‘टेरेस बागों’मे बहार है! (अमित गद्रे)

अमित गद्रे amit.gd@gmail.com
रविवार, 13 ऑगस्ट 2017

टेरेस हा इमारतीचा तसा ओकाबोका भाग असला, तरी अनेकांनी या भागाला हिरवंगार करून टाकलं आहे. टेरेसवर सुरेख बागा करून भाजीपाल्याबरोबर चक्क कलिंगड, डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू अशी झाडंही अनेकांनी लावली आहेत. या झाडांमुळं पक्ष्यांचाही वावर तिथं वाढला आहे. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून प्लॅस्टिकच्या डब्यांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा वापर करून फुलवलेल्या या टेरेस गार्डनमधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांवर नजर.

टेरेस हा इमारतीचा तसा ओकाबोका भाग असला, तरी अनेकांनी या भागाला हिरवंगार करून टाकलं आहे. टेरेसवर सुरेख बागा करून भाजीपाल्याबरोबर चक्क कलिंगड, डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू अशी झाडंही अनेकांनी लावली आहेत. या झाडांमुळं पक्ष्यांचाही वावर तिथं वाढला आहे. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून प्लॅस्टिकच्या डब्यांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा वापर करून फुलवलेल्या या टेरेस गार्डनमधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांवर नजर.

अ  रे...केवढं सुंदर कलिंगड..आवळाही फळांनी भरलाय...डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू, चिकूलाही फळं दिसताहेत...वाफ्यात मिरची, टोमॅटो, काकडी, कोबी, पालेभाज्याही दिसताहेत...मांडवाच्या आधारानं दुधी भोपळा, कारल्याचे वेल वाढताहेत...कुंड्यांमध्ये गुलाब, झेंडू, लिली, जास्वंद, ऑर्किड फुललंय... कोपऱ्यातील वाफ्यात अडुळसा, गवती चहा, हळद...बागेच्या कोपऱ्यात मधमाशांची पेटी आणि झाडाच्या फांदीच्या बेचक्‍यात पक्षाचं घरटं...हे चित्र शेत किंवा ग्रामीण भागातल्या परसबागेचं नाही, तर पुणे शहरात हौशी बागकाम करणाऱ्यांच्या टेरेसचं आहे!

बागकामाची आवड असणाऱ्यांनी स्वतःच्या कल्पना, अनुभवांतून बंगल्याच्या परिसरात, गच्चीवर, तर काही जणांनी फ्लॅटच्या गॅलरीमध्ये फुलझाडांच्या बरोबरीनं फळझाडं, हंगामी भाजीपाल्याचीही छोट्या-छोट्या वाफ्यांत लागवड सुरू केली आहे. त्याची ‘फळं’ गोमटी आहेत. या बागांतून काही प्रमाणात फुलं, भाजीपाला आणि फळंही मिळतात. बागांत पक्षी, फुलपाखरं आनंदानं बागडतात. महत्त्वाचं म्हणजे फुलं, फळझाडांची निगा राखताना दिवसभरातला ताणतणाव नाहीसा होतो. त्याचा आनंद मनाला सुखावणारा असतो. गेल्या १५-२० वर्षांपासून पुणे शहरात पालापाचोळा आणि घरातला ओला कचरा जिरवत विविधरंगी फुला-फळांनी बहरलेली टेरेस गार्डन्स वाढताहेत. पुण्याच्या बरोबरीनं मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगलीसारख्या शहरांतही टेरेस गार्डन्स दिसू लागली आहेत.

टेरेस गार्डनची वैशिष्ट्यं

  •   ओला कचरा, पालापाचोळा बागेत जिरवून गांडूळखताची निर्मिती. विटांच्या वाफ्यात मातीऐवजी पालापाचोळा, शेणखत, गांडूळखत यांच्या मिश्रणाचा वापर.
  •   पालेभाज्या, हंगामी भाजीपाल्याचं कुटुंबापुरतं वर्षभर उत्पादन. डाळिंब, अंजीर, अननस, मोसंबी, पपई, पेरू, आवळा, केळी, शेवग्याचीसुद्धा प्लॅस्टिक ड्रममध्ये लागवड.
  •   झाडांसाठी जीवामृताचा वापर, सेंद्रीय पद्धतीनं उत्पादनावर भर.
  •   कीड, रोग यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गोमूत्र आणि कामगंध सापळा, मित्र किटकांचाही वापर. सापळा पिकांचंही नियोजन.
  •   उपलब्ध टेरेसचा पुरेपूर वापर करत विविध फुलझाडं, भाजीपाला उत्पादनावर भर. यातून निसर्गाचा आनंद, ताणतणावातून मुक्तता.
  •   बागेत मुनिया, धनेश, भारद्वाज, सनबर्ड, चिमण्या, साळुंखींचा मुक्त संचार.
  •   छंदाबरोबरीनं बागेमध्ये विविध प्रयोग. अनुभवांची देवाणघेवाण.

टेरेस गार्डनचा गट
पुणे शहरात बागकामाची आवड असणाऱ्या गटाचं नाव आहे ‘ऑरगॅनिक गार्डनिंग ग्रुप.’ या गटात एक कुंडी असणाऱ्यांपासून ते मोठी टेरेस गार्डन असलेल्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून सदस्य बागकामातल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी महिन्यातून एकदा एकत्र येतात. व्हॉटसॲप ग्रुप आणि फेसबुक पेजही आहे. गटाचे सुमारे सहाशे सभासद आहेत. गटातर्फे बागकामासंबंधी वाचनालयाचा उपक्रम राबवला जातो.


फळे, भाजीपाल्यांची रेलचेल- प्रिया भिडे
डेक्कन परिसरातल्या प्रिया भिडे यांचं सहाव्या मजल्यावरचं टेरेस गार्डन ही हौशी बागकाम करणाऱ्यांसाठी एक कार्यशाळा. वेलीवर लटकणारा दुधी भोपळा, दोडका, कारली; ड्रममधल्या झाडाला लगडलेले आवळे, अंजीर, लिंबू, केळीचा घड आणि बरंच काही. थोडं पुढे गेलं की, पालापाचोळ्याच्या वाफ्यात हिरव्यागार पालेभाज्या, रसदार अळूची भली मोठी पानं. हंगामी फुलझाडांचे वाफे....हे या टेरेसवर दिसणारं दृश्‍य. या उपक्रमामुळंच यंदा दिल्लीतल्या ‘टेरी’ संस्थेनं भिडे दांपत्याला ‘ग्रीन हिरोज’ या पुरस्कारानं गौरवलं.

पालापाचोळा आणि दररोज स्वयंपाकघरातून वाया जाणाऱ्या ओल्या कचऱ्यातून फुलवलेल्या गार्डनबाबत प्रिया भिडे म्हणाल्या ः ‘‘गेल्या दहा वर्षांपासून आम्ही टेरेस गार्डनमध्ये रमलो आहोत. वाफे करण्यापूर्वी शास्त्रीय पद्धतीनं वॉटरप्रूफिंग करून घेतलं. मातीचा वापर न करता झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्याचा वापर वाफ्यांमध्ये झाडं लावण्यासाठी केला. दर महिन्याला किमान पंधरा पोती पालापाचोळा वाफ्यांत जिरवतो. त्याचबरोबर कोळशाचे तुकडे, दररोजच्या स्वयंपाकातून वाया जाणाऱ्या भाजीपाल्याचे तुकडे वाफ्यांत पसरतो. गेल्या दहा वर्षात घंटागाडीला आम्ही ओला कचरा दिलेला नाही.

‘‘पालापाचोळ्यामध्ये गांडुळं सोडलेली असल्यानं खत तयार होऊन झाडांचं चांगलं पोषण होतं. इतर खतं देण्याची फारशी गरजच नाही. वाफ्यात माती नसल्यानं स्लॅबवरही फारसं वजन येत नाही. महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात घर थंडगार राहतं. हंगामानुसार टोमॅटो, वांगी, घेवडा, गवार, भेंडी, मिरची अशा विविध भाजीपाल्यांनी वाफे भरलेले असतात. मांडवावर दुधी भोपळा, कारली, काकडी, दोडक्‍याची रेलचेल असते. झाडांना गांडूळखताबरोबरीनं शेणस्लरी वापरतो. सेंद्रीय कीडनाशकांच्या वापरानं फळं, भाजीपाल्याची गुणवत्ता चांगली मिळते. काही वाफ्यांमध्ये चाफा, बकूळ, जास्वंद, जाई-जुई, मोगरा यांसारखी विविध हंगामी फुलझाडं; तसंच ड्रममध्ये आवळा, केळी, पपई, लिंबाची झाडं आहेत. या झाडांपासून चांगली फळं मिळतात. बागेतल्या झाडांवर पक्ष्यांनी घरटी केली आहेत. त्यामुळं बागेला एक वेगळेपण मिळालंय. पुणे शहरातल्या विविध सोसायट्यांमधल्या कार्यशाळांत ओल्या कचऱ्याचा वापर आणि बागकामाचे अनुभव मी सांगते. टेरेस गार्डनचं महत्त्व लोकांना पटू लागलंय.’’


पालापाचोळ्यावर फुलली बाग - सुचित्रा दिवाण
‘‘वीस वर्षांपासून आम्ही रोजच्या स्वयंपाकातला ओला कचरा आणि दर वर्षी किमान शंभर पोती पालापाचोळा टेरेस गार्डनमध्ये जिरवतो. विटांच्या वाफ्यात पालापाचोळा, शेणखत, गांडूळ खताच्या मिश्रणात रुजलेला भाजीपाला, फळझाडांची रोपं आता भरभरून उत्पादन देतात. फारच कमी वेळा आम्ही मंडईतून भाजीपाला आणतो,’’ प्रभात रस्त्यावरचे सुचित्रा आणि शिरीष दिवाण सांगतात.

सुचित्रा दिवाण आपले अनुभव सांगताना म्हणाल्या ः ‘‘आम्ही गच्चीचं वॉटरप्रूफिंग केलं. भाजीपाला, फुलझाडांच्या लागवडीसाठी विटांचेच वाफे केले. यामध्ये दर तीन महिन्यांनी पालापाचोळा भरतो. गांडुळांमुळं पालापाचोळ्याचं खत होतं, त्यातून झाडांचं चांगलं पोषण होते. आम्ही हंगामानुसार पालेभाज्या, मिरची, भरताची वांगी, टोमॅटो, भेंडी, चवळी, कलिंगड, टरबूज, हळद, आलं यांची लागवड करतो. मांडवावर कारली, दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडक्‍याचा वेल सोडलेला आहे. आमच्या बागेत दहा प्रकारची ऑर्किड्‌स आहेत. बागेतून गुलाब, शेवंती, मोगरा, जाई, जुई, निशिगंध, झेंडू, जास्वंदीची भरभरून फुलं मिळतात. वाफ्यात अडूुळसा, गवती चहा, कोरफड, स्टिव्हिया, मिरी, लेंडी पिंपळीची रोपं आहेत. आम्ही भाजीपाल्याच्या देशी जातींची लागवड करतो. या जातींची चव वेगळीच आहे. झाडांना तुषार, ठिबक सिंचनानं पाणी देतो. त्यामुळं बागेत पुरेसा ओलावा राहून झाडांची चांगली वाढ होते. या बागेतून दर वर्षी आम्हाला २०-२५ चिकू, १५-२० सीताफळं, १५-२० डाळिंबं आणि लिंबाच्या हंगामात दीडशे फळं मिळतात. झाडांसाठी जीवामृताचा; तसंच कीड, रोगनियंत्रणासाठी सेंद्रीय कीडनाशकांचा वापर करतो.

‘‘यंदा स्टॉबेरीची व्हर्टिकल पद्धतीनं लागवड केली होती. आम्हाला स्टॉबेरीची चार किलो फळंदेखील  मिळाली. टेरेस गार्डनमधून कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला मिळतो. फारच कमी वेळा भाजीपाला विकत आणावा लागतो. फुलं, फळझाडांच्या सानिध्यात सकाळचे दोन तास निसर्गात असल्याचा आनंद मिळतो. दिवस चांगला जातो.’’


‘रिसायकल’ गार्डन- नीला पंचपोर

बाग म्हटलं, की डोळ्यांसमोर मातीच्या कुंड्या, हॅंगिंग बास्केट हे चित्र येतं; पण नवी पेठेतल्या नीला पंचपोर यांची बाग म्हणजे पूर्णपणे प्लॅस्टिक डबे आणि पालापाचोळ्याचं रिसायकल करून केलेली बाग. गच्चीवर शिरल्यावर समोर येतात ते प्लॅस्टिकचे ड्रम. त्यामध्ये शेवगा, पपई, सोनचाफा आणि वांग्यानी लगडलेली झाडं. टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांपासून कलात्मक रितीनं बनवलेल्या कुंड्या. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये ओवा, पुदिना. हॅंगिंग बास्केटच्या जागी प्लॅस्टिक दोरीनं टांगलेले छोट्या डब्यांमध्ये फुललेले चिनी गुलाब, ऑफिस टाइम, मायाळू. प्लॅस्टिक डबे, बाटल्यांपासून ते स्वयंपाकघरातल्या ओल्या कचऱ्यापर्यंत अनेक गोष्टींचा या बागेत पुनर्वापर होतोय.

याबाबत नीला पंचपोर म्हणाल्या ः ‘‘मी गेली सात वर्षं कुंड्यांचा वापर न करता भंगार दुकानातून ड्रम, लहान बरण्या, टब विकत घेऊन त्यांचा वापर करते आहे. जुन्या प्लॅस्टिक बरण्यांमध्ये पालापाचोळा, गांडूळखत भरून त्यात शोभेची झाडं लावली. रोपं लावण्यासाठी वाफ्यांमध्ये मातीचा फारसा वापर न करता पालापाचोळा, स्वयंपाकघरात वाया जाणारी पालेभाजीची देठं, पाला आणि शेणखत मिसळून गांडूळ खत तयार केलं. गच्चीवर दोन विटांचा थर करून वाफे तयार केले. वाफ्यात पालापाचोळा, गांडूळखत मिसळून मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वाटाणा, घेवडा, लाल मुळा, पांढरा मुळा, बीट, गाजराची हंगामानुसार लागवड करते. दोन-चार वाफ्यांत पालक, मेथी, कोथिंबीर टप्याटप्यानं लावली जाते. त्यामुळं वर्षभर कुटुंबाला पुरेसा ताजा भाजीपाला मिळतो. भाजीपाल्याच्या बरोबरीनं जास्वंद, मोगरा, रातराणी, शेवंती, गुलाब, कृष्णकमळाची लागवड केली. एका वाफ्यात हळद, आलं लावलं आहे. दर वर्षी घरी लोणच्यासाठी पुरेसे हळदीचे कंद मिळतात. एका वाफ्यात गवती चहा, ओवा लावलेला आहे.

‘‘प्लॅस्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये अंजीर, पपई, लिंबू, स्टार फ्रूट, ड्रॅगनफ्रूट, ऑलस्पाईसची रोपं चांगल्या प्रकारे वाढताहेत. कुटुंबापुरती लिंबू, अंजीर आणि पपईची पुरेशी फळं मिळतात. हंगामात भरपूर प्रमाणात दुधी भोपळे, कारली, काकड्या मिळतात. हा भाजीपाला दररोज वापरून शेजाऱ्यांनाही वाटतो, इतकी भाजी मिळते. चार-पाच महिने टोमॅटोची रेलचेल असते. दर दोन महिन्यांनी वाफ्यात वाळलेला पालापाचोळा पसरते. त्यावर पालापाचोळ्या कुजवणारे जीवाणूसंवर्धक मिसळल्यानं पाला लगेच कुजतो. कीडनियंत्रणासाठी सेंद्रीय कीडनाशकांचा वापर करते. दररोज स्वयंपाकात वाया जाणारी भाजीपाल्याची सालं या वाफ्यांत पसरते. गांडुळांमुळं पालापाचोळ्याचं दर्जेदार खतात रूपांतर होतं. गेल्या सात वर्षांपासून मी ओला कचरा घंटागाडीला दिलेला नाही. आपण फुलवलेल्या फळा, फुलांचा आनंद वेगळं समाधान देऊन जातो.’’


गार्डन नव्हे, प्रशिक्षण केंद्र- आशा उगावकर
पिंपळे निलख परिसरातल्या आशा उगावकर यांचं टेरेस गार्डन म्हणजे बागकामाचं प्रशिक्षण केंद्रच. गेल्या सतरा वर्षांपासून उगावकर दांपत्य टेरेस गार्डनमध्ये रमलंय. याबाबत आशा उगावकर म्हणाल्या ः ‘‘बंगल्याच्या सभोवती पुरेशी जागा असल्यानं पहिल्यांदा आंबा, चिकू, पेरू, सीताफळ, नारळाची लागवड केली. हळूहळू गुलाब, शेवंती, झेंडू, मोगरा, निशिगंध, सोनचाफा, बर्ड ऑफ पॅराडाईज, ऑर्किडच्या बरोबरीनं लहान वाफ्यांत हंगामी भाजीपाला लागवड करू लागलो.

‘‘आता टेरेसवर विटांचे वाफे करून त्यात शेणखत, माती आणि पालापाचोळ्याचं मिश्रण भरून हंगामी पालेभाज्या, वांगी, टोमॅटो, भेंडी, वांगी, कोबी, फ्लॉवर, अळू, रताळी, शेवगा, मुळा, बटाटा, घेवडा, स्वीटकॉर्नची हंगामानुसार लागवड असते. बांबूचा मांडव करून कारली, तोंडली, दुधी भोपळा, दोडक्‍याची लागवड करतो. त्यामुळं वर्षभर भाजीपाल्याची रेलचेल असते. एका वाफ्यात पपई, तर प्लॅस्टिक ड्रममध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. या सर्वांसाठी जीवामृत, गांडूळ खताचा वापर करतो. कीडनियंत्रणासाठी निंबोळी अर्क, गोमूत्र; तसंच कामगंध सापळ्याचा वापर करतो. गेल्या सतरा वर्षांपासून बागेत ओला कचरा जिरवत आहोत. त्याचं चांगलं खत तयार होते. भाजीपाल्याच्या वाफ्यात झेंडू, तुळस, लसूण, पुदिना ही सापळा पिकं लावतो. त्यामुळं मुख्य भाजीपाल्याचं किडींपासून संरक्षण होतं. आम्हाला दर हंगामात दहा प्रकाराचा भाजीपाला मिळतो. त्यामुळं फारसा भाजीपाला विकत आणावा लागत नाही. अनेक लोक आमच्या बागेला भेट देतात. नवीन गोष्टी शिकतात.’’


टेरेसवर डाळिंब, पेरू, थायलंडची चिंच... - प्रदीप बोडस
पुण्यातल्या नवी पेठ भागात राहणारे प्रदीप बोडस यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड. वर्षभर भाजीपाला, फळझाडांच्या बरोबरीनं टेरेसवर उमललेलं कमळ हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य.

या छंदाबाबत बोडस म्हणाले ः ‘‘मी कमी खर्चांत, कमी श्रमांत विटांची सांधेमोड करून वाफे केले. यात माती मिश्रण न भरता केवळ पालापाचोळा; तसंच घरातल्या स्वयंपाकात वाया जाणाऱ्या भाजीपाल्याचा वापर करतो. वाफ्यात तयार झालेल्या सेंद्रीय मिश्रणात हंगामनिहाय भाजीपाला, फुलझाडांची लागवड करतो. वाफ्यामध्ये चिकू, डाळिंब, थायलंडची चिंच, अंजीर, पेरूचं कलमही लावलं आहे. आता दर्जेदार फळंदेखील मिळू लागली आहेत. फळझाडांच्या वाफ्यातल्या मोकळ्या जागेत पालेभाज्या, ब्रोकोली, झुकिनी, कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, कलिंगडाची रोपं लावतो. त्यामुळं संपूर्ण गच्ची वर्षभर हिरवीगार असते. वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी वाफ्यावर लोखंडी अँगल आणि दोरीचा मांडव केला. उन्हाळ्यात बागेतलं तापमान थंड राहण्यासाठी फॉगर्स लावले आहेत. सेंद्रीय खतं आणि कीडनाशकांच्या वापरावर माझा भर आहे. आज माझ्या बागेतल्या झाडांवर लेडी बर्ड बीटल, कोळी या सारखे मित्रकीटक दिसतात. गेल्या सोळा वर्षांपासून या बागेतून घरापुरती भाजी, फळं मिळतात. महत्त्वाचं म्हणजे फळझाडं, फळं-फुलांच्या सानिध्यात जाणारा वेळ मानसिक शांतता आणि नव्या गोष्टींसाठी हुरूप देणारा ठरतोय.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit gadre write article in saptarang