
अमेरिकेच्या टेनेसी शहरात एकच खळबळ उडाली होती. पावसाळी हवेत आणि धुक्यात हरवलेल्या टेनेसीमध्ये आज काही तरी विशेष घडणार होतं. कदाचित पाशवी मानवी चेहऱ्याला झाकणारं मानवतेचं धुकं दूर होऊन, माणसाचा खरा चेहरा उघड होणार होता. याचसाठी टेनेसीवासीयांच्या झुंडीच्या झुंडी १९२६ मधल्या १३ सप्टेंबरला शहराजवळील एर्विन येथील क्लिंचफिल्ड रेलरोड यार्डकडे जात होत्या. जिथं एका अपराध्याला जाहीरपणे फाशी देण्यात येणार होतं. ११ सप्टेंबरला त्यानं अपराध केला होता, १२ तारखेला त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे १३ सप्टेंबरला त्याला फासावर लटकावण्यात येणार होतं.
आधुनिक काळातील हा सगळ्यात जलद चाललेला आणि तत्काळ शिक्षेची अंमलबजावणी होणारा खटला असावा. कारण इथं अपराधी स्वतःची बाजू मांडण्यास अक्षम होता. तो मुका होता, तसंच आपण कोणता अपराध केला आहे, याचीदेखील जाणीव त्याला नव्हती. लोकमतासमोर या मुक्याची बाजू मांडण्यासाठी कोणताही बोलता येणारा माणूस समोर आलेला नव्हता, त्यामुळे बोलता येणाऱ्या माणसांनी केलेला आरोप आणि न्यायाधीशांनी दिलेला निकाल, याचा या अपराध्याला विरोध करता येणंच शक्य नव्हतं.
इतकंच नाही, तर हे सर्व काय चाललं आहे, याचीदेखील जाणीव त्याला नव्हती. सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला सकाळीच रेल्वेने टेनेसी नजीकच्या युनिकोई काउंटी इथून शहरात आणण्यात आलं होतं. आबालवृद्धांसह जमलेल्या सुमारे अडीच हजारांवर असलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर असुरी उत्कंठा आणि नजरेत हिंस्र अस्वस्थता ओसंडून वाहत होती.
अखेर अपराध्याला वधस्तंभाकडे आणण्यात आलं. आपला अवाढव्य वजनाचा देह घेऊन अपराधी डुलत-डुलत चाललेला होता. त्याच्यासाठी वधस्तंभ म्हणून शंभर टन क्षमता असलेल्या एका अजस्र क्रेनचा वापर करण्यात येणार होता. अपराधी क्रेनजवळ जात असताना आपल्या इवल्याशा डोळ्यांतून जमलेल्या जमावाकडे पाहत होता, त्यांना अभिवादन करत होता. कारण त्याला वाटत होतं की, आपला शो पाहायला आलेली आणि आपल्या खेळाने आनंदी होऊन टाळ्या वाजवणारी ही गर्दी आहे. आपला शो झाल्यावर आपल्याला आपली आवडती केळी खायला मिळतील. मात्र, आज ही निर्दय गर्दी आपला प्राण घेणाऱ्या अखेरच्या शोसाठी जमलेली आहे, याची त्या मुक्या अपराध्याला जाणीवदेखील नव्हती.
क्रेनला लावलेला साखळदंड हा अपराध्याच्या अजस्र मानेत फासाच्या दोराप्रमाणे अडकवण्यात आला. त्यानंतर क्रेनने त्याला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायांनी जमीन सोडली आणि तत्काळ त्याचा देह जमिनीवर येऊन आदळला. यामुळे त्याच्या अवजड शरीरातील कंबरेपासून खालची हाडं मोडली. प्रचंड वेदनेने हा मुका जीव माणसांकडे मदतीची याचना करू लागला. त्याच्या इवल्याशा डोळ्यांमध्ये मरणप्राय यातना आणि सहानुभूतीची हाक तरळत होती. कदाचित जमलेली गर्दी ही माणसांचीच असली तरी, त्यांच्यातील संवेदनशीलताच हरवून बसलेली असावी, त्यामुळे कोणालाही ते दिसलं नसावं. त्याची मान पुन्हा साखळदंडात अडकवण्यात आली आणि यावेळेस मात्र क्रेनने आपलं काम फत्ते केलं. अपराध्याचा पाच टनांचा देह हवेत लोंबकळला. बऱ्याच वेळानंतर हा देह जमिनीवर सोडण्यात आला आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने अपराध्याला मृत घोषित केलं. हा अपराधी होता ‘मेरी’ नावाची, आशियन कुळातील एक हत्तीण.
मेरी चार्ली स्पार्क्स यांच्या ‘स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो सर्कसची’ स्टार कलावंत होती. या सर्कसची मुख्य आकर्षण असलेल्या मेरीची लोकप्रियता अफाट होती. आज त्याच मेरीला तिच्याच चाहत्यांनी फासावर लटकवलं होतं. १८९६ मध्ये जन्मलेली मेरी वयाच्या बाविसाव्या वर्षी माणसांकडून फासावर लटकवली जाते. असा तिचा अपराध तरी काय होता? हा प्रश्न आपल्या मनाला अस्वस्थ करतो. बालपणीच सर्कसमध्ये आलेल्या मेरीला प्रशिक्षित करण्यासाठी एक केअरटेकर नियुक्त करण्यात आला होता. मेरी आणि तिच्या केअरटेकरमध्ये विश्वास व प्रेमाचा एक घट्ट अनुबंध निर्माण झालेला होता. त्यामुळे स्पार्क्स सर्कसएवढीच ही जोडीही अफाट लोकप्रिय झालेली होती. १९२६ मध्ये सर्कसचे मालक चार्ली स्पार्क्स यांच्याशी वाद झाल्यामुळे केअरटेकर सर्कस सोडून निघून गेला.
तो गेल्यामुळे मेरी दुःखी आणि उदास राहू लागली होती. तिच्याशिवाय सर्कसच्या खेळात प्रेक्षकांना रंगत वाटणार नाही, याची जाणीव स्पार्क यांना होती. एक दिवस एक रेड एल्ड्रिज नावाचा बेघर माणूस त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आला, तेव्हा त्यांनी आपल्याकडे मेरीसाठी केअरटेकरची आवश्यकता आहे असं सांगितलं. त्या वेळी हॉटेलमध्ये कामाचा अनुभव असलेल्या एल्ड्रिजने प्राण्यांना सांभाळण्याचा कोणताही अनुभव नसताना, हे काम स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्याला रोजगार आणि निवारा हवा होता म्हणून कदाचित तो जिवावर उदार झाला असावा. तसंच, स्पार्क्स यांची व्यावसायिक अपरिहार्यता असावी, म्हणून त्यांनी त्याला कामाला ठेवलं. त्याला कामावर काही दिवसच झाले होते. एल्ड्रिज मेरीला अजिबात आवडला नव्हता. एल्ड्रिजला वाटत होतं की, आपण मेरीला रागावून दहशतीत ठेवू आणि मालकावर प्रभाव पाडू. एकूण, मेरी आणि एल्ड्रिज यांचं पटत नव्हतं. त्या वेळी सर्कस टेनेसीजवळील किंग स्पोर्ट या ठिकाणी होती.
सर्कसच्या जाहिरातीसाठी स्पार्क्स यांनी नेहमीप्रमाणे गावातून सर्व कलावंत आणि प्राणी यांची फेरी काढण्याचा निर्णय घेतला. या फेरीदरम्यान काही अनुभव नसलेला एल्ड्रिज मोठ्या दिमाखात मेरीच्या पाठीवर बसला. खरंतर सार्वजनिक ठिकाणी एवढ्या महाकाय प्राण्याला हाताळण्याचा त्याच्याकडे कोणताही अनुभव नव्हता. कदाचित त्याचा आत्मविश्वास त्याच्या कुवतीपेक्षा अधिक असावा. गावातील रस्त्यावर एका दुकानात ठेवलेले टरबूज खाण्यासाठी मेरी झेपावली, त्या वेळी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एल्ड्रिजने तिला अंकुशाने अमानुषपणे टोचण्यास सुरुवात केली. जखमांच्या वेदनेमुळे मेरी अधिकच बिथरली. तिने आपलं अंग हलवून एल्ड्रिजला खाली पाडलं, त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला मारून टाकलं आणि पायानेच रस्त्यावरील गर्दीकडे भिरकावलं.
काही प्रत्यक्षदर्शी सांगत होते की, मेरीने एल्ड्रिजला सोंडेने हवेतदेखील फेकलं होतं. त्यानंतर मेरी शांत झाली, मात्र माणसं पेटली. मेरीला शासन करण्याची मागणी करू लागली. स्थानिक नेत्यांनीदेखील नेहमीप्रमाणे जनभावना लक्षात घेऊन तशी मागणी केली. प्रसंगाच्या दुसऱ्याच दिवशी न्यायालयात न्यायाधीशांनी मेरीला तत्काळ फासावर लटकवण्याचा आदेश दिला. या सर्व प्रकारात मेरीचा दोष होता की तिला सोडून जाणाऱ्या केअरटेकरचा होता? सर्कसच्या मालकाचा होता की एल्ड्रिजचा होता? मेरीला मारण्यासाठी उतावीळ जनतेचा होता की झुंडीच्या मानसिकतेसमोर मान तुकवणाऱ्या नेत्यांचा - न्यायाधीशांचा होता? दोष होता तो झुंडीत संवेदना हरवलेल्या माणुसकीचा, त्यामुळेच आपण मेरीसाठी एवढंच म्हणू शकतो की, नफरत की दुनिया को छोड के, प्यार की दुनिया मे खुश रहना मेरे यार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.