Smita Dodmise
Smita Dodmise

निसर्गाचा अक्षय ठेवा

अक्षय तृतीया येण्याची चाहूल मला लागते ती वातावरणाने सभोताली असलेल्या निसर्गाने....चैत्रगौरीचे हळदी-कुंकू संपत आलेले असते. कैरीची डाळ आणि पन्ह्याची मेजवानी संपली की हळूहळू चाहूल लागते निरनिराळ्या फळांची, फुलांची आणि एकूणच वातावरण बदलाची.

अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू...  या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य संपवून तारुण्यात प्रवेश करता झालेला असतो. सगळी झाडे फुललेले असतात ती रंगाने आणि गंधाने. जिकडे नजर जाते तिकडे फुलांनी आपली शाल पांघरलेली दिसते. एखाद्या सलज्ज यौवनेसारखा बहावा त्या पिवळ्या धमक साजाने बहरलेला असतो अन्‌ जणू तो अधोमुख झालेला असतो.

बहाव्याचे ते असे पिवळे सोनसळी माळा मिळवणारे झाड पाहिले ना की डोळ्यांचे पारणे फिटते आणि तो नाजूक स्पर्शाचा, पिवळा बहावा मनभर पसरत जातो. या बहाव्यालाच कॅशिया म्हणतात ना, खूप लहानपणी ताईच्या पुस्तका वि. द. घाटेचा एक धडा वाचला होता-‘आणि कॅशिया भरारला.’ मला ते काही कळाले नाही पण कॅशिया हे नाव मनात रुतून बसले. एक रस्त्याकाठी बहावा होता, वर्षभर केवळ हिरवी पाने आणि फांद्या असणारे झाड उन्हाळ्याच्या सुरवातीला मात्र भरगच्च अशा पिवळ्या फुलांच्या माळांनी सजायचे. इतके देखणे दिसायचे ते झाड, की मी खूपदा उगाच त्या झाडाखाली उभी राहायचे, उन्हं लागत असूनही त्या पिवळ्या राशीची आल्हाददायक अशी ऊर्जा साठवायचे. त्याच्या त्या पिवळ्या फुलांच्या माळा अशा पाहिल्या की हिंदीत फुलांच्या साजाला ‘सेहेरा’ म्हणतात तसा सेहेरा या झाडाने घातलाय की काय असे वाटायचे. नुसत्या एका रेषेत ओवलेल्या माळा अशा चहूबाजूने ल्यायलेले ते झाड पाहिले की निसर्गाच्या या जादुई कामगिरीची भुरळ मनभर पसरायची. काय अवलिया जादूगार आहे ना, हा निसर्ग. वसंत ऋतू म्हटला, की पाने, फुले अंगभर मोहरतात
वर्षावात सुखाच्या
रोमरोमी फुलतो
गुलमोहराच्या कुशीत
बहावा बहरतो 

जिथे नजर जाईल तिकडे हा रंगाचा सोहळा दिसतो. सभोवताली लाल-पिवळ्या फुलांनी जणू हळदकुंकू वाहून पूजेला आरंभ केला आहे असे वाटते. गुलमोहर त्याच्या सतेज तेजस्वी असा केशरी रंगाचा फुलोरा अगदी मानाने मिरवत असतो. अंगभर भगवे वस्त्र घेतलेला योगी जणू. उन्हातही तटस्थतेने ना मलुल होता ते प्रसन्न केशरी वस्त्र पांघरून उभा असतो. उष्णतेचा शिडकाव्यात तो हसत उभा असतो, हात पसरून स्वागताला असे वाटते.

इंग्रजीत याला फ्लेम ट्री म्हणतात. खरे तर समर्पक नाव पण मला आपले गुलमोहर हे नावच आवडते. गुलछबूसारखा उन्हाच्या काहिलीत; पण अंगभर फुललेला गुलमोहर... या पिवळ्या केशरी रंगाच्या शिडकाव्यात मग नीलमोहोर, आपले राज्यफूल ताम्हनदेखील आपले रंगवैभव मिरवीत असतात, ताम्हनाचा निळा रंग खरेतर खूप सुखावतो डोळ्यांना, आल्हाददायक वाटते त्या निळ्या, सावळ्या रंगमोहनाकडे पाहिले की.. सोनचाफा ही खूप फुलतो या काळात. सोनचाफ्याचा सोनसळी रंग वेड लावणारा असतो आणि त्या सोनसळी रंगाबरोबरच सोनवर्खी सुगंध; मन अगदी आनंदविभोर होते. पानांनी पण कोवळेपणाचा तुकतुकीत लालसर रंग टाकून आता हिरवागार शेला अंगभर पांघरलेला असतो. रस्त्याच्या कडेने बोगनवेल ही फुललेली असते.  त्याच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे गेंद पाहिले की खूप मोठ्या सोहळ्याला आपण आलो आहोत असे वाटते....मोठ्या वृक्षाची रंगपंचमी जशी सुरू असते तसेच छोटी झाडे कशी मागे राहातील.

पारिजात, गुलाब, जास्वंद, कृष्णकमळ अगदी अंगभर मोहरतात. बकुळ, सुरंगी, देवचाफा अगदी तुकतुकीत पानांसह रसगंधाने धुंद झालेले असतात. वातावरणात पहाटेपासून एक संमिश्र सुगंध पसरायला लागतो. उमललेल्या सोनचाफ्याचा, पारिजातकाचा , गुलाबाचा. त्यातल्या त्यात गुलाबी गावठी गुलाबाचा त्याच्यासारखाच तलम सुगंध. या काळातील वातावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसा तापमान उष्ण असले तरी रात्री मोठ्या आल्हाददायक असतात. रात्री मग मोगऱ्याच्या कळ्या तरारतात,  त्याचा गंध हवेत पसरायला लागतो....मोगरा कळ्यांनी लगडलेला असतो. साधा मोगरा, बट मोगरा, वेली मोगरा, हजारी मोगरा सगळेच कळ्यांनी लगडलेले असतात.

रात्री असा मंद गंध यायला सुरुवात होती, जशा कळ्या टपोरल्या जाता तसा त्यांचा सुगंध बाहेर पडतो. रात्रीच्या सुगंधावरून आठवले रातराणी तर नुसती घमघमत असते. रातराणीचा गंधही फार मादक....रात्रभर त्या गंधात बुडावे असे वाटते. अशा या रंगात गंधात न्हायलेले दिवसरात्र या वैशाखात अक्षयतृतीयेदरम्यान असतात.

उष्म्यामुळे तनामनाला आलेली मरगळ घालवणारा हा निसर्गोत्सव. या काळात फळेही कसे मागे राहतील. आंबे हिरवटपणा सोडून घमघमायला लागतात. आंबा म्हणजे फळांचा राजा, या राजाचे आगमनही या निसर्गाच्या राज्यात याच काळात होते. चिकू, जांभळे, करवंदे, यांनी झाडे बहरतात. खरबूज, टरबूज, कलिंगड यांचीही रेलचेलच असते.या फळा-फुलांच्या साम्राज्यात मग त्याचे अनभिषिक्त चाहते कसे दूर राहणार. या काळात पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट, गुंजारव अधिकच प्रसन्न करतो. भल्या पहाटे अगदी सूर्योदयाच्या आधीच पक्षांचा चिवचिवाट सुरू होतो. या काळात कावळे, चिऊताई आजूबाजूला दिसतात. त्यांचे प्रियाराधन सुरू होते. कोकिळ अगदी आर्त साद घालत असतो. भारद्वाज दिसतात अनेक पक्ष्यांच्या चिवचिवाटाने अन्‌ रसभरल्या गंधाने आणि चहूबाजूने पसरलेल्या रंगाच्या गालिच्याने पहाट अगदी प्रसन्न होते. या दिवसांचे वैशिष्ट्य म्हणजे या काळातल्या पहाटवेळा फार सुखद अशा गारव्याच्या असतात. सुखाची छान झुळूक अंगावरून जात असते. असा हा अक्षयतृतीयेचा वैशाखमास. 

आता या निसर्गाच्या सोहळ्याबरोबरच या अक्षयतृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व म्हणजे यादिवशी कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय  होते. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. त्या हळदीकुंकूचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी शेतकरी शेताच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करतात. अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे. या दिवशी दान, हवन केलेले क्षयाला जात नाही, आणि पितरांविषयी केलेले कार्य अविनाशी होते. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी सोने खरेदी करून घरातील सोन्यात ठेवल्यास सोने कधीही चोरीला जात नाही, असे म्हणतात. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. 

अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून निश्‍चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय, कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. अक्षयतृतीयेला सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ असे मिळते, असे म्हणतात. अक्षयतृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. तेव्हा आपणही या निसर्गदेवतेने आपल्याला दिलेल्या या ठेव्याची जोपासना करण्याचा संकल्प करायला हवा. वनौषधींच्या आधारे आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करून नव्या जगावर भारतीय आरोग्य पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. अशी ही अक्षयसुखाची अक्षयतृतीया,  या दिवशी अनेक झाडे लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे, तरच हा रंगगंधाचा ठेवा अक्षय्य राहील. पाण्यासाठी पाऊस आला पाहिले आणि पावसासाठी झाडे लावली पाहिजे ही निसर्गसाखळी जाणून घेऊन झाडे वाचवा आणि पाणी वाचवा हा आता अक्षयतृतीयेच्या पूजेचा महामंत्र असावा. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब साठवला तर आणि प्रत्येक झाड जगवले तर हा निसर्गदेवतेचा ठेवा आपण अक्षय्य जतन करू शकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com