes about Movie