
मोन्ताज
सिनेमा नावाची जादू फोटोसिंथेसिस आणि इतर गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया पार पडत निर्माण झाली हे जरी खरं असलं, तरी सिनेमाच्या जन्माच्या सुरुवातीलाच तिला एका भाषेचं रूप येण्याचं सूतोवाच करून ठेवलं गेलं होतं.
सिनेमा नावाची जादू फोटोसिंथेसिस आणि इतर गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया पार पडत निर्माण झाली हे जरी खरं असलं, तरी सिनेमाच्या जन्माच्या सुरुवातीलाच तिला एका भाषेचं रूप येण्याचं सूतोवाच करून ठेवलं गेलं होतं. सन १८९५ मध्ये ल्युमिए बंधूंनी सुरू केलेली ही जादू, जिचं पहिलं रूप हे ‘द अरायव्हल ऑफ ट्रेन’ हे होतं. अरायव्हल म्हणजे येणं. काहीतरी असं जादूई, लार्जर दॅन लाईफ अंगावर आलं, ज्यानं लोकं स्तिमित तर झालेच; पण क्षणभर रेल्वे अंगावर येतेय की काय या भासानं अनेकाची तारांबळही उडाली. लोक त्यांच्या जागेवरून उठून रेल्वेपासून बचाव करण्यासाठी धावू लागले. ही सिनेमाची जादू! जे खोटं आहे, जे पडद्यावर आहे, ज्याला वास्तवाचा आधार नाहीये, तरीही ते क्षणार्धात माणसाच्या जाणीव- नेणिवेवर मूलगामी परिणाम करू शकतं हे सहज साध्य झालं.
फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंचा ‘द अरायव्हल ऑफ ट्रेन’चा पहिला खेळ आणि त्यापासून सुरू झालेला प्रवास लवकरच अशा टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला, जिथून सिनेमा या माध्यमाकडे पैसे कमवायचा आणि कला सादर करायचा एक चांगला मार्ग म्हणून बघणं सहजशक्य झालं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उगमापासूनच सिनेमानं व्यवसायाचं रूप धारण केलं आणि तसे प्रयत्न जगात अनेक ठिकाणी लोकांनी करायला सुरुवात केली. मोजक्याच कालावधीत चित्रकर्त्र्यांना असंही समजलं, की जर आपण विशिष्ट क्रमात, विशिष्ट कोनातून, विशिष्ट जागेवरून, विशिष्ट भवताल चित्रित केला आणि त्याची विशिष्ट क्रमानं मांडणी केली तर त्यातून अर्थ निर्माण करता येऊ शकतो. ही अर्थ निर्माण करता येण्याची पहिली ठिणगी जिथं पडली तिथं सिनेमाच्या भाषेचा उगम होण्याची सुरुवात झाली. मानवी जगण्यात भाषेचा शोध हा अर्थाच्या शोधातूनच लागला असावा. अर्थ निर्माण करायचा आहे तर त्याला एक माध्यम हवं, ते माध्यम म्हणून कुणी रंग वापरतं, कुणी नाद, तर कुणी लिखित भाषा. तशी चित्रपटाची भाषा निर्माण होण्याची आणि विकसित होण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यातूनच सिनेमाकडे कलामाध्यम म्हणूनसुद्धा बघितलं जाऊ लागलं.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मानवाच्या जगण्यात अशा काही क्रिया असतात, ज्या केल्यानं त्याला जीवशास्त्रीय गरजेपलीकडे जाऊन, काही मूलभूत आत्मिक आनंद मिळवण्याची भावना वाढीस लागते. त्याची आत्मिक विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. हीच मानवाची कलानिर्मितीची मूलभूत प्रेरणा असली पाहिजे. जिचा संबंध अत्यंत सेंद्रियरीत्या जीवशास्त्राशी जोडला जातो. ज्यात उत्कटता, आनंद, भय, मोह, मत्सर, लोभ या सर्व भाव-भावनांचं चित्र निर्माण करता येऊ शकतं. असं चित्र निर्माण करणारी कला म्हणून सिनेमाकडे पाहिलं जातं. माणसाला स्वतःच्या रोजच्या दैनंदिन जीवनव्यवहारातून निर्मिती करावीशी वाटते. अगदी शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना गाणी म्हणावीशी वाटतात, भातलावणी करताना, कापणी करताना किंवा गावोगावी जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांना जी गाणी म्हणावीशी वाटतात, त्यांत एक सहजपणा दिसून येतो. त्यांचं त्यांच्या रोजच्या आत्माविष्काराशी जोडलेलं नातं दिसून येतं. सिनेमा किंवा कुठल्याही कलाप्रकाराच्या निर्मितिप्रक्रियेकचं मूळ त्यातच आहे.
प्राचीन काळातही सर्व प्रकारच्या पुरातत्त्व विद्या आणि कला यांचे धागे एकमेकींशी जुळलेले दिसून येतात. चित्रकला, शिल्पकला, संगीत; मग त्यातही अभिजात आणि लोकसंगीत अशा वाटा चोखाळत इतर कलांच्या बलस्थानांचा लीलया उपयोग करत सिनेमा नावाचं कलाप्रारूप आपलं वैभव वाढवत राहिलेलं आहे. असं म्हणतात की जगातली अमूर्तातली अमूर्त गोष्ट व्यक्त करण्यासाठी भाषेचा आधार घ्यावा लागतो. भाषा स्वीकारावी लागते. भाषा जगणं समृद्ध करतेच; पण भाषा अर्थनिर्णयन करायला लावून आपलं म्हणणं एकापासून अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरते. याच प्रेरणेतून सिनेमाची भाषा वेगवगेळ्या साधनांचा वापरत करत विकसित झाली.माणसाला कायमच पृथ्वीपलीकडचं जग जाणून घेण्याची उत्सुकता राहिलेली आहे. पारलौकिक जीवसृष्टी आहे का? चंद्र कसा दिसत असेल, आपल्या पृथ्वीच्या पलीकडे जीवसृष्टी असेल का? अशा प्रश्नांना सिनेमातून भिडावं असं जॉर्ज मेलीए नावाच्या जादूगाराला वाटतं आणि त्यातून तो ‘ट्रिप टू द मून’ नावाचा एक देदीप्यमान आविष्कार घडवत जातो. आणि तो अनुभव, त्यानं निर्माण केलेला चंद्र आणि ती कलाकृती हे सगळं कालातीत होऊन जातं. संपूर्ण जागतिक सिनेमाविश्वात त्याची नोंद होते आणि जागतिक सिनेमाच्या इतिहासात तो सिनेमा एक ‘मैलाचा दगड’ बनून राहतो.
चित्रपटाच्या विकासाच्या टप्प्यावर सर्वात मूलभूत बदल झाला तो म्हणजे संकलन (एडिटिंग) करता यायला लागल्यानंतर. काळाचे दोन विशिष्ट तुकडे एकत्र केल्यावर काही एक विशिष्ट परिणाम साधला जातो. हे जेव्हा एडविन पोर्टर नावाच्या माणसाला समजलं तेव्हा त्याफ एक मोठी, सर्वस्वी वेगळी ‘चोरी’ केली. ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’. ही चोरी एका अर्थानं स्थळ-काळाची होती. पोर्टर यांनी अनेक घटना असलेलं एक कथानक उभं केलं. अनेक शॉट्स एकामागून एक जोडले आणि एकसलग मांडणी असलेलं चित्र निर्माण केलं. कथा अगदी साधी, दरोडेखोर येऊन रेल्वे लुटतात. नंतर होणारा त्यांचा पाठलाग वगैरे...पण त्या सिनेमाची जादू पूर्णपणे एडिटिंग नावाच्या सिनेमाच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यानं साधली गेली होती. त्यातून सिनेमाच्या निर्मितिप्रक्रियेतली एडिटिंग या टप्प्याची किमया सर्वांच्या ध्यानात आली आणि त्यातून, एकामागून एक शॉट कोणताही विचार न करता जोडायचे नसतात, तर त्यांची अर्थपूर्ण, लयबद्ध, स्थलकालसापेक्ष, वास्तवाचा आभास निर्माण करेल अशी मांडणी पुनर्रचित वास्तवाची कल्पना साकार होईल अशा पद्धतीनं करायची असते, याचं महत्त्व जगभर ओळखलं गेलं आणि त्यातून कलावंतमंडळींनी सिनेमाच्या भाषेचा वापर करायला सुरुवात केली.
कुठलीही कला कलावंत जेव्हा निर्माण करत असतो तेव्हा काहीतरी गणित डोक्यात ठेवून तो तिचं स्वरूप व आकार ठरवत असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीला जसा कार्यकारणभाव असतो तसाच तो चित्रपटालाही असतो. चित्रपट करण्यापाठीमागं काहीतरी निश्चित प्रेरणा असते, निश्चित विचार असतो, भूमिका असते आणि त्या भूमिकेचा विचार दिग्दर्शक सिनेमामाध्यमातून करत जातो.
कुणी राजकीय, कुणी सामाजिक, कुणी सांस्कृतिक, तर कुणी भौगोलिक. मग रशियातले आयझेन्स्टिन, पुडोवकिन असे दिग्दर्शक असतील किंवा सामाजिक जाणिवेचं काम करणारे श्याम बेनेगल यांच्यासारखे भारतीय दिग्दर्शक असतील. ते सिनेमाच्या भाषेचा वापर करूनच आपलं म्हणणं अधिकाधिक प्रभावी करत जातात. म्हणूनच लेनीनसारख्या राज्यकर्त्यालाही या माध्यमाच्या ताकदीचा वापर करूनच आपला प्रॉप्गॅंडा सादर करावासा वाटू लागतो. सिनेमानं रासायनिक प्रक्रिया ते दृष्टिसातत्य ही वैज्ञानिक प्रक्रिया कशी सहजरीत्या सामावून घेतली आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ती कला कशी जगभर जाऊन पोहोचली आणि मानवाच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करायला तिनं कशी सुरुवात केली हे आपण गेल्या भागात पाहिलं. अल्तमीरा ते भीमबेटकापासून अजिंठ्याच्या भीत्तिचित्रांपर्यंत चित्रांच्या माध्यमातून जसं माणसाला त्याचं दैनंदिन आयुष्य चित्रित करून ठेवायची ओढ लागली होती, तशीच ओढ सिनेमा तयार करणाऱ्या लोकांना असते. माणसाला अमर होण्याची एक गूढ आस लागलेली असते, त्या आसेतून माणूस कलानिर्मिती तर करत नसावा, असा प्रश्न निर्माण होतो. डिजिटल-युगात तर सिनेमा आता कायमस्वरूपी बद्ध झाला आहे. माणसानं तयार केलेली फिल्म उद्या अंतराळातसुद्धा पाहता येऊ शकेल. तशी शक्यता आता दूर राहिलेली नाही. जसं केसरबाई केरकरांचं गाणं अंतराळात वाजत आहे, तसाच एखादा चार्ली चाप्लिनचा ‘मॉडर्न टाइम्स’ सारखा अजरामर सिनेमा लोक अंतराळात पाहू लागले तर वावगं वाटू नये, त्यामुळे आज चित्रित होत असलेला शॉट अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आला आहे असा म्हणायला वाव आहे.
(सदराचे लेखक सिनेदिग्दर्शक-लेखक आहेत.)
Edited By - Prashant Patil