समृद्ध माणूसपणाची भाषा

1) ‘द काऊ’ या इराणी सिनेमाचं पोस्टर 2) ‘द काऊ’ या सिनेमाचे दिग्दर्शक दारीउश मेहरूजी.
1) ‘द काऊ’ या इराणी सिनेमाचं पोस्टर 2) ‘द काऊ’ या सिनेमाचे दिग्दर्शक दारीउश मेहरूजी.

सिनेमा, मग तो कुठलाही असो, तुमच्या भवतालच्या परिस्थितीला दिलेला तो प्रतिसाद असतो...भवतालच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींना दिलेला प्रतिसाद असतो. सिनेमा हे नेहमीच अतिशय सशक्त माध्यम म्हणून गणलं गेलेलं आहे. संस्कृती-वहनाचं, माणसांच्या आवाजांचं किंवा एखाद्या राजकीय विचारसरणीच्या प्रॉपगॅंडाचं. विचारांचं आदान-प्रदान करण्याच्या प्रक्रियेत सिनेमा मानवी इतिहासात अतिशय मोलाची भूमिका बजावत आलेला आहे. 

सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब आहे असं ज्या वेळी आपण म्हणतो, त्याच वेळी अभिप्रेत असलेला समाज नेमका कसा असावा, त्या समाजाची भविष्यातली दिशा कुठली असावी याचा शोध सिनेमातून आपण घेत असतो. आदर्शवत् मानवी संस्कृतीचं आपल्या मनातलं भविष्य रेखाटायला सिनेमा पुढं सरसावतो. या प्रक्रियेत इराणी सिनेमा अग्रक्रमानं समोर येतो. सिनेमा हे कथा सांगण्याचं, संवादाचं, विचारांचं परस्परांमध्ये पाझरत जाण्याचं माध्यम आहे आणि त्यातून आपण अधिकाधिक समृद्ध, उन्नत मानवी समाज घडवू शकतो याचं भान इराणी दिग्दर्शकांना सुरुवातीला आलं आणि रोजच्या सामान्य जगण्यातल्या गोष्टींना चित्ररूप देत सिनेमाच्या भाषेतून अनेक गोष्टी त्यांनी अजरामर करून ठेवल्या. 

आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर इराणी सिनेमा क्रांतिकारी पाऊल टाकतो. जगभरात आपली स्वायत्त अशी ओळख असलेला इराणी सिनेमा ‘हॉलिवूडच्या पलीकडचा सिनेमा’ अशी आपली स्वतंत्र ओळख बाळगून आहे. फ़ारसी भाषेचा आविष्कार घडवत जगातल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय-सामाजिक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा समाज स्वतःचं जगणं जगासमोर कॅमेऱ्याच्या चौकटीतून मांडू पाहतोय. 

‘स्थलपुराण’ ज्या वेळी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, त्या वेळी तिथं मला अनेक इराणी दिग्दर्शकांना भेटता आलं. माझ्या आजवरच्या सिनेमाच्या अभ्यासात इराणी चित्रपट आणि इराणी कलावंत यांच्याबद्दलचं कुतूहल कायम राहिलं. मी ज्या ज्या चित्रपटमहोत्सवांना उपस्थित राहिलो तिथं तिथं इराणी सिनेमाचाच बोलबाला प्रामुख्यानं होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अब्बास कियारोस्तमी यांनी म्हटल्यानुसार, अनेकदा आपण चित्रचौकटीत गोष्टी मांडल्याशिवाय हवं ते पाहू शकत नाही. किंवा पाहत नाही. म्हणजेच, गोष्टी चौकटीत बद्ध-बंदिस्त केल्यावर त्यांच्याकडे अधिक सजग दृश्यातून माणूस पाहू लागतो. नाहीतर त्या गोष्टी एरवी अगदी सहजरीत्या दुर्लक्षिल्या गेल्या असत्या. आजच्या सिनेमाच्या संदर्भात अनेक जाणकार अभ्यासकांच्या मते, जगातला सर्वाधिक आशयघन आणि कलात्मक सिनेमा इराण या देशात तयार होतोय.

इराणी दृश्यकलेच्या इतिहासाच्या प्रारंभीपासून ‘पर्सेपोलिस’सारख्या दृश्यरचना विचारात घेऊन, ‘दृश्य’ या माध्यमाकडे बघण्याची त्यांची नजर विकसित होत गेली असावी असा अंदाज अनेक अभ्यासकांच्या मते मांडला जातो. आपल्या संकुचित जाणिवेत रुतून बसलेल्या दृश्यप्रतिमा दीर्घ काळ इराणी चित्रपटांत दिग्दर्शकांच्या कलाकृतींमधून समोर येत राहिल्या आणि वेगवेगळ्या काळात त्यांची कालानुरूप बदलत गेलेली रूपं समोर यायला लागली. इराणमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक चित्रपटप्रदर्शन सन १९०४-०५ मध्ये झालं.

सिनेमा हे तसं आधुनिक-प्रागतिक विचारांचं वस्त्र पांघरलेलं रूप. धर्माचा पगडा असलेल्या इराणसारख्या राष्ट्रात आधुनिकता ही विचारप्रणाली अशी कानोसा घेत समाजात स्थिरावली. तिच्याशी संघर्षाचीही वेळ अनेकदा आली. त्याच संघर्षाच्या ठिणग्या पडून इराणी दिग्दर्शक आपल्या समाजातल्या अनेक जाचक रूढी-परंपर सिनेमात बद्ध-बंदिस्त करू लागले, तर काही दिग्दर्शक मूलभूत मानवी भावना, प्रेरणा, स्त्री-पुरुष नात्यामधली असीम पोकळी रेखाटत राहिले. सन १९७० च्या दशकात इराणी सिनेमा हा खऱ्या अर्थानं प्रगल्भ झाला असं म्हणतात. भारतीय सिनेमाच्या बाबतीत सत्यजित राय यांचं जे स्थान आहे, तसंच स्थान दारीउश मेहरूजी यांचं इराणी सिनेमाच्या बाबतीत आहे. सन १९७० नंतर इराणी सिनेमानं नवं आणि अधिक समंजस असं रूप धारण केलं. इराणमध्ये सन १९६३ मध्ये स्थापन झालेल्या ‘कॉलेज ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस्’ या संस्थेनं अनेक विद्यार्थी घडवण्यात हातभार लावला, तिथून नव्या जाणिवेचा सिनेमा करण्याची सुरवात झाली. 

दारीउश मेहरूजी यांचं बालपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय इराणी कुटुंबात गेलं. लहानपणापासूनच लघुचित्रशैलीतल्या अनेक चित्रांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि जडणघडणीवर पडत गेला. शिवाय, त्यांचं आयुष्य बदलून टाकणारी एक घटना घडली व ती म्हणजे ‘व्हिटॅरिओ डिसिका’चा ‘बायसिकल थीफ’ हा सिनेमा त्यांच्या पाहण्यात आला. मानवी जीवनाचं उदात्त भान देणारी ती चित्रकृती जगभरच्या अनेक महान कलावंतांना भुरळ पाडत, निर्मितीच्या नव्या प्रेरणा देत, आकांक्षांची बीजं पेरत दिमाखात उभी आहे याचाही उल्लेख अवश्य करायला हवा. ...तर मेहरूजी यांच्यावर ‘बायसिकल थीफ’चा अतिशय खोलवर प्रभाव पडला. ३५ मिलिमीटरचा प्रोजेक्टर आणून त्यावर छोट्या छोट्या चित्रफिती तयार करण्याचा प्रयत्न वयाच्या बाराव्या वर्षापासून करणाऱ्या या महान दिग्दर्शकानं पुढं ‘द काऊ’ हा 

अजरामर सिनेमा तयार केला. इराणी सिनेमाच्या जडणघडणीत हा ‘न्यू वेव्ह इन’ सिनेमा मानला जातो. हा सिनेमा म्हणजे इराणमधल्या एका छोट्या गावातल्या एका मध्यवयीन माणसाची आणि त्याच्या प्रिय गाईची कथा. मूल-बाळ नसलेल्या हसनचं गाईवर जिवापाड प्रेम असतं. एके दिवशी ही गाय मरते. त्यानंतर हसनची जी काही मानसिक स्थिती होते तिचं चित्रण मेहरूजी आपल्या अनोख्या ठाय लयीतल्या शैलीत करतात. तंत्राचा कोणताही ‘बडेजावी वापर’ नाही. इराणमधल्या एका गावकुसातल्या एका माणसाची ही गोष्ट प्रादेशिकतेची, भाषेची, सामाजिक रचनेची बंधनं ओलांडून प्रेक्षकापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचते. ही कथा, हा सिनेमा आपलं माणूस असणं समृद्ध करत नेतो. 

माणूस आणि प्राणी यांच्यातलं ‘द काऊ’मधलं नातं बघता बघता, माणूस माणसाच्या प्रेम करण्याच्या मूलभूत प्रेरणेलाच हाक देतो. मेहरूजी यांचा हाच वारसा-वसा, हीच उदात्त मानवी कलाकृतीची पालखी पुढं मजीद माजिदी, अब्बास कियारोस्तमी, मोहसीन मखमलबफ, अझगर फरहादी, जाफर पनाही, महंमद रुसूलूफ यांसारखे दिग्दर्शक घेऊन जात आहेत आणि राजकीय परिस्थितीला शरण न जाता, सेन्सॉरच्या कचाट्यातून मार्ग काढत जगभर इराणी सिनेमा घेऊन मानानं मिरवत आहेत. काही कलावंत आपल्या वकुबातून चांगल्या ताकदीचा सिनेमा तयार करतात; पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही दिग्दर्शक सिनेमा हे माध्यमच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यातलंच एक नाव म्हणजे अब्बास कियारोस्तमी. असं म्हटलं जातं की ‘सिनेमा ग्रिफिथजवळ सुरू झाला आणि कियारोस्तमी यांच्यापाशी संपला!’ 

जेव्हा जेव्हा इराणी सिनेमाचा विषय येतो तेव्हा तेव्हा, सिनेमावर लादल्या जाणाऱ्या सेन्सॉरशिपविषयी बोललं जातं. शरिया कायदाच्या विचारातून पुढं आलेली सेन्सॉरची चौकट इराणी दिग्दर्शकांना अनेक अर्थांनी जाचक वाटत आली आहे. स्त्रियांना नेहमीच विशिष्ट पेहरावात दाखवणं, सिनेमात शारीरिक जवळिकीवर निर्बंध, सिनेमात येणाऱ्या आशयावर बंधनं, सिनेमात कोणत्या प्रकारचं संगीत वापरायचं यावर बंधनं, इतकंच नव्हे तर, सिनेमात कोणत्या कविता वापरायच्या यावरही बंधनं! तरीही या सगळ्यातून आपला मार्ग काढत इराणी दिग्दर्शक जगभरातल्या चित्रपटरसिकांना भुरळ पाडणाऱ्या चित्रकृती निर्माण करत आहेत. 

(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com