

Mother Son Journey Through America
esakal
डॉ. यशवंत थोरात - saptarang@esakal.com
आपण अशा काळात जगत आहोत, ज्यामध्ये माणसे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि दूरवर प्रवास करतात. तरुणाई शिक्षण, नोकरी वगैरेच्या मागे धावत असताना आई-वडील आणि ज्येष्ठ मंडळीही हळूहळू त्यांच्या परिघाबाहेर जाऊ लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर उत्तम फराकटे लिखित ‘अमेरिका ९ वारी’ हे केवळ प्रवासवर्णन न राहता, त्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. लेखकाने आपल्या आईला केवळ अमेरिका दाखवली नाही, तर तो तिच्यासोबत एक नाते, अनेक आठवणी आणि संस्कारांचा वारसा घेऊन गेला. अमेरिकेच्या आधुनिक वातावरणात नऊवारी साडी नेसून फिरणाऱ्या एका वृद्ध आईचे चित्र हेच या पुस्तकाचे सार सांगते. अमेरिका हा या प्रवासाचा बाह्यपरिसर असला, तरी खरा प्रवास दोन पिढ्यांमधील आहे.
या प्रवासवर्णनात प्रवाशाने काय पाहिले, याहीपेक्षा त्याने ते कोणासोबत पाहिले, हे जास्त महत्त्वाचे ठरते. लेखकाने अमेरिका दोनदा पाहिली. एकदा, स्वतःच्या डोळ्यांनी आणि दुसऱ्यांदा आपल्या आईच्या डोळ्यांनी. कदाचित हे दुसरे दर्शनच अधिक सुंदर झाल्याचे हे पुस्तक वाचताना जाणवते.