
चकदेव, पर्वत आणि जंगम...
- डॉ. अमर अडके
अवघा महाराष्ट्र सह्याद्री आणि सातपुड्यातल्या रानवाटांनी जोडला आहे, बिनचेहऱ्याच्या निर्जीव डांबरी वस्त्यांनी नाही. या रानवाटा कधी भरजंगलातून जातात, कधी अन्नहीन पठारावरून जातात, कधी दोन डोंगरांमधल्या चिंचोळ्या खिंडीतून जातात, कधी प्रचंड कड्याच्या कुशीतून जातात, कधी उत्तुंग शिखराला वळसा घालून जातात, कधी पावसाळ्यात कोसळणाऱ्या प्रपातीच्या मार्गांनी डोंगरकडे उतरतात त्यांना नाळ किंवा नळीची वाट म्हणतात,
कधी ओढे ओलांडून, तर कधी प्रवाहाच्या काठाकाठाने जातात; कधी पहाड खोदून केलेल्या पायऱ्यांवरून, तर कधी उभ्या कड्यात खोदलेल्या खोबणींच्या आधाराने जातात, कधी भातखाचरांच्या बांधांवरून, तर कधी भूमिपुत्रांच्या झापांवरून जातात. या रानवाटा वाहत्या आहेत, जिवंत आहेत, त्यांना स्वतःचं रूप आहे. या आडवाटेवरच्या महाराष्ट्राला स्वतःची एक संस्कृती आहे. इथले भूमिपुत्र त्यांची संस्कृती, श्रद्धा, देव आणि निसर्ग जिवापाड जपतात. सह्याद्रीच्या शिखरा-शिखरांवर अशी विस्मयकारक संस्कृती नांदते आहे.
अशा निसर्गसुंदर गिरिशिखरांपैकी ‘चकदेव’ आणि ‘पर्वत’ ही नितांतरमणीय निसर्गशिल्पं अनुभवावी अशी आहेत. महाबळेश्वर तापोळ्याच्या पार पश्चिमेला शिवसागर जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गिरिशिखरांवर कोकणातील खेडपासून सुलभतेने जाता येतं. या चकदेव, पर्वतवर जाण्यासाठी अनेक निसर्गरम्य वाटा आहेत. प्रत्येक वाट ही असीम निसर्गसौंदर्याची अनुभूती आहे. मग ते आंबिवली घाटाने शिडीच्या वाटेने चकदेव चढणं असो, किंवा उचाटकडून दीर्घ चालीने पर्वत चढणं असो, किंवा टोकाच्या वळवणपासून पर्वतावर जाणं असो.
अशा अनेक वाटांनी या गिरिशिखरांवर अनेकदा गेलो. प्रत्येक वेळेचा रोमांच-अनुभूती वेगळीच. ही निसर्गाची स्वप्नशिल्पं वारंवार साद घालतात आणि ओढल्यासारखा मी त्यांच्याकडे जातो. तिथली जंगम मंडळी आता माझे सगेसोयरेच बनून गेली आहेत. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. अजून संततधार नव्हती; पण कडेकपाऱ्यांत कोसळू लागला होता. या ऋतूतला चकदेव पर्वत विलोभनीय असतो. या वेळी निसर्गरम्य ‘रघुवीर घाटाने’ जायचं ठरलं. खेडच्या पाच-सहा मैल अलीकडे खोपी-चोरवणे फाटा मुंबई-गोवा महामार्गावर उजवीकडे ‘चोरवणे’ खोपी हे रघुवीर घाटाच्या तोंडाशी असणारं टुमदार कोंकणी गाव.
तीव्र वळणांचा, दरीच्या अंगाने जाणारा हा घाट म्हणजे निसर्गाची अप्रतिम चित्रकारीच जणू. घाटातला श्वास आणि दिसणारं निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे. इथे राहातो आमचा वाटाड्या गणेश जंगम. मूळचा चकदेव डोंगरावरचा. गिरिशिखरावर जन्मला, वाढला आणि रमला. रानचा वारा पिऊन काटक बनला. सारं बालपण चकदेव डोंगरावर गेलं. तिथलं जंगल म्हणजे चक्रेश्वराचा सेवेकरी. पहिला श्वास चकदेववरच घेतला. तिथंच खेळला, बागडला, गवे- वाघांच्या सहवासातच वाढला.
कोवळ्या वयात अख्खा डोंगर उतरून आंबिवलीच्या शाळेत जायचा, परतीला डोंगराचे उभे कडे वेलींनी तयार केलेल्या शिड्यांनी चढायचा. संध्याकाळी परतीच्या वेळी गणेशसारखी पोरं एकमेकांच्या आधाराला घोळका करून यायची. कधी अंधारात त्या जीवघेण्या शिड्या चढायची, त्या खोल दऱ्यांत आणि उंच कड्यांवर मुसळधार पावसात सापडायची, कधी अंधारात हरवायची; पण शाळेला जायची. वयाच्या सहा ते बारा-तेरा वर्षांपर्यंतच्या कोवळ्या वयात शाळेसाठी गणेश अशा डोंगर-दऱ्या चढुतरला. मग पाचवीनंतर शिंदीच्या शाळेत जायला लागला; पण डोंगर-दरीतली पायपीट चुकली नाही. अखेरीस शाळेची साथ सुटली. गणेश ‘खोपी’त आला. पडेल ती कामं करू लागला. आज गवंडीकाम करतो. पण चकदेव- पर्वतची, तिथल्या दऱ्याखोऱ्यांची ओढ कायम आहे. इथे जंगमांची एक संस्कृती नांदते आहे. ते या परिसराला प्रत्यक्ष कैलासच मानतात. इथे सात डोंगरांवर शंकराची सात स्थानं आहेत. पंचक्रोशीची ती श्रद्धास्थानं आहेत. या साऱ्या ठिकाणी गणेशबरोबर मी फिरलोय.
गणेशची बहीण शिंदीत रहाते. सासुरवाडी पर्वतची. उभ्या दांडावरला पर्वतचा चढ एखाद्या काठीसारखाच, तो उभ्या उभ्याच चढतो. नव्या शिडीपेक्षा जुनी वेलींची शिडीच त्याला जवळची वाटते. असे अनेक गणेश सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत उपेक्षित आणि व्रतस्थ जीवन जगताहेत. ना त्यांना बाहेरचं जग माहिती आहे, ना बाहेरच्यांना त्यांचं अस्तित्व कळतं. पडल्या पावसात अंधाऱ्या रात्री आम्ही खोपीत पोचलो. रामाच्या देवळापाशी आमची वाट पहात गणेश उभा असतो. ‘रघुवीर’ घाटातून त्याच्याबरोबर आम्ही शिंदीला जातो. स्वच्छ अंगण, कोपऱ्यातलं तुळशी वृंदावन ओलांडून त्याच्या बहिणीच्या घरी आम्ही जातो. गणेशचा मेहुणा हातपाय धुवायला पाणी गरम करतो. आत शेकोटी पेटवतो. गरम भात, तांदळाची भाकरी खायला घालतो. मग रम्य पहाटे गणेशसह आम्ही चकदेवला जातो. त्याच्या घराच्या अंगणात आम्ही बसतो. कुतूहलानं त्याचं घर आम्ही पहातो. घर सगळ्या बाजूंनी कारवीच्या कामट्यांनी झाकलेलं असतं, तरच ऊब टिकते, भिंती सुरक्षित राहतात. त्या उबदार घरट्यातून त्याचे नव्वदीचे वडील बाहेर येतात. पूर्ण सुरकुतलेला चेहरा; पण कांबीसारखा ताठ म्हातारा. त्याची म्हातारी आई गरम- गरम शिरा करून देते. मग आम्ही चक्रेश्वराच्या पूजेला जातो. त्या उंच पठारावरचं ते प्रशस्त मंदिर एका पवित्र शांततेची अनुभूती देतं. मग आम्ही डोंगरकड्यांवरून शिड्या उतरून आंबिवलीला जाऊन परत चकदेववर येतो. चकदेवचं निसर्गसौंदर्य काय वर्णावं? चारी दिशांनी ते हुंगून घ्यावं, डोळ्यांत साठवावं! मग पुन्हा शिंदीमध्ये जावं. पुन्हा भल्या पहाटे उभ्या दांडाने ‘पर्वत’ चढावा. शंकराचं दर्शन घ्यावं. दोन्ही बाजूच्या दऱ्यांचं, उभ्या कड्यांचं विलक्षण सौंदर्य अनुभवावं. पर्वत उतरावा. शिंदीत मुक्काम करून खडा ‘महिमंडण गड’ चढावा. त्याच्या माथ्यावरनं मधु-मकरंद गडापासून महिपत- सुमार रसाळ, नागेश्वर... सगळ्या शिखरांचं दर्शन घ्यावं. हे सारं मनात, डोळ्यांत साठवत परतीची वाट धरावी.